-अविनाश दुधे
‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर उर्फ गोळवलकर गुरुजी यांच्या ‘बंच ऑफ थॉट्स’ यांच्या पुस्तकातील विचार संयुक्तिक नाहीत . ते विचार आता कालबाह्य झाले आहेत’ असे विधान संघाचे विद्यमान सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज दिल्लीत केले . भागवतांच्या या विधानांमुळे लगेच संघ बदलत आहे, हे मानण्याचे कारण नाही . पण कुठल्या का कारणाने होईना संघ जाहीरपणे आतापर्यंत संघाचे वेद, बायबल मानले जाणाऱ्या पुस्तकाला, त्यातील विचारांना नाकारतात ही महत्वाची गोष्ट आहे . या विषयात काही वर्षापूर्वी लिहिलेला लेख ‘मीडिया वॉच’ च्या वाचकांसाठी…
–संपादक
…………………………………………………………………………………………………….
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांची कोणत्याही काळातील भाषणं वा त्यांचं लेखन अभ्यासलं तर ते वरवर अतिशय आकर्षक, संतुलित व समग्र विचार करणारं वगैरे आहे, असं वाटतं. मात्र त्या आकर्षकतेला न भुलता त्यांच्या लेखन व भाषणांची सखोल तपासणी केली तर त्यातील फसवेपणा व लबाडी सहज लक्षात येते. संघाचे विद्यमान सरसंघचालक मोहन भागवत यांचं ताजं भाषण याचं प्रकारात मोडणारं आहे. जयपूर येथे एका स्तंभलेखकांच्या परिषदेत बोलताना त्यांनी ‘प्रचलित हिंदू धर्माचे शास्त्रीय कसोटीवर मूल्यांकन होणे गरजेचे आहे. यामध्ये ज्या मूल्यांना शास्त्रीय आधार नसल्याचे सिद्ध होईल, अशा मूल्यांचा त्याग केला पाहिजे,’ असं विधान केलं. वरवर पाहता हे विधान अतिशय क्रांतिकारक वाटतं. जगातील हिंदूंच्या सर्वात मोठय़ा संघटनेचा प्रमुख हे असं बोलतोय यावरून संघ आता बदलतोय, संघाची मंडळी बघा कसा आधुनिक विचार करतात आणि काळानुसार बदलतात, अशी अनेकांची भाबडी समजूत होण्याची दाट शक्यता आहे. मात्र याच भाषणातील आणखी काही वाक्य तपासलीत तर भागवतांच्या विधानातील फोलपणा लक्षात येईल. ते म्हणतात, ‘सर्व विषय आणि समस्यांकडे हिंदू जीवनविषयक तत्त्वज्ञानाने पाहायला हवं. केवळ हिंदू धर्मातच जगाला संतुलितपणे पुढे नेण्याची क्षमता आहे वगैरे वगैरे.’ ही हिंदू जीवनविषयक तत्त्वज्ञानाची कॅसेट संघाचा प्रत्येक संघचालक व प्रमुख नेते ठिकठिकाणी वाजवीत असतात. मोहन भागवतांचा लौकिक अतिशय मेहनती व उत्तम संघटक असा आहे. मात्र तत्त्वचिंतक किंवा काही नवीन विचार करणारा नेता म्हणून त्यांची ख्याती कधीच नव्हती. त्यामुळे भागवत जे हिंदू जीवनविषयक तत्त्वज्ञान म्हणतात ते संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी संघीयांच्या डोक्यात हिंदू तत्त्वज्ञान म्हणून जे काही घुसविलं आहे, तेच आहे हे स्पष्ट होतं.
जात पात धर्म वर्ण रूढी अत्यंत घातकवाईट परंपरा निर्माण झाल्या आहेत त्या ईश्वर निर्मित असल्याबद्दल संघ परिवार स्थापन झाल्यापासून 95 वर्षे आणि भटब्राह्मण प्रवृत्तीचे लोक हजारो वर्षापासून सांगत आले आहेत आणि बहुजन समाज आंधळेपणाने वागत आहे सामाजिक सुधारणावादी महामानवांच्या प्रयत्नाला यश येत नाही संत कबीर संत तुकाराम महाराज महामानव योगी संत गाडगेबाबा आणि या देशातील थोर विचारवंतांनी जे प्रबोधन केलेले आहे त्यामुळेही समाजामध्ये काहीही फरक पडत नाही यासाठी क्रांतिकारक कोणते उपाय योजले पाहिजेत ते आधुनिक 21व्या शतकात पर्यंत जी मानवाने विज्ञानाच्या आधारे प्रगती केलेली आहे त्याला अनुसरूनसमाज सुधारकांनी निश्चितपणे ठरविले पाहिजे