ग्रीष्मकळा…

– आशुतोष शेवाळकर

उन्हाळा आता चांगलाच तापायला लागला आहे. तापणारा उन्हाळा मला फार आवडतो. तसे मला सगळेच ऋतू आवडतात. ऋतुबदलाच्या, नव्या ऋतूच्या चाहुलीच्या काळापासूनच माझ्या
मनात त्या ऋतूची ‘उमंग’ येत असते. पण, त्यातल्या त्यात उन्हाळा हा माझ्यासाठी आत्म्याच्या सगळ्यात जवळं घेऊन जाणारा काळ असतो. माझा जन्मच ऐन उन्हाळ्यातला असल्यामुळे कदाचित उन्हाळा मला असा मुळाच्या जवळ घेऊन जात असावा.

उन्हाळा जमिनीत अनावश्यक वाढलेले अस्ताव्यस्त तण जाळून टाकतो, शेतकरी जमीन नांगरून धरतीचं पोट उघडं करून ठेवतो, ऊन त्यात शिरून त्यातले जीव-जंतू मारून पुढे येऊन पडणाऱ्या बीजाचा जीव निर्धोक करत असतं; तसाच उन्हाळा कदाचित माझ्या मनाची साफसफाई, मशागत करत असावा.

रंगपंचमीच्या दिवशी रंगांनी माखल्यावर थंड पाण्याची आंघोळ किंवा नदीत डुंबण्याची ‘उमंग’ मनात आली की मला उन्हाळ्याची चाहूल लागते. मग एप्रिलमधे कधीतरी दुपारी गरम हवेच्या झावेची झुळूक सपकन चेहऱ्यावर आली की, मग मला या ग्रीष्मकळा सुरू होतात.
पाऊस आणि पावसाळ्यावर किती साऱ्या कविता जगातल्या सगळ्यांच भाषांमधे आहेत. अगदी मराठीतही बालकवींपासून ग्रेसांपर्यंत कवींना पावसाने लोभात पाडलं आहे. हिंदी सिनेमांतही कितीतरी गाणी पावसावर आहेत. साहित्यात थंडीही कुठे ना कुठे गुलाबी थंडी म्हणून येते आणि हिंदी सिनेमातही थंडी काही गाण्यांमधून येते. पण उन्हाळा मात्र सगळ्या प्रतिभावंतांचा नावडताच दिसतो. उन्हात उभं राहायची गुरुजींनी दिलेली शिक्षा किंवा ‘तुझं घर उन्हात बांधीन’, अशा बालसुलभ धमक्या असाच उन्हाचा संबंध साहित्यात शिक्षेशीच जोडलेला दिसतो.

आपण विषववृत्तावर राहतो म्हणून नाहीतर इंग्लंड-अमेरिकेत ऊन पडलं की सण साजरा करायचा दिवस, ‘सनी डे’ असतो. लोक सुट्या घेऊन ऊन खायला बाहेर पडतात. दिवसभर ‘आउट डोअर’ राहतात. उन्हासाठी अधिक आसुसलेले गोरे विषववृत्तीय प्रदेशातल्या देशांमध्ये सुटीसाठी येऊन बिचवर अर्धवस्त्र पडून अंगात ऊन जिरवून घेत असतात. गोऱ्या ललना ‘टॅन’ व्हायला भारतात येतात आणि भारतीय ललना ‘टॅन’ घालवायला ब्यूटी पार्लर मधे जातात.

उन्हाळा आला की मला माझं गाव ‘वणी’ आठवतं. उन्हाळा खरा भोगायचा असेल तर तो तिथे जाऊन भोगावासा वाटतो. एकतर वणी-चंद्रपूर भागात नागपूरपेक्षा २-३ डिग्रीनी टेम्परेचर जास्त असतं. यवतमाळ तर आमच्या लहानपणी ‘हिल स्टेशन’ होतं. रात्री बाहेर झोपल्यावर पहाटे तिथे अंगावर चादर घ्यावी लागायची.

वणीत उन्हाळ्यात रात्री का असेना पण पांघरूण घ्यायची कल्पनाही सहन न होणारी असायची. मे मधल्या काही रात्री तर झाडांचं एक पानही न हलणाऱ्या, वातरहित अशा, हातांनी वाळ्याचा पंखा फिरवता फिरवता घामेजले होत जागण्याच्या असायच्या. लहान गावात आजूबाजूला उंच इमारती नसल्याने चारी बाजूंनी येणाऱ्या उन्हात वाळवायला घातल्यासारखी एक मजली घरं असतात. आतल्या भिंतींना हात लावावा तर त्याही गरम असतात. नळातून पाणी गरम येतं. साठवून अंघोळीसाठी पाणी थंडं करावं लागतं. आंघोळ झाल्यावर टॉवेल अंगावर ओढावा तर टॉवेलचा सर्वांगभर चटका लागतो इतका तो गरम असतो.

दोन बादल्या भरून अंगणात ठेवाव्यात व संध्याकाळी त्या झावभरल्या पाण्याने आंघोळ करावी म्हणजे दिवसा लागलेलं ऊन उतरतं असा उन्हाळ्यावर ग्रामीण उपाय असतो. दिवसभर उन्हात ठेवलेले हे पाणी हवेने उलटं विहीरीच्या पाण्यासारखं उबदार थंडं झालेलं असतं. उन्हाळा ऐन मध्यात आला की, रात्री वातावरणात हवेची झुळुकसुद्धा नसते. अंगणात झोपलं असताना भर मध्यरात्रीचा घाम अनुभवायचा असला तर वणी, चंद्रपूरलाच जावं लागतं.
मला घाम होऊन वाहायलाही आवडतं. दुपारी कधीतरी कूलर बंद करून घामाच्या धारा अंगातून वाहू द्याव्यात. वितळून आपण हलकं होतो आहोत, आपलं रंध्र-रंध्र मोकळं होतं आहे असं वाटतं. रोजचा व्यायाम झाल्यावर शवासनात दहा मिनिटं शांत पडलं की, शरीरातली धमणी न धमणी स्पंदत असते, तेव्हा रंध्रा-रंध्रातून वाहणारा घाम तुम्हाला वितळवून हलकं हलकं करून टाकत आहे असं वाटत असतं.

सशक्त माणसाने थंडीत आणि कडक उन्हातही कान न बांधता, डोकं न झाकता बाहेर फिरावं. सृष्टीचा अतिरेक सहन करायची शक्ती आपल्या शरीरात निसर्गानेच दिलेली असते. वापर सोडला की ती अस्तंगत होते. मग थोडीशीही थंडी, थोडंही ऊन बाधायला लागतं. बांधून, गुंडाळून फिरण्याचा हा बचाव वृद्धापकाळासाठी शिल्लक ठेवावा.

निसर्गापासून दूर नेणे हा वैभवापासून येणाऱ्या साधनांचा एक दोष असतो. श्रीमंती माणसाला अशक्त आणि अकाली वृद्ध करते. श्रीमंतीला आपल्या अंगावर बहरू, फळू, फुलू द्यावं. तिची सावली, फळं, फुलांचा गंध उपभोगावा, जगाला वाटावा. पण ती जेव्हा आपले कोमल हात आपल्या मुळाखालपर्यंत पसरवून आपल्याला सुखावण्याचे प्रयत्न करते, तेव्हा वेळीच ते कोमल हात आपण कठोरपणे झिडकारावेत. या कोमल हातांमध्ये आपलं जगणंच मुळापासून उखडण्याचं सामर्थ्य असतं. मुळं जमिनीत राहिलीत तरच आपलं जगणं सकस आणि समृद्ध होत असतं. कोमलता हे मुळांचं प्राक्तन नाहीच. कठोरता हीच त्यांची अनुवंशिक आवश्यकता आहे. पानं, फळं, फुलं. हाच त्यांच्या कोमलतेचा आविष्कार आहे.

(लेखक शेवाळकर डेव्हलपर्सचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत)

[email protected]

Previous articleडॉ. एलिसा ग्रॅनॅटो: कोरोना विषाणूची लस टोचून घेणारी महिला
Next article‘व्हेंटिलेटर’ म्हणजे काय, तर भावनांची किंमत कळणारं यंत्र
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.