-प्रमोद मुनघाटे
‘राशोमान’ हा अकिरा कुरोसावा या जपानी दिग्दर्शकाचा कृष्णधवल सिनेमा पाहताना मला राहून राहून सारखी ग्रेसची आठवण येत होती. या सिनेमात एका सामुराईची गोष्ट आहे. जंगलातून चाललेल्या सामुराईच्या बायकोवर बलात्कार होतो आणि त्याचा खून होतो. धुवाधार पाऊस पडत असताना या घटनेची चर्चा एक सामान्य माणूस, एक लाकुडतोड्या आणि एक पुरोहित करीत असतात. वास्तव आणि सत्य परस्परांपासून किती भिन्न असू शकतात, याच्या अनेक शक्यता या सिनेमातील एकाच घटनेवरील वेगवेगळîा पात्रांच्या कबुलीजबाबामुळे येतात. ग्रेसच्या व्यक्तित्वाच्या आणि कवित्वाच्या संदर्भात बोलायचे झाल्यास वास्तव आणि सत्यासोबत आणखी एक आयाम जोडावा लागतो, तो म्हणजे, स्वप्न! स्वप्न, वास्तव आणि सत्य यांच्या परस्परप्रक्रियेतून ‘ग्रेस’ नावाची एक चालतीबोलती संकल्पना मराठी साहित्याच्याच नव्हे तर काळाच्या एका अवकाशात आपल्यापुढे जी सिद्ध झाली, तिचा अनुबंध वेगवेगळ्या पातळ्यांवर राशोमानमधील त्या वास्तव आणि सत्याच्या संबंधाच्याच संदर्भात नव्हे तर त्या सिनेमातील मसागो या नायिकेच्या ‘चारित्र्याच्या’ संकल्पनेशी मला जोडावासा वाटतो.
ग्रेसची कविता ही एक कलाकृती असेल, पण ग्रेसचे व्यक्तित्व आणि त्याच्या व्यक्तित्वाचे ताणेबाणे तोलून धरणारे त्याचे वाङ्मयीन आयुष्य हे त्यापेक्षा अधिक कलात्मक होते. हे असे विधान करणे म्हणजे, ग्रेसच्या काव्यापासून दूर पळून जाण्यासाठी निवडलेली सोयीस्कर पळवाट शोधणे असेही कुणाला वाटण्याचा संभव आहे. म्हणजे, एखाद्या जबाबदार नागरिकाने विवाहबाह्य संबंधांचे समर्थन करावे तसे ग्रेसच्या कवितेचे असे वाङ्मयबाहî आकलन मांडणे योग्य आहे का असा मला स्वतःलाच प्रश्न पडतो. कारण ग्रेसची कविता आणि त्यांचे ललितबंध आपल्यासमोर आहेत, म्हणून आपल्याला ‘ग्रेस’ विचारार्थ आहे, नाही तर……?
पण असा प्रश्न उपस्थित करताना पुन्हा ग्रेस यांच्या आई कवितेवरची त्यांची स्वतःचीच प्रतिक्रिया आठवते. आई आपल्या बाळाला मांडीवर घेऊन स्तनपान करीत असतानाही, आपल्या उजव्या हाताने नाकातील बेसरबिंदी चाचपून पाहत असते. तिची बेसरबिंदी ही तिच्या संपूर्ण ऐंद्रिय सौंदर्यसत्तेचे केंद्रबिंदू असते. तिच्या मांडीवर बाळ आहे म्हणून ती आई आहे, पण पण त्या आधी ती बाई आहेच. ते महत्त्वाचे आहे. ज्यांनी ज्यांनी ग्रेसला प्रत्यक्ष अनुभवले आहे, त्यांच्यासाठी ग्रेसच्या काव्याइतकेच स्वतंत्रपणे ग्रेस महत्त्वाचा आहे, किंबहुना तोच अधिक महत्त्वाचा आहे.
‘राशोमान’ सिनेमा सुरू होतो तेंव्हा प्रचंड पाऊस पडत असतो. खूप वेळ नुसता पाऊस. आणि तो जीवघेणा पाऊस उघडण्याची वाट पाहणारी माणसे जंगलात सापडलेल्या सामुराईच्या प्रेतावरून त्याच्या मृत्यूचे कारण आणि बायकोवर झालेल्या बलात्काराच्या घटनेची शक्यता याबाबत चर्चा करीत असतात. लाकुडतोड्याने फक्त सामुराईचे प्रेत जंगलात पाहिले आहे. बलात्काराचा आरोप असलेल्या दरोडेखोराची तुरुंगात जबानी होते. सोबतच मसागोची आणि ‘माध्यमा’च्या माध्यमातून सामुराईचीही साक्ष नोंदविली जाते.
प्रत्येकजण घटनेचे तपशील वेगवेगळे सांगतात, पण सगळ्या निवेदनांचा ( आणि एकूणच त्या सिनेमाचा ) प्रथमदर्शनी केंद्रबिंदू म्हणजे सामुराईची देखणी बायको मसागो हिचे चारित्र्य! नवऱ्यासोबत ती जंगलातून जात असते. सामुराईने सोबतच्या घोड्यावर आपल्या रूपगर्विता बायकोला बसवले आहे. त्या आडवाटेवर दरोडेखोर आडवा येतो. मसागोच्या मोहात पडून दरोडेखोर सामुराईची हत्या करतो हे एक निवेदन. तिच्यावर तो बलात्कार करतो, हे दुसरे निवेदन. मसागोला सामुराई आणि दरोडेखोर यांच्यात निवड करायची होती म्हणून तिने सामुराईला दरोडेखोराशी लढण्याचे आव्हान दिले, हे तिसरे निवेदन. की तिला सामुराई नकोच होता म्हणून त्याच्या हत्येसाठी तिने दरोडेखोराला मदत केली?
ही सगळी घडलेल्या वास्तवाची वेगवेगळी रूपे आहेत. पण अर्थात यामागील सत्य एकच असणार आहे, ज्याचा संबंध फक्त आणि फक्त सामुराईच्या रूपगर्विता बायकोच्या चारित्र्याशी आहे, आणि ज्याचे रहस्य शोधण्याचे प्रयत्न विश्वाच्या निर्मितीपासून आजपर्यंत कोणत्याही न्यायालयाला कधीच करता आले नाही. किमान एव्हढे तरी एक सत्य सिनेमा संपल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात एखाद्या अक्राळविक्राळ श्वापदाप्रमाणे वळवळत राहते.
ग्रेसचे व्यक्तित्व आणि कवित्व अशाच मसागोच्या गूढ स्त्रीत्वाच्या सनातन अंधारगर्भाचा शोध घेत व्याकुळ झालेले आपल्याला दिसते. त्यासाठी त्यांनी आयुष्यभर तो अंधारगर्भ सरोगेट मदर सारखा आपल्या लौकिक शरिरात कसा जोजवला होता, याचे साक्षीपुरावे मात्र त्यांच्या सगळîा ललितबंधातून आणि कवितांमधून सापडतात, हाच तो अनुबंध आहे.
□
ग्रेसची पहिली ओळख त्यांच्या ‘साजण’ या कवितेपासून झाली. संध्याकाळ झाली आहे. माझ्या वडिलांचे काही कवी मित्र घरी बसले आहेत. त्यांना चहा-पाणी, कुणाला सिगारेट अशी सरबराई करण्याचे काम माझ्याकडे आहे. पण माझे सगळे लक्ष वडिलांच्या काव्यनिरूपणाकडे आहे. ते त्यांच्या भरदार आवाजात कवितेची एक एक ओळ तीन-तीनदा उच्चारत आहेत,
तुझा आला गे साज
नको त्याच्यापुढे जाऊ
त्याने यात्रेत भेटल्या कोण्या
पोरीच्या देहाला
दिले आभाळाचे बाहू….
त्याला हात नाही वेडे
उभा अंधारी साजण
तिने जीव दिला तरी
याने वाहत्या पाण्याचे
इथे आणिले पैंजण….
ग्रेसची कविता म्हणजे दुर्बोध शब्दमांडणीचा खेळ आहे, आहे, असा माझ्या वडिलांच्या मित्रांच्या मुख्य आरोप आहे, आणि त्यांनी वडिलांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. ते जिवाच्या आकांताने ग्रेसच्या कवितेतील अर्थांचे तरल पापुद्रे आपल्याजवळच्या सगळîा शब्दसामर्थ्याने उलगडू पाहत आहेत. पण किनाऱ्यावर आलेली लाट परत जाऊन किनारा कोरडा उरावा तसे त्यांच्या मित्रांचे कोरडे चेहरे पाहून ते अधिकच व्याकूळ होतात. मग ‘साजण’ कवितेतील दुःखद सौंदर्याचा रसास्वाद ऐकताना घरी जायचा विसर पडलेले त्यांचे मित्र दुर्बोधतेचे आरेापपत्र ठेवलेल्या ‘संध्याकाळच्या कविता’ विनाकारण कुरवाळत बसतात. ‘त्याला हात नाही’ म्हणजे काय त्या ‘साजणचे अंधारात उभे राहणे’ म्हणजे काय आणि ‘तिने जीव दिला तरी’ याने आणलेले ‘वाहत्या पाण्याचे पैंजण’ म्हणजे काय, हे मी बारा-तेरा वर्षांचा असताना समजून घेत होतो.
□ □
नागपूर आकाशवाणीत ग्रेसची प्रथम भेट झाली. त्यांनी घरी येण्याचे निमंत्रण दिले. पुष्कळदा घरी गेलो. बरेचदा ते टीव्हीवर सिनेमा बघत बसलेले दिसत. ग्रेससमोर बसलो असताना ग्रेसचे डोळे, नजर, ओठांची हालचाल, वास्तवापलीकडे घेऊन जाणारा त्यांचा आवाज, हातवारे आणि त्यांच्या बोलण्यातील शब्दांचे काळजीपूर्वक ओघळणे, हे सर्व अनुभवताना वाटायचे की हे स्वप्न की सत्य की नुसता भ्रम?
ग्रेसशी कोणत्या पुस्तकावर आणि कवितेवर बोलण्याचा प्रश्नच नव्हता. पण मी त्यांना मला आवडलेल्या ‘सौदागर’ सिनेमाविषयी मी बोलायला लागलो तर त्यांनी मला थांबवलं आणि स्वतःच त्या सिनेमातील नूतनचा अभिनय असलेल्या भूमिकेतील दुःखाचे पदर त्यांच्या अनोख्या शैलीत माझ्यापुढे उलगडू लागले. त्यांचे हातवारे आणि त्यांच्या चेहऱ्यावरील थरथर बघून मला आता टचकन रक्त येईल असे वाटणारे नूतनचे टपोरे डोळे मला साक्षात दिसायला लागले. हा ग्रेस त्यांच्या मी वाचलेल्या कवितेतील ग्रेसपेक्षा वेगळा नव्हता, पण हा अधिक आकर्षक होता. म्हणूनच म्हणावयाचे की, ग्रेसच्या काव्याइतकेच स्वतंत्रपणे ग्रेस महत्त्वाचा आहे, किंबहुना तोच महत्त्वाचा आहे. कारण इतर कवींच्या देहातून त्यांची कविता वगळली तरी काय उरते? नाही सांगता येत.
‘साजण’ कवितेतील ‘ती’ मला वाटते, ग्रेसच्या एकूण काव्यातीलच नव्हे तर भौतिक व्यक्तिमत्वातील एक सर्वव्यापी अस्तित्व आहे. ग्रेसने आपले सर्व अस्तित्वच त्या वेदनेची मूर्ती असलेल्या ‘स्त्रीत्वा’त विलीन करून टाकले आहे. यात्रेत भेटलेल्या पोरीला आभाळाचे बाहू देऊन टाकल्यावर मग उरले काय? तीच भळभळती जखम घेऊन आयुष्यभर ग्रेसने आपल्या शब्दाना वाहत्या पाण्याचे पैंजण बांधून ठेवले आहे.
कवितेत लक्ष्यार्थ आणि आणि व्यंग्यार्थ असतो म्हणून कवितेचा अर्थ लावू पाहणाऱ्याने तरी मुख्यार्थाच्या पलीकडे जाऊ नये, ही संपादकांची अपेक्षा मी कशी पूर्ण करणार? ग्रेसच्या कवितांमधील मिथिला, उर्मिला आणि अॅना (कॅरेनिना) यांच्या सनातन दुःखाचा तो अपमान नाही का? ते दुःख नाहीच कुणाला समजणार. एखादाच महेश एलकुंचवार ग्रेसला नागभूषण अवार्ड देताना ते दुःख आणि त्या दुःखाचा ग्रेसच्या हृदयातील पाझर आपल्या भाषणातून समजून घेत असतो. इन्ग्रीड बर्गमनचे ग्रेस नाव धारण करणारा हा कवी त्या ‘साजण’ कवितेतील वेड्या सखीचे दुःख आयुष्यभर आपल्या उरात जोजवत राहिला.
समीक्षक विचारतात की या सगळ्या वाङ्मयबाह्य शाप-उःशापाचा काय उपयोग? ग्रेसच्या कवितेतून काही संप्रेषण होत नसेल तर ती कविता रसिकांशी कसा संवाद घालणार? आणि शब्दांना अर्थांशिवाय अस्तित्व नसेल तर ‘शुद्ध कविता’ या प्रकाराला तरी अर्थ आहे का? येथे परत वाङ्मयबाहî शब्दाप्रमाणे विवाहबाहî या शब्दाचे उदाहरण घेण्याचा मोह मला आवरत नाही. विवाहबाहî संबंधांच्या अपरिहार्यतेमुळे रेल्वेच्या रूळावर जीव देणाऱ्या अॅना कॅरेनिनाचे दुःख शब्दबद्ध करू पाहणाऱ्या काउंट लिओ टालस्टायला कुणी तरी असे वाङ्मयबाह्य प्रश्न विचारण्याची हिंमत करेल का की त्याने अॅना कॅरेनिनाचे विवाहबाहî संबंध कां मांडले?
‘राशोमान’ सिनेमातील धुवांधार पाऊस आणि त्या रूपगर्विेतेच्या मोहातून झालेल्या हत्येच्या गुन्ह्यात अडकलेल्या साक्षीदारांच्या साक्षी हे सगळे ग्रेसच्या कवितेसारखे आहे. सगळे काही दुःखद, पण त्या दुःखाला व्यापून राहिलेले स्त्रीत्वाच्या सौंदर्याचे अस्तर. हे अस्तर गर्भाशयातील अस्तराप्रमाणे रक्तबंबाळ होऊ न देण्याची जोखीम ग्रेसने आयुष्यभर उचलली म्हणून संध्याकाळच्या कविता आपल्यापुढे आहेत. याही अर्थाने ग्रेस हे सर्वस्वी स्त्रीत्वाचे अखंड दुःख पेलणारे व्यक्तित्व म्हणून तुमच्या-माझ्यात अस्तित्वात होते. ते आता नाही.
□□
ग्रेसला एकदा आमच्या गावी यायचे होते. गडचिरोलीला. घेऊन गेलो. जाताना वैनगंगेचा लांबलचक पूल….एप्रिल महिना असूनही वैनगंगेला भरपूर पाणी होते….लाटा उसळत होत्या…ग्रेसनी गाडी थांबवली….खूप वेळ पाण्याकडे नुसतेच बघत राहिले…त्यांच्या कवितेतील गंगा त्यांनी प्रत्यक्षात कधी बघितली नव्हती असे ते एकदा म्हणाले होते, पण त्यांचे न चुकता रोज पहाटे चार वाजता पोहायला जाणे आम्हा सगळ्यांना माहित होते. ग्रेसनी कुठलाही कार्यक्रम नको असे सांगितले असताना वडिलांनी एक घाट घातलाच होता. त्यांच्या शाळेत नव्याने बनविलेल्या ‘क्षितिज’ उद्यानात ग्रेसच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम त्यांनी ठेवलाच होता. भरदुपारी एक वाजता त्यांनी झाड लावले….तेव्हा ते वडिलांना म्हणाले, मला दुपारच्या उन्हाची अजिबात भिती नाही, कारण माझा जन्मच अशा वैशाख उन्हात झाला आहे.
आज त्या उद्यानात ग्रेसनी लावलेल्या झाडाच्या बुंध्याशी संगमरवरी दगडावर त्यांनी वडिलांच्या विनंतीला मान देऊन लिहिलेल्या ओळी, मी गेलो की प्रत्येकवेळी पाहतो…
बागेतील वृक्ष लतांना,
तू घालीत जावे पाणी,
सुचतील तुलाही वेडे,
सरणावर काही गाणी.
□ □
मग पुढे ग्रेसनी लाल रंगाची मारुती अल्टो गाडी घेतली आणि एक दिवस अचानक संध्याकाळी फोन…तुमच्याशी दाराशी आलो आहे…त्यांच्या सोबत माझा एक अगदी जवळचा मित्र कृष्णा होता. मी संध्याकाळी माझ्या गच्चीवर बसलो होतो. समोरच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या आवारातील अत्यंत घनदाट झाडेझुडपे न्याहाळत. ग्रेसला आणून तिथेच गच्चीवर बसविले. खूप कौटुंबिक विचारपुस झाली…..पण तेव्हा ग्रेसकडे पाहताना सारखे काही तरी चुकल्यासारखे वाटत होते…त्यांचे थकलेले शरीर….चष्याआडचे खोल गेलेले डोळे…..पण आवाजात मात्र तीच जरब होती…खानदानी सौंदर्याचा दुर्मिळ स्पर्श असलेली…..तीच त्यांची माझी शेवटची भेट होती.
काही गोष्टी समजून घेता येत नाही…किंवा समजून घेण्याची इच्छाच नसते आपली, तसे ग्रेसचे एकंदर व्यक्तित्व आहे. त्यांच्या कवित्वाच तर प्रश्नच नाही. गरज असेल त्यांने घ्यावे समजून…पण माझ्या वडिलांनी मात्र त्यांच्या कवित्वावर आणि कवितेतल्या व्यक्तित्वावर एक कविताच केली आहे. ग्रेसबद्दल कधी कुतुहल उफाळून आलेच वाटलेच मनात तर मी ‘युगवाणी’च्या एका अंकात प्रसिद्ध झालेली ती कविता वाचून घेतो…..
हे खोल नदीचे पात्र
सोडून अनावर पाय,
हा कोण असा अपरात्री
ओरडे मोकलून धाय…
आर्ताचे चुंबन वेडे
चुंबुनी आर्त गरगरती
ते डंख अनावर आता,
परतीच्या मार्गावरती…
का पारजल्याविण फुलती
ही सूर्यफुलाची जात
अग्नीविन जळत रहावी
ही अभिसाराची रात्र।
( -गो. ना. मुनघाटे)
□ □
(लेखक नामवंत समीक्षक आहेत)
77090 12078
मुनघाटे सरांनी कवी ग्रेसांबद्दल व्यक्त केलेल्या भावना अतिशय ग्रेसफुल….