‘भाजप’ ही ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’ची राजकीय शाखा! भारताची ‘हिंदुराष्ट्र’ अशी ओळख करणे, हे संघाचे अंतिम उद्दिष्ट ! त्यासाठी ‘हिंदू संघटन’ आवश्यक! पण ते संघटन हिंदूंतील जाती-जमातींच्या छेदा-भेदांमुळे, देशाच्या फाळणीतून पाकिस्तानची ‘मुस्लीम राष्ट्र’ म्हणून निर्मिती होऊनही झालं नाही. ‘भाजप’चा पूर्वावतारी ‘जनसंघ’ने ‘हिंदू वोट बँक’ तयार करण्यासाठी बरीच वर्षं गाय वापरली. पण ती इंदिरा गांधींनी ‘गाय- वासरू’ला पक्षाची निशाणी बनवल्याने ‘काँग्रेस’ला पावली. १९७५ ते ७७ या आणीबाणी काळानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाप्रमाणे ‘जनसंघ’ही जनता पक्षात विसर्जित झाला आणि अडीच वर्षं सत्तेचे लोणी खाऊन झाल्यावर ‘जनता पक्षा’त फूट पाडून १९८० मध्ये ‘भारतीय जनता पक्षा’च्या अवतारात प्रकट झाला.
‘मूर्ती दूध पिते’ हीदेखील एक सुविहित रथयात्राच होती. मात्र १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत ‘भाजप’ला त्याचं सत्ता-फळ मिळालं नाही. ‘काँग्रेस’च्या पाठिंब्यावर ‘जनता दल – डाव्या आघाडी’चं ‘देवेगौडा व गुजराल सरकार’ सत्तेत आलं. ते दीडच वर्षे टिकलं. त्यानंतर १९९८ व १९९९ या एक वर्षाच्या झालेल्या दोन लोकसभा निवडणुकीत ‘वाजपेयी सरकार’च्या रूपात ‘भाजप- संघ परिवारा’ला सत्ता फळाचा लाभ झाला. या काळात देव-देवतांना वापरणारे चमत्कार घडवले गेले नाहीत. तथापि, पर्यटनाच्या नावाखाली देव-धर्म-भक्तीचा व्याप वाढवला. आसाराम, राम रहीम, रामदेव बाबा या नव्या बुवा- बाबांना हिंदुत्ववादी राजकारण पुढे रेटण्यासाठी मैदानात उतरवण्यात आलं. ‘हिंदू जागृती’च्या नावाखाली ‘सनातन’ची साखळी देशभर निर्माण करण्यात आली. ती चमत्काराच्या गोष्टी सांगत मजबूत करण्यात आली. ही सारी ‘दूधखुळ्या गणपती चमत्कारा’ची किमया होती.