सौजन्य -लोकसत्ता
उद्योग उभारून तो भरभराटीला आणण्यासाठी खस्ता खाण्यापेक्षा भुजबळ, राणे, जोशी वा महाजन मार्ग किती सोपा! खरे तर अशा कर्तृत्ववानांचे अनुकरण होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे होते. मात्र सरकारने सामाजिक समतेसाठी कटिबद्ध असणाऱ्या भुजबळ यांच्यावरच कायद्याचा बडगा उगारला. यामागे निश्चितच फडणवीस आणि दीक्षित या प्रतिगामी, जातीयवादी उच्चवर्णीय दुकलीचे कारस्थान असणार यात आम्हाला तरी शंका नाही..
सामाजिक समतेसाठी आपले आयुष्य खर्चणारे, अ. भा. सामाजिक समता परिषदेचे अध्वर्यू, महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या राजकीय, सामाजिक भूमिकांचे अनुयायी, राज्यातील सुमार पुरोगामी पत्रकार आणि महानगरी माध्यमवीरांचे आधारस्तंभ असे अनेक काही असलेल्या आदरणीय छगन भुजबळ यांच्या संपत्तीचा तपशील पाहून वासणारा ‘आ’ बंद होण्यासाठी दोन्ही हातांची दहा बोटेही पुरणार नाहीत. २५ शय्यागृहांचा बंगला, तो कमी पडेल म्हणून आणखी दोनपाच बंगले, नवी मुंबईत सदनिकांची माळ, शिवाजी पार्कात सदनिका, सांताक्रूझ, बेलापूर, पुणे, लोणावळा, मावळ आदी ठिकाणी घरेच घरे त्यांच्या संपत्तीत आढळली. हा तपशील मती गुंग करणारा आहे. कोणतेही ज्ञात कौशल्य नाही, वाडवडिलांकडून उद्योगाचा वारसा नाही आणि उद्यमशीलतेचा लौकिक नाही. तरीही इतकी सारी संपत्ती एक व्यक्ती एकाच जन्मात जमा करू शकते हे नाही म्हटले तरी तसे थक्ककरणारेच. पण या संपत्तीदर्शनाने चकित होईल तो फक्त सामान्य माणूस. पशाला पासरीभर मिळणाऱ्या सामान्य माणसासाठी हे सर्व अप्रूप. परंतु या सामान्य माणसाला विचारतो कोण? त्याच्या एकाच हाताच्या एकाच बोटाचे काय ते महत्त्व. ते देखील पाच वर्षांतून एकदा. शाई लावण्यापुरते. तेव्हा हा कष्टकरी, प्रामाणिक करदाता, घामाच्या पशाने पोराबाळांना शिकवू पाहणारा वगरे यांनाच काय तो या भुजबळ संपत्तीचा धक्का बसला असेल. या सामान्य माणसाची मातबरी ती काय? तो जन्माला येणार तेव्हाही सामान्य आणि जगाचा निरोप घेणार तेव्हाही सामान्यच. त्याच्या धक्का बसण्याची फिकीर करण्याचे यित्कचितही कारण नाही. परंतु दिवंगत प्रमोद महाजन, नारायण राणे, दिवंगत गोपीनाथ मुंडे, मनोहर जोशी, कृपाशंकर, जितेंद्र आव्हाड, गावोगावचे शाखाप्रमुख, अनेक आजी-माजी मंत्री (नावे तरी किती घेणार?) अशा अनेक आदरणीयांना काही या भुजबळ संपत्तीचे काही इतके कवतीक असणार नाही. कारण हे किंवा असे मान्यवर हे भुजबळ यांचेच सहप्रवासी. चारआठ आणे इकडे-तिकडे इतकाच काय तो असलाच तर फरक. खेरीज हे सर्वच उठता बसता या फुले/शाहू/आंबेडकर यांच्या भूमीचा दाखला देणार. त्यामुळे त्या अर्थानेही या सर्वात बंधुत्वाचे नाते आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. हे सर्वच इये महाराष्ट्राचिये नगरी ललामभूत ठरतील असे महात्मेच. पुराणात शून्यातून विश्व निर्माण करण्याची संकल्पना आहे. या सर्व मान्यवरांनी ती अमलात आणून दाखवली. त्यामुळे हे सर्व पुराणकालीन ऋषीमुनींपेक्षा जास्त आदरणीय ठरतात. त्याची कारणे दोन. एक म्हणजे अर्थातच या सर्व मान्यवरांकडून झालेली ही प्रतिसृष्टीनिर्मिती. आणि दुसरे म्हणजे परत यांच्या विश्वाचा आकार अनेक शून्ये दिली तरी त्यात मावत नाही इतका भव्य. खरे तर टाटा, मिहद्र, मूर्ती (यांत अंबानी बंधूंचा समावेश नाही, हे चाणाक्षांना लक्षात आलेच असेल. त्यांचे कूळच वेगळे.) आदींचे जगणे यांच्यासमोर व्यर्थ आहे, असे कोणास आता वाटू लागले असल्यास त्यास दोष देता येणार नाही. या उद्योगपतींनी उगाच आपले जीवन शिणवले. कारखाना काढा, तो काढण्यासाठी वर उल्लेखलेल्या मान्यवरांना खूश करा, ते परवाने मिळवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना लक्ष्मीदर्शन घडवा, हेलपाटे मारा, नंतर कामगार नेत्यांची मर्जी सांभाळा, कारखाना निरीक्षक खप्पा होणार नाही याची काळजी घ्या.. एक ना दोन. इतक्या साऱ्या कटकटींनंतर तो उद्योग सुरू होणार आणि पिढय़ा दोन पिढय़ांनी खस्ता खाल्ल्यावर काही पुंजी जमा होणार. काय अर्थ आहे त्यात? उगाच शिणायचे. त्यापेक्षा हा भुजबळ वा राणे वा जोशी वा महाजन मार्ग किती सोपा. एकाच पिढीत इतके सारे कमावता येते. तेव्हा खरे तर अशा कर्तृत्ववानांचे अनुकरण जास्तीत जास्त जणांनी करावे यासाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे होते. ते राहिले बाजूलाच. उलट सरकारने सामाजिक समतेसाठी कटिबद्ध असणाऱ्या भुजबळ यांच्यावरच कायद्याचा बडगा उगारला. यामागे निश्चितच फडणवीस आणि दीक्षित या प्रतिगामी, जातीयवादी उच्चवर्णीय दुकलीचे कारस्थान असणार यात आम्हाला तरी शंका नाही. खरे तर ही शंका राष्ट्रवादीत भुजबळ यांचे स्थान घेऊ इच्छिणारे, भुजबळांइतकेच सामाजिक समतावादी, धर्मनिरपेक्ष आदी जितेंद्र आव्हाड यांनी अद्याप व्यक्त कशी केली नाही याची साऱ्या महाराष्ट्रास प्रतीक्षा आहे. कदाचित आव्हाड यांना त्यांचे सर्वेसर्वा मा. शरदराव पवार यांच्याकडून तसा इशारा झाला नसणार. कदाचित फडणवीस यांच्या शाकाहारी वहाणेने राष्ट्रवादीतून भुजबळ यांचा िवचू परस्पर ठेचला जात असेल तर आपल्यालाही बरेच असा विचार राष्ट्रवादीकारांनी केलाच नसेल असे छातीठोकपणे म्हणता येणार नाही. कारण काहीही असो. जे झाले त्यातून या बदलत्या, पुरोगामी महाराष्ट्राचे दर्शन घडते.
हा महाराष्ट्र सडका आहे आणि आपले सडलेपण मान्य करण्याची त्याची िहमत नाही. हा महाराष्ट्र विचाराला घाबरतो. त्यामुळे प्रामाणिक विचाराचा तो गळा घोटू पाहतो. त्यासाठी तो आभास तयार करतो तो देखील वैचारिकतेचा. म्हणजे झुंडशाहीच्या क्षमतेवर तो विचाराची क्षमता ठरवतो. अधिक झुंडशाही करू शकणारा हा अधिक विचारी असा या नव्या महाराष्ट्राचा समज आहे. वास्तविक या महाराष्ट्राने संपत्तीनिर्मितीला कधीच कमी लेखले नाही. त्याचा आग्रह होता तो साध्यसाधनशुचितेचा. अलीकडच्या महाराष्ट्राने यातील फक्त पूर्वार्धच घेतला. त्यामुळे महत्त्व आले ते संपत्तीनिर्मितीला. ती कशी तयार झाली, हा प्रश्नच गौण ठरला. त्यात ज्यांना हा प्रश्न पडतो त्याची मुस्कटदाबी करण्याची सोय मनगटशाहीच्या राजकारणाने करून दिली होती. त्यात पुन्हा एक वाटणी झाली. ती म्हणजे आपले आणि त्यांचे. नको ते उद्योग करणारा आपला आहे का त्यांचा यावर काय भूमिका घ्यायची हे समाजातील बुद्धिवंत ठरवू लागले. या बुद्धिवंतांना पुरोगामी म्हणवून घेणे आवडते. त्यामुळे शिवसेनेत असेपर्यंत जातीयवादी, प्रतिगामी वगरे असणारे भुजबळ सेनात्यागानंतर पुण्यवंत पुरोगामी ठरले आणि त्यांच्या कृपाशीर्वादासाठी हे पुरोगामी मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या विश्रामगृहांतील रमण्यात सहज सामील होऊ लागले. तेव्हा खरे तर भुजबळ यांच्या इतक्या साऱ्या संपत्तीनिर्मितीच्या श्रेयातील काही वाटा या राजकीय विद्वानांच्या पदरात घालावयास हवा. भुजबळ आणि तशा नेत्यांची भोंदूगिरी या विद्वानांनी वेळीच दाखवून देण्याचे धर्य दाखवले असते तर त्यास आळा बसू शकला नसता पण निदान त्याची गती तरी मंदावली असती. पण ते झाले नाही. त्यामुळे भुजबळ यांनी जर काही केले ते पाप असेल तर त्या पापात विद्यमान महाराष्ट्राचादेखील वाटा आहे हे नाकारता येणार नाही. हे असे प्रकार रोखायचे असतील तर महाराष्ट्रानेदेखील बदलाची तयारी दाखवायला हवी.
तूर्त तात्पर्य हे की एका भुजबळांवर कारवाई झाली म्हणून इतके सारे बाहेर आले. पण म्हणून ते एकमेव असे आहेत वा होते असे नाही. त्यांच्यावर कारवाई करणे हे सर्वासाठीच सोयीचे असल्याने ती होत आहे. यावरून, आता अशी कारवाई सर्वावरच होईल इतका आशावाद बाळगणे भाबडेपणाचे ठरेल. तशी ती होणे गरजेचे आहे, हे मान्य. पण तसे होत नाही तोपर्यंत भुजबळांच्या जमीनजुमल्याकडे आणि संपत्तीकडे पाहात छगन सदन तेजोमय..असेच म्हणत बसावे लागेल.
सौजन्य -लोकसत्ता
very nice sir
Manoj