जगन रेप कर…

-उत्पल व्ही.बी.

जगन रेप कर.
असं जगनला कुणी सांगत नाही.
जगन आपणहूनच रेप करतो.
शाळेत गेलेला, न गेलेला, एमबीए केलेला, न केलेला, फेसबुकवर असलेला, नसलेला जगन असे जगनचे प्रकार आहेत.
त्यातले सगळेच रेप करू शकतात.
जगन इतरवेळी कदाचित चांगलाही असेल.
पण तरी तो कमलवर पाळत ठेवून मोका मिळताच तिच्यावर झडप घालतो.
आणि नंतर तिला अमानुषपणे मारूनही टाकतो.
जगन वाईट आहे. भयानक वाईट.

पण वाईट जगनपैकी एकाची एक केस आहे.

या केसमधल्या जगनला इतर जगनसारखंच पंधरा-सोळाव्या वर्षी इरेक्शन आलं.
कमलला न्हाण आलं त्याच्या एक-दोन वर्षांनंतर.
इरेक्शन आल्यावर काय करायचं हे त्याला आई-बाबांनी सांगितलं नाही.
कारण त्यांना त्याचा संकोच वाटायचा.
कमलला पाळी आली की आई तिला काय करायचं ते सांगते.
पण जगनला इरेक्शन आलं की काय करायचं हे बाबा त्याला सांगत नाही.
कारण बाबालाही ते कुणी सांगितलं नव्हतं.
बाबाच्या बाबाने त्याला एकदा नग्न बायकांची चित्रं असलेलं पुस्तक वाचताना पकडलं होतं आणि मारलं होतं.
पण इरेक्शनचं काय करायचं हे सांगितलं नव्हतं.
बाबाने तीसएक वर्षांपूर्वी हेलनला नाचताना बघून हस्तमैथुन केलं होतं.
आता तर नाचाची खूप प्रगती झालीय. जगनपुढे आता खूप बायका नाचतात. मल्लिका, मुन्नी, शीला वगैरे सगळया.
शिवाय कॅमेरा त्यांच्या शरीरावर फिरतो.
कारण कॅमेऱ्याला हे माहीत आहे की जगनला ते आवडेल.
आणि कॅमेऱ्याच्या मागच्या माणसांना खूप पैसे मिळतील.
असे खूप जगन तयार करणं हे कॅमेऱ्याचं ध्येय आहे.
पण ते असो.
चूक जगनची आहे.

जगनही मग हस्तमैथुन करतो.
ते करताना एकदा आईने पाहिलं तर तिने भंजाळून जाऊन बाबाला सांगितलं.
बाबाने मार खाल्ला होता, म्हणून त्याने जगनला पण मार दिला.
पण मार खाऊन इरेक्शन थांबत नाही.
म्हणून मग जगन पुन्हा नाच बघतो, संभोगचित्रांची पुस्तकं वाचतो, ब्ल्यू-फिल्म बघतो.
आणि हस्तमैथुन करतो.

आपली परंपरा फार थोर आहे.
तिचा विजय असो.
आपल्या परंपरेनं शिकवलं आहे की लग्नाआधी संभोग वाईट.
त्यामुळे लग्नापर्यंत थांबून नंतर सगळी कसर भरून काढली तरी चालेल.
म्हणजे पहिल्या रात्री बायकोला त्रास झाला तर चालेल.
पण लग्नापर्यंत स्त्रीचं कौमार्य अबाधित राहिलं पाहिजे.
त्यामुळे जगन नग्न बाईचे फोटो बघत थांबतो.
शिवाय अशा नग्न बायकांना वाईट समजलं जातं.
कारण त्या जगनला बिघडवतात.
पण जगनला त्या आवडतात.
कारण ज्याच्यामुळे इरेक्शनपासून सुटका मिळते ते जगनला चांगलं वाटतं.

पण इरेक्शन कायमचं कधीच संपत नाही.
जगनला आता ‘बाई’ हवीच असते.
तो कमलकडे आता बाई म्हणूनच बघू लागतो.
आणि एके दिवशी तिच्यावर झडप घालतो.
जगनचं जनावर होतं.

दुर्दैवाने जगन पुरूष आहे.
संस्कृती प्रगत झाली तरी संस्कृतीकडे अजूनही इरेक्शनला उत्तर नाही.
शिवाय इरेक्शनबरोबरच जगनला अजून एक महत्त्वाचं शिक्षण मिळतं.
पुरूषसत्ताकतेचं.
म्हणजे बाबा कुटुंबप्रमुख.
आई त्यानंतर.
जगन, तू मुलगा आहेस.
मुलींसारखा रडतोस काय?
जगन, तू मुलांच्यात बस बघू.
मुलींबरोबर कसला बसतोस?
जगन, मुली फक्त क्रिकेटमध्ये नाचण्यासाठी असतात.
क्रिकेट खेळायचा असतो मुलांनी.
जगन, स्वयंपाक तू नाही करायचास.
पण तुला प्लंबिंग आलं तर चांगलं आहे.
जगन, बायकांना डोकं जरा कमीच असतं.
त्यामुळे त्यांनी शक्यतो घरीच बसावं.
जगन, तू मर्द आहेस.
बाईला जिंकणं यात मर्दानगी असते.
वगैरे.

आधीच इरेक्शन आणि त्यात पुरूषसत्ताकतेचं इंजेक्शन.

जगन पार बिघडून गेलाय.
त्याच्यातला हिंस्त्रपणा जनावरांनी लाजावं इतका वाढलाय.

कमलच्या मृत्यूनंतर तिच्या मैत्रिणी, आई-बाबा आणि परंपरा सगळ्यांनाच जगनचा प्रचंड राग येतो.
त्याला फाशी द्यावी असं वाटतं.
जगनला फाशी जरूरच द्यावी.
त्याने जगन नक्की मरेल.
पण नर उरेल.

कारण नर आणि मादी कधीच कायम मेलेले नाहीत. अजूनही मरत नाहीत.

नर पुन्हा हस्तमैथुन करत वाढेल आणि पुरूषसत्ताकतेचं इंजेक्शन त्याला दिलं जाईल.

आणि मादी पुन्हा अनंतकाळ पहात असलेली वाट पहात राहील.
शुभंकर संभोगाची.

– +91 98506 77875

Previous articleरेड लाईट डायरीज : झुबेदा
Next articleहे केवळ ‘देवेंद्र गेले , उद्धव आले’ नाही !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here