आम्ही सकाळी लवकरच राजगिरी चढण्यास सुरवात केली. शिवाजी महाराजांना मनोमन वंदन करून, वर चढू लागलो. या टेकडीच्या तीनही बाजूंनी उंच तुटलेले कडे आहेत. वर जायला एक छोटीशी अरुंद पण मजबूत वाट आहे . खालून जर या टेकडीकडे पाहिले तर फक्त दगडच दिसतात. वर जायची वाट दिसत नाही. पायऱ्यांचा दगडी रस्ता चढताना जीव चांगलाच मेटाकुटीला येत होता . दोन पायऱ्यांमधील अंतरही जरा जास्त असल्याने दमायला होत होते. चढण चढत असताना मध्ये मध्ये छोटी वळणे व पुन्हा चढ अशी रचना येथे आहे. वाटेत काही ठिकाणी झाडी लागते. याठिकाणी माकडांपासून मात्र सावध राहावे लागते. हातातील किंवा खांद्यावरील सामान कधी गायब होईल कळतही नाही. येथे आमच्या सोबत माकडांवरून दोन मजेदार गोष्टी घडल्या. आम्ही जेव्हा चढण चढत होतो तेव्हा माकडांचा एक घोळका आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता. कितीही हुसकावले तरी ते मागेच लागले होते, मग लक्षात आले की आमच्यापैकी एका व्यक्तीकडे खाद्यपदार्थांची पिशवी होती. ती पिशवी पळवायचा ते प्रयत्न करत होते. शेवटी ती पिशवी त्यांच्या दिशेने टाकल्यावर मगच त्यांनी आमचा पिच्छा सोडला. दुसरी एक गंमत म्हणजे आम्ही आमची गाडी खाली पार्क केली होती, महत्त्वाचे सामान गाडीतच ठेवले होते. परंतु ड्रायव्हर गाडीत असल्याने आम्ही बिनधास्त होतो. जेव्हा आम्ही परत आलो तेव्हा ड्रायव्हर झोपला होता आणि गाडीतील सामान अस्ताव्यस्त झालेले दिसत होते. ड्रायव्हरला उठवून विचारले तर त्याला काहीच सांगता येत नव्हते, मग आमच्या असे लक्षात आले की सामानातील खाण्याच्या पिशव्याच फक्त गायब झाल्या होत्या. हा माकडांचाच उद्योग होता.