टबमध्ये झाला भारतीय टीव्ही पत्रकारितेचा मृत्यू!

(सौजन्य -निखिल वागळे)

 

सदर – सडेतोड
निखिल वागळे

मौत का बाथटब आणि श्रीदेवी

२४ फेब्रुवारी २०१८च्या रात्री दुबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलात बाथटबमध्ये बुडून सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री श्रीदेवीचा मृत्यू झाला.

त्याच रात्री भारतीय टीव्ही पत्रकारितेनं अखेरच्या घटका मोजायला सुरुवात केली. पुढच्या ७२ तासांत त्याच टबमध्ये या पत्रकारितेचाही मृत्यू झाला.

या मृत्यूचा मागोवा घ्यायचा असेल, तर श्रीदेवीच्या निधनाची बातमी भारतातल्या बहुसंख्य टीव्ही चॅनेल्सनी कशी दिली हे तपासावं लागेल. सुरुवातीला या गुणी अभिनेत्रीच्या मृत्यूचे कोणतेही तपशील उपलब्ध नव्हते. जिथं मृत्यू झाला त्या दुबई पोलिसांनीही काही सांगितलं नव्हतं. तरीही श्रीदेवीचा मृत्यू कार्डिअॅाक अरेस्टनं झाल्याची बातमी सर्वप्रथम ‘टाइम्स नाऊ’नं दिली. मेंदू गहाण ठेवलेल्या इतर चॅनेल्सनी त्यांची री ओढली. पत्रकारितेचा पहिला मूलभूत नियमही पाळण्यात आला नाही. बातमी आल्यानंतर योग्य व्यक्तींकडून त्याची शहानिशा करणं हे वार्ताहराचं कर्तव्य असतं. पण अशी कोणतीही शहानिशा पोलिसांकडून किंवा श्रीदेवीच्या कुटुंबियांकडून न करता ‘ब्रेकिंग न्यूज’चा भडिमार करण्यात आला. श्रीदेवीच्या अकाली मृत्यूनं चॅनेलवाले जणू चेकाळले होते.

मग अधिक तपशीलाच्या अभावी टेलिव्हिजनचा जुना हातखंडा वापरण्यात आला. काही गृहितकं धरून चर्चांना सुरुवात झाली. कार्डिअॅपक अरेस्ट कशामुळे होतो, हे सांगणारे तज्ज्ञ डॉक्टर ज्ञान देऊ लागले. त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची जोड मिळाली. श्रीदेवी वैफल्यग्रस्त झाली होती, आपलं वाढतं वय लपवण्यासाठी किंवा सौंदर्य टिकवण्यासाठी ती उपचार घेत होती, त्यासाठी तिनं परदेशात जाऊन शस्त्रक्रियाही करून घेतल्या होत्या वगैरे चर्चेला उत आला. काही चॅनेल्सनी अशा अनैसर्गिक शस्त्रक्रियांमुळेच श्रीदेवीचा मृत्यू झाल्याचं निदान करायला मागेपुढे पाहिलं नाही. दुबई पोलिसांचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट अजून यायचा आहे, याचंही भान या अतिउत्साही चॅनेलवाल्यांना राहिलं नव्हतं.

यशावकाश हा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट प्रसिद्ध झाला आणि श्रीदेवीचा मृत्यू हृदयविकाराच्या अकाली झटक्यानं झालेला नाही हे स्पष्ट झालं. पण हार मानतील ते चॅनेलवाले कसले. त्यांनी आपल्या कथेला नवं वळण दिलं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, श्रीदेवीचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाला होता. बाथटबमध्ये गेल्यावर तिची शुद्ध हरपली आणि नाकातोंडात पाणी जाऊन तिची अखेर झाली. पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये तिच्या शरीरात दारूचा अंशही सापडल्याचं म्हटलं होतं. चॅनेलवाल्यांना हे कोलीत पुरेसं होतं. दारू प्यायल्यामुळे श्रीदेवीचा मृत्यू झाल्याचं कुभांड त्यांनी रचलं आणि त्यानुसार पुढच्या कहाण्या तयार करण्यात आल्या.

टेलिव्हिजन हे दृकश्राव्य माध्यम आहे. बातमी सादर करणाऱ्यानं फक्त बोलून चालत नाही, तर त्याला बळ देतील अशी दृश्यंही (व्हिज्युअल्स) लागतात. श्रीदेवीच्या मृत्यूबाबत अशी दृश्यं मिळणं निव्वळ अशक्य होतं. पण आमचे बेभान चॅनेलवाले हार कशी मानणार? कॉम्प्युटर ग्राफिक्सची मदत घेऊन त्यांनी काल्पनिक दृश्यं तयार केली. ‘आजतक’ या हिंदी वाहिनीनं आपल्या पडद्यावर ‘मौत का बाथटब’ तयार केला. ‘एबीपी न्यूज’नं या बाथटबच्या बाजूला रेड वाईनचा ग्लासही दाखवला. ‘सीएनएन आयबीएन 18’नं आपल्या पडद्यावर टबमध्ये बुडालेली श्रीदेवीच साकार केली. ‘टीव्ही 9’ या वाहिनीनं टबमध्ये बुडालेल्या श्रीदेवीला पाहणारा बोनी कपूरही सोबत दाखवला. तोपर्यंत ‘एबीपी न्यूज’च्या डोक्यात स्पर्धेची झिंग पूर्णपणे चढली असावी. त्यांनी संध्याकाळी सातच्या आपल्या बातमीपत्रात मृत्यूपूर्वीची पंधरा मिनिटं श्रीदेवी बाथरूममध्ये काय करत होती, याचा अहवालच सादर केला! ‘रिपब्लिक’ आणि ‘टाइम्स नाऊ’ ही इंग्रजी चॅनेल्सही मग मागे राहिली नाहीत. अपवाद फक्त ‘एनडीटीव्ही’ आणि काही अंशी ‘इंडिया टुडे’ या टीव्ही चॅनेल्सचा.

या कपोलकल्पित कथांना आणि तर्कवितर्कांना पुढच्या ४८ तासांत नुसतं उधाण आलं. दारूचा एक प्याला आणि अँटी डिप्रेसन्ट गोळ्यांमुळे असा मृत्यू होऊ शकतो, हे चॅनेलवर बसलेले तज्ज्ञ डॉक्टर सांगू लागले. माणसं दारू का पितात इथपासून वैफल्यग्रस्तांनी दारू प्यायल्यामुळे काय होऊ शकतं इथपर्यंत चर्चा सुसाटल्या. एवढं सगळं झाल्यावर भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी मागे कसे राहतील? त्यांनी ‘दाऊद आणि चित्रपटसृष्टी यांच्या संबंधांची चौकशी करा’ अशीच थेट मागणी केली. श्रीदेवीचा या सगळ्याशी संबंध काय असा प्रश्नही त्यांना कुणी विचारला नाही. एएनआय नावाच्या वृत्तसंस्थेनं स्वामीमहाशयांचा हा बाईट घेतला आणि सर्वांना पाठवून दिला. तो भारतभरच्या चॅनेल्सनी दाखवला. पत्रकाराचं काम फक्त पोस्टमनचं नाही, एखादा नेता वादग्रस्त विधान करत असेल तर त्याला विचारपूर्वक प्रतिप्रश्न करायला हवा, हे किमान शिक्षण या वृत्तसंस्थेच्या पत्रकारांना कुणी दिलं नसावं. अर्थात, त्यांना एकट्याला दोष कशासाठी द्यायचा? हल्ली बहुसंख्य पत्रकारच ‘मी तर हमाल भारवाहू’ या वृत्तीनं काम करत आहेत.

दक्षिणेकडच्या एका चॅनेलनं तर या सगळ्यावर कडी केली. त्यानं आपल्या पत्रकाराला थेट टबमध्येच उतरवलं आणि टबमधूनच त्यानं या घटनेचं रिपोर्टिंग केलं. संजय लीला भन्साळीचा ‘पद्मावत’ प्रदर्शित झाला, तेव्हा काही हिंदी चॅनेल्सच्या वार्ताहरांनी पद्मावतीचा पोषाख घालून थेट महालातून रिपोर्टिंग केलं होतं. तुम्ही पत्रकार की अभिनेते, असा प्रश्न त्याही वेळी विचारण्यात आला होता. श्रीदेवीच्या निमित्तानं ही नाटकी वृत्ती कोणत्या टोकापर्यंत जाऊ शकते हे स्पष्ट झालं आहे. खरं तर अशा पत्रकारितेला ‘न्यूज जर्नलिझम’ का म्हणायचं हाच खरा प्रश्न आहे. टबमधली ही पत्रकारिता पाहिल्यावर ट्विटरवर एका दर्शकानं नेमकी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ‘रिपोर्टर बाथटबमध्ये शिरला. त्यानं तिथून रिपोर्टिंग केलं. तो जिवंत राहिला, पत्रकारिता मात्र मेली!’

श्रीदेवीच्या मृत्यूचे हे धिंडवडे पाहून मला आश्चर्यही वाटत नाही किंवा धक्काही बसत नाही. २००० सालापासून या देशात खाजगी टीव्ही चॅनेल्सचं अमाप पीक आलं आहे. तो सगळा इतिहास पुन्हा धुंडाळला तरी श्रीदेवीसारख्या घटना वारंवार सापडतील. अगदी सुरुवातीच्या काळात घडलेली प्रिन्स बोअरवेलमध्ये पडण्याची घटना घ्या किंवा आरुषीचं खून प्रकरण घ्या, प्रत्येक वेळी देशातल्या बहुसंख्य टीव्ही चॅनेल्सनी असा बीभत्सपणा दाखवला आहे. खरं तर ‘आजतक’सारख्या टीव्ही चॅनेलचे पहिले संपादक हिंदीतले जानेमाने पत्रकार सुरेंद्र प्रताप सिंग होते. दूरदर्शनच्या एका वाहिनीवर अर्ध्या तासाचा कार्यक्रम म्हणून सुरू झालेलं ‘आजतक’ प्रचंड लोकप्रिय झालं ते त्यांच्या धाडसी, शोध पत्रकारितेमुळे. दूरदर्शनच्या बातम्यातल्या सरकारी रटाळपणाला एस.पी. सिंग यांनी फाटा दिला आणि सोप्या भाषेतली लोकाभिमुख पत्रकारिता सुरू केली. एकच उदाहरण देतो. गणपती दूध पितो या बातमीनं देशभरात धुमाकूळ माजला होता. विविध राजकीय नेते, कार्यकर्ते, विचारवंत, शास्त्रज्ञ आपापल्या प्रतिक्रिया देत होते. पण एस.पी. सिंग यांनी आपल्या वार्ताहराला पाठवलं एका सर्वसामान्य चर्मकाराकडे. त्यानं आपल्या आयुधातून ही केशाकर्षणाची प्रक्रिया सोपेपणानं समजावून सांगितली. संपादकाचा दृष्टिकोन कसा महत्त्वाचा ठरतो, हे त्या दिवशी पुन्हा एकदा स्पष्ट झालं. दुर्दैवानं एस.पी. सिंग यांचं अकाली निधन झालं. ‘आजतक’ आणि इतर चॅनेल्स पूर्णवेळ आग ओकू लागल्या तेव्हा ते या जगात नव्हते.

त्यांच्या नंतरच्या संपादकांनी या चॅनेल्सना वाह्यात करमणुकीच्या स्वस्त व्यासपीठांचं स्वरूप दिलं. हे संपादक बिनडोक आहेत किंवा त्यांना दृष्टी नाही असा आरोप मी कधीही करणार नाही. तसं असतं तर, एक वेळ त्यांनी हे अज्ञानापोटी केलं असं म्हणून त्यांना माफ करता आलं असतं. पण बुद्धिवान माणसं जेव्हा बाजारू वृत्तीनं वागू लागतात, तेव्हा त्यांना सहजासहजी माफ करता येत नाही. ते आपल्याबरोबर सगळ्या समाजालाही बाजारूपणाच्या गर्तेत भिरकावून देतात. श्रीदेवीच्या निमित्तानं या बाजारूपणाचा जुनाच चेहरा नव्यानं समोर आला आहे इतकंच.

माझ्या मते, भारतीय टीव्ही पत्रकारितेच्या या अध:पतनाची पहिली जबाबदारी या चॅनेल्सचं नेतृत्त्व करणाऱ्या संपादकांची आहे. सुरुवातीच्या काळात मोठ्या संख्येनं टीव्ही चॅनेल्स सुरू झाल्यानं पत्रकारितेचा पुरेसा अनुभव नसलेल्या व्यक्ती संपादक बनल्या. तरुण पत्रकारांना संपादक बनावंसं वाटतं यात काही गैर नाही. कोणत्याही व्यवसायात सर्वोच्च पदापर्यंत पोचण्याची आकांक्षा ही असतेच. पण संपादकपदाबरोबर एक जबाबदारीही येते. निव्वळ लोकानुनय करणं हे पत्रकारितेचं काम नाही. भारतीय पत्रकारितेला डॉ. राजा राममोहन राय यांच्यापासून सामाजिक बांधिलकीचा एक इतिहास आहे. स्वातंत्र्य आंदोलनात हा वारसा जपला गेला आणि स्वातंत्र्यानंतर पहिली काही वर्षं तरी त्याच मार्गानं संपादक गेले.

पण टेलिव्हिजनच्या गेल्या दोन दशकांत हा वारसा अक्षरश: धाब्यावर बसवण्यात आला आहे. आपलं चॅनेल लोकप्रिय करणं, त्याची प्रेक्षकसंख्या वाढवणं हे संपादकाचं कामच आहे. पण त्यासाठी पत्रकारितेच्या मूलभूत तत्त्वांना हरताळ फासायचा का हा खरा प्रश्न आहे. टीआरपीसाठी वाह्यातपणा करा असा सल्ला या संपादकांना चॅनेलच्या मालकांनी दिला असेल तर संपादकांनी त्याचा निषेध करून आपले राजीनामे भिरकावायला हवेत.

२००७ ते २०१४ एका मराठी चॅनेलचा मी संपादक होतो आणि असा दबाव माझ्यावर व्यवस्थापनानं कधीही आणला नाही. चांगले कार्यक्रम करून चॅनेल लोकप्रिय होत असेल तर व्यवस्थापनानं हरकत घेण्याचं काहीही कारण नाही. पण ज्या संपादकांचा चांगल्यावर विश्वास नाही तेच असे उपद्व्याप करतात. स्वस्तात यश मिळवण्याचा हा उद्योग मात्र पत्रकारितेला महागात पडतो.

संपादकांबरोबरच मी प्रेक्षकांनाही जबाबदार धरतो. श्रीदेवीच्या मृत्यूनंतरचा चॅनेल्सचा वाह्यातपणा प्रेक्षकही चवीचवीनं पाहत होते. एका अभिनेत्रीच्या खाजगी आयुष्यात डोकावण्याची विकृत इच्छा या मागे आहे. चॅनेलवाले याच इच्छेला खतपाणी घालत होते. जी चॅनेल्स असा विकृतपणा करतात ती आम्ही पाहणार नाही, असा निग्रह किती प्रेक्षकांनी केला? केवळ श्रीदेवीच्या निमित्तानंच नाही, तर एरवीही राजकीय बातम्या देताना ‘रिपब्लिक’ किंवा ‘टाइम्स नाऊ’सारखी चॅनेल्स पत्रकारितेचा गळा घोटतात. या चॅनेलवर आम्ही जाणार नाही आणि त्यांच्या गुन्ह्यात सहभागी होणार नाही, असा निर्णय किती पाहुणे घेतात? ज्या चॅनेल्सनी श्रीदेवीच्या मृत्यूच्या बातम्या मिटक्या मारत सांगितल्या, तीच आज देशातली सर्वाधिक पाहिली जाणारी चॅनेल्स आहेत. म्हणूनच संपादक म्हणू शकतात की, प्रेक्षकांना जे पाहिजे तेच आम्ही दाखवतो! म्हणजे या गुन्ह्यात चॅनेलवाले आणि प्रेक्षक समसमान भागीदार आहेत. (त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे, या वेळी मराठी चॅनेल्सनी, एखादा अपवाद सोडता, एवढा बीभत्सपणा केला नाही).

प्रश्न असा आहे की, या परिस्थितीत या गुन्ह्याबद्दल कोण कुणाला शिक्षा देणार? म्हणूनच म्हणतो, श्रीदेवीच्या अंत्ययात्रेबरोबर टीव्ही पत्रकारितेचीही अंत्ययात्रा निघाली आणि आपण सगळ्यांनी तिला खांदा दिला!

===============

लेखक निखिल वागळे ‘महानगर’ या दैनिकाचे आणि ‘IBN लोकमत’ या वृत्तवाहिनीचे माजी संपादक आहेत.

Previous articleयोगी भांडवलदार (भाग ३ व ४ )
Next articleटीव्ही 9 नंबर 1 आले कसे?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here