डॉ.कलाम, अमिताभ, सचिनवर चुकीच्या संस्काराचा पगडा

kalam ‘तिरूपतीचे बालाजी पावले,
इस्त्रोची अंतराळ मोहीम यशस्वी झाली’

अशा मथळ्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. इस्त्रो ही अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणारी भारत सरकारची वैज्ञानिक संस्था. भारताच्या 100 व्या अवकाश मोहिमेच्या सुरुवातीला ही मोहीम यशस्वी व्हावी म्हणून इस्त्रोचे प्रमुख के. राधाकृष्णन अग्निबाणाची प्रतिकृती घेऊन बालाजीच्या दर्शनाला गेले होते. प्रतिकृती बालाजी समोर ठेवली. मोहीम यशस्वी झाली. जणूकाही बालाजींनीच मोहीम यशस्वी केली. मग इस्त्रोची गरज काय? शास्त्रज्ञ नेमण्याची गरज काय? पुजारीच पुरेसे ना? भारतातील एवढय़ा मोठय़ा अवकाश विज्ञान संस्थेतील लोक अशी कृती करतात याबद्दल आपणा कुणालाही फारसं आश्चर्य वाटत नाही. कारण अशी अतार्किक विचारसरणी विज्ञानाला मान्य नसली, वैज्ञानिक प्रक्रिया संमत नसली, वैज्ञानिक विचारविरोधी असली तरी ती आपल्या संस्काराचा भाग आहे. आपल्या सश्रद्ध वर्तणुकीचा, जगण्याचा एक अविभाज्य घटक आहे.
डॉ. अब्दुल कलामांसारखे एक वैज्ञानिक या देशाचे राष्ट्रपती निवडले गेले होते तेव्हा माझ्या सारख्या बुद्धिप्रामाण्यवादी, विज्ञानवादी विचाराच्या
माणसाला आनंद झाला होता. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनंतर एवढय़ा मोठय़ा उच्चपदावर पहिल्यांदा एखादी बुद्धिप्रामाण्यवादी व्यक्ती या देशात विराजमान होते आहे असं वाटलं. मात्र हा आनंद क्षणभंगुर ठरला. राष्ट्रपतिपदाची शपथ घेताच डॉ. अब्दुल कलाम सामान्य जनतेच्या पैशातून, विकत घेतलेल्या विमानातून, वायुदलाच्या स्पेशल विमानातून, पुट्टपार्थिला सत्यसाईबाबांच्या दर्शनाला, नव्हे आशीर्वाद घेण्यासाठी गेले. एवढा मोठा एका वैज्ञानिक सामान्य जादूगारासारखे (कुणीही काही तासांच्या प्रशिक्षणानं हे प्रयोग शिकू शकतो.) हातचलाखीचे प्रयोग करून सोन्याचे हार, अंगठय़ा, विभूती काढणार्‍या सत्यसाईबाबांसारख्या एका वादग्रस्त, उघड उघड लोकांना फसविणार्‍या, बाबांच्या पायावर डोकं ठेवायला का जातो? भारताच्या अणुविज्ञान संस्थेचे, संशोधनाचे एकेकाळी प्रमुख असणार्‍या डॉ. कलामांपेक्षा सत्यसाईबाबा जास्त बुद्धीवान आहेत का? की, त्यांच्याच आशीर्वादानं त्यांना राष्ट्रपती बनवलं किंवा अमिताभ बच्चन सारखा (माझा आवडता नट आहे, त्याच्यावर अनेक लेख लिहिले.) महासदीचा नायक उघड अंधश्रद्धा बाळगतो, त्याचं प्रदर्शन करतो. सुनेचा मंगळ काढण्यासाठी नागबळी करतो. तो कमी बुद्धिमान आहे का? सचिन तेंडुलकरची तीच गत. आपली बॅट चालत नाही म्हणून नागबळी पूजा गाजतवाजत केली. तरी पुढे सात-आठ मॅचेस त्याची बॅट चाललीच नाही. बरं अशी नागबळी करून बॅट चालू लागते हे खरं असेल तर आपण सचिन तेंडुलकरचं एवढं कौतुक करण्याचं काय कारण? नागबळी पूजेचंच कौतुक करू ना? आणि कुणाही सोमा गोम्या, गल्लीतल्या पोर्‍याला सचिन इतकाच महान बल्लेबाज, अनेक पूजा घालून घालून बनवू या ना?
इस्त्रोचे वैज्ञानिक डॉ. अब्दुल कलाम, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर असे बुद्धिमान, प्रतिभासंपन्न, अनेकांचे विशेषत्वानं युवकांचे आयकॉन आहेत. हे लोक जेव्हा अशी अंधश्रद्धा कृती करतात, अतार्किक गोष्टीचं उघड समर्थन- प्रदर्शन करतात तेव्हा अख्खी भारतीय तरुण पिढी आणखीच त्या दिशेनं, नशिबाच्या, अंधश्रद्धेच्या दिशेनं वाटचाल करण्यास प्रवृत्त होते. आपल्या जीवनातील यशापयश स्वबळावर, स्वकर्तृत्वावर
मिळत नसून नशिबामुळं अथवा अशा आधीभौतिक शक्तींच्या कृपाप्रसादामुळं मिळतं असं अधिक घट्टपणे मानू लागते. लहानपणापासून निर्माण झालेला हा अंधश्रद्धांचा विळखा अधिकच घट्ट होतो. त्यामुळे या मोठय़ांचं वागणं हा केवळ वैयक्तिक श्रद्धेचा विषय राहत नाही. तो सामाजिक संस्कारांचा भक्कम आधार बनतो.बर्‍याच वर्षापूर्वीची गोष्ट. विनोद दुआंचा ‘चक्रव्यूह’ नावाचा एक चर्चात्मक कार्यक्रम एका टीव्ही वाहिनीवरून प्रसारित होत असे. त्यातील एक कार्यक्रम फलज्योतिष या विषयावरची टीव्ही वाहिनीवरील ही पहिली जाहीर चर्चा. जगजित ऊप्पल नावाचे, टीव्हीवरून नियमित भविष्य सांगणारे, एक खूप प्रसिद्ध ज्योतिषी, मुंबईच्या नेहरू तारांगणाचे संचालक आणि मी असे तिघे चर्चेत होतो. विनोद दुआ अँंकर (संचालक) होते. नेहरू तारांगणाचे संचालक (डायरेक्टर) हे खगोल वैज्ञानिक असतात. वैज्ञानिक क्षेत्रातील ही अत्यंत मानाची, प्रतिष्ठेची पोस्ट समजली जाते. रेकॉर्डिग
मुंबईच्या स्टुडिओत होतं. 100-125 प्रेक्षकसंख्या. सारेच्या सारे जगजित उप्पलच्या मागे. पाया पडताहेत, तिथेच भविष्य विचारताहेत, त्यांचं दर्शन घेऊन कृतकृत्य होताहेत, असं भारलेलं वातावरण. तरुण-तरुणींची संख्या अधिक. हिंदीत कार्यक्रम असला तरी सारे आंग्लाळलेले, इंग्रजी बोलणारे आणि राशिभविष्यानुसार दिवसाचा दिनक्रम ठरवणारे. मला वाटलं
किमान एक वैज्ञानिक आपल्यासोबत आहेत. ते नेहरू तारांगणाचे संचालक असल्यामुळं विज्ञानवादी विचार प्रखरपणे मांडतील, किमान विज्ञान विचारांचं समर्थन करतील. झालं भलतच.पहिल्या टप्प्यातील चर्चेतच त्यांनी फलज्योतिषाचं समर्थन केलं. सुरुवातच अशी केली,”मी एका पुजार्‍याचा मुलगा आहे. माझे वडील ज्योतिषी होते. मोठय़ा कष्टानं मी शिकलो. वैज्ञानिक बनलो, एवढय़ा मोठय़ा वैज्ञानिक पदावर पोहोचलो. राशिभविष्य यावर माझी श्रद्धा आहे.” पत्रिकेतील राहू केतूचा विषय निघाला. राहू, केतू, चंद्र, सूर्य हे ग्रह नसल्यामुळं मी जगजित उप्पल यांची भंबेरी उडवत होतो. त्यांना काही त्याचं समर्थन करता येईना. हे वैज्ञानिक त्यांच्या मदतीला धावले, ”हॉ! राहू केतू का परिणाम होता है! ये परंपरागत भविष्यशास्त्र है, सदियोंसे हम इसे मानते आये है’ वगैरे बोलायला लागले. मग माझ्यातला कार्यकर्ता जागा झाला, ‘तुम्हाला येथे एक पुजार्‍याचा, ज्योतिष्याचा मुलगा म्हणून बोलावलं नाही. एक वैज्ञानिक, नेहरू तारांगणाचा संचालक, खगोलशास्त्रातील तज्ज्ञ म्हणून बोलावलं आहे. तुमच्या खगोलशास्त्रानुसार राहू, केतू नावाचे ग्रह अस्तित्वात आहेत का? चंद्र व सूर्य (रवी) हे ग्रह आहेत का? ते सांगा. तुमच्या वैयक्तिक अंधश्रद्धा सांगू नका.” तेव्हा कुठे महाशय जागेवर आले.”खगोलशास्त्रानुसार राहू, केतू हे ग्रह नाहीत, ते अस्तित्वातच नाहीत. रवी हा तारा आहे, चंद्र (सोम) हा उपग्रह आहे. हे जाहीररीत्या बोलले.’ सारा घोळ विनोद दुआंच्या लक्षात आला. खरं म्हणजे ते अँंकर, पण तेही आतून चिडले. कार्यक्रमाच्या दुसर्‍या सेगमेंटमध्ये त्यांनी या वैज्ञानिकाच्या हातून नारळ फोडून घेतलं. प्रस्तावना केली. ”हम भूल गये थे! इस कार्यक्रम का शुभ- उद्घाटन हमने नहीं किया! अब करते है! ये नारीयल इनके हाथों से फोडते है! क्योंकि ये एक पूजारी के बेटे है और इनका शुभ, अशुभ पर गहरा विश्वास है! वे नेहरू तारांगण इस वैज्ञानिक संस्था के संचालक है! लेकिन पूजारी के बेटे है”वैज्ञानिक महोदयांनी नारळ फोडलं. विनोद दुआ आपली खिल्ली उडवताहेत हेही त्यांच्या लक्षात आलं नाही. जगजित उप्पलचे हाल हाल झालेत. ‘फल-ज्योतिष्याची भाकिते 90 टक्के सिद्ध करा आणि 1 लाखांचं पारितोषिके घ्या’ हे आव्हान मी टाकलं. अर्थात, त्यांनी स्वीकारलं नाही. कार्यक्रम खूप गाजला. झी टीव्हीनं तो अनेकवेळा रिपिट केला.
एक मोठा खगोलशास्त्रज्ञ, आपल्या क्षेत्रातील तज्ज्ञ माणूस. त्याच्या अभ्यासशास्त्रानुसार राहू, केतू, चंद्र, सूर्य हे ग्रह नाहीत. पत्रिकेला शास्त्रीय आधार नाही. तरी संस्कारामुळं तो ज्योतिष मानतो, सार्‍या अंधश्रद्धा मानतो. कारण विज्ञान हा केवळ त्याच्या पोटापाण्याचा भाग आहे. वैज्ञानिक विचार, विज्ञान हा त्याच्या बुद्धीचा भागच नाही. ज्या तर्कशुद्ध विचारांवर अख्ख विज्ञान उभं आहे. माणूस तर्कशुद्ध विचार करायला लागल्यामुळं विज्ञानाचा विकास झाला, माणसाची एवढी प्रगती झाली. तो वैज्ञानिक विचार आपल्या भारतीयांच्या जीवनाचा, बुद्धींचा भाग बनू शकला नाही. विज्ञानाच्या क्षेत्रात आपण उल्हासनगर (मेड इन यूएसए) आहोत. इतरांचं मूलभूत संशोधन आपण आयतं वापरतो. त्यात थातूरमातूर बदल करून, ते थोडसं विकसित करून काही उत्पादन करतो आणि स्वत:ला महासत्ता बनविण्याच्या गप्पा मारतो. भारत महासत्ता बनविण्याचं भविष्य वर्तविणारे वा तसा आशावाद वर्तविणारे वैज्ञानिक डॉ. अब्दुल कलामच जर अवैज्ञानिक विचार करणारे असतील, सत्यसाईबाबांसारख्या जादूगाराच्या पाया पडून अवैज्ञानिक आचारांचे प्रदर्शन करणारे असतील तर भारत कशा प्रकारची महासत्ता बनू शकेल?
सर्वसामान्य भारतीय माणसानं आपल्या मेंदूचे दोन कप्पे करून टाकले आहेत. एका कप्प्यानं तो विज्ञान शिकतो, प्रयोगशाळेपुरती वैज्ञानिक प्रक्रिया वापरतो, त्याच्या आधारावर डॉक्टरेट मिळवितो, वैज्ञानिक जागा पटकावतो, नेहरू तारांगणाचा संचालक बनतो, इस्त्रोचा वैज्ञानिक बनतो, अंतराळ संशोधनाचा प्रकल्प संचालक बनतो. त्यावर पोट भरतो. पण त्या वैज्ञानिक प्रक्रिया विचारांना तो बिलकूल मेंदूच्या दुसर्‍या कप्प्यात शिरू देत नाही. तर्कशुद्ध विचार, वैज्ञानिक विचार जीवनाचा भाग बनवत नाही. कारण त्याच्यावर लहानपणापासून संस्कार होतो. ‘विज्ञान खरं असतं, ठीक असतं. पण जिथून विज्ञान संपतं तिथून खरं अध्यात्म, आधिभौतिक जग सुरू होतं. या जगाला विज्ञानाचे नियम लागू पडत नाहीत.’ हा या देशातील सगळ्यात मोठा खड्डा आहे अंधश्रद्धेचा. ज्यात आपण वारंवार पडतो. वैज्ञानिक जगात एक म्हण आहे, ‘न्यूटन जे सिद्ध करतो तेवढंच महत्त्वाचं आहे. तो काय म्हणतो ते बिनमहत्त्वाचं आहे’ हे आपण केव्हा शिकणार?

प्रा . श्याम मानव
(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत.)
9371014832

Previous articleबाबासाहेब, आम्हाला माफ करा !
Next articleनेताजींच्या रहस्यावरील पडदा उठणार का?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here