कोरोनाकाळात याच कारणानं फेसबुक लाईव्ह, झूम, युट्यूब लाईव्ह हे प्रकार किती वाढले ते आपण अनुभवतो आहोतच.
मुळात अंतर्मुख स्वभावाची माणसं बहिर्मुख स्वभावाच्या माणसांपेक्षा जगाकडे तुलनेनं नकारात्मक दृष्टिकोनातून पहातात. उदाहरणार्थ, बहिर्मुख प्रवृत्तीची माणसं सहज कोणाच्याही पाठीवर थाप मारुन गप्पा छाटतात, फिरायला जातात.. तेव्हा अंतर्मुख प्रवृत्तीची माणसं “त्यांना हे कसं काय बुवा जमतं?” असा विचार करत असतात. आतल्या आत भावना साठवून ठेवणं, लोकांशी कमी बोलणं हे अंतर्मुख लोकांचं महत्वाचं लक्षण आहे. अंतर्मुख लोक जास्त संवेदनाशील असतात. छोट्या छोट्या गोष्टींनी, संवादांमधल्या बारीक छटांनी, कोणाच्यातरी एका फोन कॉलवरच्या एखाद्या शब्दानं ते दुखावले जातात. त्यांना नैराश्य लवकर येऊ शकतं. आत्महत्येच्या विचारांकडे संवेदनाशील माणसं लवकर वळतात. जवळचा मित्र किंवा प्रियकर / प्रेयसी यांच्याबरोबरचं नातं संपणं, नोकरी गेल्यानं आर्थिक स्त्रोत संपणं, इतर आर्थिक समस्या भेडसावत असणं, समाजात आपली पत रहाणार नाही याची भीती वाटणं, आपलं रहाणीमानाचा दर्जा खालावेल याची भीती वाटणं, शिक्षणातलं अपयश ही आत्महत्येची काही कारणं आहेत.