दोन ध्रुवांना जोडणारं नातं

-मिथिला सुभाष

आमीर-किरणचा घटस्फोट झाला आणि अनेक पद्धतीच्या चर्चांचे पेव फुटले. घटस्फोट झाल्यावर मैत्री कशी राहू शकते हा नाराजीचा मुख्य सूर दिसत होता. मला बडं अजब वाटलं. माझा घटस्फोट झाला तोच मुळी माझ्या नवऱ्याला दुसरं लग्न करायचं होतं म्हणून. पण आम्ही दोघं चांगले मित्र राहिलो. अगदी २०१४ ला माझ्या नवऱ्याचं निधन झालं तेही माझ्या हातचं पाणी पिऊन. मी त्यांचीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबाची मित्र होते. त्या काळात मी एक लेख लिहिला होता. माझ्या नवऱ्याची दुसरी बायको आणि मी या संबंधावर. तोच इथे परत देतेय. हा लेख जवळजवळ दहा वर्षांपूर्वी लिहिलेला आहे.
*****************

तिला ‘सवत’ म्हणावं का? १९९६ पासून ती माझ्या आयुष्यात आहे. मला ‘दिदी’ म्हणते, महिन्यातून एक-दोन वेळा आम्ही भेटतो, कधी तिच्या घरी, कधी माझ्या, या भेटीत अर्थातच ‘तो’ही असतो आणि त्यांची मुलगीही, जी मला ‘बडी माँ’ म्हणते, कुठल्याही बाईला ‘सवत’ असणं नको असतं हे जितकं खरं आहे, तितकंच हेही खरं आहे की कुठल्याही संवेदनशील बाईला एखादीची ‘सवत होणं’ही आवडत नाहीच! आज हा लेख लिहितांना पहिल्यांदा मी तिचा उल्लेख ‘सवत’ असा केलाय. मला खात्री आहे, हा उल्लेख वाचून ती रडेल… मला कळू न देता…! खरं तर ती माझी सवत नाहीये. माझा घटस्फोट झाल्यावर तिचं लग्न झालंय. म्हणजे मी ‘टाकलेल्या’ नवऱ्याची ती दुसरी बायको आहे, असं म्हणता आलं असतं. पण केव्हा? जेव्हा ती माझ्या जगाच्या, माझ्या अवकाशाच्या बाहेर कुठेतरी असती तर! पण आज आम्ही दोघी एकाच ‘जगात’ आहोत.

वास्तविक पाहता, आम्ही दोघींनी दोन ध्रुवावर असायला हवं होतं. आपल्या समाजात एकाच पुरुषाच्या आजी आणि माजी बायकोसाठी तशीच व्यवस्था केलेली आहे. पण आमचं दोघींचं नातं दोन ध्रुवांना जोडणारं ठरलंय. घटस्फोट झाल्यावर तडकाफडकी नातं तुटण्याच्या अनेक घटना आपल्या पाहण्यात असतात. किंबहुना, नाते विसविशीत झाल्यामुळेच घटस्फोट होत असतात. पण माझा घटस्फोट फार वेगळ्या मानसिक स्थितीत झालाय. कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक प्रतिकूलता होतीच. पण या सगळ्याच्या मुळाशी एक अत्यंत तरल, चिमटीत धरता येणार नाही असं कारण होतं, जे फक्त आम्हा दोघांना कळत होतं. तो अत्यंत साधा (सरळ नाही), कुटुंबवत्सल, चारचौघांसारखा संसारी माणूस आहे. मीही अत्यंत साधी (सरळ आहे की नाही माहीत नाही), कुटुंबवत्सल, संसारी आहे. पण लग्न झाल्यावर काही दिवसात माझ्याच लक्षात आलं की मी ‘चारचौघीं’सारखी नाही. मला माझ्या नियतीने ‘प्रखर बुद्धिमत्तेचा’ श्राप दिलेला आहे आणि कहर म्हणजे उःशाप म्हणून ‘बावळवटपणा’ दिलेला आहे. (या आत्मस्तुतीत अहंकाराचा भाग अजिबातच नाही. अपरिहार्य झालं म्हणूनच स्वतःला बुद्धिमान म्हणवून घेतलं आहे.) त्याला माझ्या बुद्धिमत्तेचा आणि मला माझ्याच बावळटपणाचा कॉम्प्लेक्स. त्यामुळे दोघेही आपापल्या वागणुकीतून स्वतःची यथेच्छ शोभा करुन घेत होतो. दोघांच्या मध्ये हे दोन कॉम्प्लेक्सेस असल्यामुळे एकजीव होण्याचा नुसता भास होत होता. पलंगावरची गादी पलंगाच्या दोन काठांना रात्रीपुरतं एकजीव करते तसं…!

शेवटी लग्नानंतर वीस वर्षानंतर आम्ही शांतपणे एकत्र बसून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्याच्या आयुष्यात ‘ती’ आलेली होती आणि मी ‘एकांतप्रिय’ असल्यामुळे मला कचाकचा बोलणाऱ्या जगापासून मुक्ती हवी होती. (हा निर्णय घेण्याआधी बरेच काही घडले, जे पुढे येईलच.) एकोणिसाव्या वर्षी कोर्टात जाऊन लग्न केलं होतं… कुटुंबियांच्या गैरहजेरीत! एकोणचाळीसाव्या वर्षी कोर्टात जाऊन घटस्फोट घेतला… कुटुंबियांच्या गैरहजेरीत! आणि मी माझ्या अठरा वर्षाच्या मुलीला घेऊन घराबाहेर पडले. वीस वर्षाच्या संसाराचं अत्यंत साजिरं, गोमटं आणि जिव्हाळ्याचं हे संचित सोबत होतं, बुद्धी होती, ती कशी वापरावी याचं भान वीस वर्षांच्या टक्क्याटोणप्यांनी दिलेलं होतं. पुनश्च उभं राहण्यासाठी याहून अधिक काय हवं हो?! राहिलेच उभी. भक्कम, पाय घट्ट रोवून! आता तो संघर्ष खूप दूरचा वाटतो. चौदा वर्षं होऊन गेली घटस्फोटाला! पण वीस वर्षं हा फार मोठा काळ असतो! नको असलेलं चामखीळ अंगावर आलं तरी त्याची सवय होते माणसाला. हा तर दोन जिवंत माणसांनी केलेला संसार होता. लग्नाच्या त्या वीस वर्षांत घडलेली सगळी रामायणं-महाभारतं का घडत होती त्याचं कारण शोधून तेच संपवल्यावर आमच्यातला कडवटपणाच संपून गेला. ‘वहिनी किती हुशार आहेत रे,’ असं त्याला यापुढे कोणी म्हणणार नव्हतं. ‘पुरुषाला हुशार बायको नको असते, पण हुशार मैत्रीण हवी असते,’ हे सूत्र कितीही विवादास्पद असलं तरी आमच्या आजच्या नात्यात त्या सूत्रानेच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ज्या मैत्रीच्या भावनेनं आम्ही इतकी वर्ष एकमेकांना ‘सोसलं’ तीच भावना निखळपणे पाण्यावर आली. शेवाळासारखी नाही, कमळासारखी. आम्ही एकमेकांचे मित्र झालो.

इथपासून ‘तिच्या’ भूमिकेची खरी सुरुवात होते. ती मला आदराने वागवते, मी तिचे लाड करते. त्यांच्या आठ वर्षाच्या मुलीला तर मी तिची ‘सावत्र आई’ आहे हे ज्या दिवशी कळेल त्या दिवशी तिला मोठ्ठा ‘कल्चरल शॉक’ लागेल इतकी ती मला स्वतःची ‘बडी माँ’ समजते. या चिमुरडीने जन्माला आल्यावर पहिल्यांदा डोळे उघडले तेव्हा तिला मीच दिसले, कारण तिच्या आईच्या उशा-पायथ्याशी मी होते. हे सारं पाहिल्यावर, ऐकल्यावर लोकांचे डोळे आश्चर्यांने आणि माझ्या कौतुकाने विस्फारतात. कोणीही हा विचार करतच नाही की, या कौतुकातला अर्धा वाटा ‘तिचा’ आहे. ती तिच्या नवऱ्याला हे सांगू शकली असती की, ‘मला माझ्या घरात तुझी पहिली घटस्फोटित बायको आलेली चालणार नाही.’ ती त्याची दुसरी बायको असल्यामुळे, वयाने त्याच्यापेक्षा बरीच लहान असल्यामुळे आणि ‘नवरा सांगेल ती पूर्व दिशा’ या धोरणाची असल्यामुळे तोही विनातक्रार तिचं ऐकत, मान्य करत असतो. पण असं असूनही तिने असे काही आदेश न काढता मला आपल्या कुटुंबात सामावून घेतलंय. हे तिचं श्रेय नाहीये का? नक्कीच आहे. अगदी, ‘त्याला आवडणारी साबूत मसूरची आमटी तुम्ही कशी करता,’ इथपासून, ‘दिदी, बघा ना, ड्रिंक्सचं प्रमाण किती वाढलंय यांचं, एकदा चांगली खरडपट्टी काढा, तुमचं ऐकतील ते,’ इथपर्यंत सगळं ती मला सांगत असते. मी खूप दिवस नुसती लिहित बसलेय असे कळलं की पाच खणी जेवणाचा डबा घेऊन येते आणि मला दरडावते, ‘थोडं कमी लिहिलंत तर उपाशी मरणार नाही आहात.या वयात झेपेल तेवढंच काम घ्या. तुम्हाला काही झालेलं अजिबात चालणार नाही मला, सांगून ठेवते.’ आणि एवढी काळजी घेऊनही मला काही झालंच तर तीच सगळ्यांच्या आधी धावून येते. अशा मुलीला ‘सवत’ कसं आणि का म्हणायचं ते मला कळत नाही… खरंच नाही कळत!

मी धाकटय़ा बहिणीकडे आराम करायला जावं, तितक्या सहजनेतं तिच्या घरी चार-चार दिवस राहायला जात असते. तेव्हा खास माझ्या आवडीचं जेवण, सिनेमा-नाटकं, मुलीसोबत धमालअसा भरगच्च कार्यप्रम असतो. या चार दिवसात ‘तो’ आमचा ड्रायव्हर असतो फक्त. कधीतरी मग ती या सगळ्याचं उट्टं काढते. ‘दिदी, तुमचं ते घरगुती तेल बनवा ना, माझे केस किती जाताहेत,’ ‘दिदी, मला तुमच्यासारखी पर्स हवी,’ ‘या वाढदिवसाला मला ‘फॅब इंडिया’चा ड्रेस हवाय हां,’ अशा फर्माइशी हक्काने करते. माझ्याच मनात ‘तिच्या’बद्दल राग नाही हे पाहिल्यावर माझ्या सुविद्य लेकीनेही आपल्या पपाच्या दुसऱ्या बायकोशी शहाण्या मुलीसारखं छान जुळवून घेतलंय. दोघी तशा समवयीनच आहेत! माझी लेक माहेराला येते तेव्हा दोन-दोन घरची माहेरवाशीण असते. ‘तिचा’-माझा सलोखा दाखवणाऱया ढीगभर घटना मी सांगू शकते. त्या वाचून कौटुंबिक जिव्हाळ्याचे कढ येतील वाचकांना. पण दोन टोकाचे वेगळे स्वभाव असलेल्या आणि नातं सांगायचं झालंच तर ‘सवती’चं नातं असलेल्या दोन बायकांनी कसं काय बुवा एकमेकींशी पटवून घेतलं, हे वाचणंअधिक रोचक, मनोरंजक (आणि उद्बोधकही) होईल.

‘दोनशे पुरुष एकत्र राहू शकतात पण दोन बायका दोन तासही गुण्यागोविंद्याने राहू शकत नाहीत,’ हे आम्हा भारतीयांचं आवडतं सूत्र. खरं तर फक्त ‘भारतीयांचं’ म्हणून चालणार नाही. जिथे-जिथे पुरुषप्रधान संस्कृती आहे, पितृसत्ताक व्यवस्था आहे, तिथे थोडय़ाफार फरकाने असंच म्हटलं जातं. कारण हे सूत्र पुरुषांनीच बनवलं आहे. (हा भ्रम पुरुषांनी पसरवलाय, असे वाचावे.) कारण ते त्यांच्या सोयीचे आहे. बाईमध्ये इतकी उर्जा, इतकी शक्ती आहे की त्या एकमताने राहिल्या तर घरात आणि समाजातही पुरुष गौण ठरु शकतात, हे उमगल्यामुळे पितृसत्ताक व्यवस्थेच्या समर्थकांनी काही ‘प्रोग्रॅम्स’ बनवून ते बाईच्या डोक्यात ‘फीड’ केले आणि नंतर ते सूत्र बनवून त्याचा प्रचार केला. स्त्रियांनी कधीही एकत्र येऊ नये यासाठी केलेला कट! हे काही शेदोनशे वर्षांचं काम नाहीये. अनेक शतके, काही हजार वर्षे हे सुरु आहे. सुरुवातीला कधीतरी तथाकथित समाजधुरिणांनी एक मोहीम म्हणून ते राबवलं असणार. सर्वसामान्य पुरुषांनी मात्र हळूहळू ते स्वतःच्या सोयीचं म्हणून स्वीकारलं. आणि अनेक शतकं उटल्यावर आता ते अंगवळणी पडलं. मागल्या काही दशकात मात्र हे वास्तव सुजाण लोकांच्या लक्षात यायला लागलंय. सुदैवाने आम्हा दोघीत ‘तो’ पडला नाही. कारणं काहीही असतील. माझ्याबद्दल आस्था असेल म्हणून, माझ्यासारख्या, कुठल्याही परिस्थितीत संसार रेटून नेणाऱ्या मध्यमवयीन बाईचं मार्गदर्शन त्याच्या तरुण आणि अननुभवी बायकोला मिळत राहावं म्हणून, बौद्धिक गोष्टी ऐकण्याची स्वतःची हौस भागावी म्हणून किंवा वीस वर्षांची माझी सवय झाली म्हणून… यापैकी काहीही असेल, पण तो आमच्या नात्याच्या आड कधी आला नाही हे मात्र खरे.

संसारसुखासाठी तरुण, देखणी बायको आणि गप्पा, सल्ला-मसलत, विचारविमर्शासाठी मी, अशी त्याने स्वतःची सोय बघितली आहे, असा आक्षेप काही नातेवाईक आणि जवळच्या मित्रमंडळीचा आहे. पण मला खात्रीने माहीत आहे की तो तसा नाहीये. प्लॅन करुन – योजना बनवून काही तरी ‘आखणं’ आणि अंमलात आणणं हा त्याचा स्वभावच नाहीये. तो जे काही करतो ते उत्स्फूर्तपणे करतो. त्याच्याकडे दूरदृष्टी नाही. त्यामुळे अविचारही उत्स्फूर्त असतात. त्याच्या या मनस्वी स्वभावामुळेच तेव्हा आमचे खटके उडायचे आणि आता त्याच्या याच स्वभावामुळे मी स्वतःला त्याच्यापासून मनाने तोडू शकलेले नाही. त्यामुळे आम्हा तिघांचं नातं ही तेढ किंवा गुंता न होता गुंफण झालेली आहे. हे सोपं नव्हतं… अजिबातच सोपं नव्हतं. त्याने जेव्हा पहिल्यांदा मला हे सांगितलं तेव्हा मी आधी सुन्न झाले. मग त्रागा, रागराग, भांडण, रडारड असं सगळं साग्रसंगीत होत गेलं. दोन महिन्यांनंतर मी संयुक्तिक विचार करु शकण्याच्या स्थितीत आले. दरम्यान त्याने माझी ‘तिच्या’शी भेटही घडवून आणली. एखाद्या देखण्या बाईलाही कॉम्प्लेक्स यावा असं रुप, कोवळं वय, गरीब स्वभाव आणि प्रचंड भाबडेपणा असं ‘ते’ रसायन होतं. ‘उगाच नाही हा खुळावला,’ ही माझी पहिली मनातल्या मनात प्रतिक्रिया होती. तिच्याबद्दल माझ्या नवऱ्याकडून आणि इतरांकडून जे कळलं तेव्हा मात्र…

तिला आईवडील नव्हते. तिच्या वयाच्या 11 ते 13 या दोन वर्षात दोघं लागोपाठ वारले.मुळात ही त्यांना उतारवयात झालेली तिसरी मुलगी. आईवडील वारले तेव्हा दोघा मोठय़ा बहिणींची लग्न झालेली होती. त्या दोन लग्नांमुळे आर्थिक स्थिती खालावलेली. अशात आईवडिलांची सावली हरवली आणि हिची रवानगी आळीपाळीने बहिणी, काका, मावश्या यांच्या घरी. बिन आईबापाच्या गरीब परिस्थितील्या निरागस मुलीला जग आणि नातेवाईक जो आणि जितका म्हणून त्रास देऊ शकतात तितका त्रास सोसत ही मोठी झालेली. तशात तिला आमचं ‘पात्र’ भेटलं. त्यानंतर नक्की काय झालं असेल ते त्याने मला सांगितलं नाही, मी विचारलं नाही. पण वीस वर्षं त्याला ओळखत होते त्यावरून खात्रीचे अंदाज बांधू शकत होतेच. तिचं रुप बघून आधी हा नादावला, तिच्या प्रेमात पडला आणि तिच्या आयुष्याची कहाणी ऐकल्यावर मात्र कळवळला असणार. ती तर सपशेल याच्या प्रेमात पडलीच होती. अकरा-बारा वर्षांच्या दुःखाच्या फुफाट्यानंतर तिच्यावर मनापासून प्रेम करणारा जोडीदार तिला भेटला होता. पण नंतर मात्र त्याची ‘गोची’ झाली, कारण घरात मी होते ना! सुरुवातीला तिला आपल्या प्रेमात ‘पाडण्याच्या’ नादात साहेबांनी सांगितलं होतं की, माझं माझ्या बायकोशी पटत नाही, ती मला आवडत नाही, मी तिच्याशी काडीमोड घेणारच आहे, वगैरे… दुसऱ्या बाईच्या प्रेमात पडतांना सर्वसाधारणपणे सगळेच पुरुष असं सांगत असावेत. (सन्माननीय अपवादांनी स्वतःला यातून वगळावं!) त्याने तिच्याशी लग्न करावं आणि आम्ही तिघांनी ‘सुखाचा संसार’ करावा असा एक ‘तुघलकी’ प्रस्तावही त्याने माझ्यासमोर ठेवला होताच. मला तो मान्य होणं केवळ अशक्य होतं. पण तेव्हा कदाचित त्याला माझ्यातल्या ‘बावळट’पणाची खात्री वाटली असणार!आणि नेमकं त्यावेळी माझ्या बुद्धीने काम केलं. मला प्रकर्षांने जाणवलं की, या माणसाची माझ्यापेक्षा जास्त गरज या मुलीलाच आहे!

मला ही खात्री पटल्यावर मात्र पुढचं सगळं सोप होतं…! मी घटस्फोट द्यायला तयार झाले.घटस्फोटानंतर वर्षभरातच आमचं भेटणं, एकमेकांच्या घरी जाणं वगैरे सुरु झालं. आम्हा दोघींच्या मनात किंचितही कडवटपणा नाही. ‘तिला’ माझ्याबद्दल काय वाटतं ते ‘तिने’ कधीच मला शब्दात सांगितलेलं नाही. आपलेपणा, आस्था आणि प्रेमासारखा भावना शब्दांच्या मोहताज नसतातच. मलाही तिच्याबद्दल राग असण्याचं कारणच नाहीये. ती नसती तर तिच्या जागी दुसरी कुणी असती, हे एकदा मान्य केलं की रागावण्याचं कारणच संपून जातं. मी असं बोलले की लोक जगातलं दहावं आश्चर्य पाहिल्यासारखे माझ्याकडे पाहतात. पण माझं जगण्याचं तत्वज्ञान एकदम सोपं आहे.आपण आपलं आयुष्य आनंदी ठेवायचं की ‘मिझरेबल’ करायचं, हे सर्वस्वी आपल्या हातात असते. ज्या गोष्टीवर आपला ताबा नाही, ती घडली म्हणून आपण का दुःखी व्हायचं? का एखाद्याचा रागराग करायचा? त्याने मनातली नकारात्मक भावना-निगेटिव्हिटी वाढते. कुठलाही लेखक, तो खूप मोठा असो, नाहीतर माझ्यासारखा एखादा छोटा लेखक असो, तो तर ‘सृजन’ करत असतो. प्रतीसृष्टीचा छोटामोठा निर्माता असतो तो. मनातली ‘निगेटिव्हिटी’ वाढली की सृजनाची शक्यता आपोआप कमी होते. मला ते सहन होणार नाही.

शिवाय, मी प्रचंड नियतीवादी आहे. ‘पत्ता भी नही हिलता, बिना ‘उसकी’ रज़ा के’ या उक्तीवर माझी नितांत श्रद्धा आहे. नियतीवाद माणसाला अकर्मण्य-कुचकामी करतो असं म्हणायाची फॅशन आहे. पण माझा अनुभव मला सांगतो की नियतीवाद माणसाला शांत, स्थिर करतो. ‘गम और खुशी मे फ़र्क न महसूस हो जहाँ…,’ अशा वळणावर नियतीवादी माणूस सहजपणे पोचतो. अंतर्मनात कुठेतरी एक स्वर घुमत असतो, ‘आणखी एक पाश तुटला… आता प्रवास आणखी थोडा सोपा होईल…!’

(मिथिला सुभाष या नामवंत पटकथाकार व संवाद लेखिका आहेत)

[email protected]

मिथिला सुभाष यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात – मिथिला सुभाष– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous article‘आदर्श भाडेकरू कायदा, २०२१’ – भाडे उद्योगाचे नवे पर्व
Next articleउतावीळ नाना पटोळे !   
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

5 COMMENTS

  1. हे सगळं अचाट आणि अफाट थोर आहेय….🙏🏻🙏🏻
    You are simply great मिथिला ताई 🙏🏻❤️💕

  2. मनाला प्रचंड आवडले… तुटक तुटक वाचलेले आज सविस्तर वाचायला मिळाले.. सगळ्या व्यक्ती अगदी जवळच्या होऊन बसल्या आहेत.. मिथिला सुभाष.. 🌹❤🌹

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here