नको उश्रामे आणि नको उन्मादही…  

-प्रवीण बर्दापूरकर

लोकसभा निवडणुकीचा निकाल आलाय ; नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष अपेक्षेपेक्षा जमोठ्ठ्या बहुमताने विजयी झालेले आहेत . मतदान यंत्राविषयी शंका , विजेत्यांनी साम-दाम-दंड भेदाचा अवलंब केला , जनमत अलोकशाहीवादी आहे , हा नॉन सेक्युलर विचारांचा विजय आहे , असा कोणताही कांगावा न करता समजूतदारपणे तसंच कोणताही नाहक वाद निर्माण न करता हा निकाल सर्वच पक्षांनी स्वीकारायला हवा आणि संघटित होऊन भाजपच्या राजकीय भूमिकेला विरोध करण्यासाठी पुन्हा सज्ज व्हायला हवं . भारतीय लोकशाहीच्या अंतर्गत घटना आणि कायद्यानं जी चौकट आखून दिलेली आहे त्या चौकटीत राहून आतापर्यन्त झालेल्या निवडणुकात ज्या पक्षांनी ज्या पद्धतीनं विजय संपादन केलेले आहेत त्याच चौकटीत राहून भारतीय जनता पक्षानं हा विजय संपादन केलेला आहे ; आजवर जे भले-बुरे मार्ग विजय संपादन करतांना वापरले गेले तेच वापरत भाजपने हा सलग दुसरा विजय संपादन केलेला आहे . त्या विजयाला असंवैधानिक , अनीतीपूर्ण अशी लेबल्स लावण्याची गरज नाही . राजकारणात जय आणि पराजय या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात ; जयाचा उन्माद बाळगायचा नसतो , नैराश्य येऊ द्यायचं नसतं आणि पराजयातून शिकायचं असतं . ( या संदर्भात राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना दाखवलेली मॅच्युरीटी दाद देण्यासारखी आहे . लढाई सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करत त्यांनी जनमताच्या आदेशाचा स्वीकार करताना दाखवलेला उमदेपणा प्रशंसनीय आहे . ) भारतीय जनता पक्ष धर्मांध आहे हे खरं पण , त्याचा अर्थ आज निवडणुका लढवलेल्या सर्वच पक्षांचा निवडणुकीय इतिहासही जात आणि धर्म बघूनच उमेदवारी देण्याचा आहे , हे विसरता येणार नाही . सिंधुदुर्ग मतदार संघातून बंदिवाडेकर यांना उमेदवारी देणं ही धर्मांधताच आहे . नागपूर मतदार संघातून भाजपचे नितिन गडकरी यांच्याविरुद्ध भाजपचे बंडखोर नाना पाटोले अशी लढत झाली . नितीन गडकरी यांचा विजय निवडणुकीआधीच निश्चितच होता मात्र नाना पाटोले यांच्या उमेदवारीमुळे त्यात माध्यमांनी काहींशी रंगत भरली तरी ही लढत एकतर्फीच होती . या लढतीला काँग्रेसकडून आणि विशेषत: नाना पाटोले यांच्याकडून शेवटच्या आठवड्यात दिला गेलेला जातीय रंग जास्त चिंताजनक होता . राजकारणविरहित विकास ही भूमिका घेणारे नितीन गडकरी आणि त्यांच्याविरुद्ध वापरलं गेलेलं जातीचं कार्ड यामुळे भाजपच्या गोटात शेवटच्या क्षणी जरा चिंता निर्माण झाली ती गडकरी यांच्या विजयाचं मताधिक्य वाढणार की कमी होणार याबद्दल . जात महत्वाची की कर्तृत्व हा मुद्दा निमित्ताने समोर आला आणि मतदारांनी विचलित न होता गडकरी यांच्या बाजूने कौल दिला हाही नागपूरच्या विजयाचा एक अर्थ आहे . त्यामुळे कोण किती जास्त धर्मांध ही चर्चा फिजूल आहे . साध्वी प्रज्ञा हा चेहेरा असलेल्या भारतीय जनता पक्षाची धर्मांधता हिंस्र आहे आणि त्याला रोखायचं कसं , याचा विचार कोणत्याही उखाळया-पाखाळ्या न काढता आता व्हायला हवा आहे .

भारतीय जनता पक्षानं ही निवडणूक लढवतांना संघटना उभारण्याचा कोणता प्रयोग केला हा अभ्यासाचा विषय आहे . काँग्रेस आणि आणि पक्षांनि जात आणि धर्मांचा आधार घेत ज्या व्हॉट बँक तयार केल्या त्याला शह देण्यासाठी छोट्या-छोट्या गटांना एकत्र करुन वेगळ्या व्होट बँक आणि नवा जनाधार कसा  तयार केला हा अभ्यासाचा विषय आहे . ‘इट का जबाब पत्थर’से देण्याचे कोणते नवीन फॉर्म्युले पश्चिम बंगाल आणि पूर्व भारतातील प्रदेशात भाजपने वापरले हा अभ्यासाचा विषय आहे . आमच्याकडे पैसा नाही म्हणून संघटना नाही म्हणून कार्यकर्ते नाहीत असे बहाणे भाजपने कधी दिले नाहीत तसे ते काँग्रेसनं देऊ नयेत . इतकी वर्ष सत्तेत राहिलेल्या काँग्रेसच्या भरवशावर नवश्रीमंत राजकारण्यांची जी नवी जमात उदयाला आलेली आहे त्यातील हजार नवश्रीमंतांनी नुसते उश्रामे न टाकता प्रत्येकी फक्त दोन कोटी रुपये दिले तरी काँग्रेस पक्षाची आर्थिक चणचण दूर होऊ शकते ; त्यासाठी हवी आहे इच्छाशक्ती . भाजपचे कार्यकर्ते उन्ह , पाऊस , थंडी असे कोणतेही बहाणे न देता जी वणवण करत पक्ष वाढवतात तसे कार्यकर्ते घडवणं गरजेचं आहे ; दिल्लीच्या अलीशान घरात किंवा वातानुकूलित कार्यालयात बसून फुकाचे सल्ले देणारे नेते-कार्यकर्ते दूर करणं ही काळाची गरज आहे . ही एक प्रदीर्घ प्रक्रिया असून आजचा भाजप एका रात्रीत उभा राहिलेला नाही हे समजून घेण्याची गरज आहे .

भाजपला उत्तर देण्यासाठी कांगावे करणं बंद करावं लागेल . ‘मुलगी विजयी झाली तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा आणि या लोकशाहीवरचा विश्वास उडेल’ अशी भूमिका घेणार्‍या , प्रचाराचं ‘आऊट सोर्सिंग’ करण्याच्या प्रयोग करणार्‍या शरद पवार यांच्यासारख्यांना आता काँग्रेसपासून लांब अंतरावर ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे . ‘आम्ही म्हणतो तेच खरं , आम्ही म्हणतो तीच लोकशाही’ असा कर्कश्शपणा करणारांना आता ‘गप्प बसा’ असं खडसावून सांगण्याची वेळ आलेली आहे . निवडणूक हरण्याची भीती स्पष्ट दिसत असल्यानं मतदान यंत्राविरुद्ध कांगावा ( आता हे स्पष्ट झालंय ) करणार्‍या ममता बॅनर्जी आणि  चंद्राबाबूसारख्या नेत्यांपसून काँग्रेसनं स्वत:ला दूरच ठेवायला हवं . ( या संदर्भात पृथ्वीराज चव्हाण काय म्हणतात ही नीट उमजून घेण्याची तसदी काँग्रेस श्रेष्ठींनी घ्यायला हवी . ) काँग्रेसी विचाराशी यापैकी एकाही नेत्याला कांहीही घेणं-देणं नसून त्यांचा स्वार्थच त्यांच्यासाठी महत्वाचा आहे आणि त्यासाठी काँग्रेसचा आधार त्यांना हवा आहे .

आणखी एक मुद्दा म्हणजे समाजात सरकारच्या असणार्‍या असंतोषाचा आहे . गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर या केंद्र आणि राज्य सरकारांच्या या असंतोष/नाराजी विषयी खूप कांही बोललं आणि लिहिलं गेलं ; त्यात मीही आघाडीवर होतो पण , ती नाराजी/असंतोष मतांत रुपांतरित झालेली नाही , या आलेल्या अनुभवांची पुनरावृत्ती झाली हे नरेंद्र मोदी आणि भाजपच्या मोठ्ठ्या विजयानं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे आणि ते तिकडे वाळलेलं जनमत आपल्याकडे कसं याचा कोणताही ठोस प्लॅन विरोधकांकडे नाही आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एक नेता नाही , हेही लक्षात घ्यायला हवं .

समाज माध्यमांवर सुरु असलेल्या मोहिमांतून जनमताचा अचूक अंदाज येत नाही हा या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा एक अर्थ आहे . जनमताचे कौल आल्यावरही ते प्रकाशित/प्रक्षेपित करणार्‍या माध्यमांना सुळी चढवून समाज माध्यमांवरील ‘थोर’ तज्ज्ञ आणि एकारला कर्कश्शपणा करणारे सर्व भक्त आणि न-भक्त तोंडघशी पडले आहेत . अकोला , सोलापूर , नांदेड , बुलढाणा या जागा काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीमुळे गमवाव्या लागलेल्या आहेत असा ठपका आता ठेवता येईल आणि आंकडेवारी पाहता त्यात तथ्य दिसत असलं तरी यासाठी कुणी एक नाही तर काँग्रेस-राष्ट्रवादी-वंचित आघाडी अशा तिन्ही नेत्यांचा हेकेखोरपणा जबाबदार आहे . वंचित आघाडी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीत युती झाली असती तर सध्या दिसणारं चित्र निश्चितच वेगळं दिसलं असतं ; अशी कांही आघाडी होऊ नये असंच हट्टी वर्तन आणि स्वत:च्या शक्तीविषयी बाळगलेला फाजील विश्वास , असा या तिन्ही पक्षांच्या नेत्यांचा अविर्भाव कायम राहिला पण, आता या आणि अशा कोणत्याही चर्चात कांहीही अर्थ उरलेला नाही . कारण आघाडीचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही आणि आणि काँग्रेस तसंच राष्ट्रवादीचं पुरेसं जबरदस्त नुकसान झालेलं आहे . राज्य काँग्रेसचं नेतृत्व समंजस नेत्यांकडे देण्याची गरज आहे , हाही या निकालांचा अर्थ आहे .

या विजयाबद्दल नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचं मन:पूर्वक अभिनंदन . मात्र हा विजय भीतीदायक वाटावा असा अभूतपूर्व आहे . गेल्या  पांच वर्षांचा अनुभव लक्षात घेता यापुढे तरी या विजयाचा उन्माद भाजपला चढणार नाही ; त्याची भीती समाजाला वाटणार नाही ; लोकशाहीचा संकोच करण्याचे प्रयत्न होणार नाहीत ; सरकार व पक्षाच्या जनहित विरोधातील लढाई पातळी न सोडता लढण्याच्या असलेल्या कोणाच्याही हक्कावर घाला घातला जाणार नाही , अशी आशा बाळगू यात .

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)

9822055799
Previous articleभक्तिरसात बुडालेला देश
Next articleफक्त आणि फक्त अनुभवावा असा ‘ऑक्टोबर’! 
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here