नवनाथ गोरेचे गोठलेले जग…

आनंद विंगकर

साहित्य अकादमीचा मराठी भाषेसाठीचा युवा पुरस्कार नवनाथ गोरे यांच्या  ‘फेसाटी’ कादंबरीला नुकताच जाहीर झाला.  दोन वेळची भाकरी मिळणे हीच दिवसातील मोठी कमाई असे समजणाऱ्या नवनाथ यांनी आपल्या वाट्याला आलेल्या दारिद्ऱ्याचे उदात्तीकरण करण्यापेक्षा अनुभवाची दाहक वास्तवता शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न ‘फेसाटी’च्या पानावर केला आहे.  अकादमी पुरस्कार मिळाला, पण नवनाथ यांच्यापुढे आजही नोकरीची आणि भाकरीची चिंता आ वासून उभीच आहे.

मी उमदीला, सचिन ऐवळेच्या चुलत भावाच्या लग्नाला आलोय, हे समजल्यावर नवनाथ गोरे माझ्यासाठी कोल्हापूरवरून सकाळच्या पेपरगाडीने मला भेटायला निघाला.सकाळी अकराच्या दरम्यान मी स्टँडवर थांबलो. बदामी शर्ट अन् किरमिजी काळी पँट घातलेला एक सर्वसामान्य तरूण बसमधून उतरला. हाच नवनाथ गोरे होता. रंगाने जवळपास काळा. चेहरा ओबडधोबड, शरीराने धडधाकट. लक्षात रहावेत, असे फक्त त्याचे पाणीदार डोळे! बोलताना कमालीचा नम्र. बाजूच्यांची आदब राखून इतरांचे लक्षपूर्वक ऐकत हुशार, सालस विद्यार्थ्यासारखा उभा असलेला. फेसबुकावरील त्याच्या फोटोमुळे त्याला ओळखायला वेळ लागला नाही. त्याच्या आवाजात कमालीची मार्दवता. मी असा त्याला त्याच्याच गावात भेटल्याने तो खूपच आनंदित. पूर्वी कधी मी नसताना माझ्याही घरी तो येऊन गेला होता म्हणे. रस्त्यालगतच्या टपरीवरच आम्ही चहा पिण्यास गेलो. भेटणाऱ्या प्रत्येकाशी तो प्रेमानं बोलत होता. नवनाथची बोलणे अन् लिहिण्याची भाषा मराठीच, त्याचे बोली भाषेचे उच्चारण  जवळपास प्रमाण मराठीसारखेच. गेल्या काही वर्षांपासून कोल्हापुरात असल्याचा, शिक्षण अन् चरितार्थासाठी जत तालुका सोडल्याचा त्याच्यावर हा ‘प्रमाण मराठीचा’ प्रभाव असावा.

मोटरसायकलवरून त्याचा एक मित्र आला. ओळख करून दिल्यावर समजले, हा रमेश कोळी.डोक्यावर केसांची झुलपं. डोळे तसेच बोलके. रंगाने नवनाथहून उजळ, हसमुख अन् कमालीचा बोलका. बोलताना कानडीचा प्रभाव सहज जाणवणारा. लक्षात आले, मराठीहून तो कानडीच अधिक अस्खलितपणे बोलतो. हे दोघं लहानपणापासूनचे दोस्त. एम.ए. विद्यापीठात एकत्रच केलं दोघांनी. दोघं बहुधा ठरवूनच आले होते. जमेल तेवढा जत तालुक्यातील परिसर ते मला दाखवणार होते.
“फेसाटी’ मी नुकतीच वाचलेली होती. तिथले लोक अन् परिसराचा मला काहीसा अंदाज आला होता.  मी या भागात जत्रेसाठी प्रसिद्ध असलेल्या हुलजंतीला अन् माघारी फिरून कर्नाटकातील चडचण या बाजार असलेल्या गावाला गेलो. नवनाथला घरातील लोकांसाठी बाजार करायचा होता. म्हणून त्याने एकदोन चादरी अन्् बेडशीटंही घेतलेली.  घरात लागणाऱ्या सगळ्या गोष्टी साबण, निरमा, काड्यापेटीचे पुडे, अंगाच्या साबणाची वडी- सिंथॉल, कोलगेट अन् पॅरेशुट खोबरेल तेलाच्या बुदलीसकट, त्याही घेतल्या. बहुतेक पगार झाला असेल, त्याचा. रमेशनेही काडेपेटीशिवाय जवळपास या सगळ्या गोष्टी विकत घेतलेल्या.
जवळपास चारपाच तास आम्ही फिरत होतो.खूप पाहिला परिसर. भेटेल, त्या माणसांशी बोललो.

इथले राजकीय सामाजिक अन्् सांकृतिक पर्यावरण समजून घेण्याचा प्रयत्न केला.जवळपास सर्वत्र हालाखी. गाव एकमेकांपासून दूर. अर्धवट सुटणारे शिक्षण. लहान वयातच रोजगारासाठीची भटकंती. सगळीकडेच बहुतेक यलम्मासारख्या देवदेवतांचा प्रादुर्भाव. नवनाथच्या कादंबरीत ते सगळं कळत नकळत आलंय.
चहा घेताना रमेश अन् नवनाथ कधी कानडीत बोलत. कदाचित घरगुती प्रश्न असावेत.मग नवनाथच म्हणाला, तुम्ही आज माझ्याकडेच चला, मुक्कामाला. गैरसोय होईल थोडी, पण घरात कोंबडी कापायला सांगतो. रमेश विचारतो, माणदेशावरल्या आमच्या कोरड्या हवेची थंडी जबराट, आताच विचारतोय काय घेणार अाहात का? नवनाथ नाही घेणार त्याने माळ घातलीय अलीकडे गळ्यात. म्हणालो, ‘नको. पाहुण्यांच्यासमोर ते बरोबर दिसत नाही. तुझ्या कादंबरीतील नायकाला तर सगळी व्यसनं आहेत?’ हसला तो. ‘सर मी ते सगळं सोडलंय.’ लग्न झालंय नां तुझं? तो थोडा हिरमुसला. ‘आवो नोकरीचा पत्ता नाही अजून. घर नाही रहायला. आपल्या सारख्याला कोण देणार पोरगी?’
मला काही बोलता आले नाही, त्यावर.

उमदीपासून चार किलामीटरवर नवनाथचे गाव. तिथून दोन-तीन किलामीटरवर रानात त्याची वस्ती. जानेवारीचा तो महिना. हवेत प्रचंड गारठा.  सूर्य मावळून गेल्यानंतरचा मी अल्हाददायी जतचा परिसर अनुभवतोय. ज्याला समृद्ध महाराष्ट्राने सहज स्वस्त उपलब्ध मजूरांचे कोठार म्हणून स्वीकारलेलं आहे. म्हणूनच अस्थिर आहे,अवघ्या तरूण पिढीचे जगणं. नवनाथसारख्यांनी कधी करायचीत लग्न? कधी सुरू व्हायचा संसार? म्हणून मग परत गावचं घर आईवडील… हे चक्र अटळ.नवनाथने हे जवळपास सगळं मांडलंय, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त “फेसाटी’त.
गावापासून तीनचार मैल दूर, माणसांची कसलीही वर्दळ नाही, असं निलांडे. कडूसं पडताना आम्ही पोहचलो तिथं. या मैलदीड मैलांच्या आजुबाजूला  कोणाचीच वस्ती नाही. चारी बाजूने कुडं अन् आत सारवून लिंपून घेतलेलं एक जुन- पुराणं सपार. आतील काळोखात क्षीण प्रकाशाचा एक दिवा. बाहेर माती अन् शेणकाला टाकून रानातच खळ्यासारखं सपाट तयार केलेलं अंगण. नुकतेच खराट्याने लोटून स्वच्छ केलेलं. सपाराच्या सोप्यात एक खोली होती, बहुधा त्याचे दार झापाचे असावे.मी अंगणातच उभा , स्तब्ध. बाहेर बाजूला लिंबाचे लहान झाड. झाडाखाली गाय बांधलेली. एक कुत्रा बंडा. नवनाथ अन् रमेश सोबत असल्यानेच त्याने मला स्वीकारलं होतं.  हातात दोन भरलेले तांबे घेवून आठवी-नववीला शिकणारा बाहेर एक मुलगा आला. सावळा हा नवनाथचा भाचा. सोप्यात गालावरची दाढी पिकलेला चाळीस-पंचेचाळीस वर्षांचा अपंग माणूस, जो नवनाथचा थोरला बंधू असावा. कादंबरीत त्यांना मी वाचलेलं होतंच. आणि आई आता वय वाढलंय त्यांचं, असेल साठ-पासष्ठ किंवा त्याहून जास्तही. तरीही बऱ्यापैकी हाडपेरं मजबूत. कपाळावर ढळढळीत कुंकू. तुलनेत नवनाथच्या कादंबरीत ती थोडी मला अशक्त वाटते. ते दोघं माय-लेकरं रात्रीच्या पाहुणचारासाठी कोंबडी सोडवत होते.  उन्हं उतरणीला लागलेली आई. थोरला मुलगा पंचेचाळीसचा. अपंग. बिन लग्नाचा. धाकटा तीसच्या उपरांत.अजूनही खईदवार. कुठली नोकरी नसलेला. माळावरलं एकटं एकाकी हे सपार.  मी नमस्कार केला. म्हणालो,कशा अाहात आई? काळोखात त्या प्रसन्न हसल्या. थोड्या वेळानं, पेल्यात काळा चहा पित आम्ही बाहेरच बसलो, अंगणात. उघड्यावर हवेत सुरू झालेला गारठा. विजेच्या खांबावरून आकडा टाकून घेतलेल्या लाइटचा बल्ब अंगणातील मेढकुचीच्या दांड्याला अडकवलेला. हा नवनाथसाठी अवांतर पुस्तक वाचण्याचा, रात्रीतून फिरणाऱ्या श्वापदाला वा अनोळख्याला कळावं, इथं माणसाची वस्ती आहे, म्हणूनचा रात्रभर जळणारा दीपस्तंभ. नवनाथचा भाचाही इथेच रात्री बसून जीवनाचा अभ्यास करीत असेल…

डोक्यावर फेटा, अंगात बंडी अन् गुडघ्यावरून वर खोचलेलं धोतर. एक जवळपास भिजलेले वृद्ध बाबा खालच्या तुरीला फवारणी करून आलेले. वयाच्या असंख्य सुरकुत्यांनी चेहरा वलयांकित झालेले हे नवनाथचे वडील. “फेसाटी’कादंबरीत ते एका मरणाच्या आजारातून उठलेले आहेत. खरं तर मी त्यांना वाकून नमस्कार करायला हवा, पण रोगरने ते भिजले आहेत. पूर्ण कपडे काढून त्यांनी प्रथम अंंघोळ करायला हवी. रजनी पाम दत्तंाचा ‘आजचा भारत’ हा ग्रंथ मला आठवला. आजच्या भारतातला त्र्याएेंशी वर्षांचा हा म्हातारा सन दोन हजार अठरात पिकावर किटकनाशक औषधाची फवारणी करून कडूस पडल्यानंतर येतोय, आपल्या चंद्रमौळी घरी, हे नाहीतरी एक आश्चर्यच. टोपात पाणी तापवलेलं. बाहेर त्यांनी अंघोळ केली.
आमच्या सोबत रमेश आहेच. तो अखंड अनुभवातले बोलत जातो. आता मात्र मला काही बोलताच येत नाही. गरीबीतूनच आलोय मी. पण हे अजून कसलं पाठीमागे दारिद्र्य लागलंय, जे नऊ-दहा पंचवार्षिक सरकारी योजना राबवूनही संपत नाही. आणि इथून पुढे तर परिस्थिती आहे त्याहून अधिक खराब होणार आहे. नवनाथ स्वत: जवळ असलेली एकदोन मासिकं दाखवतो. मला ती वाचण्यात कुठलाच रस नाही. लिहिण्याने प्रश्न सुटतील, अशी सुतराम शक्यता नाही. पण अजूनही माणसं अशी पाऊस, थंडी, ऊन, वाऱ्यात वाट्याला आलेल्या ओंजळभर उजेडात अन् घोंगडीभर निवाऱ्यात निमुटपणे जगताहेत. हे तरी इतरांना कळायला हवंच नां? म्हणूनच लिहायचं आहे.
मी हे सगळं पाहून हदरलो आहे. गारठलो आहे. मधेच नवनाथ म्हणाला, बाहेरच्या चुलीपुढे बसूयात. आता मी चुलीला पाय लावून बसलोय, गुहेतून बाहेर पडलेल्या आदिम माणसासारखा! अग्निला मीच तर काबूत आणलंय. आणि ही पिळवणूक, जात, धर्म अन् शोषण पंचमहाभुतांसारखे सुरुवातीपासूनचे नाही. जसं या अग्नीला माणसाने काबूत आणले.तसेच आजच्या प्रश्नांनाही आपण सामोर जायला हवेच.  म्हणालो-लिहित रहा मित्रा. लिहिण्याची अजून गरज आहे…

[email protected]
लेखकाचा संपर्क : ९८२३१५५७६८

Previous articleहे वेताळाचे प्रश्न नाहीत
Next articleवाळू हातातून निसटतेय…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

  1. दाहक अनुभवांची वास्तव अनुभूती जगण्याचा संदर्भ …..अगदी हदरायलाच होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here