-अमेय तिरोडकर
काही माणसांना एक छंद असतो. जो अडचणीत आहे त्याची मदत करायची. असं करत असताना त्यांचे काही फार दीर्घ धोरणी डाव वगैरे असतातच असं नाही. पवार त्यातले एक असावेत. (आता असावेतच. कारण ते तसेच आहेत असं म्हणायची आपली हिंमत नाही. पवार कसे आहेत हे बहुदा फक्त त्यांना एकट्यालाच माहिती आहे असा त्यांच्या भक्तांचा दावा असतो ????)
मोदी राफेलवरून अडचणीत आलेत. तसे ते मागच्या चार वर्षात अनेकदा आलेले. पण यावेळची गोष्ट मूलभूत पातळीवर वेगळी आहे.
यावेळी मोदींच्या देखरेखीखाली राफेल घोटाळा झालाय. त्याला ना संरक्षणमंत्री जबाबदार आहेत ना आणखी कोणी. यावेळी फक्त आणि थेट मोदी. म्हणजे, मोदींच्या हेतूवरच बोट रोखता येणं आणि ते लोकांना convince होणं असा हा मागच्या चार वर्षातला पहिलाच प्रसंग आहे.
राजकीय मानसशास्त्राचं एक गृहीतक आहे. लोकं नेता कधी निवडतात? तर, लोकांना नेता हा मनाने स्वच्छ हवा असतो. तो प्रशासनात कितीही चुका करो पण नियत साफ आहे ना त्याची, मग झालं तर.
हो ! नियत साफ. साफ नियत. आत्ता अलीकडे हे शब्द कुठे ऐकले आपण? साफ नियत? बरोब्बर. सरकारला ४ वर्षं झाली तेव्हा मोदींच्या जाहिरातींची टॅगलाईन होती. साफ नियत, सही विकास !!
4 वर्षात काहीच करून न दाखवता आल्यामुळे मोदी फेल गेले या टीकेला साफ नियत हे उत्तर दिलेलं होतं. त्या उत्तरामागे राजकीय मानसशास्त्राचा वरती सांगितलेला नियम एक्सप्लोर करायचा विचार होता. नोटबंदी, जीएसटी सारख्या चुका झाल्या असतील पण आमची नियत साफ आहे हे सांगण्याचा तो प्रयत्न होता.
राफेलने नेमक्या त्याच प्रचाराला टाचणी लावली !! मोदींची नियतच साफ नाहीये हे राहुल गांधी राफेलमध्ये सतत बोलत राहिले. त्याला समर्थन देणारे अनेक कागद आणि वक्तव्ये आता होऊ लागलीत. आणि मोदी सगळ्यात मोठ्या अडचणीत फसलेत.
यातून बाहेर पडायला पाकिस्तान काँग्रेस आघाडी करून झाली, हिंदू मुस्लिम करून झालं, देशद्रोही वगैरे सगळं बोलून झालं पण रिलायन्सला या डीलमध्ये का घेतलं आणि राफेलची किंमत किती हे सांगता येईना. हीच तुमची चुप्पी तुमच्या खोट्या नियत चा पुरावा आहे हा राहुल यांच्या आरोपांचा बेस आहे !!
पवारांची मुलाखत नीट ऐका. त्यांनी संसदेची संयुक्त चौकशी हवी ही काँग्रेसची मागणी लावून धरलीय. राफेलच्या किंमती जाहीर करायला हव्यात याही मागणीचं समर्थन केलंय. म्हणजे दोन्ही गोष्टी मोदींना अडचणीत आणणा-या. पण मग पवार मोदींना दिलासा मिळावा असं काय बोललेत? “लोकांना मोदींच्या हेतूंबद्दल काही शंका वाटत नाही” !! म्हणजेच काय तर, ‘नियत साफ’ आहे !!!
पण आता पवारांवरच हे मदतीला धावून जाणं उलटलंय !! राफेलमध्ये एक नवा खुलासा समोर आलाय. राफेलच्या किंमती अवास्तव वाढवण्यात आलेल्या आहेत असं एअरफोर्सच्या त्यावेळच्या जॉईंट सेक्रेटरीने पंतप्रधान कार्यालय आणि संरक्षण मंत्री यांना कळवलं होतं. या डीलवर आक्षेप घेतला होता. पण तरीही हे डील पुढे रेटलं गेलं आणि इतकंच नाही तर विरोध करणाऱ्या ऑफिसरला रजेवर जावं लागलं ! असो !!
तर अडचणीत आल्यावर मदत करताना बदल्यात शिष्य त्याची परतफेड करेल अशी गुरुची अपेक्षा आहे की नाही माहीत नाही. पण, गुरूच्या अपेक्षांबद्दल आणि राजकारणाबद्दल आपण काय बोलावं?
पवार म्हणजे एकाचवेळी चौकोनाच्या पाचही कोनांत, वर्षाच्या सहाही ऋतूंत आणि भवतालाच्या बाराही दिशांत हजर असणारे व्यक्ती आहेत ! त्यांना आपण तुम्ही का मदत केली आणि बदल्यात काय मिळालं हे काय विचारावं !!
रेसकोर्सवर जाणारे असं म्हणतात म्हणे की सगळ्याच घोड्यांवर पैसे लावणारे जे असतात ते सगळ्यात जास्त नुकसानीत जातात !! खरं खोटं घोड्यांना माहिती आणि पैसे लावणा-यांना !!!
(लेखक दैनिक ‘एशियन एज’ चे विशेष प्रतिनिधी आहे)