रामविलास पासवान हयात होते तोपर्यंत लोक जनशक्ती पक्षातील कुरबुरींना तोंड फुटलेलं नव्हतं कारण रामविलास यांचा करिष्मा आणि वचकही तसाच होता . बिहारवर वर्चस्व निर्माण करण्याच्या नितीशकुमार आणि रामविलास यांच्यात सुरु असलेल्या सुप्त संघर्षालाही जाहीर स्वरुप प्राप्त झालेलं नव्हतं . त्या संदर्भात जे काही शह आणि काटशहाचं राजकारण सुरु होतं त्याला तोंड फुटलेलं नव्हतं . मात्र , रामविलास पासवान यांच्या निधनानंतर लोक जनशक्ती पक्षाची सुत्र चिराग पासवान यांच्याकडे आली आणि नितीशकुमार यांचा जनता दल (यु) आणि लोक जनशक्ती पक्षात वर्चस्वाचा संघर्ष उघडपणे सुरु झाला तरी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकापर्यंत त्याची फार काही झळ नितीशकुमार आणि त्यांच्या जनता दल (यु ) पक्षाला बसलेली नव्हती .
सर्व राजकीय पक्षात असतात तसेच सत्तेसाठीचे संघर्ष लोकसभेत जेमतेम सहा सदस्य असलेल्या लोक जनशक्ती पक्षातही आहेत , हे नितीशकुमार यांनी हेरलं आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचं बिगूल वाजायला सुरुवात होताच फासे फेकले . कुठल्या तरी हिंदी चित्रपटात ‘ये खेल तुमने शुरु किया है , इसे मै खतम करुंगा’ असा डॉयलॉग आहे . नितीशकुमारांना शह देण्याचा खेळ चिराग पासवान यांनी सुरु केला आणि त्या खेळाचा शेवट आता नितीशकुमार करत आहेत . लोक जनशक्ती पक्षाच्या सहापैकी पाच खासदारांनी बंडाचं निशाण फडकावलं . पक्षाच्या गटाचं लोकसभेतील नेतेपद चिराग पासवान यांच्याकडून काढून घेऊन पशुपती पारस यांच्याकडे सूपूर्द केलं . पक्षाच्या संसदीय गटात फूट पडली . चिराग पासवान अल्पमतात गेले . त्यांच्या गटात आता तेच एकमेव खासदार उरले आहेत . पुढच्या सगळ्या हालचाली नितीशकुमार यांच्या नियोजनाप्रमाणे घडत गेल्या आणि चिराग पासवान एकटे पडले . पक्षात फूट पडली हे मान्य करुन स्वत:च्या नेतृत्वाखालील पक्ष मूळ असल्याचं सिद्ध करण्याऐवजी चिराग पासवान यांनी त्या पाच खासदारांना पक्षातून काढून टाकलं . आता ते पाच खासदार विरुद्ध एकटे चिराग पासवान अशी अस्तित्वाची खडाखडी सुरु झालेली आहे . २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतच बिहारातील मतदार पशुपती पारस यांच्यामागे आहेत की , चिराग पासवान यांच्यामागे हे सिद्ध होईल .