पॅरासाईट: वासात हरवून जाणाऱ्या माणसांच्या चेहऱ्याची कथा

-प्रीती बनारसे-रेवणे

करोनामुळे आर्थिक फटका सर्वांनाच बसणार आहे. पण, त्यातही खालचा वर्ग अधिक भरडला जाईल. हा वर्ग वरच्या वर्गावर निर्भर आहे आणि त्यांना त्याची जाणीवही आहे. पण, वरच्या वर्गाचीही कामं श्रमजीवी वर्गाशिवाय होऊ शकत नाहीत. हे खालच्या वर्गाचं महत्त्व न जाणवणारी असंवेदनशीलता म्हणजे ‘पॅरासाईट’ हा सिनेमा.

वास आपल्या जीवनातील एक अत्यंत महत्वाचा पण दुर्लक्षित घटक. अतिपरिचयात अवज्ञा झालेला. पण, आपला सबकॉन्शस मेंदू त्याची दखल घेत असतो आणि आपल्या जाणिवा नकळतपणे त्यावर रिअ‍ॅक्ट होत असतात. हे रिअ‍ॅक्ट होणं आपल्या परंपरा, संस्कृती, विचारधारा व माणसाच्या मनात खोलवर रुतलेल्या अहंभावातून आकार घेत असतं.

‘पॅरासाईट’ या वर्षीचा ऑस्कर विजेता सिनेमा. नवऱ्याने सुचविला म्हणून बघायला घेतला अँमेझॉनवर. तेव्हा रात्रीचे 2.30 वाजले होते आणि संपला तेव्हा 4.45.. या सव्वादोन तासात माझी नजर स्क्रीनवरून हटली नाही की माझ्या मनात दुसरा कुठला विचार आला नाही. एवढा हा सिनेमा घट्ट पकड घेतो, उत्कंठा वाढवत नेतो. सिनेमा संपल्यावरही खूप अस्वस्थ आणि हतबल वाटायला लागलं. डोक्यात असंख्य विचार एकच गर्दी करू लागले. “नेमकं काय वाटतंय..?” ते समजत नव्हतं. म्हणून या सिनेमावर कुणी लिहिलंय का..? हे शोधून शोधून वाचलं. मला आवडणाऱ्या तीन व्यक्तींची या सिनेमावरील समीक्षा, सिनेमा बघतांनाचा अनुभव वाचला. खूपसं पटलं, रिलेट झालं. पण, तरीही मला खूप काही वाटत होतं. हे माझं वाटणं व्यक्त करण्याचा प्रयत्न करते.

मी काही सिनेसमीक्षक नाही. पण, तरी काही कलाकृती आपल्याला आतून बाहेरून हलवून टाकतात. त्यातीलच हा बॉन्ग जून दिगदर्शित सिनेमा, कोरियन सिनेमा असून आपल्याकडीलच एखाद्या झोपडपट्टीमधील एखाद्या कुटुंबाबाबतची ही कथा वाटते. म्हणूनच ती अधिक जवळची वाटते. जगातील गरीब-श्रीमंत या वर्गातील भेदावर, त्याच्यातील अंतरावर हा सिनेमा भाष्य करतो. म्हणूनच हा वैश्विक वाटतो. कोण चूक, कोण बरोबर ते नाही ठरवता येत. परिस्थिती कशी कारणीभूत ठरते आणि त्याचबरोबर माणसांची मूल्ये, त्याची नैतिकता माणसाच्या जगण्याचा प्रवास ठरवत जाते. गरीब घरात जन्म झाला, याला कोण जबाबदार..? कर्म असते, तशी नियतीही असते असं मानायला लावणारी भावना बळावते. गरीबांचे कर्तृत्व असूनही पैश्याअभावी नाकारलं जाणं, संधी न मिळणं, यातून होणारी घुसमट, येणारं नैराश्य आणि महत्वाचं म्हणजे चांगलं-वाईट न ठरवता येण्याचा विवेक हरवणं. त्याचे परिणाम किती भयंकर असू शकतात, यांची कल्पना हा सिनेमा आपल्याला करून देतो.

(या ठिकाणी स्पॉयलर होणं मला टाळता येणार नाही. त्यामुळे सिनेमा बघायचा असेल तर त्यानंतरच पुढचं वाचावं..)

‘किंम’ हे कुटुंब शहरातील एखाद्या गलिच्छ झोपडपट्टीत बेसमेंटमध्ये राहणारं. शहरातील रस्त्याहूनही खाली असणारं घर. इथे एक घर आहे, त्यात माणसं राहतात, याची जाणीव नसणारी माणसं तिथे मूत्रविसर्जन करतात. तर किड्यामुंग्यांना मारणारी फवारणी या घरातील माणसांवर करून जातात. इतके ते दुर्लक्षित समाजाचा भाग असतात. वडील पन्नाशीतील मिस्टर किंम, त्याची पत्नी ‘चुंग-सूक’, पंचविशीत ‘की-जुंग’ ही मुलगी आणि साधारण विशीतील ‘की-वू’ हा मुलगा. मिस्टर कींम सध्या बेरोजगार आहेत, यापूर्वी त्यांनी केक शॉप मध्ये आणि ड्रायव्हर म्हणून काम केलंय. बायको मुलांवर प्रेम करणारा, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानणारा. वृत्तीने सात्विक पण, पैसे कमविण्यासाठी मुलांनी काही बेकायदेशीर कृत्य केलं तरी ते चूक न मानणारा. त्यात काही गैर आहे असं त्याला वाटत नाही. परिस्थिती कशी माणसाची बुद्धी नाठी करते, हे दाखवणारं पात्र आहे. त्याची पत्नी कधीकाळी गोळाफेक स्पर्धेत गोल्डमेडल चॅम्पियन असणारी. पण, आता छोटे मोठे काम करून कुटुंबाचं पोषण करणारी, चांगलं जेवण मिळावं यासाठी तरसणारी. मुलगी कौशल्ये असूनही काम नाही म्हणून त्रस्त असणारी. पण श्रीमंतीची लालसा असणारी, उंच व चांगल्या गोष्टींची आवड असणारी आहे. किबु हा मुलगा वरवर बघता साधा सरळ वाटणारा पण संधीसाधू, विश्वासघात करणारा असा वाटतो. पण कुटुंबातील सर्वांवर प्रेम करणारा आणि त्याच्यासाठी काहीही करायला तयार असणारा असा आहे.

दुसरं गर्भश्रीमंत असं चौकोनी कुटुंब. मिस्टर पार्क हा खेळणे तयार करणाऱ्या कंपनीचा CEO, कुटूंबवत्सल, बायकोचं आर्थिक व निर्णय स्वातंत्र्य जपणारा. पण, श्रीमंतीचा आव असणारा, कर्मचारी / नौकर वर्गाशी अदबीने बोलणार पण अंतर ठेवून वागणारा. गरीब श्रीमंतांमधील सीमारेषा गडद करणारा, गरिबीचा द्वेष करणारा असा. त्याची पत्नी ‘योन-ग्यो’ ही खूप प्रेमळ आणि स्वतःच्या कुटुंबाप्रती काळजीवाहू असते. पण, इतर जगाशी तिचा काहीही संबंध नसतो. तिच्या चकचकीत, स्वच्छ व निरोगी जगापलीकडे अभावांनी भरलेलं, मळकटलेलं, जगण्यासाठी धडपडणारं दुसरं जग आहे, याची तिला कल्पनाही नसते. घराचं अर्थकारण बघणारी दुसऱ्याच्या आर्थिक अडचणीची पर्वा न करणारी. ‘डा-हाय’ ही किशोरवयीन मुलगी. जी हळवी आहे, भेदाभेद अजून तिच्यापर्यंत पोहचलेला नाही. प्रेम, आकर्षण यातील फरक न कळलेली पण, माणूस म्हणून उजवी वाटून गेलेली. ‘ड-सॉन्ग’ हा 6-7 वर्षांचा मुलगा जो खूप चंचल आहे. खेळकर आणि शोधक नजरेने सतत जगाचा वेध घेणारा. लहान मुलांची निरागसता आणि मोकळेपणा त्याच्या बोलण्यात जाणवतो. त्याच्या जगण्याच्या परिघाबाहेरील गोष्टीतील फरक टिपणारा आणि आजूबाजूला असणाऱ्या गोष्टीत साम्य शोधणारा असा. मिस्टर कींम, घरातील मेड आणि जसीका यांना एकसारखाच गंध येतो हे टिपणारा.

या घरात काम करणारी ‘मुंग-गुवांग’ ही एक मेड, जी तिच्या कामाशी आणि मालकाशी प्रामाणिक आहे. पण, परिस्थितीपुढे हतबल होत काही गोष्टी करते.

या दोन कुटुंबामधील घडणाऱ्या गोष्टी, घटना यातून हा सिनेमा आकार घेतो. चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम यातील घर करतं. तेही एखाद्या पात्राप्रमाणेच काम करतं. दोन कुटुंबाच्या घरातील फरक आपल्याला समाजातील वास्तवाचे आणि विभाजनचे/भेदाचे भान करून देते. संपूर्ण चित्रपटामध्ये अदृश्य पण जाणवू शकणाऱ्या अश्या ‘वास’ (गधं)या गोष्टीच्या माध्यमातून दिग्दर्शकांनी खूप मोठा परिणाम साधला आहे. हा वास आहे गरिबीचा, अभावाचा, श्रम करणाऱ्या घामाचा पण ज्यांच्यासाठी श्रम केले जातात त्यांनाच त्यांची घृणा येते, त्यांनाच हा वास असह्य होतो. ही घृणा इतकी वाढत जाते की माणसातील माणूसपण हिरावून घेते.चित्रपटाच्या पहिल्याच फ्रेममध्ये ह्यांगर ला टांगलेले सॉक्स दिसतात आणि त्याचा अर्थ संपुर्ण सिनेमाभर जाणवत राहतो, दिग्दर्शकांनी प्रत्येक फ्रेममध्ये वस्तू, वातावरण, निसर्ग आणि ध्वनी यांचा गोष्ट सांगण्यासाठी योग्य व पुरेपूर वापर केलेला आहे.

पहिल्याच दृश्यात कीम कुटुंबाच्या बेसमेंटमधील गजबजलेल्या, विस्कटलेल्या घरात ‘किबु’ हा मुलगा घरात कुठं फुकटचं नेटवर्क मिळतं का, ते शोधत फिरत असतो. टॉयलेट या घरातील एकमेव उंच असलेल्या ठिकाणी त्याला नेटवर्क मिळतं. कीबू याचा मित्र ‘मेन’ घरी येतो. सोबत एक पुरातन दगड भेट म्हणून आणतो. या दगडामुळे पैसा-समृद्धी लाभते, असा त्याच्या आजोबांचा विश्वास आहे, असं सांगतो. पुढे लोभापायी पुरातन दगडाविषयीची माणसाची भावना माणसाविषयी त्याला दगड करून टाकते. मेन परदेशी जाणार म्हणून त्याच्या जागी किबुला एका श्रीमंत घरी इंग्लिश ट्युशन घ्यायला सांगतो आणि इथूनच सिनेमा वेग घेतो.

नोकरी मिळविण्यासाठी खोटी कागदपत्रे त्याची बहीण तयार करते आणि याचंही आईवडिलांना कौतुक वाटत. कीबूला नोकरी मिळते. तशीच ती आपल्या घरातील इतर सदस्यांना मिळावी, म्हणून तो चतुराईने प्रयत्न करतो अन् मिळवून देतोही. पण, माणसाची हाव ही वाढतच असते. लोभ त्याला स्वस्थ बसू देत नाही. मिस्टर पार्क यांच्या घरातील जुन्या ड्रायव्हर आणि मेड यांना वाईट पध्दतीने कामावरून काढण्यास प्रवृत्त करतात आणि त्यात यशस्वी होतात. मिस्टर कींमला ड्रायव्हरविषयी आस्था वाटते आणि त्याला चांगलं काम मिळावं अशी तो आशा ठेवतो. पण, मुलगी ‘की-जोन्ग’ ही आपण फक्त आपला विचार करावा असं सुचवते.

माणसाचं आत्मकेंद्रित असणं, याला कुठल्याही एका वर्गाची गरज नसते. कुठलीही माणसं तशी असू शकतात. घर मालकीण मिसेस पार्क ही चांगली आहे. कारण, ती श्रीमंत आहे असं मिसेस कींमला वाटतं. पैसा असला तरच माणूस चांगला वागू शकतो, हे तिचं मत. जुनी मेड पार्क कुटुंबियांपासून लपवून घराच्या बेसमेंटमध्ये स्वतःच्या रिटायर्ड व वृद्ध नवऱ्याला ठेवते. पण, तिला घराविषयी प्रेम आहे, मालकांविषयी आदर आणि उपकाराची भावना आहे. हे दोन्ही कुटुंब श्रमजीवी वर्गाचे प्रतिनिधित्व करतात. पण, त्यांच्या आपापसात ही कशी एकमेकांवर कुरघडी करून जो ताकदवर तो जिकेलं या नियमाला अनुसरून जगण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात.

माणसाची जगण्याची प्रेरणा ही अंतिम आहे व त्यासाठी तो दुसऱ्या जीवावर पॅरासाईट म्हणजे परजीवीसारखं जगतो. जगात सगळेच एकमेकांवर अवलंबून असतात. पण, गरीबांसाठी हे अवलंबून असणं लाचारीचं ठरत. तर श्रीमंतांसाठी हक्काचं. पैशाच्या मोबदल्यात काहीही मिळवता येतं, ही अहंकारी भावना माणसाला आतून पोकळ बनवते आणि तो असंवेदनशील होत जातो. त्याला आजूबाजूची माणसं ही यंत्र वाटायला लागतात. त्याच्या मनाप्रमाणे वागणारी माणसं त्यांना हवी तशीच, तेवढीच आणि हवी तिथेच आवश्यक वाटतात. एवढया मोठया घरात एक मेड असते जी सर्वकाही एकटीच करते. ती आजारी आहे, म्हणून तिला कामावरून काढून टाकताना तिचं कसं होईल पुढे? याचा जराही विचार केला जात नाही. म्हणजे मिळेल तितकं राबवून घ्यायची समाजाची वृत्ती अधोरेखित होते. एका वर्गाकडे पिण्याच्या पाण्याचे दहा प्रकार असतात. त्याच्या पाळीव कुत्र्यांसाठी मोठंमोठ्या ब्रॅण्डचे पौष्टिक खाद्य असतं. तर दुसर्‍या वर्गाला कुत्र्याचं खाद्यही त्याच्या रोजच्या जेवणापेक्षा स्वादिष्ट वाटतं. वर्गसंघर्ष पुरातन आहे. पण, त्यातील वाढती दरी माणसाचं माणूस असणचं नाकारत चाललीय. माणसं वर्गाचे प्रतीक झालेय, वर्ग मोठे होऊन माणूस कसा खुजा होत जातोय, हे वास्तव हा सिनेमा दाखवतो.

पार्क कुटुंबाचं शहराच्या मध्यवर्ती उंचावर असलेलं उंच घर आणि त्या घरात तेवढंच खोल असलेलं तळघर, हे एका वर्गाच्या जीवावर दुसरा जीव आहे. तसंच खालच्या जीवाला आपण वरच्या जिवामुळे आहोत, हे वाटत राहतं. पण वरच्या जीवाला त्याची जाणीवही नाही, हे स्पष्ट चित्र आपल्याला दिसतं. घरातल्या खाली जाणाऱ्या पायऱ्या गूढ, मकळट, काळोख्या आहेत. तर, घरातील मध्यवर्ती भाग हा सूर्यप्रकाशात उजळून निघणारा, चकचकीत आणि भव्य आहे. दोन्ही जागांवर राहणाऱ्या माणसाचं आयुष्यही तसंच आहे. रात्रभर जोरदार कोसळणारा पाऊस एका कुटुंबासाठी आवडणारा असतो. दुसऱ्या दिवसाचे सूर्यकिरण स्वच्छ सोनेरी असतात. तर दुसरं कुटूंब रात्रभर झालेल्या पावसाने अख्या शहरातील वाहत आलेल्या पाण्याने तुडुंब भरलेले घर, बुडालेला संसार. त्यातील काय वेचायचं आणि काय ठेवायचं, याचीही उसंत न देणाऱ्या निसर्गापुढे हतबल होतो. बेसकॅम्पमध्ये रात्र काढावी लागलेल्या कुटूंबांच्या दिवसाची सुरुवात जुन्या वापरलेल्या कपड्यामध्ये आपल्या मापाचे कपडे शोधणे, कुठूनतरी जेवण मिळण्याची वाट बघणे याने होते.

एका प्रसंगात मिस्टर पार्कला यांच्या घरात एक वास येतो आहे. जो वास त्याच्या ड्रायव्हरच्या अंगाला येतो तसा.. जो त्याला नकोसा असतो. वासाचे अस्तित्व त्याला जाणवते. पण, आपल्याच आजूबाजूला असलेल्या लोकांची / जित्याजगत्या माणसांची त्याला जाणीव होत नाही. इतक्या आपल्या भावना स्वकेंद्रित झाल्या आहेत. गरीब मुलीची अंतर्वस्त्रे त्याला उत्तेजित करतात. पण कींमच्या अंगालाही गरिबीचा असलेला तोच वास त्याला असह्य होतो. टोकाची घृणा दुसऱ्याच्या मनात द्वेष निर्माण करून टोक गाठू शकते, याची कल्पनाही त्याला नसते. शेवटच्या दृश्यात हे टोक गाठलं जातं आणि आपण, “हे काय घडलं..?” असं अवाक् आणि हतबल होऊन बघत राहतो. असं व्हायला नको होतं, अशी हळहळ व्यक्त करतो.

श्रीमंत असणं हा काही गुन्हा नाही, तसंच गरीब असणंही नाही. प्रत्येकाला किमान स्वतःचं आकाश बघता यावं, स्वप्नांवर विश्वास ठेवता यावा आणि एक दिवस तसं नक्की होईल, असा आशावाद आपल्या मनात हा सिनेमा अस्वस्थ करत असतांनाही देऊन जातो. आशयघन अशा पटकथेसोबत कलाकारांच्या अभिनयाची उत्तम साथ लाभलेला आपल्याला अंतर्मुख करणारा हा सिनेमा. नक्की बघावा असा आहेच..!

(लेखिका समाजशास्त्राच्या अभ्यासक आहेत)

 95940 70537

Previous articleमहाराष्ट्राची साठी ते पंच्याहत्तरी : दलितांनी काय मिळवले? काय राहिले?..पुढे काय?
Next articleMinimalism: किमान चौकटीत राहण्याची जीवनशैली
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here