-अमेय तिरोडकर
देवेंद्र फडणवीस त्यांच्या अटळ अशा राजकीय पराभवाकडे आपणहून चालत गेले. याला कारण फडणवीसांचे दोन दुर्गुण. एक प्रचंड अहंकार, दुसरा त्यांचे भंपक साथीदार.
फडणवीसांचा अहंकार हा त्यांच्या एकंदरीतच राजकीय कर्तृत्वापेक्षा फारच मोठा झाला होता. उबग यावा इतका तो सगळ्यांना दिसत होता. त्यांच्या पक्षातल्या लोकांनाही आणि बाहेरच्यानाही. परिणामी ज्यांच्या पाठीत कणा आहे ते सगळे त्यांच्यापासून दूर होत गेले. पक्षातले पण आणि बाहेरचे पण.
यातून मग फडणवीस अत्यंत भंपक, पोकळ लोकांनी घेरले गेले. या लोकांना सत्तेशी मतलब असतो. सत्तेत कोण बसलं आहे त्यांच्याशीही नसतो आणि लोकांशी तर नसतोच नसतो. या लोकांनी फडणवीसांना भ्रमात ठेवलं. जमिनीपासून होईल तितकं दूर नेलं. परिणामी फडणवीस हवेत गेले. इतके की आपण कुणाला अंगावर घेतोय आणि कुणासमोर दंड थोपटतो याचं भान पण त्यांना राहीलं नाही.
फडणवीसांचं वय ४९ वर्षं. शरद पवारांची राजकीय कारकीर्द ५२ वर्षांची. इतकं तरी भान ठेवायचं की जेवढी सरकारं फडणवीसांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात बघितली असतील त्यापेक्षा जास्त पवारांनी बनवली आणि बिघडवली आहेत. अश्या वेळी आपण कुणाला दुखावतो आहोत हे त्यांनी लक्षात ठेवायला हवं होतं.
पण भान सुटलंच. एकदा नाही अनेकदा. शेवटच्याच नाही तर मागच्या पाच वर्षांत अनेकदा.
स्वतंत्र भारताच्या इतिहासात शेतकऱ्यांवर संप करायची वेळ पहिल्यांदा आली ती फडणवीसांच्या काळात. पण काय केलं यांनी? रात्री तीन वाजता फडणवीसांनी शेतकऱ्यांचा संप फोडला. एक शेतकरी नेता हाताशी धरून हे अत्यंत निषेधार्ह कृत्य त्यांनी केलं.
भीमा कोरेगावमध्ये ज्या पद्धतीने फडणवीसांनी आपली कार्यकुशलता दाखवली त्याबद्दल भविष्यात कुणीतरी व्यवस्थित लिहिलंच. पण हा त्यांच्या हवेत जाण्याचा या पाच वर्षातला सगळ्यात भयंकर प्रकार होता.
या पाच वर्षात मेक इन महाराष्ट्र ते जलयुक्त शिवार अश्या असंख्य योजनांचे बुडबुडे आले. पण कधीही त्याबद्दलचे रिझल्ट्स लोकांसमोर आले नाहीत. नेहमी खोटे दावे, कागदावर केलेला विकासच या पाच वर्षात दिसला. जलयुक्त शिवार ही अशास्त्रीय स्कीम आहे असं एच एम देसरडा यांच्यासारखा वयोवृद्ध तपस्वी कोर्टात जाऊन सांगतो तर किमान एकदा तरी त्यांना बोलवावं आणि त्यांची भूमिका समजून घ्यावी हे फडणवीस यांना वाटलं नाही.
हे सगळं हा महाराष्ट्र बघत होता. शिवसेनेचा वारंवार होणारा अपमान, महाराष्ट्राचं पाणी गुजरातला देण्यापासून ते बुलेट ट्रेन पर्यंतचा असंख्य वेळचा सरकारचा तकलादूपणा आणि सत्तेच्या गरमी व गुर्मीमुळे आलेला उर्मटपणा हा महाराष्ट्र मूकपणे बघत होता.
याचा कडेलोट झाला तो मागच्या तीन महिन्यांत. कोल्हापूर, सांगली, सातारा, गडचिरोली, चंद्रपूर बेसुमार पावसात झोडलं जात होतं, पुरात बुडत होतं आणि फडणवीस राजकीय यात्रेत मग्न होते. विरोधी पक्ष संपवणे ही या राज्याची वृत्ती कधीच नव्हती. पण ते संपले असं समजून सत्तेचा अमरपट्टा आपल्याला लाभला आहे अश्या आविर्भावात वावरत होते. बेताल टीका करत सुटले होते.
याचा फटका पडला! राज्यातल्या जनतेने तो दिलाच!!किमान त्या दिवशी तरी म्हणजे निकालाच्या दिवशी तरी फडणवीस हा फटका समजून घेतील आणि आपला टोन जरा डाऊन करतील अशी अपेक्षा होती. पण त्याही दिवशी सरकार आम्हीच बनवणार, बघाच तुम्ही, विरोधकांनी फार आनंद मानून घेऊ नये, वगैरे स्टेटमेंट त्यांनी केली.
पोरकटपणाचा हा कळस झाला. शेवटी याला कुठेतरी रोखणं भाग होतं. महाराष्ट्राच्या राजकारणातल्या सगळ्यात मोठ्या ताकदीने मग निर्णायकपणे सूत्रं फिरवायला सुरुवात केली. फडणवीसांना आता कळलं असेल की जमिनीवर त्यांचं काहीही नव्हतं. तसेही ते बसवलेले मुख्यमंत्री होते आणि ज्यांनी बसवलं त्यांनाही हे लक्षात आलं की फडणवीसांना वाचवण्यात फारसं काही हशील नाही. आणि मग राजीनामा देण्यापासून काहीही पर्याय शिल्लक राहिला नाही!
याच फडणवीसांनी पंढरपूरच्या वारीत साप सोडायची पुडी सोडली होती. या मातीत गेली आठशे वर्षं ग्यानबा तुकाराम करत लहानथोर विठुरायाच्या पायाशी चालत गेली. कुणाच्याही मनात जो स्वप्नात पण येणार नाही तो संशय या मातीत पेरला गेला. ही या सरकारची सर्वात बीभत्स कृती होती. नियती किती नेमकी असते बघा. फडणवीसांचा राजीनामा आला तोच नेमका कार्तिकी एकादशीदिवशी! एखादा नास्तिकही म्हणेल की हा न्याय विठुरायानेच केला!
मी त्यांचा हितचिंतक आहे. ते विरोधी पक्षात असताना वेगळे होते. सत्तेत बसले आणि वेगळे झाले. एरव्ही माणूस मेहनती आहे. अभ्यास करायची वृत्ती आहे. वय त्यांच्या बाजूने आहे. यातून त्यांनी आपलं काय चुकलं आहे हे समजून घ्यावं. नव्या दमाने तयारी करावी. सत्ता काय, आज आहे उद्या नाही परवा येईल. त्याचं फार मनावर घेऊ नये. आणि या काळातल्या चुका टाळाव्यात. टाळतील अशी आशा!!
(लेखक नामवंत पत्रकार व राजकीय विश्लेषक आहेत)
एक महत्वाचा मुद्दा लेखकांनी सोडलेला दिसतो तो रोजगार, महाराष्ट्रात असंख्य तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करतात आणि फडणवीसांनी ही गोष्ट हेरून फसवी मेगाभरती काढली व ही भरती प्रक्रिया राबविण्याचे कंत्राट महा IT ह्या बोगस कंपनी ला दिली ह्या कंपनीने ज्या प्रकारे काही विभागांच्या भरती प्रकियेमध्ये प्रचंड गोंधळ व भ्रष्टाचार आहे असे पुराव्यानिशी अनेक विद्यार्थ्यांनी शासनाच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला . अनेक मोर्चे निघाले अनेक उपोषण झाले परंतु फडणवीस सरकारने ह्या कडे ढुंकूनही पाहले नाही
व अनेक विद्यार्थी व पालकांची नाराजी फडणवीसांना भोवली