– सानिया भालेराव
शंभरहून जास्त इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये शॉर्टलिस्ट होणारी, Julio Pot यांनी दिग्दर्शित केलेली ‘द गिफ्ट’ ही माझ्या अत्यंत आवडती शॉर्ट फिल्म. साधारण आठ मिनिटांमध्ये आपला कित्येक वर्षांचा प्रवास झाला आहे असं ही फिल्म पाहून वाटलं. गोष्ट जिथून सुरु होते तिथूनच ती कशी पर्सिव्ह करायची हे आपल्यावर दिग्दर्शकाने सोडून दिलं आहे हे जाणवतं. एक मुलगा आणि एक मुलगी. सुरवातीला त्यांचं स्केच बनवण्यापासूनच आपण या गोष्टीचा एक भाग बनून जातो आणि या दोन पात्रांचं स्केचिंग करताना ज्या हुशारीने आपलं लक्ष हा दिग्दर्शक वेधून घेतो ते लाजवाब.
सहसा मी पूर्ण गोष्ट उलगडून सांगत नाही पण इथे ती सांगणं गरजेचं. तर मुलगा आणि मुलगी भेटतात. मुलगा आपला छातीतला एक छोटासा दरवाजा उघडतो आणि आतून निळ्या रंगाचा एक गोळा त्या मुलीला देतो. ती फार प्रेमाने त्या निळ्या बॉलला गोंजारते की आपले साहेब खुश्श! मग हा बॉल तिच्या हातात कायम राहतो. एकत्र चालताना, हिंडता/ फिरताना. सुरवातीला तिला त्या बॉलचं खूप अप्रूप वाटतं. मग ती हळूहळू त्या बॉलशी खेळायला लागते. सुरवातीला एक टप्पा पाडून बघते. बॉल जमिनीला आदळला की याला दुखतं आणि मग दोघेही हसतात. पण नंतर नंतर तिचं त्या बॉलसाठी अप्रूप कमी होत जातं. ते सगळेच प्रसंग खूप छान आणि बोलके घेतले आहेत. नातं मुरण म्हणा, जून होणं म्हणा किंवा विरण म्हणा.. इथे ते इंटरप्रिटेशन प्रेक्षकांवर सोडलेलं आहे. कोण चुकतंय की कोणीही नाही हे आपण एन्व्हाना ठरवून टाकलेलं असतं. मग हळूहळू नात्यात नकोसे रंग येतात आणि वेगळं व्हायची जेंव्हा वेळ येते तेंव्हा तो तिला त्याचा निळा बॉल मागतो पण ती तो त्याला न देताच निघून जाते. आता आपल्याला दिसतो तो.. मनाचा दरवाजा सताड उघडा पडलेला.. एकाकी तो..
त्याच्या भोवती असतं जाळं.. नको असलेल्या भावनांचं, एकटेपणाचं, दुःखाचं.. ते वाढत जातं. इतक्यात तिथे एक दुसरी मुलगी येते. ते जाळं दूर करण्याचा प्रयत्न करते पण तसं होत नाही. मग तिला एकदम काय वाटतं कोण जाणे पण ती आपल्या छातीचा तो छोटासा दरवाजा उघडते आणि त्या निळ्या बॉलने ते जाळं पुसण्याचा प्रयत्न करते आणि काय आश्चर्य बघता बघता ते जाळं नष्ट होतो. तो आनंदाने बाहेर येतो. त्याचं लक्ष तिच्या निळ्या बॉल कडे जातं. तो तिचा बॉल घ्यायला जातो पण ही थोडी बिचकते. मग थोडा विचार करते आणि खूप जोर लावून तिच्या निळ्या बॉलचे दोन तुकडे करते. एक त्याच्याकडे आणि एक तिच्याकडे. आपापल्या कप्प्यांमध्ये ते हे तुकडे ठेवतात. दरवाजा बंद करतात आणि एकमेकांना मिठीत घेतात.
काय वाटलं तुम्हाला हे तुम्ही सांगालच आणि सांगाच. कारण ही चिंगू फिल्म पाहिल्यानंतर मला खूप साऱ्या भावना जाणवल्या. आनंद, सुन्नपणा, असोशी.. खूप काही. निळा बॉल म्हणजे आपलं हृदय. एकदा का ते कोणा दुसऱ्याला दिलं की आपण आपले उरत नाही. ज्याच्याकडे आपलं लाख मोलाचं हृदय असतं मग त्यावर आपला आनंद, दुःख अवलंबून असतं. त्याने कदर ठेवली तर ठीक पण नाही ठेवली तर शेवटी एकाकी उरतो ते आपणच. प्रत्येकाला पुन्हा त्या एकाकीपणातून बाहेर काढणारं मिळेल असं होत नाही. तुझ्याकडे एखादी गोष्ट नाही मग जी माझ्याकडे आहे ती आपण वाटून घेऊया असं समंजसपणे सांगणारा जोडीदार हे खरं गिफ्ट. तो निळा बॉल आणि त्याचं आपल्या हृदयाशी जोडलेलं नातं कमाल. नातं नवीन असतं तेंव्हा सगळं कसं हिरवंगार दिसतं अगदी आजूबाजूला दुष्काळ असला तरी. पण मग जे अनमोल असं काही आपल्याला मिळालं आहे त्यात दोष दिसायला लागतात. जेलसी, इन्सिक्युरिटीज,मन विचलित करणारे असंख्य गोष्टी आज आपल्या आजूबाजूला आहेत. अशा परिस्थितीत जे खास आपल्याकडे ते बघता जे नाहीये त्यावर लक्ष देत बसलं की नातं विझायला लागतं.
बरं जसं सुरवातीला या पोराला आपला निळा बॉल द्यावासा वाटला तसा तिला का नाही द्यावासा वाटला? पण असे प्रश्न नात्यात विचारायचे नसतात ना. जो देतो तो देत राहतो.. घेणारा घेत राहतो.. अशी नाती टिकली तरी जगत नाहीत. आपण आपला निळा बॉल देऊन बसलो आणि तो मिळालाच नाही परत तर? पण परत मिळेल या आशेने देणं हे खरं देणं असतं का? आपल्या हृदयाचा अर्धा भाग देणारी ती. आता दोघांकडे सुद्धा अर्धे तुकडे. हे दोघे वेगळे झाले तर पुन्हा आपापले अर्धे तुकडे असलेलं अर्धवट काळीज घेऊन जगतील. आपल्याकडे जेंव्हा काहीही नव्हतं तेंव्हा स्वतःचा पूर्ण एक भाग मोठ्या मुश्किलीने अर्धा करून देणारी ती.. तिच्या प्रेमाची किंमत तो ठेवेल हे कशावरून? पण असं नियम लावून, अंदाज बांधून करायच्या गोष्टी असतात का या? दोन अर्धवट तुकडे असलेल्या जीवांनी एकत्र येऊन एकमेकांना पूर्ण करावं याहून सुंदर नातं असू शकेल का? एकाने भरलेलं आणि एकाने रिकामं किंवा दोन संपूर्ण आणि परिपूर्ण गोष्टी एकत्र येणं यापेक्षा दोन अर्धवट, खरचटले, ठेचाळलेले जीव एकत्र येऊन थोडंसं ओबडधोबड, थोडंसं नेटकं, थोडं अस्ताव्यस्त, परिपूर्ण असूनही थोडं अपूर्ण असं काहीसं साध्य करतात.. मला ते अधिक भावतं. एकमेकांशिवाय अधुरे असलेले जीव, आपापल्या कमतरतांना मिळून पूर्ण करतात..ते नातं.. निरंतर राहतं.. कायम घट्ट.. बांधलेलं.
तुमच्या जखमा बघताना स्वतःच्या सुद्धा जखमा उघड्या करून करून त्यावर हळुवार फुंकर घालणाऱ्या, स्वतःला कमी पडत असलं तरी तुम्हाला काढून देताना क्षणाचाही विचार न करणाऱ्या, ज्या वेळी तुम्हाला कोणीही साथ दिली नाही त्यावेळी तुमच्या पाठीशी असणाऱ्या, ज्याच्या बरोबर तुम्ही पूर्णही आहात आणि अपूर्णही.. म्हटलं तर साथीदार, म्हटलं तर सोबती, म्हटलं तर सगळं काही, म्हटलं तर कोणीही नाही.. त्या व्यक्तीला जिने तुम्हाला प्रेम नामक अद्वितीय भावनेची ‘भेट’ दिली आहे.. त्या व्यक्तीला ही फिल्म जरूर पाठवा.. ज्या गोष्टी पोहोचवायच्या राहून गेल्या असतील त्या पोहोचवा. Cheers to “The Gift” we all have..Cheers to life!
शॉर्ट फिल्मची लिंक: http://bit.ly/2LYlWwO
(लेखिका संशोधिका असून पाणी प्रदूषण या विषयात त्या काम करतात . त्यांची स्वतःची या विषयात काम करणारी ‘इकोसोल’ नावाची कंपनी आहे . वेगवेगळ्या भाषेतील पुस्तकं वाचणे, चित्रपट बघणे व त्यावर लिहिणे ही त्यांची आवड आहे .)
………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………..
हे सुद्धा नक्की वाचा-
‘सिड्युसिंग मिस्टर परफेक्ट’ चित्रपटाची लिंक – http://bit.ly/2QcghSf
अस्तु-समाधानी आणि शांत जगण्याचा मंत्र– http://bit.ly/2VPJKXv
नवरा – बायकोतल्या नात्यावर सेन्सीबली भाष्य करणारा – बेलाशेषे– http://bit.ly/2LgHILE
जगावं कसं आणि कशासाठी हे सांगणारा – ‘कास्ट अवे’!– http://bit.ly/2VVvmcR
‘द नोटबुक’-जन्म मृत्यूच्या पलीकडे जाणारी प्रेमकहाणी– http://bit.ly/2UAWW2m
९६- हळुवार,अलवार प्रेमाची गोष्ट सांगणारा चित्रपट– http://bit.ly/2G2DlQ1