बात सजदो की नही …

माणिक बालाजी मुंढे
…………………
अंधेरीच्या कुठल्या तरी सिग्नलला ऑटो थांबलेला, मी डावीकडं बघितलं, एक कॉलेजवयीन पोरगी बाजुला शुन्यात बघत असलेली. आजुबाजुला वेस्टर्न एक्स्प्रेसवेची प्रचंड मोठी ट्राफिक. संथ गतीनं पुढं सरकणारी वाहानं, हॉर्नचा कर्कश आवाज, गाड्यांच्या काचावर टकटक करत भीक मागणारी लहान लहान पोरं, सिग्नल लागलंय म्हणताच मुंग्यासारखी एकमेकाला धडका देत जाणारी मुंबई. त्या पोरीला ह्या कशाचंच भान नव्हतं. एक भीकारी पोरगं तिच्या जवळ गेलं पण तिची कसलीच हालचाल नाही. नजर शुन्यात ती शुन्यातच. ती ह्या जगात नसावी. सिग्नल सुटलं आणि बिळातून उंदरं पळत सुटावीत तशी ट्राफिक सैरभैर झाली. मुंबईत मला अशी माणसं दिसली की भीती वाटते.

थोड्याच वेळात आमचा ऑटो पुढच्या सिग्नलला थांबला, पुन्हा तशीच गर्दी, तशीच पोरं सगळं तसंच फक्त सिग्नल बदलला. मी पुन्हा इकडं तिकडं पहात होतो तर डाव्या बाजुला, अगदी मधात एक बाईकवाला सोडून तीच पोरगी, तशीच समोर शुन्यात पहाणारी. फरक फक्त एवढाच की आता तिच्या डोळ्यातल्या पाण्यानं वाट शोधलेली. तिचे अश्रू तिच्या गालावरून ओघळत खाली हातातल्या मोबाईलवर पडत होते. तिच्यासाठी हे जग धुसर झालं असणार. आता मात्र माझ्या काळजात धस्सकन झालं. ऑटोतून उतरून तिची क्षणभर विचारपुस करावीशी वाटली तर पुन्हा सिग्नल सुटला, मुंबई पुन्हा सैरभैर झाली. वेदनेवर फुंकर घालावी तर तेही ह्या शहरात शक्य होत नाही. त्या पोरीचं नेमकं काय झालेलं असेल काय माहित?

त्याचदिवशी संध्याकाळी, मी कुर्ल्याहून रात्री साडे दहाच्या आसपास गाडी घेतली. गर्दी तर होतीच पण मानखुर्दपर्यंत ती बऱ्यापैकी कमी झाली. मी फर्स्ट क्लासच्या दारात उभा. जागा असो नसो मी शक्यतो बसत नाही. बसलं की झोप लागण्याची भीती वाटते आणि मग पुढचं सगळं बिघडून जातं. उगीच एका वयस्कर माणसाचा फिल येतो. त्यादिवशीही मी तसाच फोनवर बोलत दारात उभा. माझ्या समोर लेडीज डब्ब्याच्या दारात एक तशीच पस्तीशीतली पोरगी म्हणा नाही तर बाई. अंगावर ब्रँडेड सलवार कमीज घातलेला. पर्स वगैरे खांद्याला टांगलेली. केस मोकळेच होते. वाऱ्यानं चौफेर उडत होते. पण तिच्या चेहऱ्यावर कसली तरी भीतीदायक शांतता होती. मी फोनवर शोभीला बोलत होतो. ती सौराष्ट्रात असेल कुठे तरी. माझ्या समोरची ती बाई मात्र एकटक लावून लोकलच्या वेगात खालून सरकत जाणाऱ्या जमीनीला डोळ्यात पकडण्याचा प्रयत्न करत असावी. एक तर दिवसभर ती सकाळची पोरगी डोक्यातून जात नव्हती आणि आता हे आणखी एक दृश्यं.

मी शोभीला दिवसभरात काय झालं ते बोलत होतो तेच समोरच्या बाईच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा. शोभी म्हणाली तिला जावून बोल क्षणभर. मी म्हणालो भीती वाटते. ती म्हणाली काही नाही होत बोल तिला. शोभीतला पोलीस ऑफिसर जागा झाला असावा. मी म्हणालो पुढच्या स्टेशनवर गाडी थांबली की बघतो. तेच समोरच्या बाईनं भरधाव वेगानं निघालेल्या लोकलमधून उडी मारली. मी फोन ठेवला आणि बाहेर बघितलं. बाजुच्या ट्रॅकवर एखादा कपडा उडत जावा तशी ती बाई मला पडताना दिसली. ज्या चार एक जणांनी तिला पाहिलं तेही दारात आले. क्या हुआ? काय झालं? व्हॉट हॅपन असे दोन चार आवाज. माझ्या फोनवरून मी रेल्वे पोलीसांना फोन लावला. झालेली घटना सांगत होतो तर बाजुच्या ट्रॅकवरून तेवढ्याच वेगानं मुंबईकडे जाणारी लोकल निघून गेली. ट्रॅकवर पडून ती बाई वाचली जरी असेल तरीही ह्या लोकलखाली तिच्या चिंधड्या झाल्या असणार. नंतर लोकलमधून माणसं आपआपल्या घरी निघून गेली. त्यारात्री आई घरी परतली नाही म्हणून तिच्या लेकरांचं काय झालं असेल? ह्या अवाढव्य शहरात जगण्यासाठी तिला एक कारण सापडलं नसेल? ब्लँक?

मला अशीही झोप लागत नाही. त्यारात्री तर थोडासा डोळा लागला तरी स्वत:च लोकलमधून उड्या मारतोय अशी स्वप्नं पडायची. शोभीपासून माझ्या ह्या मुंबईतल्या अवस्था मी दूर ठेवत आलोय. उघड्या डोळ्यात रात्र आली तशी निघून गेली. दिवस असा लख्खं डोळ्यांनी उजाडताना पाहिला. रात्री लाईट बंद न करता तसाच पडून राहीलो कित्येक तास. एरवी मी ऑफिसला अकरा बारा वाजता निघत असतो. त्यादिवशी पिक अपच्या गाडीनं सात वाजताच कामोठ्याहून अंधेरी ऑफिस गाठलं. मुंबईत सगळ्या वेदनांवर एकच जालीम उपाय आहे आणि तोही तिनंच दिलाय. काम. अजब आहे मुंबई, जगातलं भव्यदिव्य ती निर्माण करण्याची संधी देते आणि मग आपण काय निर्माण केलंय ते पहाताना त्याच माणसाला तो किती शुल्लक आहे याची जाणीवही करून देते.

माणसं तशी घराबद्दल संवेदनशिल असतात पण मुंबईकर जरा जास्तच आहेत. त्यांच्या घरात तुम्हाला सहज प्रवेश मिळणार नाही. पण ती भेटली तर मग त्यांच्या आत डोकावता येतं. ह्या शहरानं त्यांना जे काही बनवलंय ते कधी अंगावर येतं तर कधी भन्नाट वाटतं. ह्या शहरात खऱ्या अर्थानं बायका पुरूषाच्या बरोबरीत आहेत. ते स्वातंत्र्य त्यांना मुंबईनं दिलंय. मुंबईनंच त्यांना तसं बनायला भाग पाडलंय. गौरी मला मुंबईत अशीच कधी तरी चार एक महिन्यातून भेटत असते. तिच्या गळ्यात तिनंच काम केलेली काही ट्रायबल ज्वेलरी असते. भेटायचं ठरलं तर आम्ही कुठल्या तरी बारमध्ये भेटतो किंवा सीसीडीत. अगोदर ती बंगलोरला रहायची. नवरा आयटीत. ही घर सांभाळायची. तिची माझी ओळख एका मैत्रिणीकडून झालेली. मालाडला शिफ्ट झाली. नवरा मुंबईचा. बंगलोरला रहायची तर घरात तिघंच. नवरा-बायको आणि एक छोटा मुलगा. पण मुंबईत घरात सासू सासरे आले. अगोदर तिला फक्त लेकराचं बघावं लागायचं आता सासू सासऱ्यांची जबाबदारी. प्रायव्हसीचाही बोऱ्या वाजला. बंगलोरला आयुष्य घरात राहून राहून कंटाळवाणं झालेलं.

मुंबईत मात्र तिचं डोकं भनानलं. कायम धावपळीत असणाऱ्या मुंबईत आपण असे घरी कसे काय बसून असतो असं तिला सारखं वाटायला लागलं. मग तिनं ट्रायबल ज्वेलरीचं काही करता येईल का त्याचा शोध सुरु केला. नवऱ्यानं अर्थातच त्याची काय गरज म्हणून प्रश्न विचारलाच. पण गौरीचं म्हणनं असं की, मी मुंबईत रहाते असं वाटतच नाही. कुणी तरी कोंडून टाकलंय असं वाटतंय घरात. बरं फेसबुक, व्हॉटस् अपवर घरात बसल्या बसल्या थोडासा टाईमपास केला तर नवरा त्यावर टेहाळणी करतो. सासरा आजारी असतो. सासू त्याचं काहीच बघत नाही. जसं काय त्यांची ओळखही नसावी. घरातलं वातावरण डिप्रेशिंग वाटायचं. मग गौरीनं एकेदिवशी लोकलची पास काढली, जिथं गरज असेल तिथं गाडी केली आणि शहरभर फिरून आली. ती म्हणाली फ्रेश झाले, ह्या शहरात बायका ज्या स्वातंत्र्य घेऊन वागतात. त्याचा हिस्सा व्हायचं ठरवलं. ज्वेलरीचं हळूहळू काम केलं. आता चांगलं बस्तान बसलंय. गौरी आता जयपूर, कोलकाता, पणजी अशी फिरत असते. ती म्हणते मला घरातून बाहेर फेकलं ते ह्या मुंबईनं. बंगलोरनं अशी भावना कधीच दिली नाही.

मुंबईच्या लोकलमधून कोण जात नाही? माझ्या लहानपणी शाळेत सोडायला काही जणांचे आईवडील यायचे. मुंबईच्या लोकलमधून फिरताना काही लेकरांकडं बघितलं की रूखरूख वाटते. पाठीवर त्यांच्या वजनापेक्षा जास्त ओझं, मरणाच्या गर्दीत उभी रहाणारी ती चिमुकली पावलं. तिकडं वडाळ्यापासून ते इकडं वाशी, बांद्र्यापर्यंत चढणारी उतरणारी लहानसहान शाळकरी लेकरं. मुंबईत सगळे सारखे आहेत. चांदवाला भेटलं की तिचं किती कौतूक करावं ते कळत नाही. मुंबईत एकदा घरातून बाहेर पडलेला माणूस संध्याकाळी तसाच परतेल याची काही खात्री नाही. तेव्हा चांदवाचा आत्मविश्वास बघितला की ह्या शहराची नव्यानं ओळख झाल्यासारखं वाटतं. मुंबईसारख्या शहरात कमावणाऱ्या आईबापांना लेकरांचं काय करायचं हे कधीच कळत नाही पण अशा आईबापासोबत कसं रहायचं हे लेकरांनाच कळाल्याचं चांदवाला भेटलं की जाणवत रहातं.चांदवाला फक्त सात एक वर्षाची आहे. रचना-अनिलची एकुलती एक पोरगी. रचना मार्केटींगमध्ये आहे त्यामुळे ती रोज मुंबईच्या कुठल्या तरी एका टोकाला फिरत असते. अनिल फ्री लान्स एडीटींगची कामं करतो. पण अलिकडं तो फार काही कमवत नाही. दुपारी घरी जेवण करून झोप काढत असतो. चांदवाचं तो बघतो पण त्यातून त्यानं रचनाला व्हीलन केल्याचं रचनाचं म्हणनंय. दोघांची भांडणं होतात. महिन्या दोन महिन्यातून दोघंही एकदा तरी डिव्होर्सवर येतात आणि मग चांदवा दिसली की माघारी वळतात.

बरं दोघंही कामाला बाहेर गेले तर चांदवा फ्लॅटवर एकटीच असते. घरात यू ट्यूब, टीव्हीवर ती कार्टुन्स वगैरे बघत असते. पशुपक्षी प्राणी ह्याचं तिला एवढं वेड की पुढं की डिस्कव्हरी किंवा नॅशनल जिओग्राफिकला नक्की काम करेन. बरं तुम्ही कुठल्याही वेळेला चांदवाला भेटा ती कधीच हिरमुसलेली नसते. मधात त्यांच्या घरातली मांजर प्रेग्नंट होती तर चांदवानं सांगलीला न जाता तिचा सांभाळ करायचा म्हणून मुंबईतच राहीली. 26/11 चा मुंबईत दहशतवादी हल्ला झाला त्यावेळेस अतिरेक्यांच्या गोळीबारात जखमी झालेल्या एका मांजरीचा फोटो चांदवानं हॉलमध्ये चिकटून ठेवलाय. अनिल-रचनाची खडाखडी झाली की चांदवा पंचाच्या भूमिकेत जावून वातावरण एकदम हलकंफुलकं करते. कधी कधी मला वाटतं ह्या शहरात चांदवाची संवेदनशिलता कायम राहील का? का तिची संवेदनशिलताच मुळात ह्या शहराची देण आहे? माहित नाही.

रचना माझ्या ऑफिसकडं आली की आवर्जून फोन करते. मी मुंबईत शक्यतो कुणाला भेटायला नाही म्हणत नाही. तेवढीच काही नवीन मेमरी. मी अनिलला कधी भेटलेलो नाही पण तो नैतिकता वगैरे पाळणाऱ्यापैकी दिसतो तर रचना कमालीची स्वातंत्र्यवादी. त्यांची खडाजंगी शक्यतो रचनानं काय घालावं काय नको पासून ते फेसबुकवर काय शेअर केलेलं असतं तिथपर्यंत पोहोचते. रचनाचं म्हणनं असं की एक तर हा पाहिजे तेवढं कमवत नाही. छोट्याशा कमाईतही समाधानी. फिलॉसॉपी अशी की, गरजा कमी कराव्या मग कमवावं पण कमी लागतं. मला ते जमत नाही. मी म्हणते मुंबईत आता नाही कमावलं तर म्हातारपणी काय करणारोत? बरं चांदवासाठी काही बघावं लागेल की नाही? राहीली त्याची नैतिकता तर मुंबईतल्या लोकलच्या गर्दीत शिरताना किती किती स्पर्श होतात ते दिसत नाही का? त्यासाठी कधी घर सोडून हे बघितलं तर कळेल? मी तर म्हणते कुठल्या तरी बाईसोबत ह्यानं अफेअर तरी करावं. कमीत कमी ह्याचा सुस्तावलेपणा तरी जाईल. तिच्यासाठी का होईना पण हा मुंबईकर होईल. रचना अनिलबद्दल कितीही वेळ बोलू शकते. मला जाणवलेली गोष्ट अशी की दोघात आता कसलंच नातं शिल्लक नाहीय. चांदवा काय तो तेवढाच एक धागा. रचनाची घुसमट होते. एकवेळेस बोलता बोलता ती म्हणाली, काही मिळवण्याची वासना संपलेल्या पुरूषासोबत झोपणं किती वेदनादायी असतं हे कसं कळणार? तेही अशा शहरात जिथं माणसं स्वत:चा अविष्कार बघण्यासाठी आयुष्यपणाला लावतायत. रचना म्हणते, चालत रहाणाऱ्या माणसा इतकं सुंदर काही नाही आणि ही खचाखच भरलेली मुंबई चालणाऱ्याचा रस्ता कधीच अडवत नाही. प्रत्येक भेटीत रचना असं एखादं तरी वाक्य देऊन जाते. मग मी त्या वाक्यांचा पाठलाग करत रहातो.

तनुजाचा फोन आला तर प्रत्येक वेळेस मला भीती वाटते. काय ऐकायला मिळेल काही सांगता येत नाही. तनुजा मुळची जगताप, नवरा मारवाडी. लहानाची मोठी झाली ती सुरतमध्ये. माझी आणि तिची भेट एकदा सुरतहून येतानाची. ती कुणालाही बोलू शकते, बोलतं करू शकते. असं वाटतं तिला तिच्या बोलण्यातूनच ऊर्जा मिळत असावी. तिला कुठल्याही वेळेस भेटा ती इतक्या शॉर्ट कपड्यात असते की नजर नेमकी कुठं ठेवून बोलायचं हेच कळत नाही. मानेवर, कमरेवर, हातावर टॅटू आहेत. त्यामुळे गोऱ्या कांतीवर ते एकदम हॉट वाटतात. त्याची जाणीव तिला व्यवस्थित आहे. मुंबईत तसं वळून फार कुणी कुणाकडं बघत नाही. कारण एक गेलं की दुसरं फीड दिसतंच दिसतं ते तेवढंच हॉट असतं.

पण तनुजाला वळून बघितल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. पहिल्याच भेटीत तिनं मला तिचे लग्नापुर्वीचे फोटो दाखवले. व्यवस्थित केस विंचरलेले, सोबत अंगाचा कुठलाच भाग उघडा नाही. ती म्हणाली विश्वास नाही बसत ना ही मीच आहे? मी हो म्हणालो. मग तिनंच सांगितलं ते असं. तिचं पहिलं लग्न एका मराठा कुटुंबात झालं पण हि चार दिवसातच माहेरी आली. का तर नवरा मुलगा बिल्कूलच आवडत नाही. का तर तो क्लीन रहात नाही. वरून सासू सासरे आणि ती बोगस प्रतिष्ठा. डिव्होर्स घेतला. नंतर स्वत:च शोधला तो आताचा सचिन. तो मारवाडी. मी म्हणालो हाच का तर ती म्हणाली, एक तर त्याच्याकडं व्यवस्थित पैसा आहे. मला पैसेवालाच नवरा हवाय. बिल्कूल ह्या मुंबईत जॉब वगैरे करत लोकलमध्ये फिरायची इच्छा नाही. मेरा काम है खुबसुरत बने रहना और उसका दिल बहलाना. ते मी करते. स्वातंत्र्य स्वातंत्र्य ते काय पैशाशिवाय येत नाही? सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैसा असेल तरच सेक्सची मजाय. नाही तर सगळं कोंडलेलं..

मी एकदा सचिनला भेटलो. तनुजानंच भेट घालून दिली. मला तो प्रचंड आवडला. तो हॉटेल मॅनमेंट करतो. म्हणजे कुणाला जर हॉटेल सुरु करायचं असेल तर तो ते करून देतो. एखादं दीड वर्षात ते रूळावर आलं की तो ते सोडून देतो. नवं हॉटेल हातात घेतो पुन्हा तसंच. म्हणजे शुन्यातून काही सुरु करायचं त्याचे आकडे झाले की आपण पुन्हा शुन्यातलच काही तरी पकडायचं. तो कमालीचा शांत आहे. त्याला कामाशिवाय काही माहित नसावं असं वाटलं. घरात त्यानं तनुजाच्या पाठीमागं लागून कामासाठी चोवीस तास बाई ठेवलीय. सगळं इतकं टापटीप लागतं की बाथरूममधली टॉवेलची जागा बदलेलीही त्याला चालत नाही. तनुजाच्या वागण्यात एक स्वैरपणा आहे. दर दोन चार महिन्याला एक नवीन पुरूष, मुलगा तिच्या आयुष्यात असतो. विशेष म्हणजे हे सचिनलाही माहित आहे. कधी कधी तर तनुजा कोणत्या बॉयफ्रेंडला भेटायला जातीय तेही सांगते. सचिनचं त्यावर काहीच म्हणनं नसतं. मला वाटायचं तनुजाचं आयुष्य मुंबईतलं सगळ्यात सुखी लोकांपैकी एक असेल. पण एकदा तिला तसा म्हणालो तर ती म्हणाली, त्यानं माझ्यावर नियंत्रण ठेवावं, कधी तरी मालकी गाजवावी असं फार वाटतं पण त्याला हे माहितच नाही असं वाटतं. तनुजा मला मुंबईतल्या स्वैरपणे वागू पहाणाऱ्या पिढीची आठवण करून देत रहाते तर सचिन, बच्चनची. स्वत:वर केवढं नियंत्रण आहे असं वाटतं ह्या माणसाचं? तनुजा-सचिन मुंबईतलीच दोन स्वतंत्र बेटं आहेत?

सकाळी आठच्या आसपास मी ब्रश करत खिडकीत उभा असतो. एक पंचवीशीतली पोरगी, लग्न झालेली रोज पाठीवर बॅग टाकून धावत सुटलेली असते. पावसाळा असेल तर हातात छत्री असते, इतर वेळेस काही ना काही असतं. पण पाठीवर बॅग आणि हात कधीच रिकामे नसतात. कामासाठी धावत सुटलेल्या मुंबईची ही आठवण. हे चित्रं कधीच बदलत नाही. लहानपणी रोज शाळेत धावत जायचो. का तर प्रार्थना चुकली तर मग छड्या बसायच्या. तरीही आठवड्यातून चार दिवस प्रार्थनेला उशीर व्हायचाच. मला ही धावत सुटलेली पोरगी रोज शाळेची आठवण करून देत रहाते. वाटतं हिचं आज काय चुकणार? लोकल? ऑटो? ऑफिस? काय आहे ह्या मुंबईत जिथं सगळी माणसं रेस लागल्यासारखी पळत सुटलेत.

मुंबई कुणाची? सविताला विचारलं तर पटकन म्हणते आमची. कोकणवाल्यांची. तुम्ही तर सगळे म्हणजे सगळे बाहेरचे. एकदा म्हणालो अरे पण तुझा तर वनबीएचकेचा फ्लॅटही नाही इथं. मग ते तिच्या लक्षात राहीलं असावं. दोन महिन्यानंतर तिनं मला फोन केला आणि म्हणाली, वास्तु पुजेला या. का तर तिला मी आडनावानं राणे म्हणून हाक मारत असतो. मला तिचा जिद्दीपणा आवडतो. ह्या शहरासोबत जिद्द लावणारे जिंकतात. ही त्यापैकी एक. सविताचे वडील कुर्ल्यात ऑटो चालवायचे. नंतर कोकणात परतले वेंग्युर्ल्याला. घरची परिस्थिती जेमतेम. घरात ही तीन भावंडं. सविता, प्रीती आणि रोहीत. रोहीत लहाना, प्रीती मोठी. कॉलेजला असेपर्यंत दुध विकायला जायचे म्हणून सविता आवर्जून सांगत असते. तिच्या घरी पहिल्यांदा गेलो तर तिनं स्वत: दुकानला जाऊन आम्हाला पिण्यासाठी ब्लेंडर्स प्राईड, बिअरच्या बाटल्या असं सगळं आणलं. मी म्हणालो मराठवाड्यात बाई दारूच्या दुकानासमोरून गेली तर बदनाम होईल. तिच्या घराला कुणी विचारायचं नाही. सविता म्हणते हो. आहे मराठवाड्याचा अनुभव. गोष्ट अशी की सवितानं आणि प्रितीनं मग हिंमतीनं कोकणात घर बांधलं. जॉब मुंबईत केला. अगोदर परळला वन रूम किचनमध्ये रहायच्या. नंतर रोहीतचं लॉ दोघींनी पूर्ण करून घेतलं. पण हे सगळं उभं करता करता प्रीतीनं पस्तीशी पार केलीय आणि सवितानं तिशी ओलांडलीय. प्रितीसाठी स्थळं बघितली पण काही जमतच नाही. हिला वनबीएचकेत गौरीसारखं सासुसासऱ्यांसोबत रहायचं नाही तर कुणाला ही दिसायला डावी वाटते. हे कमी म्हणून की काय रोहीतला एका जजसाहेबाच्या पोरीसोबत लव्ह मॅरेज करायचंय. तो जज मराठवाड्यातला. त्याचं म्हणनं असं की दोन्ही बहिणी बिना लग्नाच्या मग माझी पोरगी ह्यांच्यासोबत सुखात कशी रहाणार? सवितानं सांगून बघितलं अहो, एवढी मोठी मुंबई आहे. त्यांचे ते कुठेही स्वतंत्र राहू शकतात, त्यांना हवं तसं. खरं तर सविताला ते पसंद नाहीय पण भावासाठी ती मुंबईचा मार्ग दाखवतेय. तिन्ही भावंडं एकत्रं वाढलीयत. आता त्यांना भाऊ असा कुठे तरी जाऊन अचानक रहाणार म्हटलं तर आई वडील आणि ह्या दोन्ही बहिणी एकदम हळव्या होतात. बरं नाही म्हणावं तर मग त्याचंही लग्न राहून जायचं अशी भीती. त्यामुळे सविता रोहीतसाठी काहीही करायला तयार.

सविताची अशीच बेलापुरला भेट झाली तर म्हणाली, सालं एवढ्या मोठ्या हरामखोर मुंबईत त्या प्रीतीसाठी एक हक्काचा पुरूष भेटत नाही हे डिप्रेशिंग आहे. रोहितची तिला फार चिंता नाही. मुंबईसाठीचा तिचा आवडता शब्दय हरामखोर. मी म्हणतो तुझं काय? तुही तर आता तिशीत आहेस? तर ती प्रियंका चोप्राच्या भूमिकेत जात म्हणते, हमें क्या है, सात खून माफ. प्रीतीच मधात एकेदिवशी वाशीला भेटली तर जाणवलं की तिनं लग्नाच्या आशा सोडून दिल्यात आणि रायगडमध्ये आता स्वत:च्या कमाईतून काही प्रॉपर्टी खरेदी करता येतीय का ती पहातेय. मुंबई तुम्हाला कधी यायला खुणावेल आणि कधी सोडायला भाग पाडेल सांगता येत नाही.

मुंबईत गडी मंडळी तेवढे सकाळी ऑफिसला निघताना फ्रेश वाटतात. संध्याकाळी परतताना ढेपाळलेले असतात. बरं फ्लॅटफॉर्मवर कितीही गर्दी असली, काहीही असलं तरी काही जण काहीही चटरपटर खात रहातात. मुंबईतल्या बायका मात्र टकाटक दिसतात. मी मुंबई, दिल्ली, हैदराबाद, पुणे अशा शहरांधून रहात आलोय पण मुंबईतल्या बायका ज्या पद्धतीनं स्वत:ला कॅरी करतात ते कुठंच नाही दिसलं. ऑफिसला येताना आणि घरी निघतानाही व्यवस्थित खटाखट असतात. फ्रेश. कुठेही गबाळेपणा नसतो. मुंबईतल्या कुठल्याही रस्त्यावर तुम्ही पाच मिनिटं उभे रहा किती प्रकारची पाखरं येत जात रहातात आणि त्यांच्या किती तऱ्हा दिसतात तेही बघा. हे शहर जसं स्वत:च्या मस्तीत चालत असतं तशाच इथल्या बायका आहेत. मला तसं मुंबईला कधीच बॉम्बे नाही म्हणावं वाटत का तर ते पुरूषी आहे. मुंबई हा शब्द बाईच्या जवळ जाणारा. कुठून कुठून बाया माणसं या शहरात आलेत पत्ता नाही.

माझ्याकडं स्वयंपाकासाठी रझिया येते. ती बंगालची. मिदनापूर जिल्ह्यातल्या कुठल्या तरी गावाचं तिनं नाव सांगितलं. बांग्लादेशी सलमाही येते माझ्याकडं झाडूपोछा करायला. सलमाच रझियाला घेऊन आली तर ती मुंबईत नवीन असल्याचं माझ्या नजरेतून सुटलं नाही. तिनंच सांगितलं, सतराव्या वर्षी लव्ह मॅरेज केलं. दोन एक वर्षात एक पोरगाही झाला. नवरा मुंबईत नोकरीला म्हणून आला तो इकडेच. येते वेळेस रझियानंच एका सावकाराकडून पन्नास हजार रूपये घेऊन त्याला दिले. हा काही बाबा परतलाच नाही. शेवटी ह्याच्या शोधात रझियानं मुंबई गाठली तर ह्यानं दुसरं लग्न केलेलं. दोन लेकरंही आहेत त्याला. रझिया त्याला काहीच न म्हणता त्याच्या गल्लीतून परतली पण मुंबई नाही सोडली. सावकाराचे लाख रूपये फेडणार कसे? रझिया म्हणते गावाकडं कितीही काम केलं तर शक्यच नाही.

मग दुसऱ्या दिवशीपासून तिनं स्वयंपाकाचं काम शोधायला लागली. रझियाच्या हातची दाळ तुम्ही खायलाच हवी. कितीही दाल तडका खाल्ला असेल पण रझियाची चव ते चवच. तिला मग सलमाच्याच ओळखीनं चार एक ठिकाणी स्वयंपाकाची कामं मिळालं. वीस पंचवीस हजार रूपये कमावते. एकेदिवशी म्हणाली, भैय्या बम्बई मे ना पैसा बहोत, बस मेहनत करनेवाला चाहीय. मी तिला म्हणालो तू आता मुंबईकर झालीस. तिला ह्या शहराचा जीव कशातय हे बरोब्बर कळालंय. नंतर तिनं आई आणि भावालाही बोलवून घेतलं. कामोठ्यातच कुठं तरी त्यांनी घर केलंय. ईदला घरी बोलवलं पण ऑफिसच्या कामामुळं जाता आलं नाही तर रझिया घरी डब्बा ठेवून गेली.

पाच एक महिन्यानंतर रझियानं मग माझ्या हातानंच त्या सावकाराचे १ लाख २० हजार रूपये बँक खात्यावर डिपॉजिट केले. मी जरा त्याची खातरजमाही करून घेतली म्हटलं हिची परत फसवणूक नको व्हायला. एकेदिवशी खुश होती फार. मी म्हणालो काय झालं तर म्हणाली मुजीबूर आला होता भेटायला. पैसे नाहीत म्हणत होता मग त्याला चार एक हजार रूपये दिले. मी म्हणालो असे पैसे नको देत जाऊ. त्याला तशीच सवय लागेल. तर ती म्हणाली देखा नही जाता भैय्या उसको. मैने मुंबई में उसको पहिली बार देखा तो लगा मैने इस इन्सान से शादी नही की थी. दुनिया सबसे मजबुर इन्सान लगा मुझे वो.

मुंबईत येऊन मला दहा वर्षे होतायत. मी ह्या शहरात चालत चालत कित्येकांना रडताना पाहिलंय. काहींकडं बघितलं की वाटायचं ह्या शहरात ह्या माणसांचं काय हरवलंय काय माहित? काहींना आनंदात इतक्या मोठमोठ्यानं ओरडताना बघितलंय की त्याचीही भीती वाटावी. मुंबईत म्हाडाच्या घराची नुस्ती लॉटरी लागली म्हणून मिठाई वाटत येणारी माणसं ह्याच शहरात सापडतात. शनिवारी रात्री बारा वाजता ड्रॉपच्या गाडीनं ड्युटी करून घरी जाणारी, रविवारी लग्न करून सोमवारी परत ऑफिसला हजर असणारी कांचन कदाचित फक्त मुंबईतच भेटेन तेही लग्नाबद्दल एक शब्दही न काढता. गौरी घराबाहेर पडलीय तर मग तिला नवीन मित्रही मिळालाय, ती म्हणते आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्यावर तुम्हाला वेगवेगळे जोडीदार सर्वार्थानं हवे असतात हे नवऱ्या मुलाला कसं कळणार? रचनानेही नवा जोडीदार मित्र शोधलाय. ती त्याला एक्झॉस्ट म्हणत असते. सविता थांबणाऱ्यांपैकी नाही, ती चालत राहील, ती शहरंही बदलेल. तिला नवीन माणसं भेटतच जातील. रोहीणीची मात्र भीती वाटते. कसं रहायचंय हा ज्याचा त्याचा प्रश्न पण तुम्हाला जोडीदार हवा हे नक्की. तनुजाचा मला थांगपत्ता लागत नाही. मी तो शोधावा तरी का? तिची खरं तर जास्त भीती वाटते. का तर ती सर्वकाही मिळवल्यानंतरच्या अवस्थेत आहे. अलिकडे एकदा भेटली तर रिकामेपण तिला घेरायला लागलंय असं वाटत राहिलं. सचिन मला तिच्यापेक्षा कैक पटीनं सुंदर वाटतो.

पण रझिया एवढं सुंदर काहीच नाही. तिनं स्वत:च्या अंगावर जबाबदारी घेऊन जे स्वातंत्र्य मिळवलंय ते कुणाचा बापही हिरावू शकत नाही. मी महिन्याला लाख रूपये आणि मोठ मोठ्या पोस्टवर असलेल्या मुली बघितल्या पण शेवटी नवरा शोधायची वेळ आली की त्याचा पगार किती, त्याच्याकडं गाड्या किती असला हिशेब मांडत बसतात. मग आपोआपच सगळं असुनही दुय्यमपणा येतोच. नंतर मग इक्वल इक्वल म्हणून भांडत रहातात. आयुष्य शुन्यात जातं, वेगवान लोकलमध्ये पाय आपोआप उचलले जातात. पण तुझ्याकडं सगळं असून तू का नाही त्याला सांगितलं की मी माझ्या जीवावर तुला सांभाळते. कमावणारा पुरूष तेच तर करतो ना? जर त्याच्याच कमाईवर जगायचं तर मग तो म्हणतो तुला गरजच काय? त्यामुळेच जोडीदाराला स्वत:च्या जीवावर सांभाळू पहाणारी रझिया मला मुंबईसारखी सशक्त वाटते.

मी रझियाला एकेदिवशी म्हणालो तू दुसरं लग्न का नाही करत? ती म्हणाली डर आहे मनात. पुन्हा असंच झालं तर? विश्वास नाही बसत सहज. मग तिच म्हणाली, मुंबईत अगोदर स्वत:चं घर घेईन म्हणजे मीच त्याला सांभाळीन. बोलता बोलता ती सांगून गेली की कुणी तरी यूपीचा भैय्या आहे, तो लग्न करू म्हणतोय. पर देखुंगी हे तिचे शब्द. नंतर ती स्वयंपाक करता करता बोलत राहीली. मी हुँ हुँ म्हणत राहीलो.

नंतर मी लोकल पकडण्यासाठी स्टेशनला गेलो तर सगळी माणसं मुंबईकडे घाईगडबडीत, धावत निघालेली. त्यात बाया माणसं, गडी, पोरं, पोरी असे सगळे. हीच गर्दी संध्याकाळी घरी परतत राहाते. मी लोकलच्या दारात उभ्या उभ्या फेसबुक चाळत होतो. रचनानं योजनाची पोस्ट शेअर केलीय, बहुतेक तो मीर तकी मीरचा कलाम आहे: बात सजदो की नही, खलुस ए नियत की होती है, अक्सर लोग खाली हाथ लौट आते है, हर नमाज के बाद.

बच्चनच्या ब्ल़ॉगमध्ये एकेदिवशी एक वाक्य होतं. काम मेही मोक्ष है. कामासाठी घराबाहेर पडलेली मुंबई मला नमाजासाठी निघालेल्या गर्दी एवढीच नियतवान वाटते. पण मग ती रात्री घरी परतताना तिच्यात एवढं रिकामेपण कुठून येतं की लोकलच्या ट्रॅकवर ती स्वत:चा आत्मघात करते?

वाशीच्या पुलावरून लोकल जातानं अचानक मोठा आवाज येत राहीला आणि थंडगार प्रचंड वेगानं हवाही. समोर तसाच लेडीजचा डब्बा. बाजुला विस्तीर्ण पसरलेला अरबी समुद्र आणि त्याच्या बाहुवर उभी ही अजस्र मुंबई. तिच्याकडं पहात मी मीरच्या ओळी जसा पुटपुटत राहीलो तशी मला माझ्या रिकाम्या हाताची जाणीव झाली आणि भीतीही वाटली. सजदो-नियत-खाली हाथ-नमाज. रझिया.

(लेखक टीव्ही ९ वृत्तवाहिनीत कार्यकारी संपादक आहेत)

9833926704

(पूर्वप्रसिद्धी : सकाळ दिवाळी अंक २०१५)

Previous articleभारिप-बहुजन महासंघ : एका राजकीय पर्वाचा अस्त
Next articleजे महाराष्ट्राच्या मनात, तेच पवारांच्या.. !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

  1. Respected, Avinashbhau,
    ….Read the ” Media Watch “social media in your WhatsApp This article is very important and the articles you read from all levels are very important…
    Bhau,
    From social media …..
    ” Media Watch “till today I have read very important articles and they were readable and they were to be kept in the archive which you have included throughout the facts and circumstances of the Government of Maharashtra giving priority to the important articles I have read…..
    Note:-
    1 – Disrespectful of public opinion Pouring.
    2 – What is the majority debate.
    3-
    Extreme Nehru love of people.
    4 – The result of Dr. Ambedkar’s lasting inspiration.
    5 – The Bharipa Bahujan Federation is a political party…

    Bhau,
    This entire article in your Media Watch was very readable and equally important and instructive.

    Thanks…

    Regards-RAJABHAU GADLING,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here