-सानिया भालेराव
“बॅड बॉय बिलियनेयर्स : इंडिया” ही नेटफ्लिक्सवरची सध्या ट्रेंडिग असलेली डॉक्युसिरीज! खरं पाहता ३ सप्टेंबरला ही सिरीज रिलीज होणार होती. विजय माल्या, सुब्रतो रॉय, नीरव मोदी आणि रामलिंगन राजू या चार जणांचे स्कॅम या सिरीजमधून उलगडून दाखवणार होते.. स्कॅमला खास भाषेत “घपला” असं म्हणतात.. तर या घपल्यांची स्टोरी या सिरीजमध्ये होती. आता यातला जो चौथा घपलेखोरआहे तो म्हणजे सत्यमचा राजू.. ज्याने जवळपास सात हजार कोटींचा घोटाळा केला, त्याने असा आक्षेप घेतला की माझ्याबद्दल या सिरीजमध्ये जे दाखवलं गेलं आहे, ते अर्धसत्य आहे. या महाशयांनी या सिरीजवर आक्षेप घेतला आणि ही केस हैद्राबाद सुप्रीम कोर्टात गेली. त्याचं असं म्हणणं होतं की माझी प्रतिमा या सिरिजमुळे डागाळली जाते आहे. आता यार हसावं की रडावं? बिहारमधल्या एका लोअर कोर्टात सुब्रतो रॉय यांनी देखील या सिरिजवर आक्षेप घेतला होता पण कोर्टाने या सिरिजला रिलीजची परवानगी दिली. कोर्टात या या स्कॅमची केस ऑनगोइंग असेल आणि या अशा सिरीजमुळे जर केसवर परिणाम होणार असेल तर हा आक्षेप एकवेळ आपण समजू शकतो पण राजू साहेबांचं असं म्हणणं होतं की माझ्याबद्दल जे दाखवलं गेलंय ते अनएथिकल आहे किंवा माझी समाजातील प्रतिमा यामुळे खराब होईल. मला हा मोठा पॅराडॉक्स वाटला. पण त्यांचं म्हणणं ऐकलं गेलं असावं. कारण या सीरिजमधून रामलिंगन राजू यांचा एपिसोड काढला आहे. आणि मग ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात तीन बॅड बॉईजची गोष्ट घेऊन ही डॉक्युसिरीज नेटफ्लिक्सवर अवतरली. खरंतर या प्रकरणांची पाळंमुळं फार खोलवर आहेत आणि ती या सिरीजमध्ये विशेष डेप्थमध्ये दाखवली गेली नाहीयेत. कदाचित असं केल्यास खूप मोठी मोठी नावं समोर आली असती आणि ही सिरीज आपल्याकडे दाखवलीच गेली नसती कधी.. पण निदान या निमित्ताने हे घोटाळे काही लोकांपर्यंत पोहोचतील आणि घोटाळ्याचा शेवट खड्ड्यात होतो हे निदान उमजू शकेल…
ही इन्व्हेस्टिगेटिव्ह डॉक्युसिरीज असल्याने मला आवडली. मी काही या लोकांचे घपले इथे सांगत बसणार नाहीये, ते जाणून घ्यायचे असतील तर ही सिरीज जरूर बघा. एका बैठकीत तीनही एपिसोड बघून टाकावे असं मी ठरवलं होतं पण ते शक्य झालं नाही कारण हे घोटाळे बघून माझं डोकं चक्रावून गेलं! माणसाचं माणूसपण आणि मग लोभापायी त्याचा होणारा ह्रास.. सगळं कठीण वाटलं. या तीनही बिझनेस टायकूनमध्ये एक समान गोष्ट वाटली ती म्हणजे रुबाब करणं.. पैशाचा माज दाखवणं,आपापल्या पद्धतीने. सुब्रतो रॉय आणि नीरव मोदी हे तसं पाहता अत्यंत साध्या घरातले आणि त्यामुळे त्यांचं असं कमी कालावधीत वर चढणं कित्येकांना न पचणारं..एक सामान्य माणूस आपल्या हुशारीवर काय करू शकतो याचं उदाहरण म्हणजे हे दोघे. सुब्रतो रॉय ज्यांनी सस्वतःची गॉडलाइक प्रतिमा उभी केली, आपण सगळे एक परिवार आहोत आपण असं म्हणून अगदी तळागळातल्या भारतीयांच्या भावनाप्रधान मानसिकेतवर बोट ठेवून या माणसाने कोटीच्या कोटी रुपये कमावले. भावनांचा बिझनेस केला सुब्रतो रॉयने! नीरव मोदीची गोष्ट जरा वेगळी. याने घपला केला पण त्याने जे दागिने बनवले, त्यातली कारागिरी, कारागिरांना दिलेला मोबदला यात त्याने गडबड नाही केली, तडजोड नाही केली. अर्थात बँकेला लुटलं आणि त्यात सामान्य लोक भरडले गेले हे ही तितकंच खरं…
यातला तिसरा म्हणजे विजय माल्या. खरंतर वडिलांची किंगफिशर कंपनी होतीच हाताशी पण याला अजून मोठं व्हायचं होतं. माझ्याकडे रोकडा आहे आणि मी तो दाखवणार अशी मानसिकता असल्याने विजय माल्या किंग साईज लाईफ जगत राहिला. आपल्याकडे फक्त दारू विकणारा म्हणून पाहिलं जातं याची कदाचित काहीशी खदखद त्याच्या मनात असावी आणि मग किंगफिशर एअरलाईन्सचा उदय झाला. एअर हॉस्टेसला ग्लॅमराईज केलं असेल तर ते माल्याने. त्याच्याकडे व्हिजन नक्कीच होती. ग्लॅमर, हिरोइन्स, फॅशन, पार्ट्या, स्टाईल हे सगळं माल्याच्या लार्जर दॅन लाईफचा भाग होता. माल्या फ्लॅम्बॉयंट होता आणि त्यामुळे त्याचं सगळंच राजेशाही होतं. पण त्याच्या फ्रॉडमुळे कित्येक जणांचे जॉब्स गेले, आत्महत्या झाल्या, कुटुंब बरबाद झाली.
ही डॉक्युसिरीज बघत असतांना आपल्याला आपण किती सामान्य आहोत हे जाणवत राहातं. एखाद्या दुकानदाराकडे एक रुपया जरी उधार असला तरी तो त्याला परत दिल्याशिवाय चैन न पडणारे आपल्यासारखे लोक किंवा भाजीवाल्याला द्यायला, रिक्षावाल्याला द्यायला सुट्टे पैसे नसतील तर नोट देऊन उरलेले पैसे तू ठेव असं म्हणणारे माझ्यासारखे लोक.. त्यांना हे सगळं बघताना धडकी भरणार हे नक्की! हे असं बघत असतांना हृदय इतकं जोरजोरात धडधडत होतं माझं की आता ते आपल्या हातात येतं का काय असं वाटायला लागलं.. लोकांचा कोटींचा पैसा बुडवून आपल्या पोराच्या वाढदिवसाला जंगी पार्टी करणारा माल्या, ज्यांच्या घरी भरपेट दोन वेळ जेवायला अन्न नसेल अशा लोकांचा पैसा बुडवून आपल्या मुलाच्या लग्नात राजकुमार संतोषी सारख्या दिग्दर्शकाकडून लग्नाचा व्हिडीओ बनवून घेणारा, पोराच्या वरातीत अमिताभच्या खांद्याला खांदा लावून नाचणारा सुब्रतो रॉय.. काय म्हणावं या लोकांना? ही खरंच माणसं आहेत का असा प्रश्न पडतो हे बघताना आणि आपण हतबुद्ध होऊन जातो..
या डॉक्युसिरीजच्या दोन आवडलेल्या गोष्टी म्हणजे यात फिनॅन्शियल टर्म्स आणि हे घोटाळे सामान्य माणसाला समजतील अशा पद्धतीने उलगडवून दाखवले आहेत. आणि दुसरं म्हणजे यात फिक्शनल मसाला नसल्याने आपण हे बघत असतांना आपल्याला माणसं दिसतात, त्यांचं वागणं दिसतं. फ्रॉड केल्यावर देखील सुब्रतो रॉयला देवाप्रमाणे पाहणारी काही माणसं, माल्याने फ्रॉड केला असला तरीही त्याला मैत्रीत सूट देणारे त्याचे मित्र, आमचे नीरव सर असं करूच शकत नाहीत असं म्हणणाऱ्या निरव मोदीच्या कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचारी हे आपण स्क्रीनवर पाहत असतो आणि दुसरीकडे माल्या यांनी त्यांच्या कंपनीतील लोकांना पगार देऊ न केल्याने आत्महत्या करणारे कर्मचारी, सुब्रतो रॉयच्या चिट फ़ंड मध्ये आपल्या आयुष्याची मिळकत लावून ते पैसे डुबून गेल्यावर विझल्या डोळ्यांनी हातावर हात धरून बसलेले कष्टकरी लोक, निरव मोदीच्या बँक फ्रॉडमध्ये भरडला गेलेला बँकेचा क्लार्क.. दोन टोक.. माणसांची आणि भावनांची.. ही सिरीज कुठेही आपलं असं मत देत नाही आणि डॉक्युसिरीजचीही मला सगळ्यात आवडणारी गोष्ट आहे. या तीनही जणांना ते चांगले आहेत वा वाईट आहेत अशा कोणत्याही प्रेज्युडाईजशिवाय आपल्या समोर ठेवलं जातं. सरतेशेवटी आपलं मत बनवण्याचं स्वातंत्र्य आपल्याला दिलं जातं.
या सगळ्या स्कॅममध्ये अजून एक समान गोष्ट म्हणजे आपल्याला कोणाचा बाप काही करू शकत नाही हा घनघोर विश्वास.. या तिन्ही जणांना अगदी पडत्या काळात देखील असं वाटलं नाही की आपली बेईमानी पकडली जाऊ शकते.. लाच दिली की सगळं ठीक होतं या (गैर)समजावर असे फ्रॉडस्टर पोसले जातात. माल्या सध्या युकेमध्ये आहेत. मुंबईचं आर्थर रोड जेल त्यांची डोळे लावून वाट पाहत बसलंय.. निरव मोदी लंडनमधल्या जेल मध्ये आहे. सुब्रतो रॉय सध्या लखनौमधल्या त्याच्या घरामध्ये आहेत . सहाराचे काही असेट्स विकून त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली आहे पण ज्याचे पैसे त्यांनी बुडवले ते लोक अजूनही मंदिरात जाऊन देवासमोर हात जोडत आहेत या एका आशेवर की त्यांचे पैसे परत मिळतील.. त्यांच्या घामाची उष्मा एसीचं थंड वारं अंगावर घेणाऱ्या रॉय यांच्यापर्यंत पोहोचेल का हा खरा प्रश्न आहे?
कमी कालावधीत खूप जास्तं मिळवण्याचा हव्यास ही प्रवृत्ती बळावताना दिसते. दुसऱ्याला फसवून, त्याचं नुकसान करून कधीच स्वतःच पोट भरू नये असं आजी लहानपणी सांगायची. आपल्याला चार पैसे कमी मिळाले तर चालतील पण दुसऱ्याचे पैसे कधीही बुडवू नये, पाच पैशाची सुद्धा उधारी कधी करू नये असं आई सांगायची.. असतील या मिडल क्लास व्हॅल्यूज.. पण या आजही मला फार रिलेव्हन्ट वाटतात. कोणाचं वाईट केलं की रात्री झोप येत नाही असं आई लहानपणी म्हणायची ते आजवर मला खरं वाटतं.. मग मी विचार करते माल्या, रॉय, निरव मोदी, रामलिंगन राजू.. या सगळ्यांना येत असेल का झोप रात्री? माझं वेडं , मिडलक्लास, भाबडं मन मला असे खूप सारे प्रश्न विचारत बसतं… बिझनेस म्हणजे घपला.. हे समीकरण करणाऱ्या या सर्व लोकांना खरंतर खप मोठी शिक्षा व्हायला हवी.. काहीतरी लबाडी केल्याशिवाय पैसा मिळत नाही ही अतिशय वाईट मानसिकता अशा लोकांमुळे बळकट होत जाते. म्हणूनच याचयांचे फ्रॉड जगासमोर येणं गरजेचं आहे.. लबाडी करून तुम्ही पळून जाऊ शकत नाही, लोकांचे पैसे बुडवून तुम्ही स्वतःचे बंगले उभारू शकत नाही, टॅक्सपेयरचा पैसे स्वतःच्या बिझनेसमध्ये टाकून तुम्ही मजा मारू शकत नाही.. हा मसेज तमाम करंट आणि भावी फ्रॉडस्टर्सपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. शरत प्रधान सारखे पत्रकार ज्यांनी तीस वर्ष सुब्रतो रॉयच्या केसचा फॉलोअप घेतला, निरव मोदीच्या बँक फ्रॉडचा तपास करणारा अनॅलिस्ट.. हे लोक महत्वाचे!
एकदम सगळं काही मिळवण्याचा हव्यास माणसाला खड्डयात घेऊन जातोच.. पैसा, प्रसिद्धी एका रात्रीत येत नसतं आणि ते तसं आलं तर ते टिकत नाही.. म्हणूनच टिकून राहणं ही सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे असं मला वाटतं.. मग ते बिझनेसमध्ये असो, पैशाच्या शर्यतीत असो वा लोकप्रियतेच्या.. सातत्य हे फार महत्वाचं आणि ते तेव्हाच येतं जेव्हा इनपुट जेन्युईन असतो.. तुम्ही कोणालाही फार काळ उल्लू बनवू शकत नाही.. समोरच्याच्या डोळ्यात धूळ फेकून त्याला बुद्धू काही काळ बनवता येऊ शकतं पण ते टिकणारं नसतं.. आणि कदाचित माझं हे म्हणणं अगदी पुरातन विचाराचं वाटू शकेल पण कोणाला फसवून, त्याचं मन दुखावून, त्यांना उल्लू बनवून येणारी सुबत्ता, लोकप्रियता ही कमी काळासाठीची आणि वरवरची असते. आता मी हे म्हणते आहे पण डोळ्यासमोर ती म्हातारी दिसते आहे.. प्रभावती कोंडू.. सहाराच्या चिटफ़ंड मध्ये पैसे अडकवून बसलेली म्हातारी..तिचे सुरकुतलेले हात ती देवासमोर जोडते आहे.. डोळ्याखाली काळी वर्तुळं आहेत तिच्या, चेहेऱ्यावर खूप साऱ्या सुरकुत्या.. देवासमोरच्या उदबत्या जळून संपत आहेत पण आपले पैसे परत मिळतील ही तिच्या मनातली आशा संपत नाहीये. त्या म्हातारीला हे सगळं मी सांगू शकेल का? ज्यांचे पैसे बुडवले गेले, ज्यांचे पगार थकवले गेले, ज्यांनी कष्ट करून पैसे कमावले त्यांचे पैसे लुटले गेले.. या सगळ्यांना तत्वाचे, मोरॅलिटीचे फ़ंडे आपण सांगू शकतो का? मग तत्व वगैरे सगळं फक्तं कागदावर असतं का?
माझ्या भावी पिढीला मी सांगू शकते का माझे पुरातन मिडलक्लास मॉरल्स, जे माझ्या आजीने,आईने मला सांगितले होते असा मी विचार करते आहे..ती म्हातारी काही केल्या माझ्या डोळ्यासमोरून जात नाहीये.. इमारतीचा पाया नीट बांधला नाही, त्यात खोट केली की इमारत कोसळतेच..आता अचानक मला दिसते आहे.. मी… पाच सहा वर्षांची.. माझ्या बाबासोबत पत्त्यांचा बंगला बनवतांना.. माझा बंगला सारखा पडतो आहे आणि बाबा मात्रं शांतपणे एकावर एक असा सुंदर बंगला बांधतो आहे.. मग काही वेळाने मी चिडून दोन पानं एकत्र करून जुगाडूगिरी करून बंगला बांधायला सुरवात करते.. सुरवातीला सगळं ठीक असतं पण एका उंचीनंतर सगळा बंगला कोसळतो.. मी रडायला लागते आणि बाबा मला हसून म्हणतो की थांब मी तुला शिकवतो.. मग बाबा हलक्या हाताने पत्ता कसा पकडायचा, दोन पत्यामध्ये किती अंतर ठेवायचं हे शिकवतो आणि काही दिवसांनी प्रॅक्टिस करून आता मला पत्याचा बंगला उभा करता येतो आहे.. वरचे मजले सांभाळून बांधायचे, ते उभे करताना आपला पाया ते वजन सोसू शकतो का नाही हे तपासून पाहायचं.. लवकर उंच जाण्याच्या नादात आपलं मूळ विसरायचं नाही.. आणि तरीही झाली गडबड तर पुन्हा सुरु करायचं कारण आता बंगला कसा उभारायचा हे तुला माहिती आहे, हे सगळं सांगणारा बाबा मला दिसतो आहे.. मला हे सगळं आता स्पष्ट दिसतं आहे आणि मला उत्तर सापडलं आहे माझ्या प्रश्नाचं.. आता माझ्या पिल्लाला मी शिकवणार पत्याचा बंगला बांधायला.. जे मला माहिती आहे ते मी करत राहणार आहे.
Bad boy billionaires official trailer- क्लिक करा–https://bit.ly/3kjVPNl