पण, दुसरीकडे मुळातच इतक्या प्रचंड मनोरंजनाची आपल्या गरज असते का, हाही प्रश्न उरतोच. 80 हून अधिक OTT प्लॅटफॉर्म्स, त्यावर उपलब्ध असणार्या हजारो सीरिअल्स आणि सिनेमे आणि बघणारा मेंदू एक! आपल्याला खरंच दिवसरात्र मनोरंजनाची गरज असते का? मुळात मनोरंजन आपल्याला का हवं असतं? त्यातून आपल्याला काय मिळतं? एका छोट्या डबीत स्वतःला कोंबून फोनच्या छोट्या स्क्रीनवर सतत काहीतरी बघितल्यामुळे आपल्याला खरंच रिलॅक्स वाटतं का? आपण खरंच खुश होतो का? ज्याप्रमाणे आपल्यापर्यंत पोचणार्या सगळ्या माहितीची आपल्याला गरज नसते, माहितीचा कधीही न संपणारा कचरा आपण सातत्याने गोळा करत असतो, तसंच काहीसं आपल्या मनोरंजनाच्या गरजेचं झालं आहे का? बिंज वॉचिंग आपण का करतो? हे सगळे प्रश्न आपण स्वतःला विचारण्याची आज नितांत गरज आहे. आपण आपल्या गरजेतून निर्माण केलेली बाजापेठ 2023 पर्यंत 5 बिलियन डॉलर्सची होणार आहे. आपल्या जीवावर अनेक लोक मोठे होणार आहेत, पण त्या बदल्यात आपल्याला काय मिळणार आहे? आपलं खरंच मनोरंजन होतंय, की आपणही फक्त कचरा गोळा करतोय, की अजून काही?