-प्रवीण बर्दापूरकर
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या कांही नेत्यांनी केलेली वक्तव्ये भोवली , ही केंद्रीय गृह मंत्री आणि या निवडणुकीचे भाजपचे सूत्रधार अमित शहा यांनी दिलेली कबुली म्हणजे उशीरा झालेली उपरती आहे . अमित शहा हे कांही भाजपचे साधे नेते नाहीत तर , नरेंद्र मोदी यांचे उजवे हात आहेत , निवडणुका जिंकून देणारे म्होरके आहेत , जे. पी. नड्डा राष्ट्रीय अध्यक्ष असले तरी अजूनही पक्ष तेच चालवतात , हे लक्षात घेता अमित शहा यांनी आता भाजपचे कार्यकर्ते , समर्थक , हितचिंतक , भक्त आणि अंधभक्तांनाही दिल्ली विधानसभेच्या निकालाबाबत जरा सबुरी आणि जबाबदारीने व्यक्त होण्याचा सख्त आदेश दिला पाहिजे .
लोकशाहीत निवडणुका ही कधीही खंड न पडणारी प्रक्रिया आहे . निवडणुकीत विजयी होण्याची संधी एकाच पक्षाला असते मात्र , दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेला सलग दुसरा दारुण पराभव भाजपचे नेते कार्यकर्ते , समर्थक , हितचिंतक , भक्त आणि अंधभक्तांच्या फारच जिव्हारी लागला असल्याचं व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रियातून दिसतं आहे . जिव्हारी लागण्याची ही प्रक्रिया खरं तर निकालाआधीच सुरु झाल्याचं भाजपकडून येणाऱ्या बेताल वक्तव्यातून दिसत होतं ; ‘गोळी मारो’ , ‘भारत-पाक क्रिकेट सामना’ , ‘दहशतवादी’ या जहरी आरोपातून ते जाणवत होतं . आपल्या देशातल्या राजकारण आणि राजकारण्यांतला समंजस आणि सुसंस्कृतपणा हरवत चालला असल्याचं हे लक्षण आहे . हे असंच सुरु राहिलं तर निवडणुकात ‘बॅलेट’ ऐवजी उद्या ‘बुलेट’ येण्याचा धोका आहे कारण केवळ भाजपच नाही तर कमी-अधिक प्रमाणात सर्वच राजकीय पक्षात अशी जहरी वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांचं पीक फोफावलं आहे . आज मुखी जहर आलंय उद्या हाती शस्त्र येण्याचेच भयकंपित करणारे हे संकेत आहेत .
सत्ताधारी पक्षानं तर निवडणुकीच्या प्रचारातच नाही तर दैनंदिन व्यवहारातही डोळ्यात तेल घालून भान बाळगावं लागतं , म्हणूनच या संदर्भात भाजपची जबाबदारी जास्त आहे . पण , विशेषतः २०१४ला सत्तेत आल्यापासून विरोधकांना राष्ट्रद्रोही ठरवण्याचा एक अत्यंत घातक पायंडा भाजपनं पाडला आहे . विरोधकांना गोली मारो , निवडणूक म्हणजे भारत-पाकिस्तान सामना आहे अशी वक्तव्ये करण्याची संवय भाजप नेत्यांना , त्यातही प्रामुख्यानं नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडगोळीला , गुजरात निवडणुका लढवतांना लागलेली होती , त्या संवयीचं आता राष्ट्रीयीकरण करण्यात आलेलं आहे . दिल्लीच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांना ‘दहशतवादी’ म्हणून संबोधित करण्यापर्यंत भाजपच्या प्रकाश जावडेकर या केंद्रीय मंत्र्यांनं मजल मारावी , हा तर प्रचाराची पातळी किती खालच्या पातळीवर जावी याचा नीच्चांक आहे . त्यावर गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘मौत का सौदागर’ झाला होता असं स्मरण करुन दिलं जात असलं तरी , त्या वक्तव्याची मोठी किंमत काँग्रेसला चुकवावी लागलेली आहे , याचा विसर न पडू दिलेला बरा ; कुत्रा माणसाला चावला म्हणून कांही माणूस लगेच कुत्र्याला चावत बदला घेत नाही , हे संस्कृतीच्या नावानं सतत उमाळे काढणाऱ्या भाजपच्या कार्यकर्ते , समर्थक , हितचिंतक , भक्त आणि अंधभक्तांनी लक्षात घ्यायला हवं .
अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीनं दिल्लीकरांना अनेक सोयी-सवलती दिल्या म्हणून उमाळ्यावर उमाळे काढणाऱ्या भाजपच्या कार्यकर्ते , समर्थक , हितचिंतक , भक्त आणि अंधभक्तांनी दिल्लीकरांना ‘फुकटे’ म्हणून संबोधनं हा निव्वळ भंपकपणा आहे . २०१४च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याची घोषणा केली होती ते काय आमिष नव्हतं आणि ते पाळलं नाही ही काय फसवणूक नाही का ? गरिबांना गॅस कनेक्शन , ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या खात्यावर विशिष्ट रक्कम जमा करणं या आणि अशा अनेक सवलती म्हणजे सरकारच्या खजिन्यातून मते मिळवण्यासाठी केलेली खैरातच होती , हे भाजपच्या कार्यकर्ते , समर्थक , हितचिंतक , भक्त आणि अंधभक्तांनी विसरु नये . महाराष्ट्रात शिवसेनेच्या दहा रुपयात भोजन देण्याच्या घोषणेला शह म्हणून ‘मी परत येणार’ असा दावा करणाऱ्यांनी पांच रुपयात जेवण देण्याची घोषणा केली होताच की . फार लांब कशाला दिल्लीच्या निवडणुकीत गव्हाचं एक किलो पीठ २ रुपयात , मोफत स्कुटी अशा अनेक सवलतींचे आमिष मतदारांना दाखवणारा भारतीय जनता पक्षच होता . ‘आपलं ते धोरण आणि दुसऱ्याच मात्र विटलेलं वरण’ , असं हे वागणं असून भाजपच्या समर्थक , हितचिंतक , भक्त आणि अंधभक्तांचा तो भंपकपणाच आहे . नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या अनेक सवलती दिल्या आणि अनेक अजून दिलेल्या नाहीत तरी , देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे मात्र , दिल्लीकरांना इतक्या सवलती देऊनही अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं दिल्ली राज्याची तिजोरी रिकामी होऊ दिलेली नाही , हेही लक्षात घेण्याचं भान भाजपच्या कार्यकर्ते , समर्थक , हितचिंतक , भक्त आणि अंधभक्तांनी दाखवायला हवं .
आठवण जुनी आहे , १९९६मधली . ‘लोकसत्ता’च्या लोकरंग या रविवार पुरवणीसाठी मी तेव्हाचे विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते शरद पवार यांची एक मुलाखत घेतली होती . पवार यांच्या कुटुंबात न घडलेल्या एका बाबीची घोर कुजबुज तेव्हा राजकीय वर्तुळात सुरु करण्यात आलेली होती . त्या संदर्भात विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देतांना शरद पवार म्हणाले होते , रा . स्व. संघाची अफवा पसरवण्याची क्षमता फारच मोठी आहे . त्याच संघाचं अपत्य असल्यानं तो अफवा पसरवण्याचा गुण भाजपमध्ये कसा आलाय याचा मासला म्हणजे दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत पसरवल्या गेलेल्या एका माहितीचा आहे . भाजपच्या आय टी सेलने पसरवलेल्या या माहितीनुसार भाजपचे ८ उमेदवार केवळ १०० मतांच्या फरकानं पराभूत झाले , १९ उमेदवार केवळ १ हजार आणि ९ उमेदवार केवळ २ हजार मतांच्या फरकानं पराभूत झाले आहेत . या माहितीतून दिल्या जाणाऱ्या आकड्यांची बेरीज करा – विजयी ८+थोडक्यात पराभूत झालेले ८+१९+९ म्हणजे संपूर्ण बहुमताचा आंकडा येतो . थोडक्यात काय तर आपण फारच निसटत्या फरकानं दिल्लीची सत्ता गमावली आहे , असा या माहितीचा अर्थ आहे . एका भक्ताकडून ही माहिती आली तेव्हा उत्सुकता चाळवली म्हणून निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन प्रत्येक मतदार संघाच्या निकालाची आंकडेवारी काढली तर ही माहिती सपशेल खोटी निघाली ! बिजवास मतदार संघातून भाजपचा उमेदवार ७५३ तर आदर्श नगर मतदार संघातला भाजपचा उमेदवार १५८९ मतांनी पराभूत झाला . हे दोन अपवाद वगळता १०० मतांच्या फरकानी तर भाजपचा एकही उमदेवार पराभूत झालेला नाही . भाजपचे सर्व उमेदवार किमान सात हजार मतांनी पराभूत झालेले आहेत . केवढा हा खोटारडेपणा आणि आत्मवंचनाही ! ज्यांना पराभव खिलाडूवृत्तीनं स्वीकारता येत नाही ते कधी तरी विजयी झाल्यावर म्हणूनच उन्मत्त होतात .
म्हणूनच , उशीरा का असेना भाजपचे दिग्गज नेते अमित शहा यांना दिल्ली विधानसभेच्या निकालाबद्दल झालेल्या उपरतीचं स्वागत करायला हवं . पराभव मान्य करतांना झालेल्या चुकाही मान्य करण्याचा उमदेपणा अमित शहा यांनी दाखवलेला आहे . असाच उमदेपणा भाजपच्या सर्व भाजपच्या कार्यकर्ते , समर्थक , हितचिंतक , भक्त आणि अंधभक्तांनीही दाखवायला हवा . ते जर दाखवत नसतील तसा सख्त आदेशच अमित शहा यांनी द्यायला हवा . अमित शहा यांचा आदेश नाकारण्याची हिंमत पक्ष आणि भाजपच्या कार्यकर्ते , समर्थक , हितचिंतक , भक्त आणि अंधभक्तांत नाही . अमित शहा यांचा आदेश न पाळून त्यांचा अवमान नक्कीच कुणी करणारही नाही कारण हा पक्ष तसंच त्याचे समर्थक , हितचिंतक , भक्त आणि अंधभक्तांही शिस्तबद्ध आणि आज्ञाधारक आहेत . शिवाय अशा आज्ञाधारकांकडून आदेशाच्या झालेल्या पालनातून देशभक्ती उजाळून निघते हा आणखी एक फायदा आहेच .
(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत )
9822055799