–सरोजकुमार मिठारी
मराठी भाषा शुद्धलेखन चळवळीचे महाराष्ट्रातील बिनीचे शिलेदार, ज्येष्ठ भाषातज्ज्ञ अरुण फडके (६५) यांचे आज नाशिक येथे निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंजत होते. विशेष म्हणजे कर्करोगाचे निदान झाल्यानंतरही त्यांनी उपचारानंतर व्याख्याने, मार्गदर्शनवर्ग पुन्हा सुरू केले होते.
“भाषा ही प्रवाही आणि परिवर्तनशील असते. ज्याप्रमाणे नदीच्या प्रवाहाला योग्य दिशा द्यावी लागते अन्यथा हाहाकार संभवतो, त्याप्रमाणेच भाषेच्या प्रवाहाला योग्य दिशा, योग्य मार्ग आणि काही शिस्त असली पाहिजे. जसे कपड्यांमधील नीटनेटकेपणा कपड्यांचे सौंदर्य वाढवतो, तसेच भाषेतील शुद्धता ही त्या भाषेची सौंदर्य वाढवत असते.” अशा अनेक सोप्या उदाहरणांवरून त्यांनी भाषिक शुद्धतेची गरज अधोरेखित केली.
मराठी ही सामर्थ्यवान भाषा आहे आणि तिला स्वतःची लेखनप्रकृती आहे. मराठी भाषेबद्दल सर्वांनाच आपुलकी, अभिमान असतो. मात्र जागतिकीकरणाच्या स्पर्धेत मराठी ज्ञानभाषा होत असताना मला मातृभाषेत शुद्ध लिहिता आले पाहिजे, ही इच्छाशक्तीही प्रत्येकाजवळ असणे गरजेचे आहे, असे त्यांचे प्रतिपादन होते.
माणसांच्या स्वैर वागण्याला कायदे, नीतिनियम वळणावर आणतात. कारण व्यवहारातील नियमव्यवस्थाच जर आपण नाकारली तर त्याचे परिणाम स्वतःला किंवा इतरांना भोगावे लागतात. त्याप्रमाणे चुकीच्या लेखनामुळे भाषेत भेसळ निर्माण होऊन समाजजीवनात अव्यवस्था आणि पर्यायाने अराजक यांना आमंत्रण दिल्यासारखे होते. म्हणून शुद्धलेखन हा आग्रह न धरता ती महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाची सवय झाली पाहिजे, ही त्यांची भूमिका होती व या भूमिकेशी ते आयुष्यभर प्रामाणिक राहिले, कार्यरत राहिले.
आपल्या राज्यात पहिली ते पदव्युत्तर ते अगदी विद्यावाचस्पती (पीएचडी) पर्यंत मराठी शिकविली जाते, पण मराठी कशी लिहावी, याचे ज्ञान दिले जात नाही, त्यामुळे मराठीत पदवी, पदव्युत्तर तसेच डॉक्टर झालेले अनेक वाचस्पतीही दहा ओळी शुद्ध लिहू शकत नाहीत, अशी खंत त्यांनी अनेकदा बोलून दाखवली होती व शासनाकडे शुद्धलेखनाच्या नियमावलीच्या कायदेशीर अंमलबजावणीसाठी ते प्रयत्नशील होते.
शुद्धलेखन मार्गप्रदीप, शुद्धलेखन ठेवा खिशात, सोपे मराठी शुद्धलेखन, मला मराठी शिकायचंय, मराठी लेखन-कोश ही त्यांची मराठी भाषेवरील अप्रतिम पुस्तके विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, विद्यावाचस्पतींसह सर्वांनाच मार्गदर्शक आहेत.
त्यांच्या निधनाने सध्या दुर्मीळ होत चाललेले मराठी भाषेचे व्यासंगी अभ्यासक आणि शुद्धलेखन चळवळीतील तळमळीचा कार्यकर्ता हरविल्याची खंत आहे.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..
-
लेखक महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळात सहायक संपादक आहेत.
-
९८५०७०२२०५