ते पुढे म्हणतात, ‘‘महात्माजींना राजकारणात मिळालेले अभूतपूर्व यश आणि त्यांच्या कर्तृत्वाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर घडलेल्या चमत्कारांची जाणीव प्रत्येक सामान्य नागरिकाप्रमाणे मलादेखील आहे. परंतु माझे कर जुळतात त्यांच्या अभय साधनेसमोर! माझे मस्तक झुकते त्यांच्या सर्वंकष करुणेसमोर!’’ अशा प्रकारे गांधींच्या सत्य-साधनेतील अभय आणि करुणा या मूल्यांचा कुमारजींनी समग्र वेध घेतला. त्या विचारांचे संगीताशी गठबंधन करताना त्यांनी ‘ग’ आणि ‘ध’ या दोन स्वरांची चढती व उतरती सुरेल संगती आखली. त्यामुळे ‘ग’ हा या रागाचा वादी स्वर(प्रमुख स्वर) आणि ‘ध’ संवादी स्वर (उपप्रमुख स्वर) ठरला. मल्हारचा प्रकार असल्याने वर्षा ऋतूत हा राग खुलून दिसतो.