२०१४ ला मोदी आले. आले तेच मुळी स्वातंत्र्यानंतरचा तो काळ घेऊन आल्यासारखे. सरकार आणि जनता यांच्यातला दुरावा एकदम गायब. मोदींवर लोभावलेले बहुजन. जिकड-तिकडचे नोकरशहा, उद्योगपती, पत्रकार, नट, लेखक, शास्त्रज्ञ, खेळाडू यांची हरेक विषयातली मतं थेट मोदींसारखीच. त्यामुळे हे खरंखुरं लोकांचंच सरकार आहे असं सगळीकडे झालं. मीडिया, विद्यापीठं इत्यादी ठिकाणी सेक्युलरछाप लोक होते. पण त्यांना जन्माचा धडा मिळाला. मग सगळीकडेच राजद्रोह करताना लोक दहा वेळा विचार करायला लागले. शांतता आली.
इथून पुढे हिंदुराष्ट्रच अशी चाहूल लागली. तितक्यात गडबड झाली. करोना आला. पहिले आठ-दहा महिने ठीक होते. मोदींच्या प्रेमाखातर लोकांनी सगळं सहन केलं. भुकेनं मेले, हजार मैल उन्हातून चालले. रडारड नाही. मोर्चे नाहीत. तोडफोड नाही. मोदींची अडचण अशी झाली की, राममंदिराचा शीलान्याससुद्धा नीट करता आला नाही, त्या गडबडीत.
बंगालच्या निवडणुकांचे पाहा. मोदींना निवडणुका प्रचंड आवडतात. आयुष्यात त्यांना नाटक-सिनेमा-वाचन-संगीत कसलाही छंद उरलेला नाही. (पूर्वी काही होता का हे सांगणेही कठीण.) निवडणुकीचा प्रचार हाच त्यांचा विरंगुळा उरला आहे. तिथे त्यांना लाखो लोक दिसतात. ते त्यांचेच लोक असतात. त्यांच्यासमोर ते अक्षरशः काय वाटेल ते बोलू शकतात. हे खरं हे खोटं, असा भेद ते करत नाहीत.
फोटो, प्रसिद्धी फक्त मोदींची होते. क्वचित अमित शहांची. बाकी सर्व नगण्य. कर्ते-करविते मोदी आहेत असे दिसते. म्हणजे तसे ते आहेच. वाजपेयींना संघ जाब विचारत असे. अडवानींना घालवण्याची शस्त्रक्रिया भागवतांनी केली होती. तिला त्यांनी केमोथेरपी म्हटलं होते. आता मोदींना काहीही विचारण्याच्या अवस्थेत भागवत नाहीत. असा सत्तासमतोल फार काळ टिकत नाही.