योगी भांडवलदार -भाग ७

सौजन्य – बहुजन संघर्ष

अनुवाद – प्रज्वला तट्टे

(गॉंडमन टू टायकून या पुस्तकावरून साभार)

रामभरत हा पतंजलीच्या सर्व आर्थिक नाड्या आपल्या हातात ठेवणारा रामदेवचा भाऊ काही कमी दबंग नाही. १६ जून २०१० मध्ये टोयोटा इंनोव्हा त्यानं दोन पादचाऱ्यांच्या अंगावर घातली. गाडीचा टायर बर्स्ट झाल्यामुळं हे झालं असं सांगून केस दाबली गेली. १८ ऑक्टोबर २०१३ मध्ये राम भरतनं नितीन त्यागी नावाच्या एका माजी कर्मचऱ्याची पतंजली योगपीठ दोन मध्ये बंद करून खूप पिटाई केली. राम भरत म्हणे त्यानं पैसे आणि २५लाखाचा माल चोरला. त्यागीच्या आज्यानं पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी नितीनला सोडवून राम भरत ला लॉकअप मध्ये टाकलं. तिथून राम भरत पळाला. त्यानंतर नेहमीप्रमाणे रामदेवनं पत्रकार परिषद घेऊन केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारांवर आपल्याला बदनाम करत असल्याचा दावा केला. “माझा भाऊ फरार नसून पोलिसांनी त्याला बोलावलेलंच नाही”, असं सांगितलं. उत्तराखंड हाय कोर्टात २४ डिसेंम्बर २०१४ ला म्हणजे केंद्रात भाजप सत्तेत आल्यावर, सर्व साक्षी पलटल्या आणि केस बंद झाली. मे २०१५ मध्ये स्थानिक ट्रक वाहक/मालक आणि पतंजली कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी झाली. CCTV कॅमेऱ्यात रामभरत आपल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना हाणामारी करण्यासाठी उद्यूक्त करताना पकडला गेला. त्यासाठी त्याला चौदा दिवस पोलीस कस्टडीत राहावं लागलं. पोलिसांनी घेतलेल्या झडतीत पतंजलीची खाजगी सुरक्षा कंपनी- भारत सेना सुरक्षा बल-असल्याचं उघड झालं.एक तलवार, काही हेल्मेट आणि चौदा भाले सापडले. वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वीटी अग्रवाल यांनी कडक कारवाई केली. रामदेवनं नेहमीप्रमाणं सरकार त्याच्या विरुद्ध कारस्थान करत असल्याचा कांगावा केला, जेव्हा की यावेळी केंद्रात सरकार भाजपचं होतं. हरिद्वार कोर्टात केस चालू आहे…

४ मे २०१७ रोजी पतंजलीनं १०,५६१ कोटी ₹ नफा दाखवला. त्यापेक्षा अधिक फक्त हिंदुस्थान लिव्हरचा ३०,७८२कोटी ₹ आहे. म्हणजे पतंजली क्रमांक दोन वर आली आहे. मे २०१८ पर्यंत नफा २०,०००कोटी ₹ करण्याची घोषणा रामदेवनं केलीच आहे. पतंजली इतर कंपन्यांच्या त्या सर्व उत्पादनांच्या स्पर्धेत उतरली आहे ज्यांची उत्पादनं अव्वल होती. जसं डाबरचं मध, कोलगेटचं टूथपेस्ट, नेस्लेचे नूडल्स, अमूल-गोवर्धनचं तूप. या प्रतिस्पर्धी कंपन्यांचा माल केमिकल मिश्रित असून आणि ‘पतंजलीचा माल तो शुद्ध!’ असा प्रचार रामदेव करतो. मल्टिनॅशनल कंपन्या राष्ट्रद्रोही आहेत म्हणून सांगतो. कोलगेटच्या शेजारी पतंजली पेस्ट ठेवलेली दिसली की ग्राहक साहजिकच पतंजली उचलतो. कारण कोलगेट उचलली की ग्राहकाला राष्ट्रद्रोह करत असल्यासारखं वाटतं. अनेक उत्पादनं स्वस्त आहेत म्हणून सुद्धा खपतात. रामदेव काही उत्पादनांच्या किंमती कमी ठेवू शकतो कारण तो त्याच्या कामगारांना कमीत कमी पगार देतो. पतंजलीत आठवड्याचे सहा दिवस आणि बारा तास काम करणारा मजूर महिन्याचे फक्त सहा हजार कमवू शकतो. स्वतःचेच चॅनल असंल्यामुळं रामदेवला प्रचारावर फक्त २-३% रक्कम खर्च करावी लागते. इतर कंपन्यांचा प्रचारावर १२-१८% खर्च होतो. शिवाय त्या कंपन्या बर्यापैकी सरकारी नियम पाळतात.

रामदेवनं तर सर्व नियम धाब्यावर बसवलेले असतात. मार्च २०१३ ला दिल्लीत ‘राष्ट्र निर्माण बैठक’ झाली. त्यात रामदेवनं सांगितलं, “हमें तो परमिशन मिलतीही नहीं है। बिना परमिशन के ही काम कर रहे हैं। टाटा को अगर सात साल लगेंगे, तो बाबा को तो सत्तर साल लग जायेंगे। तब तक तो मैं मर जाऊंगा!” १५ नोव्हेंबर२०१५ ला बाजारात आणलेल्या नूडल्स मध्ये लेड या धातूची मात्रा परवानगीपेक्षा अधिक होती. इंडियन एक्सप्रेस मधे दोनच दिवसांनी बातमी आली की फूड सेफ्टी अँड स्टँडर्डस ऑथोरिटी ऑफ इंडिया ने नूडल्सच्या पाकिटावर दिलेला १००१४०१२०००२६६ हा लायसन्स क्रमांक चुकीचा आहे असा इशारा दिला आहे. पतंजली नूडल्सला परवानगी मिळाली कशी हे FSSAI चे अध्यक्ष आशिष बहुगुणा यांना माहीतच नव्हतं! ७डिसेंम्बर रोजी हरियाणाच्या निर्वाना गावचे विनोद कुमार यांनी विकत घेतलेल्या पतंजली नूडल्स पाकिटात जिवंत आणि मेलेल्या अळ्या निघाल्या.

डिसेंम्बर २०१६ ला हरिद्वार डिस्ट्रिक्ट कोर्टानं पतंजली आयुर्वेदावर दुसऱ्यांची उत्पादनं आपल्या नावावर खपवल्याबद्दल ११लाखाचा दंड ठोकला. कोर्टानं पतंजली आयुर्वेदावर दुसऱ्यांची उत्पादनं आपल्या नावावर खपवल्याबद्दल आणि उत्पादनांबाबत खोटी माहिती देणारा प्रचार केल्याचं सिध्द झालं म्हणून ११लाखाचा दंड ठोठावला. इंडियन एक्सप्रेसनं आर टी आय अंतर्गत फूड अँड ड्रग अडमिनिस्ट्रेशन ऑफ हरियाणानं माहिती दिली की ऑक्टोबर २०१६ मध्ये त्यांनी पतंजली घी ची चाचणी केली तेव्हा ते निम्न दर्जाचं आणि आरोग्यास घातक असल्याचं सिध्द झालं. १८ एप्रिल २०१७ला इंडियन एक्सप्रेसनं तशी बातमी सुद्धा दिली. मे २०१५मध्ये नेस्ले च्या मॅगी संदर्भात असं घडलं तेव्हा नेस्लेनं ३२०कोटी रुपयांची बाजारातली मॅगी परत मागवली आणि ग्राहकांची माफी मागितली होती. पण अशी अपेक्षा रामदेवकडून करता येणं अशक्य आहे. हा पतंजलीविरुद्ध चा मल्टिनॅशनल कंपन्यांचा डाव आहे, आमची उत्पादनं एकमेवद्वितीय असल्यामुळं त्यांची चाचणी करणारी यंत्रणाच सरकारकडे नाही असं सोईस्कर उत्तर रामदेवकडे तयारच असतं. कारण आता तर राज्य आणि केंद्रात भाजप असल्यामुळं सरकार विरोधात आहे असंही म्हणता येत नाही. २४ एप्रिल २०१७ ला इकॉनॉमिक टाइम्सनं प्रसिध्द केलेल्या बातमीनुसार भारतभर विखुरलेल्या डिफेन्सच्या ३९०१ कॅन्टीन मधून पतंजली आमला जूस विकायला बंदी घातली कारण ते आरोग्यास घातक सिद्ध झालं. ऍडव्हरटायसिंग स्टँडर्डस कौन्सिल ऑफ इंडियानं ही दिशाभूल करणाऱ्या जाहिराती दिल्या म्हणून रामदेवला दणका दिला आहेच. पण प्रश्न रामदेववर लागलेल्या आरोपांना रामदेव प्रतिसाद कसा देतो याचा आहे. उत्पादनांचा दर्जा न सुधरवता आपण आपली कंपनी राष्ट्रहितासाठीच कशी चालवतो आहे हे सांगतो. ‘मी जमिनीवर झोपतो, मी फकीर आहे……. सर्व नफा सेवाकार्यासाठी जातो. माझ्या नावावर काहीच नाही……बहुराष्ट्रीय कंपन्यांवर विश्वास ठेवू नका. त्या मला बदनाम करतात कारण त्यांना पतंजलीचं यश बघवत नाही.’ असं नेहमीचं पालुपद रामदेव लावतो.
राष्ट्रभक्ती आणि साधुत्व खपवून इतका नफा कमावण्याचा मंत्र आता श्री श्री रविशंकर आणि सद्गुरू जग्गी वासुदेव देखील जपू लागले आहेत. त्यांनीही आपापली उत्पादनं बाजारात आणली आहेत. यांनाही सश्रद्ध हिंदूंच्या मार्केटवर आपला जम बसवायचा आहे.
आणि हो, तिकडे रामदेवला हरियाणातले लोक बाबा रामदेव नं म्हणता ‘लाला’ रामदेव म्हणायला लागली आहेत. हरियाणवी बोली भाषेत लाला म्हणजे व्यापारी, दलाल!

(या लेखमालेतील अगोदरचे ६ भाग याच पोर्टलवर अन्यत्र उपलब्ध आहेत)

 ७७६८८४००३३
Previous articleसावधान… सोशल मीडिया तुमच्यावर ‘नजर’ ठेवून आहे!
Next articleसेक्स इंडस्ट्री आणि राजकीय आर्थिक व्यवस्था
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here