१२ डिसेंबर रोजी श्री. शरद पवारसाहेबांचा वाढदिवस… ८४ व्या वर्षात ते पाऊल ठेवीत आहेत. १८ ऑक्टोबर २०१९ ला सातारा येथील निवडणूक प्रचार सभेत आपण तुफान पावसात धडाकून भाषण केलेत… पावसाच्या सरी कोसळत होत्या… वक्ता विचलीत झाला नाही… म्हणून श्रोता हलला नाही… त्या निवडणुकीत एका पावसाने निकाल बदलला… बघता-बघता ५ वर्षे गेली. १५ दिवसांपूर्वी तुम्ही नवी मुंबईत आलात… निवडणुका अजून जाहीर व्हायच्या आहेत… त्या आगोदरच तुमच्या भाषणात पावसाने हजेरी लावली… तुम्ही विचलीत न होता ५ वर्षांनंतरही तो पाऊस पुन्हा अंगावर झेललात… जणु येणाऱ्या निवडणूक शुभशकूनानेच प्रचाराची सुरवात झाली, असेच त्या पावसाने श्रोत्यांना वाटले. मंगळवारी तुमचा वाढदिवस. सुरुवातीलाच भावना व्यक्त करतो की, हा तुमच्या एकट्याचा वाढदिवस नाही. महाराष्ट्राच्या पुरोगामी राजकारणाचा, विचारांचा आणि यशवंतरावांच्या परंपरेचाही हा ८४ वा वाढदिवस आहे. तुमच्या नेतृत्त्वाने या सगळ्या परंपरा जपणारा ‘योद्धा’ म्हणून तुमचा वाढदिवस महाराष्ट्राच्या अभिमानाचा दिवस आहे. म्हणून पवारसाहेब, आपले मन:पूर्वक अभिनंदन.
कोणाच्याही वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ‘जीवेद् शरद: शतम….’ असं म्हणतात… आपण तर स्वत:च ‘शरद’ आहात! आपण अत्यंत समर्थपणे आणि कणखर इच्छाशक्तीवर आयुष्याच शतक निश्चित पूर्ण करणार आहात. त्यासाठी तमाम महाराष्ट्राच्या तुम्हाला पुढच्या १६ वर्षाच्याही शुभेच्छा आहेतच. यावर्षीचा पवारसाहेबांचा वाढदिवस हा केवळ एक आनंदाचा दिवसच नव्हे, तर हा एक ‘निर्धार-दिवस’ म्हणून साजरा करायला हवा. आणि १२ डिसेंबरला ८४ व्या वर्षांत पाऊल ठेवणारे पवारसाहेब, हे यावर्षीच्या निवडणुकीत ‘महायोद्धा’ आहेत. युद्ध जिंकण्यासाठी ते मैदानात उतरले आहेत. सत्तेवर नसलेला या देशातील आजच्या तारखेचा सर्वश्रेष्ठ नेता, त्याचे नावही शरद पवारसाहेब हेच आहे. सत्तेवर असलेल्यांच्या भोवती जी गर्दी असते ती मतलबी लोकांची असते… स्वार्थी लोकांची असते… ‘काहीतरी मिळवण्याकरिता’ असते… आज जे दादा-मामा सत्तेत आहेत ते ज्या दिवशी सत्तेत नसतील, त्या दिवशी त्यांच्याभोवती किती माणसं असतील…? अ
नेक वर्षे शरद पवारसाहेब सत्तेत नाहीत पण, सकाळी ७ वाजतात कधी आणि पवारसाहेबांना भेटायला जातोय कधी… अनेकांना अशी ओढ लागलेले महाराष्ट्रातील शेकडो लोक ८ वाजता पवारसाहेबांच्या घरी गर्दी करून असतात. आणि कोणतीही ‘ऑपॅाईंटमेंट’ न घेता आलेल्या, अशा शेकडो लोकांना भेटल्याशिवाय शरद पवारसाहेब तुम्ही घराबाहेर पडत नाही. गेली ६० वर्षे हे पथ्य तुम्ही पाळले आहे. लोक अकारण कोणावरही प्रेम करत नाहीत. पवारसाहेबांना कोणाचाही फोन जाओ… ते घरी नसतील आणि निरोप ठेवला तर, ते घरी आल्यावर त्यांचा रात्री-अपरात्रीसुद्धा… यादी पाहून फोन आल्याशिवाय राहणार नाही. कामाशिवाय ते बोलणार नाहीत. उगाच चकाट्या पिटत बसणार नाहीत. आयुष्याचा क्षण आणि क्षण फुकट न घालवणारासुद्धा देशातील एकमेव नेता हाच आहे. आलेल्या प्रत्येक माणसाचे काम शक्यतो मार्गी लावणारा हाच नेता आहे. लोकांचा एवढा प्रचंड विश्वास असलेला महाराष्ट्रातील हाच नेता आहे. त्पांच्यामुळेच अनेकांनी मोठेपणा आलेल्यांन केलेला आहे. राजकीय परिस्थिती अशी निर्माण झाली की, एखादा नेता खचून गेला असता…. पवारसाहेबांचे उलटे आहे… परिस्थिती जेव्हा घड्याळाचे काटे उलटे फिरवते, तेव्हा पवारसाहेब अधिक ताकतीने उसळून उठतात.. जे त्यांना सोडून गेले त्यांचा एकच मुद्दा आहे… ‘पवारसाहेबांचे वय झाले आहे…’ पण, त्यांना हे माहिती नाही की, प्रचंड इच्छाशक्तीला वय नसतं… शिवाय सोडून गेलेली माणसं मुद्दा नसल्याने स्वार्थासाठी कारण पुढे करीत आहेत. पवारसाहेबांचे वय झाले आहे, असे म्हणून फुटलेल्या गटाच्या नेत्यानी त्यांच्या पक्षाच्या जाहिरातीतींमध्ये ‘वय झालेल्या पवारसाहेबांचाच’ फोटो लावलेलाहोता. त्यांना ‘विठ्ठल’ही म्हटले गेले… पण, आता त्यांच्यावर मोदी-शहा यांचे फोटो लावण्याची वेळ येणार.
जे फुटून गेले त्यांना, पवारसाहेबांच्या डोळ्याला डोळा भिडवण्याचे त्राणसुद्धा यापैकी एकाच्याही अंगात नाही. अजितदादा’ सोबत जे कोणी ४० जण गेलेत, त्यांचा आकडा अजूनही निश्चित झालेला नसतानाच, सत्तेसाठी त्यांनी फूट पाडली आहे. जे चारवेळा उपमुख्यमंत्री होते त्यांना एकदा मुख्यमंत्री व्हायचे आहे… ‘त्यांचं भलं होवो,’ असे सांगून, पवारसाहेब एका क्षणात त्यांच्यापासून वेगळे झाले. पाच-सात महिन्याचा तर विषय आहे… आता जे सोडून गेले ते सात महिन्यानंतर कुठे असतील? पवारसाहेब एक ‘महायोद्धा’ म्हणून देश त्यांचा गौरव त्यावेळी करत असेल… हे काल्पनिक शब्द नाहीत. उद्या काय घडणार आहे त्याचा हा महाराष्ट्राचा अगोदरचा तपशील आहे. तीन राज्यांच्या निवडणुकांत काँग्रेसचा म्हणजे, इंडिया आघाडीतील एका पक्षाचा, पराभव झाला. तरीही महाराष्ट्र म्हणजे ही तीन राज्ये नव्हेत… हा महत्त्वाचा फरक लक्षात घ्या. या महाराष्ट्रात दोन-तीन पक्षांची तोड-फोड करुनसुद्धा, छातीवर हात मारून भाजप नेतेही सांगू शकत नाहीत की, ते जिंकतील… जिथपर्यंत पवारसाहेब विरोधात आहेत, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस पक्ष भाजपाच्या विरोधात आहेत… तिथपर्यंत महाराष्ट्र तीन राज्यांएवढा सोपा नाही… हे नक्की. जिंकणारा सिकंदर असतो, हे खरे आहे. त्यामुळे तीन राज्यांत मिळालेला विजय भाजपाच्या मोदी मंत्राचा किंवा मशीनच्या तंत्राचा…. कसाही असेल… त्या ठिकाणी ते जिंकले हे मान्य. पण, महाराष्ट्र तेवढा सोपा नाही, हे ही तेवढेच खरे.
जे भाजपसोबत गेले त्यांचे भले होओ… पवारसाहेबांनी त्यांना क्षमा केलेली आहे. पवारसाहेबांचा फोटो लावून ज्या सभा होत होत्या त्या फोटो लावण्याला पवारसाहेबांनी हरकत घेतली… आता तीच मंडळी यशवंतराव चव्हाणसाहेबांचा फोटो लावत आहेत. कारण या टोळीतील ९ जणांपैकी किंवा त्यांच्या नियुक्त अध्यक्षाचा फोटो लावण्यासारखा एकही नेता त्यांच्याजवळ नाही. त्यांचं भलं होऊ दे, असे पवारसाहेबांप्रमाणेच म्हणू… आणखी एक प्रार्थना करू… पुढच्या सात महिन्यांत महाराष्ट्र घुसळून काढण्याची ताकद पवारसाहेबांमध्ये आहे. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर आणि यशवंतराव यांचा हा महाराष्ट्र आहे आणि
पवारसाहेबांचाही हाच महाराष्ट्र आहे. त्यामुळे येणाऱ्या लढाईत हा एक योद्धा सगळ्यांना भारी पडेल… ईडा… पिडा… टळेल… या महाराष्ट्रात शिंदे, फडणवीस, दादा या त्रिकुटाचे राज्य कोणत्याही परिस्थितीत पुन्हा येणार नाही, यासाठी तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते, नेत्यांना एकत्रितपणे काम करावे लागेल. आणि त्याचे श्रेय पवारसाहेबांना असेल. यापूर्वीही पवारसाहेबांना सोडून गेलेल्या आमदारांचा आकडा हाच होता… त्यांची नावेही आज माहिती नाहीत. त्यांचा पत्ताही कोणाला माहिती नाही. पण, पवारसाहेबांचे नाव एकही दिवस वगळता येत नाही. आता जे सत्तेत आहेत ते जत्रेत फिरणारी मंडळी जशी पाळणा आणि घोड्यावर बसून घेतात, तेवढी हास्यास्पद झालेली आहेत… चार-आठ महिन्याची जत्रा संपली की, मग ही माणसं कुठे असतील, त्यांचे पत्ते विचारावे लागतील… पवारसाहेबांच्या नावापुढे पत्ता लिहिण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील प्रत्येकाला त्यांचे नाव आणि त्यांचा पत्ता पाठ आहे.
गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राचं सगळं राजकारण बदललं आहे. संदर्भ बदलले आहेत, सत्तांतर झालेलं आहे पण कोण बदललं नसेल तर शरद पवारसाहेब… पवारसाहेब १९६२ साली म्हणजे वयाच्या २२ व्या वर्षी महाराष्ट्रासाठी जसं काम करत होते, तसेच २०२३ साली त्याच जोमानं, त्याच जिद्दीनं आणि त्याच बांधिलकीनं संबंध महाराष्ट्रासाठी आपण काम करता आहात. आपल्या इच्छाशक्तींनेच महाराष्ट्राचं राजकीय परिवर्तन घडलेलं होते आणि आताही त्यामुळेच महाराष्ट्रात सत्तांतर होणार आहे. महाराष्ट्रावरची इडापिडा टळो आणि भाजपाचं संकट दूर होओ… यासाठी आपले वैचारिक नेतृत्व, पुरोगामी मार्गदर्शन कमालीचं कामाला येणार आहे. म्हणून हे परिवर्तन होणार आहे. गेली ६५ वर्षे महाराष्ट्राबद्दल आपली बांधिलकी जशी होती, तशीच कायम आहे. २०१४ सालापर्यंत आपण केंद्रीय कृषीमंत्री होतात. डॉ. मनमोहन सिंग सरकारचा शेवटचा महत्वाचा निर्णय आपल्याच खात्याचा होता. गरीब माणसाला १० किलो तांदूळ आणि १० किलो गहू…. २ रुपये किलोप्रमाणे… हा आपला निर्णय अंमलात आला असता तर देशाच चित्र बदललं असतं. २०१४ ला केंद्रात सत्तांतर झालं. महाराष्ट्रात कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी बनू शकली नाही म्हणून सत्तांतर झालं नाही आणि प्रतिगामी शक्तींच्या हातात पुरोगामी महाराष्ट्र गेला. २०१९ च्या महाराष्ट्रातील निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रावादीची आघाडी केवळ आणि केवळ आपल्या आग्रहातून, पाठिंब्यातून सर्व अडचणींवर मात करून झाली. त्यानंतरची ‘महाआघाडी’ हा तर प्रतिगामी भाजपला सगळ्या मोठा धक्का होता. देशात ‘इंडिया’ ही एक महाशक्ती निर्माण करण्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याप्रमाणेच आपणही पुढाकार घेतलात. शिवसेनेनं या निर्णयाला पाठींबा दिला. त्यामुळेच पुन्हा एकदा महाराष्ट्रात सगळे चित्र बदलणार आहे. आणि तो तुमचा निर्धार सामान्य माणसाचे प्रतिनिधित्त्व करतो आहे… सामान्य माणूस शासनाच्या आजच्या सगळ्या खोट्या घोषणांना, देखाव्याला, जाहिरातबाजीला कंटाळलेला आहे.
महाराष्ट्रातला सामान्य माणूस मतदानाच्या दिवसाची वाट पाहतोय… आणि आज महाराष्ट्रातील हा अदृश्य संताप तुमच्याच नेतृत्त्वाखाली मतपेटीतून व्यक्त होणार आहे. गेली ६० वर्षे आपण दिवसाचे १८ तास महाराष्ट्रासाठी, देशासाठी काम करत आलात. आजच्या महाराष्ट्राची बांधणी करण्यात, यशवंतराव चव्हाणांपासून सगळ्यांची दूरदृष्टी उपयोगी पडलेली आहे पण आपण ही घडी उसकटू नये म्हणून, सतत विकासाच्या बाजूने उभे राहीलात. हे करीत असताना सुसंस्कृत महाराष्ट्राची जपणूक तुम्हीच केलीत त्यामुळेच संपूर्ण देशात तुमच्या नेतृत्वाबद्दल सर्वपक्षीय नेत्यांना मनस्वी आदर आहे. इतिहास याचा साक्षीदार आहे की, नऊ वर्षापूर्वी ७५ वर्षे पूर्ण करणारे आपण, असे एकमेव नेते आहात… ज्यांचा देशाच्या राजधानी दिल्लीत राष्ट्रपती, उपराषष्ट्रापती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, आठ राज्यांचे मुख्यमंत्री, देशातल्या सर्व प्रमुख विरोधी पक्षांचे नेते यांच्या उपस्थितीत अत्यंत आनंदाने सत्कार संपन्न झाला, हे भाग्य कोणाच्याही वाट्याला आलेले नाही. महाराष्ट्राची एवढीच अपेक्षा आहे की आपल्या ‘जीवेद् शरद: शतम….’ वर्षांत म्हणजे २०४० साली तोच अत्यंतिक आनंद संपूर्ण देश पुन्हा एकदा अनुभवेल.
तिथपर्यंत प्रत्येक वर्षी आपले अभिनंदन आणि आपल्या नेतृत्वाखालीच महाराष्ट्रात पुन्हा एकदा शाहू- फुले- आंबेडकरांच्या महाराष्ट्राची वैचारिक पताका फडकेल… तो दिवस दूर नाही… आणि त्याच दिवशी तुमचा खरा वाढदिवस साजरा होईल. कारण हे परिवर्तन तुमच्या अदम्य इच्छाशक्तीमुळेच घडणार आहे.