लंडन-कोलकाता-लंडन: अनोख्या बससेवेची रंजक कहाणी

(साभार: दैनिक दिव्य मराठी)

इतिहास जरा खंगाळला की अनेक अचंबित करणाऱ्या गोष्टी बाहेर येतात . अलीकडेच सोशल मीडियातील एका पोस्टने लंडन-कोलकाता-लंडन या बससेवेची माहिती समोर आली. तब्बल दहा देशांतून प्रवास करणाऱ्या या बससेवेची कहाणी खूपच रंजक आहे .
……………………………………………….

-अविनाश दुधे

सोशल मीडियाचं जग हे फुटपाथवरील रद्दीच्या खच्चून भरलेल्या दुकानासारखं असतं. त्या दुकानात कथा- कादंबऱ्यापासून चित्रपट, फॅशन, विज्ञान, अध्यात्म, कामजीवन अशा तऱ्हेतऱ्हेच्या विषयांवरील हजारो पुस्तकं कवडीमोल भावात मिळतात. ती रद्दी चाळताना खूपदा जुनी, दुर्मिळ,अनमोल पुस्तकं हाताशी लागतात. सोशल मीडियावर भटकंती करतानाही अनेकदा असंच औत्सुक्यपूर्ण, अचंबित करणारं काहीतरी सापडतं. मागील पंधरवड्यात इंग्लंडमध्ये राहणाऱ्या बंगालच्या रोहित के.दासगुप्ता या गृहस्थाने ट्विटरवर Literally just finding out about the London-Calcutta bus service which apparently existed well into the 70’s. अशी पोस्ट टाकली. पोस्टसोबत ‘लंडन ते कलकत्ता’ (आताचे कोलकाता) या मार्गावर धावणारी बस व त्या बससेवेच्या जाहिरातीचे छायाचित्रेही त्यांनी जोडली होती. काही तासांतच ही पोस्ट भारत व इंग्लंडमधील भारतीयांच्या उत्सुकतेचा विषय झाली. हजारो लोकांनी ती रिट्विट सर्वत्र पसरली . सुरुवातीला त्या पोस्टकडे ‘फेक पोस्ट ’ म्हणून पाहण्यात आले. पण, काही वेळातच प्रतिभा परमार या महिलेने, ‘या बसने मी नवी दिल्ली ते लंडन हा प्रवास केला आहे . तो प्रवास एक महिन्याचा होता. मी लवकरच त्या प्रवासाबद्दल लिहिणार आहे’ , अशी कॉमेंट केली. नॉरीसा नॉर्डहोल्ट या महिलेनेही अशा प्रकारची बससेवा होती , याला दुजोरा दिला. त्यानंतर या बससेवेबद्दल गुगल आणि इतर माध्यमांच्या सहाय्याने भरपूर शोधकाम झाले, त्यातून त्या बससेवेसंदर्भात वर्तमानपत्रातील बातम्या व इतर खूप सारी रंजक माहिती हाती आली.

अल्बर्ट टूर आणि ट्रेव्हल्स कंपनी १९५७ ते १९७३ या काळात ‘लंडन-कलकत्ता-लंडन’ अशी बससेवा चालवत असे . या बसच्या पहिल्या प्रवासाला १५ एप्रिल १९५७ ला लंडनहून सुरुवात झाली. इंग्लंड –बेल्जियम- पश्चिम जर्मनी-युगोस्लाव्हिया-बल्गेरिया- तुर्कस्थान-इराण- पाकिस्तान- भारत असा दहा देशांचा प्रवास करून ही बस ५ जूनला कोलकातात पोहचली. भारतात प्रवेश केल्यानंतर अमृतसर- दिल्ली- अलाहाबाद- वाराणसी-कलकत्ता असा या बसचा मार्ग होता. पहिल्या फेरीत लंडनहून कलकत्त्यासाठी एकूण २० प्रवासी होते. त्यापैकी ८ प्रवाशांनी याच बसचे परतीचे लंडन तिकीट घेतले होते . काही दिवस घालविल्यानंतर बस ज्या मार्गाने आली, त्याच मार्गाने २ ऑगस्टला लंडनला पोहोचली. या बसचे लंडन- कलकत्ता तिकीट हे ८५ पाउंड म्हणजे आजच्या दरानुसार अंदाजे ८,००० रुपयांच्या आसपास होते. या तिकीट खर्चात हॉटेलमधील निवास खर्च , दोन्ही वेळचे जेवण , अल्पोपहाराचा समावेश होता. बसमध्ये प्रत्येकाला झोपण्यासाठी वेगळे कम्पार्टमेंट, फॅन, हीटर, रेडिओची स्वतंत्र व्यवस्था होती. प्रवासादरम्यान वाटेत येणाऱ्या वेगवेगळ्या देशातील प्रेक्षणीय स्थळही प्रवाशांना दाखवली जात असे. भारतात ताजमहाल, दिल्लीतील राजपथ, राजघाट, गंगा नदी , वाराणसीतील मंदिरं आदी ठिकाणं दाखवली जात असे.

पहिल्यांदा ही बस भारतात आली तेव्हा कोलकात्यातील ‘स्टेट्समन’ या दैनिकाने या बसेसेवेबाबत सविस्तर बातमी प्रकाशित केली होती . ३२, ६७० किलोमीटरचा प्रवास करून बस लंडनला परत पोहचल्यानंतर ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या प्रख्यात दैनिकाच्या प्रतिनिधीने बसचा मालक, चालक आणि प्रवाशांना त्यांचे अनुभव विचारून एक सविस्तर वृतांत प्रकाशित केला होता. बसचा चालक गॉरो फिशर याने अनुभव कथन करताना, तुर्कस्थानातील हेअरपिनच्या आकाराची अतिशय अवघड वळणे, वाळवंटात बसची चाके वाळूत रुतून बसल्याने लाकडी फळ्या टाकून बस बाहेर काढण्याचा प्रकार , धुळीची वादळं, मुसळधार पाऊस, याशिवाय भारतातील अतिशय अरुंद रस्ते व मोठ्या प्रमाणात असलेल्या सायकलस्वारांमुळे ड्रायव्हिंग करतांना खूप काळजी घ्यावी लागायची, असे सांगितले. बसचा लंडन- कलकत्ता हा प्रवास सुरु असताना बसमधील सर्व प्रवाशांना इराण- पाकिस्तानदरम्यान लुटारूंनी मारून टाकले, अशी बातमी लंडनमध्ये पसरली होती . त्यावेळी संपर्काची साधने मर्यादित असल्याने काहीच कळायला मार्ग नव्हता . दोन दिवसानंतर ती बातमी अफवा असल्याचे स्पष्ट होताच सर्वांचा जीव भांड्यात पडला.

लंडन-कलकत्ता-लंडन ही बससेवा १९७३ पर्यंत चालली . वर्षातून या बसच्या तीन फेऱ्या होत असे . १९७३ मध्ये या बसचे लंडन- कलकत्ता तिकीट १४५ पाउंड (१३ हजार ६५० रुपयाच्या आसपास) होते. भारत- पाकिस्तान यांच्यात तणाव असला आणि तो प्रवास रस्तामार्गे करणे शक्य नसल्यास प्रवाशांना हवाईमार्गे दिल्ली वा तेहरानमध्ये पोहचवले जाईल, त्यासाठी २६ पाउंड अतिरिक्त आकारले जातील, अशी सूचना बससेवेच्या जाहिरात ब्रोशरमध्ये असायची. सुरूवातीची काही वर्ष कलकत्त्याहून ही बस ब्रह्मदेश- थायलंड- मलेशिया- सिंगापूरमार्गे पुढे ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरापर्यंत प्रवास करायची . The World’s longest Bus Route अशी त्याची जाहिरात केली जात असे. मात्र काही काळानंतर कोलकाता ते ऑस्ट्रेलियातील पर्थ या शहरापर्यंत या बसचा प्रवास जलमार्गाने व्हायचा . पर्थ बंदरावर जहाजातून बाहेर पडल्यावर पुन्हा रस्तामार्गे बस सिडनीला जात असे. कालांतराने लंडन-सिडनी ही बससेवा बंद करण्यात आली. लंडन-कलकत्ता -लंडन बससेवा मात्र १६ वर्ष चालली.

(लेखक ‘मीडिया वॉच’ अनियतकालिक व वेब पोर्टल चे संपादक आहेत.)
8888744796

Previous articleकोरोना व्हॅक्सिन खरंच लवकर येणार?
Next articleजामताडाका फोन कॉल…आदमी को कंगाल बना देता है!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.