लाईफपार्टनर – एकटेपण – पजेसिव्हनेस – मल्टिपार्टनर !

लेखक – मंगेश सपकाळ , मेलबोर्न ऑस्ट्रेलिया

लहानपणापासून कळत-नकळत आपल्यावर एका गोष्टीचं ब्रेनवॉशिंग चालू असतं. शिकायचं, नोकरी करायची, पार्टनर शोधायचा, लग्न करायचं आणि अंडी जन्माला घालून त्यांच्या संगोपपणात आयुष्य घालवायचं. आपल्या मेंदूत हा जगण्याचा एक रट्टा फिट करून दिलेला असतो. मग कधीतरी आपण वयात येतो, नोकरी धंदा सुरु करतो आणि मग सुरु होतो ‘लग्न’ नावाचा खेळ. जसं एखादा उपग्रह, ग्रहाभोवती चकरा मारत असतो, जवळ जात असतो आणि हळूहळू तो ग्रहावर आदळतो, विलीन होतो, तसं लग्न नावाच्या उपग्रहामुळे, त्याच्या गुरुत्वाकर्षणाने आपल्या लग्नाभोवतीच्या फेऱ्या चालू होतात. घरचे-बाहेरचे-आपले-परके सगळ्यांचं एकच रडगाणं असतं – ‘लग्न कधी करणार ?’.

आपण आपल्या पार्टनरच्या कल्पना रंगवतो. ‘आपला पार्टनर कसा असावा’, याचा बेसिक आराखडा आपण तयार करतो. पार्टनर मनाने चांगला असावा, स्वतःच्या पायावर उभा असावा, रोगराई नसलेला असावा, माणुसकी जाणणारा असावा आणि अमकं-तमकं…. डालडा-लसूण.. बरंच काही. लाखो लोक, लाखो कल्पना.

पण का ?
लाईफ पार्टनरची गरज का असते ?
भाऊ-बहीण-आई-वडील नाही का चालणार ?
नाहीच.
कारण पुढे फॅमिली पण वाढवायचेय ?
पण फॅमिली का वाढवायचेय ?
ते माहित नाही.
कदाचित एकटेपण असेल ?

या एकटेपणावर मात करण्यासाठी आपल्याला ‘कोण ना कोण’ बाळगावं लागतं. आणि या ‘कोण ना कोणला’ इम्पॉर्टन्स देण्यासाठी आपला ‘ऍडजस्टमेन्ट’ नावाचा खेळ सुरु होतो. नवऱ्याने-बायकोबरोबर, बायकोने-नवऱ्याबरोबर, पालकांनी-पाल्यांबरोबर…. आयुष्य साला ऍडजस्टमेंट करतच निघून जातं. ही ऍडजस्टमेंट म्हणजेच ‘कुछ पाने के लिये कुछ खोना पडता’…. इथे ‘पाना’ म्हणजे कदाचित एकटेपणावर मात आणि काही मूठभर सुखं. आणि खोना म्हणजे – ते मग अगदी काहीही असू शकतं. अगदी सुख-चैन देखील.

दोघांच्या आवडी-निवडी, दोघांची तत्त्वं, दोघांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन जवळपास सारखाच असणारा, आपल्या कल्पनेत बसणारा पार्टनर मिळणं सर्वात RARE गोष्ट होऊन जाते.
ऍडजस्टमेन्ट जोपर्यंत नकळत होते, तोपर्यंत ती ऍडजस्टमेंट वाटत नाही. पण जेव्हा आपल्या बेसिक तत्त्वांवरच ‘ऍडजस्ट’ कारयची वेळ येते, तेव्हा मग त्या फॅमिली नावाच्या संकल्पनेला तडे जाऊ लागतात.

काही लोक ‘समाज काय म्हणेल’ या भीतीने संसाराचा गाडा पुढे ढकलतात.
तर काही लोकांना एकटेपण नको म्हणून आहे तसं रडगाणं चालू ठेवतात.

——————-

हल्ली हल्ली तर मला असं वाटू लागलंय, की जर एकटेपणा लोकांना येवढाच खटकत असेल, तर लोकं २-३-४ पार्टनर का नाही ठेवत ? एकच का ?
कदाचित एकाबरोबर ऍडजस्ट होता होता नाकी नौ येतात., मग येवढ्या लोकांबरोबर अवघडच आहे. पण इथे नुसतं ऍडजस्टमेन्टचा मुद्दा नाही. मुद्दा आहे ‘भावनिक गोंधळाचा’, मुद्दा आहे ‘पजेसिव्ह’ सारख्या अतिशय तद्दन फालतू भावनेचा. मुद्दा आहे समाजाने लादून दिलेल्या नियमांचा.
कारण लोकांनी पझेसिव्हला प्रेमाचं नाव दिलंय. येवढंच कशाला, काही लोकांना ‘कोणी आपल्याबद्दल पजेसिव्ह नसणं’, हे देखील त्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेम नसल्यासारखं वाटतं.

मला तर वाटतं,
‘पजेसिव्ह’पणा सोडून जे काही उरतं ते “खरं प्रेम”.
असं प्रेम निर्माण करता यायला हवं, मिळवता यायला हवं… तर मजा आयुष्याची.
असं प्रेम करताही यायला हवं कुणावर… तर आयुष्याचं सार्थक.

कोणाची ओढ निर्माण होणं, कोणीतरी हवंहवंसं वाटणं हे सगळं ठीक आहे, पण आपली व्यक्ती फक्त आणि फक्त आपली असावी, हा विचार मला फारच ‘लाचार’ करणारा आणि दुबळा वाटतो. येवढं का आपण Insecure व्हावं ? समोरच्याच्या आयुष्यात आपण येवढं का आपण गुंतून राहावं ? एवढी किंमत आपण सोडून कोणाला असावी, हा कमीपणा वाटतो मला.
त्याचं कारण कदाचित असंही असेल, की प्रत्येकजण तेवढा विचारांनी पक्का आणि स्ट्रॉंग नसतो. पण मग तेवढं स्ट्रॉंग आपण स्वतःला करता यायला हवं.

कोणी म्हणतं, ‘पझेसिव्हनेस’ संपला, तर कदाचित ‘फॅमिली सिस्टमही’ संपेल.
आणि मला उलट वाटतं, ‘पझेसिव्हनेस’ संपेल, तेव्हा स्वतःमधला “मी” ‘बहरेल’, त्याची बौद्धिक वाढ होईल.

हेही असू शकेल,
ज्या व्यक्तीला ‘एकटेपण’ वाटणार नाही,
जी व्यक्ती ‘एकटेपणाला’ पुरून उरणार,
त्या व्यक्तीला ‘पझेसिव्हनेस’ वगैरे प्रकार नेहमीच चुतियाप्पा वाटणार ….. कदाचित …

—————-

असो, पण
काहीही झालं तरी ‘सुखाच्या व्याख्या संकुचित नसायला हव्यात’.

तरी बौद्धिक रवंथ करण्यासाठी, काही प्रश्न इथे विचारावेसे वाटतात प्रत्येकाला.
(समाजाचा विचार, कायद्याचा विचार बाजूला ठेऊ… )

तुम्हाला पॉली लाईफ (मल्टीपार्टनर लाईफ) आवडलं असतं का ?
मल्टीपार्टनर लाईफकडे बघण्याचा काय दृष्टीकोण आहे तुमचा ?
मल्टिपार्टनर असण्याचे तोटे काय असतील, असं तुम्हाला वाटतं ?

म्हणजे कल्पना करून पाहा, की तुम्ही २-३ पार्टनर बरोबर राहत आहात. ते तुम्हाला सुखावणारं वाटतंय की काही वेगळं ?

नक्की पहा -One woman has several husbands in Indian village-  https://www.youtube.com/watch?v=VVcT-Cy83uI

(लेखक उपहास , वक्रोक्ती व विनोदी पद्धतीने अनेक विषयांचा परखड वेध घेतात. लेखक स्वतःचा परिचय अतिशय हट्टी , अतिशय निर्बुद्ध , अतिशय अश्लील , अतिशय दुराचारी-अविचारी , अतिशय उद्धट …. वगैरे वगैरे..असा देतात   )

Previous articleदयार, दिशा आणि तिचे सूर्य
Next articleलग्न
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here