लाजिरवाणे, संतापजनक!

टताहेत अशी भाषा केली की, माणसं कापरासारखी पेटायला लागतात. अशा गर्दीसमोर काल्पनिक शत्रू उभे केलेत की सारासार विचार न करता ही माणसं मेंढरं बनून वाटेल त्याच्यामागे जातात.
……………………………………………………
परवा नाशिकात जे घडलं ते लाजिरवाणं होतं.bhujbal-nashik-rally-759 विषण्ण करणारं होतं. एका भ्रष्ट नेत्याच्या सर्मथनार्थ लाखो लोक रस्त्यावर येतात आणि त्या एकत्रीकरणाला ओबीसी अस्मितेचं रूप देण्याचा प्रयत्न होतो, हे कमालीचं संतापजनक होतं. माध्यमांनी छगन भुजबळांची पाठराखण करण्यासाठी काढण्यात आलेल्या त्या तथाकथित ओबीसी मोर्चाचे खरे स्वरूप उघडकीस आणल्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याची सारवासारव आयोजक करताहेत. मात्र केवळ आणि केवळ भुजबळांच्या सर्मथनासाठीच हा मोर्चा होता, हे आता लपून राहिलेलं नाही. नाशिकात मोर्चाची माहिती देणारे पोस्टर्स, बॅनर्स, मोर्चकर्‍यांच्या हातातील फलकं, डोक्यावरील ‘मी भुजबळ’च्या टोप्या पाहता ओबीसींच्या हक्कांपेक्षा भुजबळांच्या तुरुंगवासाची आयोजकांना अधिक चिंता आहे, हे स्पष्ट झालं आहे. या मोर्चाच्या माध्यमातून छगन भुजबळ म्हणजे जणू ओबीसींचे मुक्तिदाता आहेत. ते ओबीसी आहेत म्हणून त्यांच्यावर अन्याय झाला आहे. ते ओबीसींसाठी झगडतात म्हणून सरकारने त्यांना जाणीवपूर्वक तुरुंगात टाकले आहे, असं वातावरण निर्माण करण्याचा जो प्रयत्न झाला त्याला हरामखोरी याशिवाय दुसरा शब्द नाही. भुजबळ हे काय लायकीचे नेते आहेत हे गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्राने पाहिले आहे. भुजबळांनी सत्तेचा वापर करून जमविलेली अब्जावधी रुपयांची संपत्ती, ठिकठिकाणी असलेलं राजप्रसादासारखे बंगले, दागिने, महागड्या पुरातन वस्तू हे सगळं घबाड सरकारी तपास यंत्रणांनी बाहेर आणलं आहे. असं असतानाही भुजबळांसाठी जेव्हा गळे काढले जातात तेव्हा ती माणसं लबाड आहेत. बनेल आहेत, हे समजून घेतलं पाहिजे. काही महिन्यांपूर्वी एकनाथ खडसेंनाही जेव्हा वेगवेगळ्या गैरव्यवहारांमुळे राजीनामा द्यावा लागला तेव्हा बहुजन असल्यामुळेच त्यांच्यावर ही वेळ आली. बहुजन नेतृत्वाचं खच्चीकरण करण्याचा हा प्रकार आहे, असे आरोप झाले होते. स्वत:ला बहुजनांचे, ओबीसींचे नेते म्हणविणार्‍यांना आपली नालायकी उघड झाल्यावर बचावासाठी ‘जात’ आठवते हा मोठा विनोद आहे. माणूस बहुजन असला म्हणजे त्याने काहीही केलं तरी त्याकडे दुर्लक्ष केलं जावं, अशी त्यांची समजूत दिसते. भुजबळांनी ज्या पद्धतीने लांड्यालबाड्या करून अर्मयाद संपत्ती जमविली, अनेक बेकायदेशीर प्रकार केलेत. आपल्याच कुटुंबातील सदस्यांना सत्तेचा लाभ दिलात, पदं दिलीत. ती ओबीसी असल्यामुळे सर्मथनीय ठरतात का? याचे उत्तर त्यांचा उमाळा येणार्‍यांनी दिली पाहिजेत. फुले-शाहू-आंबेडकरांची नावं घेतली, त्यांच्या नावाने दोनचार स्मारकं उभारलीत की कुठलीही पापं करायला आपण मोकळे अशी जर बहुजन, ओबीसी नेत्यांची समजूत असेल तर त्या समाजानेच त्यांची डोकी जाग्यावर आणण्याची गरज आहे.

नाशिकला देशाच्या वेगवेगळ्या प्रांतातून आणि राज्याच्या कानाकोपर्‍यातून एकत्रित आलेले ओबीसी स्वयंस्फूर्तीने आल्याचे सांगण्यात येत आहे. ते खरेही असेल. मात्र त्या मोर्चातील लाखोंच्या गर्दीला आपला उपयोग एका भ्रष्ट नेत्याची वकिली करण्यासाठी होत आहे, याची नाशिकात येईपर्यंत माहिती असेलच, असे नाही. आता मोर्चा आटोपल्यानंतर आम्ही ओबीसी आरक्षण बचावासाठी तिथे गेलो होतो. भुजबळांसोबत आम्हाला काही देणेघेणे नाही, असे अनेक मोर्चेकरी सांगताहेत. याचाच अर्थ मोर्चाच्या आयोजकांनी ओबीसींच्या अस्मितेला हात घालून गर्दी जमविली आणि त्याचा उपयोग दुसर्‍याच कारणासाठी केला. अर्थात, भुजबळांच्या अंधप्रेमातून जमा झालेली गर्दीही तिथे मोठय़ा प्रमाणात होती. अशा गर्दीला विचार नसतोच. आपला समाज हा तसाही व्यक्तिपूजक आहे. त्याच्यासमोर काल्पनिक शत्रू उभे करून तुझ्यासमोरच्या समस्यांसाठी अमुकअमुक कारणीभूत आहे. त्यांनी मुद्दामहून आपल्या माणसावर अन्याय केला आहे, असा बागुलबुवा उभा केला की सारासार विचार न करता माणसं मेंढरासारखी वागतात, याची असंख्य उदाहरणं प्रत्येक समाजात, प्रत्येक धर्मात पाहायला मिळतात. या अशा चेहरा नसलेल्या गर्दीच्या भावनांना हात घालणं खूप सोपं असतं. अमुक एका समाजाच्या वर्चस्वामुळे तुमच्यावर अन्याय होतो किंवा तुमच्या हक्काचं ते लाटताहेत अशी भाषा केली की, माणसं कापरासारखी पेटायला लागतात. भारतीयांच्या व्यक्तिपूजेच्या प्रवृत्तीबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी फार आधी सावध केलं होतं. मात्र आपल्यात काहीही सुधारणा नाही. इंदिरा गांधीपासून नरेंद्र मोदींपर्यंत, जयललितांपासून शरद पवारांपर्यंत आणि सत्यसाईबाबांपासून आसारामबापूंपर्यंत अतिरेकी व्यक्तिस्तोमाची उदाहरणं आपण पाहिली आहेत. त्याला छगन भुजबळांचे सर्मथक अपवाद ठरण्याचं कारण नाही. बाकी नाशिकचा मोर्चा हा भुजबळांचे सर्मथन करण्यासोबतच मराठय़ांच्या एकापाठोपाठ निघत असलेल्या मोर्चांना उत्तर देण्याच्या प्रयत्नाचाही एक भाग होता. मात्र हा मोर्चा ओबीसींच्या मागण्यांपेक्षा भुजबळांची पाठराखण करण्यासाठीच जास्त गाजला. त्यामुळे मराठा मोर्चांना शह देण्याचा पहिला प्रयत्न तरी परिणामकारक झाला नाही. मात्र पडद्याआड आता ओबीसींची मोट अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नांना वेग आल्याचे दिसत आहे. मराठा मोर्चे सुरू झाल्यानंतर छगन भुजबळांना तब्येतीच्या कारणामुळे का होईना तुरुंगातून रुग्णालयात हलविणे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना एकाएकी कौटुंबिक स्नेहसंबंधांची आठवण येऊन त्यांचं भुजबळांना भेटायला जाणे, त्यानंतर तडकाफडकी हा मोर्चा निघणे हा संपूर्ण घटनाक्रम वरकरणी जेवढा सरळसाधा दिसतो तेवढा निश्‍चित नाही. या घटनाक्रमात सरकारचा, मुख्यमंत्र्यांचा काही सहभाग आहे का, हे तपासणे रंजक ठरणार आहे.

(लेखक हे ‘पुण्य नगरी’च्या अमरावती-अकोला आवृत्तीचे संपादक आहेत.)

Previous articleसरकारसोबत चर्चा केलीच पाहिजे!
Next articleपुरुष असाही! पुरुष तसाही!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here