विमानाने निघाले होते. पण रेल्वेतून ग्रुपने जाण्याची मजा वेगळीच होती.निसर्गरम्य परिसरातून प्रवास करता येतो. सकाळी 7.30 ला गोदावरी ओलांडली त्यानंतर 2-3 तास जी विस्तीर्ण भात शेती पाहायला मिळाली ते दृश्य अप्रतिमच . पूर्वी कोकणात खाचराची भात शेती व शिमोग्याची सपाटीवरची वेगवेगळ्या रूपातील भात शेती पाहिली होती. पण इतकी विस्तीर्ण आणि नजर पोहाचेपर्यंत सपाट क्षेत्रावरील भात शेती प्रथमच पाहत होतो . सुगी जवळ आल्याने जणू काही सोनेरी रंगच दूरवर पसरलाय असे वाटत होते . हे दृश्य पाहिल्यावर रेल्वेने पोहाचायला जास्त वेळ लागला तरी त्याचे काही वाटले नाही. विशाखापट्टणमला सकाळी 11.30 च्या दरम्यान पोहोचलो. आम्ही ठरवलेली मिनी बस आम्हाला घेण्यासाठीआली होती. रेल्वे स्टेशन पासूनच शहर स्वच्छता प्रेमी असल्याचे जाणवू लागले होते. गूगल वर माहिती सर्च केली तर ते भारतातील 9 व्या क्रमांकाचे स्वच्छ शहर आहे ही माहिती मिळाली. दोन दिवस विशाखापट्टणम पाहून आम्ही ओरिसाला निघणार होतो. दोन दिवसांत भरपूर पहायचे होते.
भीमीली बीच आणि टेकडी हा बीच विशाखापट्टणम पासून 23 किमी वर आहे, भीमीली बीच हा जेथे गोस्थानी नदी समुद्राला मिळते तेथे आहे, येथे बीच वर बुद्धाच्या चेहऱ्याचे भव्य शिल्प आहे. या भागात उत्खननात पुरातन बुद्ध धम्माच्या तेथील अस्तित्वाचे अवशेष मिळाले आहेत. हा भाग आधी भूमिनीपट्टणम या नावाने ओळखला जात होता , हे नाव महाभारतातील भीम या प्रसिद्ध व्यक्तिमत्वावरून पडले असे म्हणतात . हा प्रदेश भीमाच्या अधिपत्याखाली होता असे म्हटले जाते.प्राचीन काळापासून येथे व्यापारी बंदर ही होते. इंग्रज व डच व्यापार याचा बंदरातून चालत होता .1754 मध्ये नागपूरकर रघुजी भोसले यांच्या भास्करराम या सेनाधिकाऱ्याच्या सैन्याने भूमिनीपट्टणम वर हल्ला केला होता . त्यानंतर डचांनी येथील गढी मजबूत केली होती . येथली टेकडीची माती आणि समुद्रकिनाऱ्याची वाळूची पुळण ही लाल रंगाची आहे व ती भारतीय जिओलॉजीकल हेरिटेज मध्ये मोडते . ऋषिकोंडा बीच हा विशाखा पट्टणम मधील व आंध्र किनारपट्टीवरील सगळ्यात प्रसिद्ध व लोकप्रिय बीच. येथे खूपच गर्दी असते. सुंदर सोनेरी वाळूच्या पुळणीचा किनारा असून वॅाटरस्पोर्ट्स अँक्टिविटी ही येथे भरपूर चालतात. येथे बरेच हॉटेल्स असून स्थानिक मासे ही चांगले मिळतात.
कुरसुरा पाणबुडी म्युझियम समोरच एअरक्राफ्ट म्युझियम आहे. विशाखापट्टणम शहर विकास प्राधिकरणाने सुमारे १४ कोटी रुपये खर्च करून हे अनोखे संग्रहालय तयार केले आहे. या संग्रहालयात तुम्ही टी यू १४२ या विमानाच्या आत जाऊनही पाहू शकता. या संग्रहालयात बऱ्याच गॅलरी आहेत, जिथे प्रतिकृतींच्या सहाय्याने भारतीय हवाई दलाचे कार्य अधोरेखित करण्यात आले आहे. नागरिकांना खास करून मुलांना हे म्युझियम आकर्षित करते.