संजय वानखडे नावाचा कस्तुरीमृग

-अविनाश दुधे

संजय वानखडे हा माणूस विदर्भातील एक मोठी बँक असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन बँकेचा दोनदा अध्यक्ष होता . ही त्याची लौकिक ओळख . प्रत्यक्षात त्याला ओळखणारी माणसं, कोणत्याही अर्थाने बँकेचा अध्यक्ष वा नेता म्हणून त्याला ओळखत नव्हते . अमरावतीच्या सामाजिक , राजकीय , सहकार, क्रीडा , बँकिंग , शिक्षण , समाजसेवा अशा क्षेत्रात सर्वत्र संचार असलेल्या या माणसाची ओळख शेवटपर्यंत माणसं जोडणारा कार्यकर्ता अशीच होती . हाती घेतलेल्या कामात १०० टक्के झोकून देणारा , ते काम पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान करणारा , एकेक माणूस मुंगीच्या चिकाटीने जोडणारा, अकृत्रिम जिव्हाळा आणि प्रेमाने शेकडो माणसं बांधून ठेवणारा अवलिया, हीच संजय वानखडेची ओळख होती .

अतिशय निगर्वी ,कमालीचा विनम्र, विलक्षण संकोची असणारा हा माणूस प्रत्येकासोबत सौजन्यानेच वागायचा. ही वागणूकच त्याची खासियत होती .लहानथोर कोणीही असो हा सारख्याच आदराने वागणारं . वयाने मोठ्या असणाऱ्यांना वाकून नमस्कार करणार, पण अगदी १६ वर्षाच्या मुलालाही ‘भाऊ’ संबोधनाशिवाय बोलणार नाही. दादा , भाऊ, अण्णा , साहेब , ताई , वहिनी असेच याचे  प्रत्येकासोबत कौटुंबिक बंध. बँकेचा अध्यक्ष झाल्यावरही त्याच्या या वागण्यात काहीच फरक नव्हता. बरं हा साधेपणा, विनयता मुद्दामहून पांघरलेलं सोंग होतं, असं अजिबात नव्हतं.  व्यक्तिमत्वाचा अंगभूत भाग असावा इतकं साधेपण याला सहज चिपकलेलं होतं .

त्याचा हा साधेपणा , कुठलाही मोठेपणा मिरवायचा नाही , श्रेय घेण्याची धडपड करायची नाही… या गुणांमुळेच संजय वानखडे हा माणूस किती ‘उंच’ आणि ‘खोल’ होता , हे अनेकांना कळलंच नाही . अगदी २४ तास त्याच्यासोबत राहणाऱ्या त्याच्या जिवलगांनाही नाही . अनेकजण त्याला कायमच गृहीतच धरत गेलेत .अंडर इस्टीमेट करत गेले. खरं तर हा मोठ्या कुटुंबातला. घरी भरपूर शेती . हा व्यवसायाने अध्यापक . पाच आकडी पगार . नंतरच्या काळात बँकेचा दोनदा अध्यक्ष. राजकीय , सामजिक , शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांसोबत उठबस . पण याने त्याचे कधीही भांडवल केले नाही . चिमूटभरही गुणवत्ता नसलेली माणसं आपल्या सुमारपणाचे प्रदर्शन करत सर्वत्र मिरवतात . हा मात्र गुणवत्तेचं भरभक्कम भांडवलं असतानाही पडद्याआडच राहिला . कायम मागे राहून सतरंज्या उचलणाऱ्या , टेबल खुर्च्या लावणाऱ्या कार्यकर्त्याच्या भूमिकेतच हा अधिक रमत असे . अनेक विषयांची सखोल माहिती असतानाही प्रत्येक ठिकाणी स्टेज आणि माईकपासून हा ठरवून दूर राहायचा . त्यामुळे त्याचं मोठेपण झगमगाटी दुनियेला कळणे शक्यच नव्हते .

याचं वर्तुळ खूप मोठं . त्यात आणखी खूप सारे वर्तुळ .अंबापेठ क्रीडा मंडळ , पंजाबराव बँक , शिवाजी शिक्षण संस्था , आम्ही सारे फाऊंडेशन आणि आणखीही खूप काही . यातील एका वर्तुळाला माहीत असणारा संजय वानखडे दुसऱ्याला माहीत नसायचा . अंबापेठ क्रीडा मंडळाला त्याच्यातील कुशल खेळाडू तेवढाच माहीत . बँकिंग क्षेत्रातील मंडळी केवळ त्याची शिस्त आणि प्रामाणिकपणा याच्याशी परिचित . राजकीय क्षेत्रातील जगदीश गुप्ता , संजय खोडके , विलास इंगोले , मिलिंद चिमोटे यांना चिकाटीने, मेहनतीने काम करणारा ‘संजू’ एवढंच माहीत. ‘आम्ही सारे’ च्या कार्यकर्त्यांना त्याचं भरपूर वाचन , प्रत्येक क्षेत्रात असलेल्या प्रचंड ओळखीचं कौतुक . पण बाकी क्षेत्रातील त्याच्या कर्तृत्वाशी तेही अनभिज्ञच .

खरं तर हा कस्तुरी मृगच . याच्यातील कस्तुरीचा सुगंध याने कायम लपून ठेवला . जगासमोर येवूच दिला नाही . व्हॉलीबॉल , बॉस्केटबॉल, खो-खो राष्ट्रीय राज्यस्तरावर खेळलेला हा खेळाडू, क्रिकेटही तेवढंच उत्तम खेळायचा . प्रत्येक खेळाचे नियम व तांत्रिक माहितीही सखोल . फुटबॉलचं तर प्रचंड वेड . वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धा सुरु झाली की याला ‘फुटबॉल फिव्हर’ चढायचा . गेल्या वर्ल्ड कपदरम्यान त्याने कोणते चार संघ सेमी फायनलला येतील आणि अंतिम सामना कोण जिंकेल , याचं केलेलं भाकीत तंतोतंत खरं ठरलं होतं .  बँकिंग क्षेत्रातील त्याचं ज्ञान कुठल्याही अर्थतज्ञाला चकित करणारं होतं . सहकारातले बारकावे याच्याइतके फारच कमी लोकांना माहीत . विविध खटल्यांच्या निमित्ताने कोर्टाच्या अनेक वाऱ्या केल्या असल्याने  त्या व्यवसायातील माहितीही थक्क करणारीच .

त्याचं वाचनप्रेम हा तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे . घरी, बाहेर, प्रवासात पुस्तकं कायम त्याच्या सोबतीला असायची . अनेकदा पहाटेपर्यंत वाचन केल्यानंतर पोटावर पुस्तक ठेवलेल्या अवस्थेत हा झोपी जायचा . दोन –तीन तास झोप घेतली की हा सकाळी ७ च्या ठोक्याला कॉलेजला शिकवायला पळायचा . तिथेही कधी एक मिनिट उशीर नाही. .शिकविण्याचं आपलं काम चोखपणे करणार . याची वाचनाची रेंज प्रचंड. . इतिहासापासून मानसशास्त्रापर्यंत, तत्वज्ञानापासून अर्थकारणापर्यंत . मराठा राजवटींचा इतिहासापासून मुस्लीम मानसिकतेपर्यंत आणि अगदी अल्बर्ट एलीसच्या विवेकवादी मानसोपचार पद्धतीपर्यंत .  हे वाचन तो स्वतःत जिरवायचा. मात्र इथेही तेच . हे वाचन , त्यातून मिळालेलं ज्ञान तो कधी मिरवायचा नाही. ‘आम्ही सारे’ त अनेकदा सखोल वैचारिक चर्चा होत , पण हा क्वचितच आपलं मत व्यक्त करायचा . फारच आग्रह झाला तर दोन –चार वाक्यातून आपली खोली जाणवून द्यायचा .

संजय वानखडेच्या व्यक्तित्वाचे असे खूप सारे माहीत नसलेले पैलू आहेत . त्याच्या व्यक्तित्वातील एक वैशिट्य फारच कमी लोकांना माहीत होते . त्याची ओळख सर्वांना सौजन्यमूर्ती अशीच होती .  पण त्याच्या व्यक्तिमत्वातला धुमसणारा अंगार ज्याला कळला… त्यालाच संजय वानखडे थोडाफार समजत होता . हा माणूस कोणाच्या भानगडीत कधीच डोकं खुपसायचा नाही , पण कारण नसताना त्याला कोणी डीवचलं , त्याच्या आत्मसन्मानाला धक्का दिला की मात्र शेंडीला गाठ पाडल्याप्रमाणे हा मनाशी गाठ बांधून हिशेब चुकते करायच्या मागे लागायचा . एकदा ठरलं की  समोरची माणसं किती ताकदवर आहेत़़ वगैरे विचार तो नाही करायचा. मुंगीच्या चिकाटीने पण आतून ज्वालामुखीसारखा उसळून हा संघर्षाच्या तयारीला लागायचा . त्याच्यातील त्या उफाळत्या ज्वालामुखीचा वरुन काहीच पता लागायचा नाही . पृष्ठभागावर सारं काही शांत असायचं . मात्र त्याचे परिणाम समोर आलेत की संजय वानखडेची  ‘धग’ कळायची . पंजाबराव बँकेत दोनवेळा त्याने आपल्यातील हा सुप्त अंगार दाखवून दिला . ज्या बँकेत सुरुवातीच्या काळात नोकरी केली , तेथील सत्ताधाऱ्यांनी खोटे आळ लावून न्यायालयीन खटल्यांचं झेंगट लावल्यानंतर त्याने ज्या ज्या चिकाटीने , संघर्षाने प्रस्थापितांना उलथावून लावले तो एक इतिहास आहे . त्यासाठी त्याने तेव्हा जी अफाट मेहनत घेतली होती, तो निव्वळ कौतुकाचाच नाही अभ्यासाचाही विषय आहे . ‘रक्त आटविणे’ वगैरे जे शब्दप्रयोग केले जातात ते संजय वानखडेसारख्या माणसांच्या मेहनतीवरूनच रूढ झाले असावेत .

पहिल्या निवडणुकीत ज्या सहकाऱ्यांना  सोबत घेऊन प्रस्थापितांना झोपविलं होतं, तेच सहकारी सत्तारुढ होताच तडजोडीची भाषा करतात़. हेकेखोरपणाचा आरोप करुन त्यालाच निर्णय प्रक्रियेतून बाजूला सारतात, हे पाहून याने चार वर्षांपूर्वी दुसऱ्यांदा  आरपारच्या लढाईचा निर्णय घेतला होता़. याच्यासारखी माणसं जेवढी लोभस आणि विनम्र असतात तेवढेच बिथरले की ते सारं काही उलथून टाकतात. हे त्याच्या एकेकाळच्या सहकाऱ्यांना  पहिल्या निवडणुकीत सोबत असूनही कळलं नव्हतं,  ही आश्चर्याचीच गोष्ट होती . संजय वानखडे हा अव्यवहारी आहे, खूपच काटेकोर आहे, असा आरोप करुन सत्तेत मशगूल असलेल्यांना वानखडेंचं धुमसणं काय उलथापालथ करु शकते, हे लक्षातच आलं नाही़.  अफाट जिद्द, परिश्रम आणि चिकाटी़ या भांडवलाच्या जोरावर याने २०१० सारखीच लढाई लढली . यशाचा जुना फॉर्मुला त्याला माहीत होताच़. जुने सहकारी सत्तेत मशगूल असतानाच याने तब्बल १५-२० हजार नवीन सदस्य नोंदविले़. मागील निवडणुकीप्रमाणेच  दुचाकीवरुन एकेक घर पालथं घालायला याने सुरुवात केली. निवडणूक हा केवळ शह-काटशह आणि पैशाचा खेळ नसतो, तर एकेक माणूस आपलंस करण्यालाही यात सर्वाधिक महत्व असतं, हे याच्याएवढं कोणालाच माहीत नव्हतं.

२० हजारापेक्षा जास्त सदस्यांना हा माणूस व्यकितश: जाऊन भेटून आला़. नमस्कार करुन त्यांचे आशिर्वाद घेऊन आला़. अनेकांकडे तर हा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा  गेला़. मेहनत करावी तर किती करावी़? सहा महिने बिनपगारी सुट्टी घेऊन वणवण पायाला भिंगरी लावल्यासारखं वेडपिसं होऊन हा फिरला़. सकाळी ६ ते रात्री कितीही़.  त्याचा तब्येतीवर परिणाम झाला नसता तरच नवल. एक दिवस प्रचारादरम्यान  प्रचंड थकवा व पोटात काही नसल्याने चक्कर येऊन हा मोटरसायकलवरुन खाली पडला़. मेंदूत ब्लड क्लॉट निघाला़.  काही तास हा पॅरलिटीक होऊन दृष्टी, वाचा जाते की काय, अशी स्थिती होती़. डॉक्टर म्हणाले, मरणाच्या तावडीतून थोडक्यात वाचला़. काही मिनिटं उशीर झाला असता तर खेळ खलास होता. जवळची सारी माणसं धास्तावली़. जबरदस्तीने याला कसंतरी १५-२० दिवस झोपविलं. पण हा कसला मानतो़? कशीबशी विश्रांती घेऊन पुन्हा भिडला़. पुन्हा वणवण फिरला. लागला़. एकेक गाव, शहर, मतदार पिंजून काढायला लागला़. कागदावरचं प्लॉनिंगही तेवढंच चोख़. एवढं सारे काही केल्यावर तेव्हा तो जिंकला नसता तरच नवल होतं! संजय वानखडे नावाच्या माणसाने २०१० नंतर २०१५ मध्येही  पुन्हा एकदा आपल्यातील ‘मटेरियल’ जगाला दाखवून दिलं होतं.

लागोपाठ दुसऱ्यांदा दैदिप्यमान यश मिळाल्यानंतर हा मात्र शांत नव्हता. याला आता वेध लागले होते ते पंजाबराव बँकेला राज्यातील अव्वल बँक बनवायचे . त्यादृष्टीने वाटचालही सुरु झाली . पुन्हा एकदा १८-१८ तास काम सुरु झालं. सगळ काही ठीक असताना, भरारी घेण्याची तयारी असताना कोणी कल्पनाही करणारं नाही असं आक्रीत घडलं .एका कर्जदाराने बँकेच्या केलेल्या फसवणुकीसाठी स्वतःला जबाबदार धरत याने स्वतःची जीवनयात्रा नाहक संपविली . ज्या संजय वानखडेच्या प्रामाणिकपणावर त्याच्या विरोधकांनाही शंका नव्हती . तो स्वतःलाच माफ करू इच्छित नव्हता. आयुष्यभर जपलेली उच्च नैतिक मूल्य त्याच्यासाठी स्वतःच्या आयुष्यापेक्षा मौल्यवान होती . मूल्य , नैतिकता या गोष्टी केवळ पुस्तकात उरल्या असताना हे जग सोडतानाही सार्वजनिक जीवनातल्या आदर्शाचा एक नवीन अध्याय लिहून तो गेला .

(लेखक ‘मीडिया वॉच’ नियतकालिक, दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक आहेत)

8888744796

हेही नक्की वाचा –

संजय वानखडे: सार्वजनिक जीवनातल्या आदर्शाचा नवीन अध्यायhttps://bit.ly/3iMuVwS

प्रिय संजुभाऊ …. http://bit.ly/2m527ak

Previous articleउपयोगशून्य स्वामी
Next articleबुध्दीमत्ता+कृत्रिम बुध्दीमत्ता = भविष्यकाळ
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.