श्रीकांत पटवर्धन
सौजन्य -लोकसत्ता
कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी ‘सनातन’ चा साधक समीर विष्णू गायकवाड याला संशयावरून अटक झाल्यानंतर राज्यभर काहूर उठले. सनातनवर बंदी घालण्याची मागणीही काही राजकीय पक्षांनी केली. या पाश्र्वभूमीवर ‘सनातन’ संस्थेची विचारसरणी व त्यांचे ‘साहित्य’ याचा ऊहापोह करणारा पत्रलेख..
पानसरे हत्येप्रकरणी ‘सनातन’ कार्यकर्त्यांला अटक, ही बातमी (१७ सप्टें.) वाचली. या हत्येच्या संदर्भात ‘संशयित’ म्हणून अटक करण्यात आलेला समीर विष्णू गायकवाड हा १९९८ पासून ‘सनातन’ संस्थेचा पूर्णवेळ कार्यकर्ता असल्याचे, तसेच त्याचा पूर्ण परिवार ‘सनातन’मय असल्याचे म्हटले आहे. अर्थात, अजून तरी तो केवळ संशयित असून, त्याने हल्ला केल्याचे स्पष्ट झालेले नाही, हेही नमूद केले आहे.
सनातन संस्थेने मात्र समीर गायकवाड निरपराध असून, पोलिसांनी सनातनद्वेष्टय़ांच्या दबावाला बळी पडून हा ‘बनाव’ रचल्याचे म्हटले आहे.
यथावकाश पोलिसांची चौकशी पूर्ण होऊन व नंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन सत्य काय ते उजेडात येईलच, पण या संदर्भात ‘सनातन’ संस्थेची एकूण विचारसरणी, त्यांचे ‘साहित्य’, प्रचाराची पद्धत इ. गोष्टी पुन्हा एकदा ऐरणीवर येणे, तपासल्या जाणे अपरिहार्य ठरते.
अशा तऱ्हेने प्रयत्न केल्यास हे लक्षात येते की, ‘सनातन’ संस्थेच्या एकंदर कार्यपद्धतीत आक्रमकता किंवा िहसा यांचे वावडे नाही; किंबहुना त्यांच्या साहित्यात अनेकदा यावर भर दिलेला दिसून येतो. विशेषत: सध्याच्या परिस्थितीत, ज्याला ‘सनातन’ संस्था ‘कलियुगातील कलियुग’ म्हणते – अशी आक्रमकता, िहसा ही अपरिहार्य ठरते, असे ‘सनातन’चे मत असल्याचे दिसते.
उदाहरणासाठी, आपण जर ‘सनातन भारतीय संस्कृती संस्था’द्वारा प्रकाशित ‘क्षात्रधर्म – साधकांचे रक्षण व दुर्जनांचा नाश’ (संकलक : डॉ. जयंत बाळाजी आठवले, डॉ. कुंदा जयंत आठवले) ही पुस्तिका बघितली तर त्यामध्ये जागोजागी / पानोपानी िहसेला उघड उत्तेजन देणारी, त्यासाठी पौराणिक वचने उद्धृत करून तिचे समर्थन करणारी वैचारिक मांडणी आढळते. वानगीदाखल खालील मजकूर त्या पुस्तिकेतूनच, जशाचा तसा उद्धृत करीत आहे :
१. ‘‘अध्यात्माचा प्रसार व दुर्जनांचा नाश, ही साधनेची दोन अंगे आहेत. दुर्जनांच्या नाशाच्या लढाईची तयारी व प्रत्यक्ष लढाई या दोन्ही साधनाच होत.’’ — (पृष्ठ ४)
२. ‘‘क्षात्रधर्माची आवश्यकता – शरीर आजारी असल्यास साधना नीट होत नाही. त्यावर उपाय म्हणून आपण औषधोपचार करतो. जरूर पडल्यास जिवाला धोका निर्माण करणारा सडलेला (गँगरीन झालेला) पाय कापूनही टाकतो. तसे हल्ली समाजपुरुष आजारी असल्याने, म्हणजे समाजामध्ये भ्रष्टाचारी, लाचलुचपतखोर, गुंड वगरेंचे प्रमाण खूप वाढलेले असल्याने, क्षत्रिय साधनेने त्यांना कापून काढल्यास, नष्ट केल्यास साधना करणे सोपे जाते.’’ (पृष्ठ ९)
३. ‘‘सायुज्य मुक्ती प्राप्त करून घ्यायची असेल, तर ईश्वरातील सर्व गुण भक्तात हवेत. भक्तात ईश्वराच्या मारक रूपाचा भाग नसेल तर त्याला ईश्वराशी एकरूप होता येत नाही. ईश्वराचे तारक रूप साधकात येतेच, पण स्वत:मध्ये मारक रूप आणून साधनेत पूर्णत्व आणणे हे क्षात्रधर्म साधनेनेच शक्य होते. कलियुगात ईश्वराच्या तारक रूपाची साधना ३०%, तर मारक रूपाची साधना ७०% महत्त्वाची आहे.’’ (पृष्ठ १२)
४. ‘‘साधक, साधुसंतच काय, तर राम कृष्णादी अवतारांनाही विरोध झाला, तसा आपल्यालाही होणार.’’ (अवतारांनी विरोध मोडून काढला, तसा आपणही मोडून काढू.) (पृष्ठ १५)
५. ‘‘क्षात्रधर्म साधना : शारीरिक : आताच्या लढय़ातील ३०% लढा शारीरिक प्रकारचा असेल. ५% साधकांना हत्यारे चालविण्याचे शिक्षणही आवश्यक ठरेल. त्यासाठी हत्यारांची सोय योग्य वेळी ईश्वरच करील.’’ (पृष्ठ २१)
६. ‘‘एखाद्याला बंदुकीच्या गोळीच्या नेमबाजीचा सराव नसला तरी त्याची जरुरी नसते. नाम घेऊन त्याने बंदुकीतून गोळी सोडली की, नामातील सामर्थ्यांने नेम लागतोच. अर्जुन श्रीकृष्णाचे नाव घेऊन बाण सोडायचा, म्हणून तो सर्वोत्कृष्ट धनुर्धर होता.’’ (पृष्ठ २२)
७. ‘‘नुसते खोड तोडून चालत नाही, तर झाडाची पाळेमुळेही खणून काढावी लागतात. दुर्जनांबरोबर त्यांच्या दुर्जनतेची माहिती असणारे व पापाच्या पशांवर पोसलेले त्यांचे कुटुंबीय, कार्यालयीन सहकारी, अवैध कारखान्यातील कामगार वगरे सर्वाचा नाश करणे आवश्यक ठरते. कारण त्यांनी गुन्हेगारीविरुद्ध कृती न केल्याने गुन्हेगारीला मूकसंमती देऊन अप्रत्यक्षपणे प्रोत्साहनच दिलेले असते.’’ (पृष्ठ २७)
८. ‘‘प्रत्येकालाच दुर्जन अधिकाऱ्याचा नाश करणे शक्य होणार नाही. अशांनी दिसणाऱ्या प्रत्येक दुर्जनाचा नाश करावा.’’ (पृष्ठ २८)
९. रामायण, महाभारतातील िहसासमर्थक वचने : ‘‘प्रजेचे रक्षण न करणाऱ्या राज्यकर्त्यांना सर्वानी एकत्र होऊन पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे ठार करावे.’’ (महाभारत १३.६१.३३), ‘‘राज्य घेण्याच्या कामी जर कोणी अडथळा करतील, तर त्यांचा वध करावा.’’ (महाभारत १२.१०.७), ‘‘दुष्टांची िहसा ही धर्मशास्त्राप्रमाणे अिहसाच होय.’’ (महाभारत १२.१५.४९) ‘‘अवध्याचा वध केल्याने जितके पातक लागते, तितकेच पातक वध्याचा वध न केल्याने लागते.’’ (रामायण ३.९०.३) (पृष्ठ २८,२९)
पुस्तिकेच्या पृष्ठ २९ वर ‘प्रत्यक्ष कृतीतील टप्पे’ यामध्ये अशी सूचना आहे की, साधकांनी सर्व तऱ्हेच्या दुर्जनांच्या याद्या बनवाव्यात. ‘‘याद्या साधकांनी बनवल्याने त्यांच्या खरे-खोटेपणाचा प्रश्न येणार नाही’’(!) पुढे सर्व तऱ्हेच्या दुर्जनांचे प्रकार दिले आहेत, ज्यात होळी, गणेशोत्सवाची वर्गणी दहशतीने वसूल करणाऱ्यांपासून ते ‘अपेक्षेहून जास्त पसे असणारे शेजारी, नातेवाईक व ओळखीचे’ इथपर्यंत बरेच प्रकार आहेत, ज्यांचा सारांश- ‘‘थोडक्यात म्हणजे प्रत्येक स्वार्थी मनुष्य’’ – अशा शब्दांत दिलेला आहे.
‘सनातन’चा कार्यक्रम थोडक्यात: ‘‘१९९८-९९ : साधकांनी स्वत: दुर्जनांच्या याद्या बनवणे, १९९९-२००० : इतरांच्या तक्रारीच्या याद्या बनवणे व तोपर्यंत त्याची शहानिशा बुद्धीने व सहाव्या ज्ञानेन्द्रियाने करता येण्याइतकी स्वत:ची क्षमता वाढवणे आणि २००० सालापासून : दुर्जनांच्या नाशाच्या प्रत्यक्ष कृतीला सुरुवात – गाव, तालुका, शहर, जिल्हा, राज्य अशा तऱ्हेने टप्प्याटप्प्याने कार्य करणे’’ असा आहे!
हे सर्व पाहिल्यावर हे लक्षात येते की, कदाचित जरी पानसरे यांच्या हत्येशी समीर गायकवाड याचा संबंध नसल्याचे पुढेमागे स्पष्ट झाले, तरीही ‘सनातन’ संस्थेची एकूण विचारप्रणाली, कार्यपद्धती ही अिहसक किंवा केवळ विचारांच्या परिवर्तनावर, मतपरिवर्तनावर भर देणारी नाही. ती निश्चितच आक्रमक आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये अशा प्रकारच्या विचारसरणीला स्थान असू शकत नाही, हे उघड आहे.
श्रीकांत पटवर्धन
सौजन्य -लोकसत्ता