कोणत्याही आहाराचा गंड किंवा श्रेष्ठत्व बाळगण्यापेक्षा इतरांच्या जगण्यावर अजाणतेपणीही मर्यादा येणार नाही, व्यक्तिस्वातंत्र्यावर कुरघोडी होणार नाही याची दक्षता बाळगणे हीच खरी संस्कृती आणि तोच खरा सात्त्विक… निव्वळ याच भूमिकेतून शाहू पाटोळे यांचे अन्न हे अपूर्णब्रह्म हे पुस्तक वाचायलाच हवे.
प्रशांत पवार, मुंबई
नमस्कार गृहिणींनो… आजच्या आपल्या मेजवानी या लाडक्या कार्यक्रमात आपण शिकणार आहोत ‘रुचकर वजडी’ कशी बनवायची. सर्वप्रथम वजडी स्वच्छ धुवून घ्यावी…
श्शी बाई, काय हे घाणेरडं, असं म्हणत रिमोटचे बटण दाबून पुढचे चॅनल.
… तर सुरू करूया ‘रगती’ तयार करण्याची रेसिपी. रगती म्हणजे बोकड कापतानाच त्याचे उष्ण रक्त भांड्यात जमा करायचे. गॅसवर रगती जसजशी शिजत जाते तसतसा तिचा रंग बदलत जातो.. डार्क कॅडबरी चॉकलेटसारखा रंग झाला की तुमची रगती शिजली असे समजा. शिजलेली रगती घट्ट होते अगदी पनीरपेक्षाही. ही रगती अशीच गरमागरम खायला अतिशय रुचकर लागते.
पुन्हा रिमोट आणि पुढचा रेसिपी शो.
… तर अशा पद्धतीने आपण आज ‘फाशी’च्या तिखट कालवणाची रेसिपी शिकलो.
चॅनलवाल्यांना शिव्यांची लाखोली आणि शेवटी टीव्हीच बंद…
चॅनलच्या सुळसुळाटात, २४ तास सुरू असलेल्या रेसिपी चॅनल्समध्ये, लाखोंच्या संख्येने खपणाऱ्या पाककृतींच्या पुस्तकांत, ठिकठिकाणी आयोजित होणाऱ्या पाककृती स्पर्धांमध्ये, ढाब्यांपासून पंचतारांकित हॉटेलच्या मेनूकार्डमध्ये… कुठेतरी, कधीतरी, केव्हातरी वर उल्लेख केलेल्या रेसिपीज असाव्यात हा शाहू पाटोळे यांचा आग्रह.
कोण हा शाहू पाटोळे आणि अशी निराधार कल्पना तो कसा काय सुचवू शकतो?
हे असले काही आम्ही खातो का कधी, असे मानणाऱ्या इथल्या सात्त्विक समाजव्यवस्थेत असले ‘वशाट’ (अनुल्लेखित मांसाहार) विचार कसे काय डोक्यात येतात या माणसाच्या?
हिंदुस्थानी संस्कृतीतील वर्णवारीप्रमाणे आहारसंस्कृतीतही चातुर्वर्णीयच नव्हे तर पंचवर्णीय आढळून येतात. १. विशेष शुद्ध शाकाहारी (ज्यात आले, लसूण, कांदा अशा जिनसांचा वापर नसतो), २. शाकाहारी (यातील काही गट चातुर्मास पाळतात), ३. मिश्राहारी (अंडी, स्टॉक यांचा आहारात वापर करणारे), ४. मांसाहारी. मांसाहार म्हणजे अभिजन किंवा अभिजनांच्या समकक्ष समजल्या जाणाऱ्यांकडून केला जाणारा मांसाहार (बोकड, शेळी, मेंढा, मेंढी, कोंबडा, कोंबडी यांच्यासह क्वचितप्रसंगी ग्राम सूकर, वन्य सूकर, हरीण, ससे, घोरपड आणि सर्व प्रकारचे मासे, झिंगे, खेकडे, शिंपले, कासव. शिवाय धर्मपालनासाठी हा वर्ग विशिष्ट दिवशी किंवा विशिष्ट काळात मांसाहार वर्ज्य करतो.), ५. संस्कृतिपालक मांसाहारी (ज्यांच्या आहारात वरील सर्व पदार्थांशिवाय गोवंशमांस, महिषमांस यांचा समावेश असतो आणि या वर्गातील लोकांनी विशिष्ट दिवशी मांसाहर टाळावा असा अट्टहास धर्ममार्तंड करीत नाहीत असा वर्ग.)
कोणत्याही रेसिपी शोमध्ये, पाककृतींच्या पुस्तकात फक्त पहिल्या चार वर्णांचे प्रतिनिधित्व केले जात असते. म्हणजेच अभिजनांच्या आहारात जे समाविष्ट असते तेवढीच खाद्यसंस्कृती… मात्र अभिजनांच्या पलीकडचा माणूस त्याच्या दररोजच्या जेवणात काय खातो, त्याच्या आहारात कोणकोणते पदार्थ असतात, सणावाराला कोणती (पंच)पक्वान्नं रांधतात, पाहुण्या-रावळ्यांसाठी खास बेत कोणता करतात, असे साधे प्रश्न या मंडळींना का पडत नाहीत? कोकणी खाद्यसंस्कृती म्हणजे मासे, खेकडे, वडे-सागुती… घाटी म्हटले की पिठले-भाकरी… खान्देशी म्हटले की भरीत किंवा मांडे, वऱ्हाडी म्हणजे ठेचा भाकरी, कोल्हापूर म्हटले की पांढरा –तांबडा रस्सा आणि एकूणच महाराष्ट्र म्हटला की, पुरणपोळी, कटाची आमटी, कांदेपोहे, झुणका-भाकर… बास्स इतकेच!
महाराष्ट्रातला एक मोठा वर्ग आजही दररोज चटणी-भाकरी, कोरड्यास-भाकर तरी खातो किंवा सांस्कृतिकदृष्ट्या तथाकथित अन्नुलेखित मांसाहार करतो. मात्र इथली व्यवस्था सांस्कृतिक भिंतीच्या सदरेवर अशा ठिकाणी बसली आहे की त्या व्यवस्थेला तटबंदीच्या पल्याडचे काहीही दिसत नसावे. येत्या काही वर्षांत ज्या ज्या गावांमध्ये टीव्ही सर्व वाहिन्यांसह पोहोचला आहे तिथली मूळ खाद्यसंस्कृती हळूहळू लोप पावत जाणार हे निश्चित. आपल्या देशातील अनेक जातिसमूहांच्या खाद्यसंस्कृती त्या त्या प्रदेशातील तथाकथित अभिजनांच्या अदृष्य धाकामुळे दुर्लक्षित राहिल्या आहेत. काँटिनेन्टल खाद्यसंस्कृतीचे आक्रमण अपरिहार्य असणार आहे. त्यामुळे पड, हेळ्या, हलाल, रगती, जीभ, फाशी, मेंदू, काळीज, बोकं, उंडवर, उराडी, पेकाट, खांड, वशाट, चलबट, टोणा, वसु, मांदं, बोट्या, डल्ल्या, चान्या, खुरं, चुनचुनं, सागुती हे मांसाहारी पदार्थ कालबाह्य होणार का? किंवा दाळीचा ढंबळा, पिठली, शेंगदाण्याचा खळबुट, हुलग्याचं पिठलं, दाळगा, कळणा, पेंडपाला, तांदूळजा, हागऱ्या घोळ, पाथ्रीची भाजी, करडीची भाजी, कुरडूची भाजी, उंबराच्या दोड्या यासारखे अभिजनांच्या डिक्शनरीत नसलेले शाकाहारी पदार्थ लुप्त हणार का?
जातीच्या उतरंडीत तळाशी असलेल्या समाजाच्या आहारातच नेमके हे अन्न कसे आले असावे, त्यांनी हे स्वत:हून स्वीकारले की व्यवस्थेने स्वीकारायला भाग पाडले…
निसर्गाची प्रतिकूलता, अन्नधान्याची टंचाई, दुष्काळ, अतिवृष्टी, इतरांवरील अवलंबित्व यांसारख्या आपत्तींमुळे हे घडले असावे. तरीही प्रश्न उरतोच की, याच जातींच्या वाट्याला हे का यावे. त्यांना धार्मिक आणि सांस्कृतिक सापळ्यात अडकवले गेले असेल की त्यांनीच गावाची घाण दूर करावी आणि त्यांना या घाणीची सवय व्हावी, त्यांच्या जगण्याचा तो एक भाग बनावा, असा व्यवस्थेचा डाव असेल…
कालबाह्य होत जाणाऱ्या एका मोठ्या वर्गाच्या पूर्वजांची खाद्यसंस्कृती, पूर्वज काय खात होते, गुणसूत्रांमध्ये काय भरलेले आहे आणि आजही इथल्या कष्टकरी, उपेक्षित घटकांच्या ताटात कोणते पदार्थ असतात अशा असंख्य प्रश्नांनी पछाडून गेलेल्या शाहू पाटोळे यांनी मग या सगळ्याचे डॉक्युमेंटेशन करायचे ठरवले. जोपर्यंत पंचवर्णीय खाद्यसंस्कृतीच्या समावेशाला सामाजिक व्यवस्थेत स्थान मिळत नाही तोपर्यंत अन्न हे पूर्णब्रह्म असूच शकत नाही, असा दावा करत मानववंशशास्त्राचा अभ्यास करून शाहू पाटोळे यांनी एक महत्त्वाचा दस्ताऐवज समोर आणला अन्न हे अपूर्णब्रह्म या पुस्तकरूपाने.
या सगळ्यांचे मूळ इथल्या सांस्कृतिक वर्चस्वाच्या राजकारणात आहे आणि प्रत्येक टप्प्याटप्प्यावर घडलेल्या सांस्कृतिक राजकारणामुळे अभिजन-बहुजन किंवा प्रस्थापित-विस्थापित असे प्रवाह तयार झाले आहेत. सांस्कृतिक वर्चस्वाचे राजकारण काय करते तर प्रत्येकाचे एक शास्त्र, चौकट तयार करते. साहित्य, कला, संस्कृती प्रत्येक बाबतीत हे शास्त्र ठरलेले असते. अगदी खाद्यसंस्कृतीही त्याला अपवाद नाही. बरे-वाईट ठरवण्याचा अधिकार आपोआप ठरावीक लोकांकडे किंवा वर्गाकडे जाऊन उरलेले सगळे बाद ठरतात. आपल्याकडे संस्कृतीचे दोन समांतर प्रवाह आहेत. एक हुकमत गाजवणाऱ्यांचा, तर दुसरा दबलेल्यांचा. या दोन्हींची प्रतीकं आणि अभिव्यक्ती यात अफाट विभिन्नता आहे. ती शिक्षणापासून कलेपर्यंत आणि भाषेपासून खाण्या-पिण्याच्या सवयीपर्यंत दिसते. शुद्ध, सर्वगुणसंपन्न, व्यक्तिवादी, अधिकृत आणि सर्वमान्य असलेल्या या हुकमत गाजवणाऱ्यांच्या सांस्कृतिक वर्चस्वामुळे जो दुसरा प्रवाह आहे, तोदेखील स्वत:कडे गौणत्व घेत असतो.
सत्तरीच्या दशकात दलित साहित्याचा प्रवाह मराठी सारस्वतात शिरला आणि अशा प्रकारच्या सांस्कृतिक राजकारणाची चिरफाड होण्यास सुरुवात झाली. दलित लेखकांच्या स्वानुभवांच्या नवमांडणीमुळे अभिजनवर्गाला पहिल्यांदाच आपल्या संस्कृतीतील, समाजातील एका वर्णातील एक वर्ग कुठल्या प्रकारचे जगतोय हे कळले. पॅशन आणि फॅशनच्या पातळीवर दलित आत्मकथने मराठी वाचकांनी डोक्यावर घेतली. या आत्मकथनांचे अनुवाद झाले, रिसर्च पेपर सादर झाले, संशोधने झाली, वेगवेगळे शब्दकोश तयार झाले, या दलित आत्मकथनांमधल्या शब्दाविष्कारांवर बरेच खल झाले. पण दलित साहित्यात उल्लेख असलेल्या खाद्यसंस्कृतीचा कुणीही सविस्तर मागोवा घेतला नाही किंवा त्या खाद्यजीवनावर कोणी संशोधन केलं नाही. जवळपास प्रत्येक दलित आत्मकथनात आलेले खाद्यनामे इतर वर्णीय पहिल्यांदाच वाचत होते. परंतु आवृत्त्यांवर आवृत्त्या निघूनही इतर वाचकांनी दलित साहित्यातील पाककलेत रस दाखवला नाही. स्वत: दलित लेखकांनीही त्यांच्या साहित्यात फक्त खाद्यसंस्कृतीचे उल्लेख केले, पदार्थांच्या रेसिपीज सांगितल्या नाहीत. या साहित्यात प्रामुख्याने मांसाहाराबद्दलचे उल्लेख जास्त प्रमाणात येत असल्याने आणि हा मांसाहार सांस्कृतिकदृष्ट्या “आम्ही असले काही खात नाही’ अशा स्वरूपाचा असल्याने दलित फक्त मांसाहारच करतात ही इतरेजनांची अटकळ आणखी दृढ झाली. अनुल्लेखित पदार्थांच्या पाककृतींच्या बारकाव्यांसह शाहू पाटोळे यांनी या सगळ्यांची अतिशय वेगळ्या पद्धतीची मांडणी त्यांच्या या पुस्तकात केली आहे. इथल्या संस्कृतीत कोण कसा वागतो त्यापेक्षा कोण काय खातो, याचे अति स्तोम माजवले जाते. कोण काय खातो, त्याचे पूर्वज काय खायचे यावरून त्या व्यक्तीची सामाजिक पत, दर्जा आणि स्थान ठरवले जाते आणि आजही त्यात फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळेच या धार्मिक, सामाजिक तटबंदीमध्ये आपल्यापेक्षा खालच्या जातीने किंवा वर्णाने खाद्यसंस्कृतीत कुठल्या प्रकारची चव विकसित केली आहे याची माहिती वरच्या स्तराकडे असण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, अगदी आंतरजातीय विवाह केला तरीही, असा निष्कर्ष शाहू पाटोळे यांनी काढला आहे. दोन वर्णांच्या वैवाहिक संकरातही अभिजन मुलगा असो वा मुलगी, ज्याची जात उतरंडीत वरच्या क्रमांकावर असेल त्याचीच खाद्यसंस्कृती त्या घरात प्रभावी असते आणि हे आपोआपच होत असते कारण खालच्या पक्षाने आपल्या स्तरावरील खाद्यजीवनाबद्दल न्यूनगंड बाळगलेला असतो. संस्कृतीच्या विकासात आहार, विहार, आचार आणि खाद्यसंस्कृती यांचाही निरंतर विकास होत असतो. एतद्देशीय संस्कृतीत सर्वसमावेशक खाद्यसंस्कृतीचा विकास होण्याऐवजी ती वर्ण आणि जातिव्यवस्थेमध्ये बद्ध केल्याचे आढळते. सात्त्विक, राजसिक आणि तामसिक असे तीन आहारवर्ग ठरवून त्यांना वर्णबद्ध करण्यात आले आहे. ज्या प्रकारचा आहार जो वर्णिक घेतो तशीच त्याची वृत्ती आणि मानसिकता असते हा निष्कर्ष धर्मग्रंथांनी आणि त्यांच्या फॉलोअर्सनी मान्य करून टाकला आहे. माणूस काय खातो त्यापेक्षा तो इतरांशी समाजात कसा वागतो हे अधिक महत्त्वाचे. कोणत्याही आहाराचा गंड, श्रेष्ठत्व बाळगण्यापेक्षा इतरांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर मर्यादा येणार नाही, याची दक्षता बाळगणे हीच संस्कृती. याच भूमिकेतून हे पुस्तक वाचायलाच हवे.
(‘अन्न हे अपूर्णब्रम्ह’ हे पुस्तक जनशक्ती वाचक चळवळीने प्रकाशित केले आहे.)
shivaprash@gmail.com