सुनीती देव : जशी होती तशी…

-प्रवीण बर्दापूरकर

तत्त्वज्ञानाच्या सेवानिवृत्त प्राध्यापक , नागपूरच्या डॉ . सुनीती देव यांचं निधन  झाल्याचे पत्रकार पीयूष पाटील आणि पाठोपाठ श्रीपाद अपराजित यांचे फोन आले तेव्हा संध्याकाळ दाटून आलेली होती . बेगम मंगला गेल्यापासून ‘एकटा राहण्याची सवय  झालीये’ असं , चारचौघात कितीही म्हटलं तरी आता सत्तरीच्या उंबरठ्यावर आहे म्हणूनही असेल कदाचित , संध्याकाळ सरणं आजकाल कठीण झालेलं आहे , हे मान्य करण्यात मुळीच कमकुवतपणा आहे असं  वाटत नाही . त्यात सुनीती देवची बातमी आली आणि सुन्न होऊन किती तरी वेळ बसून राहिलो . आठवणींचे कल्लोळ गडद झाले .

सुनीतीची आणि माझी ओळख बऱ्यापैकी जुनी ; ऐंशी ते नव्वदीच्या दशकातली . एकदा यदुनाथजी थत्ते नागपूरला आले तेव्हा बहुदा लिलाताई चितळे यांच्या घरी झालेली . ( नागपूरला आले की यदुनाथजी ‘साधना’चे कांही अंक देत , ते मी अनेकांना घरपोहोच करत असे , तेव्हढीच टपाल खर्चात बचत ! ) महात्मा गांधी , समाजवाद , ‘साधना’ परिवाराशी असणारा भावबंध आणि लोकशाहीवादी असणं हाही सुनीती आणि माझ्यातला बळकट दुवा होता ; आमच्यातला आणखी एक समान धागा म्हणजे , ती नियतीवादी किंवा दैववादी नव्हे तर कट्टर विवेकनिष्ठ होती .  तेव्हा मी रिपोर्टिंगमधे होतो आणि अनेक कार्यक्रमात आमची भेट होत असे . साधारण १९९५ पर्यंतचा तो काळ . मात्र ही ओळख फार कांही जवळीक असणारी नव्हती . आमची भेट  झाली आणि माझी बेगम सोबत असेल तर जरा मोकळ्या गप्पा होत . भेटी बऱ्याच होत कारण नागपूरच्या सामाजिक चळवळीत आम्हा दोघांचाही सक्रिय सहभाग होता व सांस्कृतिक जगतातील अनेकजन आमचे कॉमन मित्र होते . या क्षेत्रातील बहुसंख्य कार्यक्रमांना हजेरी लावण्यात , खांद्यावर शबनम कायम असणारी सुनीती एक असायची . तेव्हा मी आणि बेगम तिला ‘मॅडम’ म्हणायचो . पण , मैत्रीपुराण तेवढ्यापुरतच मर्यादित होतं . याच दरम्यान केव्हा तरी सुनीती आणि मंगला एकाच वयाच्या असल्याचं गप्पा मारतांना त्यांच्या लक्षात आलं . त्या दोघी एकमेकांना ‘अरे-तुरे’ करु  लागल्या . त्या दोघींपेक्षा मी वय आणि ज्ञानानंही लहान ; एखाद्या शब्दाच्या व्युत्पत्ती ,   मुळार्थ , संधी-विग्रह याबद्दल त्या दोघी बोलू लागल्या की , मी एकदम गुमसुम होऊन जात असे .

आमची दोस्ती जमली २००० मध्ये आणि पक्क सूत जुळलं ते २००३ नंतर . मुंबई , औरंगाबाद असे पडाव टाकत ‘लोकसत्ता’च्या विदर्भ आवृत्तीचा निवासी संपादक म्हणून मी पुन्हा नागपूरला परतलो आणि भेटीदाखल एक पुस्तक घेऊन सुनीती घरी आली . तोवर  सुनीती विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाची प्रमुख झालेली होती . मधे सुमारे आठ-दहा  वर्ष उलटली तरी तिच्यातला उत्साह तस्साच तजेलदार , अगत्य आणि बोलण्यातली वरची पट्टी कायम होती . एव्हाना आम्हा तिघांच्याही वय आणि अनुभवाच्या पुलाखालून पाणी बरंच वाहून गेलेलं होतं . त्या भेटीत आम्ही दोघं एकेरीवर आलो  . त्यानंतर बेगम मंगला , सुनीती आणि मी असं मैत्रीचं एक त्रिकुट तयार झालं . आमच्यातल्या दोस्तीच्या मेतकुटाची भट्टी झकासच जमली  . वाचन , श्रवण , खादाडी , अखंड बडबड आणि भटकंती हे आमच्यातले आणखी कांही समान दुवे बनले . २००४ नंतर नागपुरातलं एकही पुस्तक , हातमाग , शिल्प , चित्र आणि खाद्य प्रदर्शन आम्ही तिघांनी चुकवलेलं नाहीच . तिथे जाऊन कांही खरेदी केली की नाही हा मुद्दाच नसायचा  पण , खादाडी करण्याची संधी मात्र नक्कीच हुकवलेली नाही . महत्त्वाचं म्हणजे आम्ही एकमेकाला विनाकारण अनेकदा भेटवस्तू  दिल्या पण , त्यात पुस्तकाशिवाय दुसऱ्या कशाचाही समावेश नाही ! भेट घेण्या-देण्याआधी ते पुस्तक आहे की नाही याची खातरजमा करायची किंवा सरळ कोणतं पुस्तक हवं , अशी विचारणा करायची , अशी आमच्यातली प्रथा होती  . पुढे आम्ही दिल्ली , नंतर औरंगाबादला आल्यावरही ही प्रथा वाहती राहिली . एकमेकाला भेटीदखल दिलेल्या पुस्तकांची आम्ही कधीच मोजदाद केलेली नाही .

वयानं ज्येष्ठ असण्याची  कुर्रेबाज खुन्नस उठवत सुनीती आणि बेगम दोघीही मला छळत . म्हणजे सेल्फ सर्व्हिस  असेल तर त्या दोघी गप्पा मारत बसून राहात आणि दिलेली ऑर्डर आणण्यासाठी नेहेमीच मला जावं लागत असे ; हा त्या दोघींचा मला छळण्याचा एक जाम आवडता प्रकार असायचा . दुसरं म्हणजे , आम्ही तिघं असलो की ,  मी कार ड्राईव्ह करायची आणि त्या दोघींनी मागच्या सीटवर बसायचं किंवा  सुनीती कार ड्राईव्ह करत असेल तर माझी रवानगी मागच्या सीटवर होत असे . त्या दोघींच्या बोलण्यात मी काही जरी हस्तक्षेप केला तर , ‘मालकांच्या बोलण्यात चालकानं तोंड मारायचं नसतं ,’ हा डायलॉग हमखास ऐकायला मिळत असे . या प्रकाराला वैतागून एकदा सुनीतीची मी मस्त फिरकी घेतली  . एका वाढदिवसाला ती भेटायला आली तेव्हा खट्याळपणा म्हणून मी तिच्या पाया पडलो . तेव्हा गांगरुन गोरामोरा झालेला  तिचा चेहेरा अजूनही माझ्या नजरेसमोर तरळतो आहे . ‘पुन्हा असा कांही प्रकार करशील तर कध्धीच बोलणार नाही तुझ्याशी ,’ असा  सज्जड दम मग तिनं दिला .

अमरावती आणि यवतमाळला घालवलेले कांही दिवस वगळता सुनीती ‘बॉर्न  अँड  ब्रॉट अप’ नागपूरकर . पावणेसहा फुटावर उंची , लख्ख गव्हाळ वर्ण , उजव्या मनगटावर घडयाळ , सूती पेहेराव आणि कायम कोणत्या नं कोणत्या उपक्रमात आकंठ बुडालेलं असणं , हे सुनीतीचं वैशिष्ट्य . ती माझ्यापेक्षा वय आणि शिक्षणानं ज्येष्ठ . शिक्षण आणि विद्वत्ता या बाबतीत सुनीतीशी माझी कोणतीही बरोबरी नाही . तत्त्वज्ञान या विषयात ती एम.ए. आणि त्याचं विषयात पीएच.डी.ही केलेली . विद्यमान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणजे पूर्वाश्रमीच्या नागपूर विद्यापीठाच्या याच विभागाची मुख्य म्हणून सुनीती निवृत्त झाली . या विषयाबाबत माझी लायकी म्हणा की पात्रता , तत्त्वज्ञान हा शब्द नीट ( बहुसंख्य तत्वज्ञान असा लिहितात ! ) लिहिता येतो यात समाधान असणारी . तिचे पती बा. य. देशपांडे ( पतीचा उल्लेख सुनीती कायम बाळ असा करत असे  !) हेही याच विषयात उच्चपदवी प्राप्त आणि ज्ञानाधिकारी . तिचे मोठे दीर डॉ. दि. य. देशपांडे हे तर तत्त्वज्ञान या विषयातील एक मोठ्ठं नाव . डॉ.  दि . य . देशपांडे यांनी तत्त्वज्ञानाच्या जागतिक नकाशावर अमरावती आणि नागपूरला स्थान मिळवून दिलं ; इतकं हे नाव बडं . ‘आजचा सुधारक’ नावाचं वैचारिक मासिकही याच कुटुंबांची देण आहे .

सुनीतीचे राग-लोभ तीव्र होते . रागावताना म्हणा की रुसताना अनेकदा तिच्यात  अनेकदा एक मस्त भाबडेपणाही  असे . क्षुल्लकशा कारणानंही ती नाराज होत असे मग त्या माणसाशी तिचं कोरडेपणानं वागणं सुरु होई , तो का तसा वागला किंवा बोलला यांची टेप सुरु होई . काय  घडलं ते जाणून घेऊन सुनीतीची समजूत काढण्यात मग बेगम आणि माझा फारच वेळ जात असे . मात्र , तिचा उल्लेखनीय  गुण म्हणजे कुणाच्याही वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ न करणं . मंतरलेल्या सोनेरी पाण्यावरचं माझं प्रेम तिला रुचत  नसेच पण , एकदा नापसंती व्यक्त केल्यावर तो विषय तिनं नंतर कधीच काढला नाही .

आमचं त्रिकुट , अनेकदा भावनात्मक पातळीवर एकमेकांशी शेअरिंग करत असे तरी समोरच्याची स्पेस जपण्याचा तिचा गुण जाम फिदा व्हावा असाच होता . मला संपादक म्हणून पदोन्नती मिळाली ही बातमी सर्वात प्रथम  समजणारी सुनीतीच होती कारण तेव्हा कार्यालयात माझ्या समोरच होती  मात्र , ती बातमी मंगलाला कळवण्याचा चोंबडेपणा कांही तिनं दाखवला  नाही . कधीही कुणाला  तुझा पगार किती , घरी कोण कोण आहे , वगैरे चौकशा नाहीत . तरी बेगम मंगलाच्या आधी हृदयाच्या बायपासच्या आणि नंतरच्या दीर्घ आजारात सुनीती बरीच हळवी झालेली पहायला मिळाली . बायपासनंतर सकाळी फिरुन येताना ती हमखास डोकावायची आणि तेही ब्रेकफास्ट घेऊनच .  ‘काय म्हणते माझी सखू ?’ या तिच्या विचारण्यानं त्या दोघीतील गप्पांना सुरुवात होत असे .

भूमिका म्हणून सुनीती कशी ठाम होती यांची एक आठवण आहे  . सर्वच प्राध्यापकाचं निवृत्तीचं वय एक प्रयोग म्हणून तेव्हा वाढवलं गेलं होतं पण , त्याचा शासकीय आदेश यायचा होता . तेव्हा तिची मुदतवाढीची फाईल मंत्रालयात अडकली . त्यामुळे जुन्या नियमाप्रमाणं तिनं निवृत्ती घेतली . हे समजल्यावर तेव्हा शिक्षण सचिव असलेल्या मित्रांशी बोलू का , असं मी तिला विचारलं  . पण सुनीतीनं ठाम नकार दिला . ‘तू माझ्यासाठी शब्द टाकलेला मला आवडणार नाही आणि मला न सांगता तू असा वशिला लावला  तर मी  पुन्हा जॉईन होणारच  नाही ,’ असं तिनं स्पष्टच सांगितलं . तेव्हा शिक्षण खात्याचा प्रधान सचिव आनंद कुळकर्णी हा माझा दोस्त होता , त्याची कामाची तडफदार शैली लक्षात घेता एका फोनवर सुनीतीचं झटक्यात काम झालं असतं पण , तिचा नकार ठाम होता . नंतर महिना-सव्वा महिनाभरानं आदेश निघाले आणि सुनीती पुन्हा विभाग प्रमुख म्हणून रुजू झाली .

समोरच्याचा प्रतिवादाचा हक्क सुनीतीला मान्य होता तरी  , अशात तिच्या एका आवडत्या कथा लेखकावर केलेल्या टीकेमुळे ती माझ्यावर बऱ्यापैकी रुसलेली होती . तो आजारी असतांना मी टीका करायला नको होती , असं तिचं म्हणणं होतं पण तो लेखक आजारी आहे हे मला कुठे माहिती होतं ? नंतर सुनीतीचा हा रुसवा ओसरला हेही तेवढंच खरं . रुसवा होता तरी आमच्या संवादात खंड पडलेला नव्हता . कोणताही गाजावाजा न करता चळवळीतल्या लोकांना यथाशक्ती नियमित सहाय्य करण्याची सुनीतीची वृत्ती वसा घेतल्यासारखी होती .  नव्याची तिला कायम आस असायची . आमच्या टेबलवर ‘चिन्ह’चा अंक पाहिल्यावर द ग्रेट चित्रकार गायतोंडे प्रकल्पात ती सहभागी झाली . पुढे तर सतीश नाईक आणि ‘चिन्ह’ परिवाराची सक्रिय सदस्य झाली . त्याही ग्रुपमध्ये ती मस्त रमली . असा महाराष्ट्रभर तिचा व्यापक  संपर्क होता .

‘लोकसत्ता’च्या  विदर्भ आवृत्तीसाठी  सुनीतीनं भरपूर लेखन केलं . तिनं लेखनासाठी कधीच नाही म्हटलं नाही . ( ‘लोकसत्ता’च्या बातमीत नेमका हा उल्लेख का नाही , हे कांही समजलं नाही . ) सांगितलेली शब्द मर्यादा आणि वेळेचं भान पाळण्याची तिची सवय दाद देण्यासारखीच असायची . वाचन अफाट आणि चिकित्सक असल्यानं तिला कोणताच विषय वर्ज्य  नसायचा . संवेदनशील विषयावरील नाटक , सिनेमा , पुस्तक असे तिचे लेखनाचे विषय असतं . आमच्यासाठी बाबा आमटे , ग . प्र . प्रधान अशी कांही मरण स्मरणेही तिनं भावपूर्ण  लिहिली पण , मोठं लेखन तिनं केलं नाही . त्याबाबत वारंवार मागे लागूनही सुनीतीनं दाद लागूच दिली नाही .

एकीकडे कांहीशी भाबडी असली तरी सुनीती त्याचवेळी  खमकी आणि कणखरही होती . जगण्याच्या तिच्या कांही टर्म्स होत्या . कुणाला आवडो वा  न आवडो त्या टर्म्सशी तिनं कोणतीही तडजोड केली नाही . विवाहानंतर ‘देशपांडे’ झाली तरी ती ‘देव’ म्हणूनच जगली . पतीच्या निधनानंतर प्रदीर्घ काळ एकटी राहिल्यावर सुनीती नुकतीच  मुलगा , सून आणि तिच्या प्रिय नातीकडे राहायला गेली होती ; ते तिनं तिच्या वरच्या पट्टीतल्या खळाळत्या आवाजात मलाही कळवलं होतं . पण , ते सहजीवन एन्जॉय न करताच सुनीती गेली .

सुनीती जशी होती तशीच छान होती म्हणून आमच्यात मैत्री बहरली . आधी बेगम मंगला आणि आता सुनीती गेली , मी एकटा उरलो . आमचं त्रिकुट मोडून पडलं आहे…

( छायाचित्रे वृषाली देशपांडे यांच्या सौजन्याने . )

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)

९८२२० ५५७९९

प्रवीण बर्दापूरकर  यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –प्रवीण बर्दापूरकर– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleपवारसाहेब, सुरुवात तर छान झाली…
Next article‘भ’कार आणि शिवराळ संजय राऊत !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here