सुरंगीचे मादक रूप

पश्‍चिम घाटात अनेक लक्षवेधी वृक्ष आहेत. सुरंगी त्यातीलच एक. तळकोकणातील सिंधुदुर्गात हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्‍या गावांत सुरंगीचे वृक्ष आढळतात. यातले बरेचसे वृक्ष दोन-तीन पिढ्यांपूर्वीचे आहेत. वेणी, गजरा बनविण्यापुरता याचा वापर सगळ्यांनाच माहीत आहे. आरवलीतील प्रसिद्ध देवस्थान श्री देव वेतोबाला सुरंगीच्या फुलांची पूजा बांधण्याची प्रथा आहे. देवाला वाहण्यासाठी, विशेषतः रामनवमीत पूजेसाठी सुरंगीच्या फुलांचे विशेष महत्त्व असते; मात्र याही पलीकडे सुरंगीचे सुकवलेली कळे, फुले यांच्या मार्केटची व्याप्ती पसरली आहे. ती उलाढाल कोटीत आहे; मात्र या जंगली झाडाविषयी फारसे संशोधन झालेले नाही.
दोन पिढ्यांना दरवळ
सुरंगीचे झाड साधारण आंब्याच्या झाडासारखेच मोठे असते. ते ७०-८० वर्षे जगते. फेब्रुवारीच्या मध्यापासून मार्चपर्यंत साधारण दोन बहरात फुलते. याच्या खोडालाच कळ्या येतात. सकाळी दिसू लागणाऱ्या कळ्या नऊ-दहा वाजेपर्यंत फुलतात. परागकण मोठ्या प्रमाणात असणाऱ्या सुरंगीच्या पिवळसर पांढऱ्या फुलांचा सुगंध आसमंतात दरवळतो; पण सिंधुदुर्गात बहराला आलेली सगळी झाडे नैसर्गिकरीत्या उगवलेली आहेत. यात नर झाडाला बहर येत नाही; मात्र एकूण उगवणाऱ्या झाडात नराचे प्रमाण जास्त असल्याने सुरंगीच्या झाडांच्या वाढीलाही मर्यादा आहे. एकदा झाड बहरू लागले की किमान दोन पिढ्यांच्या आयुष्यात त्याचा सुगंध दरवळत राहतो.
सुरंगीची व्याप्ती
सुरंगी ही पश्‍चिम घाटाची मक्‍तेदारी आहे. तरीही पूर्ण पश्‍चिम घाटात हा वृक्ष आढळत नाही. यावर फारसे संशोधनही झालेले नाही; मात्र वेंगुर्ले तालुक्‍यातील काही गावांची अर्थव्यवस्था पूर्णतः सुरंगीवर अवलंबून आहे. सावंतवाडी, कुडाळ आणि वेंगुर्ले तालुक्‍यातील काही भाग यासाठी पोषक मानला जातो. आरवली, सोन्सुरे, टाक, आसोली, धाकोरे, फणसखोल, वडखोल, कोलगाव, आकेरी या गावांमध्ये सुरंगीची संख्या बऱ्यापैकी आहे. या भागातील जवळपास ८०० कुटुंबे सुरंगीच्या माध्यमातून आपले अर्थार्जन चालवतात. कोकण कृषी विद्यापीठाने केलेल्या प्राथमिक पाहणीनुसार जिल्हाभर सुरंगीच्या पसरलेल्या नैसर्गिक लागवडीचे क्षेत्र साधारण ४० ते ४२ हेक्‍टर इतके आहे.
सुरंगीचे अर्थकारण
आरवली, सोन्सुरे, टाक, आसोली, धाकोरे, फणसखोल, वडखोल या वेंगुर्ले तालुक्‍यातील सात गावांत खऱ्या अर्थाने सुरंगीचा व्यापारी दृष्टिकोनातून विचार होतो. कोलगाव, आकेरीत सुरंगीचे गजरे करण्याचा व्यवसाय चालतो. इतर गावांत मात्र सुरंगीचे कळे सुकवून ते विकले जातात. एका मोठ्या झाडापासून दरवर्षी साधारण ३० ते ३५ किलो सुरंगी कळा मिळतो. याचा दर साधारण सहाशे रुपयापासून अडीचशे ते तीनशे रुपयांपर्यंत असतो. यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ८०० कुटुंबांचा सहभाग असतो. एका कुटुंबाला यातून एका हंगामाला पन्नास हजार ते साडेपाच-सहा लाखापर्यंत उत्पन्न मिळते. फुलांचा खरा हंगाम वर्षाला केवळ पंधरा दिवसांचा असतो. प्रत्येकी सर्वसाधारण उत्पन्न दोन लाखाचे धरले तरी एकूण उलाढाल १६ कोटींची होते. यासाठी झाडाची कोणतीही काळजी घ्यावी लागत नाही. अवघे पंधरा-वीस दिवस काम करून त्यावर वर्षभर आरामात जगणारी कुटुंबेही या भागात आहेत.
जीवघेणी जोखीम
अवघ्या पंधरा-वीस दिवसांत कोटीच्या घरात उलाढाल होत असली तरी यासाठीची मेहनत आणि जोखीम तितकीच आहे. सुरंगीचे झाड मोठे आणि पसरलेले असते. याच्या फांद्यांना फुले येतात. सकाळी दिसणारे कळे दहा वाजेपर्यंत फुलतात. त्याआधी कळे काढावे लागतात. याच्या फांद्या कमकुवत असतात. या झाडावर चढणेही अनुभवी आणि कसब असलेल्यांनाच शक्‍य होते. फुले छोट्या फांद्यांच्या खोडाला असल्याने ती काढणे कठीण असते. यासाठी झाडाला दोऱ्या बांधून ती काढावी लागतात. अगदी भल्या पहाटे या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात होते. या हंगामात सुरंगीच्या झाडावरून पडून जीवघेणी इजा झाल्याच्या घटना सर्रास घडतात. या झाडावर चढणाऱ्यांची मजुरी साधारण ६०० ते ८०० रुपयापर्यंत जाते. ज्यांना कळे काढणे शक्‍य नाही, ते झाडाभोवती शेणाचा सडा काढून किंवा प्लास्टिकचे मोठे कापड पसरून ठेवतात. पडलेली फुले गोळा करून ती सुकवली जातात. सुरंगीची झाडे आंब्याप्रमाणे खंडाने देण्याचीही प्रथा आहे.
अशी आहे बाजारपेठ
सुकलेल्या कळ्या आणि फुले याची स्थानिक पातळीवर खरेदी होते. याची स्थानिक बाजारपेठ शिरोड्यात आहे. कळ्यांना जास्त तर फुलांना कमी दर असतो. हा माल हवाबंद करून साठवला जातो. दरानुसार मुंबईला पाठवला जातो. तेथून पुढे याचे मार्केट कुठे आहे हे समजत नाही. याचा वापर सौंदर्य प्रसाधने, आयुर्वेदिक औषधे, सुगंधी द्रव्ये, रंग आदींसाठी केला जातो. सध्या सुरंगीची आवकच मर्यादित आहे. यामुळे याची बाजारपेठही मर्यादित राहिली आहे.
सुरंगीच्या विकासाचे प्रयत्न
सुरंगीचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदे खूप आहेत. हा जंगली वृक्ष असल्याने वातावरणातील बदलांचा तो मुकाबला करू शकतो. याची विशेष देखभाल घ्यावी लागत असल्याने खते व इतर खर्च होत नाही. याच्या फुलांमध्ये परागीकरणाची क्षमता जास्त असल्याने आंबा, काजूसह इतर पिकांना फायदा होतो; मात्र प्रमाणित कलम किंवा झाड नसल्याने आत्तापर्यंत याची स्वतंत्र लागवड होत नव्हती. ग्रामीण विकास क्षेत्रात काम करणाऱ्या लुपिन ह्यूमन वेलफेअर अँड रिसर्च फाऊंडेशन या संस्थेने २०१४ मध्ये यावरील संशोधनाला चालना दिली. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने सुरंगीवर संशोधन केले. बऱ्याच प्रयत्नानंतर सुरंगीचे प्रमाणित रोप बनविण्यात यश आले; मात्र अद्याप पुरेशा प्रमाणात याची कलमे बनविण्यात आलेली नाही. त्यामुळे ती सहज उपलब्ध नाहीत. लुपिनतर्फे सुरंगी कलम बसविण्याचे प्रशिक्षण नर्सरीधारकांना दिले जाणार आहे. यामुळे पुढच्या काळात सुरंगीची कलमे सहज उपलब्ध होणार आहे.
सुरंगी क्षेत्र वाढले तर
 शेतबांधाच्या कडेवर लागवड शक्‍य
 जंगली श्‍वापदांपासून धोका नाही
 वातावरण बदलाचा विशेष परिणाम नाही
 मशागतीचा खर्चही कमी
 आंतरपीक म्हणून लागवड शक्‍य
 चांगली बाजारपेठ उपलब्ध
 परागीकरणाची क्षमता जास्त असल्याने इतर पिकांना फायदा
असे आहे अर्थकारण
 सुरंगीचा व्यापार करणाऱ्या गावांची संख्या ९
 प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभार्थी कुटुंब ८००
 प्रत्येक कुटुंबाचे प्रतिहंगाम सरासरी उत्पन्न २,००,०००
 प्रतिहंगाम वार्षिक उलाढाल १६ कोटी
Previous articleनशिबवान धोत्रे… संघर्ष आंबेडकर, पटेलांनाच !
Next articleपोएटिक व्हायोलंस
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

  1. अभ्यासपूर्ण लेख. आपल्या लेखां मध्ये उल्लेख आलेल्या गावामधून फिरणे झाले.खुप रंजक माहिती मिळाली. सुंदर लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here