स्त्री-पुरुष (विवाहबाह्य) संबंध- भाग पहिला

– मिथिला सुभाष
**********************

विवाहबाह्य संबंध असावेत की नाही, याची चर्चा करणारा हा लेख नाही. असे खूप संबंध आसपास दिसताहेत, त्यापाई आयुष्याचा फुफाटा करून घेतलेली माणसं जवळपास दिसताहेत. मलाच नाही, तुम्हा सगळ्यांना असे जिवलग माहीत असतील जे विवाहबाह्य संबंधात आहेत. त्यामुळे अत्यंत कळवळीने केलेलं हे मार्गदर्शन आहे. ‘मला ते मार्गदर्शन करण्याचा अधिकार काय?’ असा प्रश्न डोक्यात आला असेल तर त्याला माझं एकच उत्तर आहे, विष खाऊन माणूस मरतो, ही माहिती असण्यासाठी विष खाऊन बघावं लागतं का? नाही ना..?? मग झालं तर..!!

……………………………..

स्त्री-पुरुष संबंध म्हंटल्यावर अगदी स्वाभाविकपणे आठवते ते पती-पत्नी नाते. या नात्याला कौटुंबिक, सामाजिक आणि मानले तर धार्मिक संदर्भ असतात. पण आज माझ्या डोक्यात स्त्री-पुरुष संबंध म्हणजे स्पष्ट सांगायचं झालं तर ‘विवाहबाह्य संबंध’ हा विषय असल्यामुळे आज तरी मी पती-पत्नी नात्याबद्दल फार लिहिणार नाहीये. याला आणखीही एक कारण आहे. याबाबतीतला माझा अभ्यास आणि माझी मतं फारच आग्रही असल्यामुळे मी शंभरपैकी नव्व्याण्णव मित्रांना खात्रीने दुखावणार. ‘तुमच्या कुल्याला फोड झालंय आणि ते मला दिसलंय,’ असं सांगितल्यावर कुणीही बिथरणार. (लग्नसंस्था आणि कुटुंबव्यवस्था यांचं उबग येईपर्यंत कौतुक हा एका मोठ्या स्वतंत्र लेखाचा विषय आहे.) याचा अर्थ सगळ्या लग्नात प्रॉब्लेम्स असतात असं मला म्हणायचं नाही. अतिशय सुखाने अनेकानेक वर्ष संसार करणारी भरपूर जोडपी आहेत. पण कुठल्यातरी कारणाने लग्न शाबूत ठेवण्याचं प्रमाणही फार जास्त आहे. आणि हे नेणिवेच्या पातळीवर इतकं प्रच्छन्नपणे होत असतं की आपण आपलं लग्न प्रयत्नपूर्वक टिकवून ठेवलंय हे फार कमी लोकांना जाणवतं.  यात फक्त कुणा एकाची चूक असते असंही नाही. (लग्नसंबंधात बायका पुरुषांना जेवढा त्रास देतात तेवढा त्रास कदाचितच त्या पुरुषाला दुसरं कुणी देत असेल, असं माझं मत आहे.) सेक्सचं राजकारण, मुलांच्या मालकी हक्काचं राजकारण हे बायकांच्या खास आवडीचे आणि नवऱ्याला चिमटीत धरणारे क्षेत्र. आणि घराकडे दुर्लक्ष करणं, बाहेर प्रकरणं करणं, केली नाहीत तरी ती आहेत अशा फील’मधे तिला ठेवणं हे पुरुषांचे आवडीचे क्षेत्र. असो, एकूण काय? अनेक गोष्टी अशा असतात ज्यांच्यावर झाकणं घातलेली असतात. पण संसार चालत राहतो. कौटुंबिक सोहोळ्यांना जोडप्याने उपस्थित राहणं, लग्नाला पंचवीस वर्ष झाल्यावर पुन्हा एकदा धुमधडाक्यात लग्न करणं वगैरे साग्रसंगीत होत असतं. पण आत कुठेतरी एक तंतू विरलेला असतो. हा एक असा विषय आहे की, ‘यात अपवाद आहेत’ असं म्हंटल्यावर जवळजवळ प्रत्येकाला ‘आपण अपवाद आहोत’ असं वाटतं. “आणि ती दोघं सुखाने जगू लागली” हे वाक्य प्रत्येकाला आपल्यासाठी हवं असतं. पण या ‘सुखा’चे निकष प्रत्येक जोडप्यागणिक वेगळे असू शकतात. दोघांची बौद्धिक पातळी, कुठलीही गोष्ट डोक्यात रजिस्टर होण्याचा बक़ूब आणि ते मान्य करण्याचा उमदेपणा/अक्कल प्रत्येकागणिक वेगवेगळी असू शकते. तरुणपणात आगीसारखा तळपणारा पुरुष पन्नाशीनंतर एकदम बायकोच्या ‘अर्ध्या वचनात’ जातो, त्यामागच्या कारणांची चर्चा मी माझ्या दुसऱ्या लेखात करणार आहे. कारण या लेखात मला शारीर संबंधांना हातही लावायचा नाहीये.

या संदर्भातले स्त्री-पुरुषाचे दुसरे नाते म्हणजे, दोघं विवाहित असतांना आपापल्या कायदेशीर विवाहित जोडीदारापासून लपवून दुसऱ्याच स्त्री/पुरुषाशी असलेलं छुपं प्रेम-प्रकरण. हा विषय आता अनुल्लेखाने टाळण्यासारखा नगण्य राहिलेला नाहीये. खरं तर याला ‘प्रेम-प्रकरण’ म्हणायचं की नाही याबद्दल थोडं साशंक व्हायला होतं. मन आणि मेंदूच्या एका विशिष्ट परिपक्वतेनंतर कुठलंही माणूस ‘पुन्हा प्रेम’ करू शकत नाही/करत नाही. शिवाय, जो एकदा आपल्या लग्नाच्या जोडीदाराला फसवू शकतो त्याला दुसऱ्या कुणालाही फसवणं सहज शक्य असतं, मग तो/ती करतात ते प्रेम कसं, हाही एक विचार येतोच डोक्यात. पण या बाबतीत कसलेही जनरलायझेशन करून चालण्यासारखं नाहीये. असे संबंध अत्यंत प्राणपणाने निभावून, ते प्रेमाचे संबंधच आहेत हे सिद्ध करणारी माणसंही आहेत. आपलं प्रेम टिकावं, बहरावं, यासाठी त्यांनी जे पराकोटीचे कौटुंबिक आणि सामाजिक त्रास सहन केलेले असतात, ते पाहून असं वाटतं, खरंच देवच चुकला होता जोडी लावायला.

विवाहबाह्य संबंध होण्याची अनेक कारणं असतात. त्यातलं एक कारण म्हणजे, ‘बौद्धिक गरज.’ ही गरज पूर्ण न होणं ही फार मोठी उपासमार असते. आपल्याकडे माणसाची बौद्धिक वाढ पूर्ण होण्याआधीच त्याचं लग्न झालेलं असतं. नंतरच्या काळात या जोडप्यातला एक कुणीतरी डोक्याने वाढतो, इवॉल्व्ह होतो. दुसरा जिथे जसा होता तिथे तसाच राहतो. फक्त वयाने वाढतो. दोघातली बौद्धिक दरी वाढत जाते. संसार सुरु असतो, पण एकजण असंतुष्ट असतो. अशात त्याला/तिला स्वत:च्या बुद्धीला अनुरूप असं कुणी भेटलं तर आकर्षणाने सुरुवात होते आणि दोघं जवळ येतात. अशा संबंधात शारीरिक संबंधही असतात, पण आकर्षण बुद्धीचं असतं. पहिलं प्रेम बुद्धीवर असतं. मात्र, स्त्री-पुरुष प्रेमाचा सर्वोच्च बिंदू नेहमीच ‘शारीर’ असतो. जिथे प्रेम व्यक्त होण्यासाठी शब्द, स्पर्श वगैरे तोकडे पडायला लागतात तेव्हा असह्य असोशीने शरीरात प्रवेश हाच अंतिम पर्याय असतो. हा संबंध मॅच्युअर असतो. एकमेकांकडून काही अपेक्षा नसतात. दोघं समजूतदार असतात. त्यामुळे विरहही जीवघेणा असला तरी एकमेकांनाही न सांगता दोघं तो सहन करतात. काही कारणाने कायमचं दूर जाण्याची वेळ आली तरी परस्परांना न दुखावता ही दोघं दूर होतात. यांना एकमेकांच्या खाजगी आयुष्याशी फारसं घेणंदेणं नसतं. त्यांनी एकमेकांना कसल्याही भ्रमात ठेवलेलं नसतं आणि भलत्या अपेक्षाही ठेवलेल्या नसतात. असे संबंध तुटल्यावर ही माणसं भावनिकदृष्ट्या कोलमडतात. पण नेहमीचे व्यवहार सुरु ठेवतात. यांच्या मनात प्रचंड उलथापालथ होतेय हे बाहेर कुणाला कळतही नाही. “समजूतदार आहात ना, मग मरा” हे यांच्याबाबतीत अगदी खरं असतं.

त्यामानाने सहेतुक संबंध अत्यंत तापदायक असतात. यात लग्न, पैसा, मजा, स्थैर्य असा कुठलाही हेतू असू शकतो. पैकी जर एका कुणालातरी लग्न करायचं असतं आणि दुसऱ्याला ते टाळायचं असतं, तेव्हा तर हे संबंध अतिशय मिझरेबल होतात. यात पुरुषाची पोजिशन, पौरुष, पैसा पाहिला जातो आणि बाईचे सौष्ठव, रूप आणि ‘ती गळ्यात तर पडणार नाही ना’ ही खात्री पाहिली जाते. यात दोघांची ‘जाळ्यात सापडण्याची कमी-अधिक असोशी’ फार महत्वाची असते. त्यावरून या प्रकरणी पुढाकार कोण घेणार ते ठरते. हे संबंध सुरु होतांना जनरली “माझी बायको मला सुख देत नाही” किंवा “माझ्या नवऱ्याचा सेक्समधला इंटरेस्ट संपलाय”टाईप्स विधानं केली जातात. ती खोटी असतात, असंही मला म्हणायचं नाही. ती असतही असतील खरी. पण जिथे सुरुवातच अशी होते तिथे हे सगळं प्रकरण फक्त शरीराभोवती फिरत राहतं. मग त्यातून काहीही कॉम्प्लेक्सेस निघतात. याबाबतीत दोघांनीही काही गोष्टी कटाक्षाने पाळाव्या. “तुम्ही एका बेडरूममध्ये झोपता का?” “तुमची मुलं कुठे झोपतात?” “तू तिला/त्याला हात लावत नाहीस म्हणजे मिठीही नाही का मारत?” “आज तुझे डोळे का असे तारवटलेले दिसताहेत, गडबड केलीस ना रात्री?” असे चढत्या भाजणीचे प्रश्न एकमेकांना विचारू नये. “आज कुठे जाणारेस? काल कुठे गेला होतास? कोणाशी बोलत होतास एवढा वेळ” या प्रश्नांना काही अर्थ नसतो. अशा फाजिल चौकशांमुळे एकमेकांचा कंटाळा येण्याची शक्यता असते. विवाहबाह्य संबंधात प्रत्येकाने आपली जागा, आपली पायरी ओळखून राहायचं असतं. हिच्या/याच्या जोडीदारासोबत यांचा काही वर्ष संसार झालाय, दोघांनी एकमेकांना सुख-दु:खात साथ दिलीये. आणि आपण आत्ता आलोय, हे भान ठेवले तरच या चोरट्या संबंधातून काहीतरी सुख हाती लागू शकेल. “आपण याच्या/हिच्या आयुष्यात आलो म्हणजे खलास, आता याने/हिने आपल्या लग्नाच्या जोडीदाराकडे ढुंकून पाहायचं नाही,” ही अपेक्षा असेल तर विवाहित व्यक्तीशी संबंध ठेवायचा नाही !! तात्कालिक शारीरिक गरज म्हणून, जोडीदाराला संशय येऊ नये म्हणून, त्याच्याबद्दल वाटत असलेल्या गिल्टपासून सुटका मिळावी म्हणून, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, त्याच्यावर कधीतरी असलेलं प्रेम विसरता येत नाही म्हणून संबंध पूर्णपणे तोडणं शक्य होत नाही. आणि सरळसरळ घटस्फोट घेऊन तुमच्याशी लग्न करण्याची हिंमत किंवा इच्छा तुमच्या प्रियकराला/प्रेयसीला नसेल, आणि तरीही तुम्हाला त्याच्या/तिच्याबरोबर कंटिन्यू करायचं असेल तर या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे.

या सगळ्या अव्यापारेषु व्यापारात स्त्री-पुरुषांचा एक गट असा असतो जो भयंकर खतरनाक असतो. मी या विषयावर बोलतांना नेहमी म्हणते की, “विवाहबाह्य संबंध जुळवताना ९८% माणसं हेच सांगतात की माझ्या जोडीदाराचं आणि माझं जमत नाही.” त्याची विविध कारणं ही सांगतात. मला कधीही कुणी हे विचारलं नाही की उरलेली दोन टक्के माणसं कसं जुळवतात. त्या दोन टक्क्यांबद्दल मी आत्ता बोलतेय. ही माणसं (बाई किंवा पुरुष, पण बहुधा पुरुषच.) पहिल्या-दुसऱ्या भेटीतच सांगतात की, “माझं माझ्या बायकोवर अतिशय प्रेम आहे, तिचंही माझ्यावर नितांत प्रेम आहे आणि I am happily married !!” मी वर कंसात ‘बहुधा पुरुषच’ असं का लिहिलंय त्याचं कारण सांगते. हे ‘happily married’ प्रकरण जर बाई बोलली तर पुरुष तिला सरळ विचारतो की मग माझ्याकडे कशाला आलीस? हेच जर पुरुष बोलला तर सगळ्याच बायकांना हा प्रश्न सुचत नाही. (याचं कारण मी माझ्या पुढच्या लेखात लिहेन. कारण ते तिच्या नैसर्गिक प्रेरणेशी संबंधित आहे.) अशा पुरुषांना मी खतरनाक म्हणतेय याचा अर्थ ते खोटं बोलत असतात असंही नाही. ते असतात happily married. पण लग्नाच्या चित्रातला एक कुठला तरी कोपरा बेरंग, रिकामा झालेला असतो आणि तेवढ्याच जागेपुरती त्याला दुसरी बाई हवी असते. तिने त्या तेवढ्या जागेच्या बाहेर त्याच्या आयुष्यात पाऊल टाकायचं नसतं. त्यामुळे, ‘मला तुझी फारशी गरज नाही, तू माझ्या गळ्यात पडण्याचा विचारही करू नकोस आणि मी तुला प्रतिसाद दिला ही मी केलेली मेहेरबानी आहे,’ हे सगळे निरोप तो न बोलता पोचवत असतो. अशा प्रकरणांवर खरं तर त्या पहिल्या वाक्यावरच फुलस्टॉप लागायला पाहिजे. पण नाही ना लागत. कारण काही बायका मूर्ख असतात. आणि मग आमच्यासारख्या काहींना असे लेख लिहायला लागतात. असो.

हा लेख म्हणजे ‘लफडी कशी करावी’ याचे प्रशिक्षण नाही. असे संबंध कुठल्याही काळात कुणालाही कायमस्वरूपी सुख देत नाहीत. त्यातून दु:खच निपजते. पण, ‘लफडी करू नका,’ हे सांगणारी मी कोण? त्यामुळे जे काही करताय ते निदान जपून, सांभाळून करा. होता होईलतो त्यातून सुख मिळवा, हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे. अशा संबंधात आणि असे संबंध जुळले जाण्यात लैंगिकतेची फार महत्वाची भूमिका असते. त्याबद्दल पुढल्या लेखात…

क्रमश:

Previous articleपहिला पेशवा : बाळाजी विश्वनाथ
Next articleविनोबांच्या प्रायोपवेशनाची हकीकत
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here