स्त्री बनून बघ…

तो बुध्द झाला
रात्री अपरात्री संसार सोडून
सत्य शोधत तो
बाहेर पडला. ..
बायको मुलाला त्यागुन
तो सिद्धार्थ बुद्ध झाला …..

….

तो भर लग्नाच्या मांडवातून
ना कुणाचा विचार
ना कसला आचार
निसटला मनासारखे करून
मनाच्या शोधात. ..
मनाचा अभ्यास करून
रामदास स्वामी झाला. …

तो संसार उघडय़ावर
सोडून वाऱ्या सारखा
बिनधास्त निगड
वनात बसला
तासनतास
भजनात दंग होऊन
अंभग भजले आणि
तुकाराम महाराज झाला ……

तो पळाला कुरूपतेला
घाबरून
स्वरुपात येण्यासाठी
तुळस दारात उभी करून
तुलसीदास बनला. …..


कुणी विचारले नाही
काय झाले तीचे. .
जीची रात्र संपली नसेल
ती. ..?

जर ती गेली असती
सोडून रात्री अपरात्री
सत्य शोधत बुद्ध होण्यासाठी

जर ती सोडून गेली
असती मनाच्या शोधात
भर मांडवातून पळुन. ….

जर ती बसली असती
भजनात दंग होऊन
तर……!!!!

तर काय तिला
बुध्द, रामदास, तुकाराम …
बनू दिले असते
इतक्या सहज,
आणि स्विकारला असता


तिचा श्लोक?

तिचा अभंग?

तिचा संसार त्यागलेला
तो सत्याचा बोध?
………..
उलट समाजाने अग्नीपरिक्षा घेतली असती
एवढेच नव्हे, तर बहिष्कृत ही केले असते ……
त्याकाळात ……

आजही म्हणावा तितका फरक पडला नाही …

 

Previous articleसुखदुःखाचा ताळेबंद….
Next articleउद्धव ठाकरेंसमोरची आव्हानं
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here