सौजन्य लोकसत्ता
शरद बेडेकर
स्मृतिपुराणे हे पुरोहित रचित ग्रंथ आहेत. देवाच्या नावाने आणि मृत्यूनंतरच्या कल्पित भयानक ‘परलोक जीवनाच्या’ म्हणजे ‘नरकवासाच्या’ नावाने, लोकांना भयभीत करून, अशा दृढ झालेल्या भीतीवर आपली उपजीविका करणाऱ्यांचे हे ग्रंथ आहेत. त्यात केवळ थापा, भाकडकथा असून, त्यात काहीही सत्य नाही.
मागील प्रकरणात आपण पाहिलेली ‘धर्मसूत्रे’ व या प्रकरणांतील ‘स्मृतिग्रंथ’ यांत एक महत्त्वाचा फरक असा आहे की, धर्मसूत्रांचे रचिते स्वत:स ‘दिव्य दृष्टी असलेले ऋषी’ अथवा देवादी अतिमानव कोटींतील व्यक्ती म्हणवीत नाहीत तर याच्या उलट मनु आणि याज्ञवल्क्य यांच्या स्मृतींचे कर्तृत्व ब्रह्मदेवासारख्या मुख्य देवाकडे असल्याचे त्याच ग्रंथांमध्ये सांगितलेले आहे. ग्रंथ रचणाऱ्यांचा ‘प्रामाणिकपणा’ कमी होत चालल्याचा हा परिणाम असावा. (हा निष्कर्ष माझ्यासारख्या निरीश्वरवाद्याचा नसून, महामहोपाध्याय काणे यांचा आहे.
वेदांचा विषय ‘यज्ञीय कर्मकांड’ हा आहे. उपनिषदांचा विषय ‘ब्रह्मविद्या’ हा आहे, तर सूत्रात व स्मृतीत ‘वर्णाश्रम धर्माचे’ सविस्तर प्रतिपादन आहे. सूत्रांतील व स्मृतींतील ‘वर्णाश्रम धर्माबाबत’ असे सांगितले जाते की, हे धर्मशास्त्र व सामाजिक चालीरीती व कायदे, वैदिक आर्याचेच आहेत व त्यांची ती स्मरणपूर्वक केलेली नोंद आहे. हे मात्र खरे नव्हे. कारण वेदोपनिषद काळात समाज चातुर्वण्र्यावर म्हणजे जन्मानुसार होणाऱ्या भेदाभेदांवर आधारित नव्हता आणि वर्णवर्चस्वाधारित समाज ही सूत्र व स्मृतिपुराण काळांतील हिंदू धर्माची अवनती आहे.
कालानुक्रमे पाहिल्यास प्रमुख धर्मसूत्र ग्रंथांनंतर इ.स.पू. २०० ते १५०च्या आसपास योगसूत्रकार महामुनी पतंजली होऊन गेला. त्याच्यानंतर म्हणजे इ.स.नंतरच्या दुसऱ्या शतकात केव्हा तरी स्मृतींमध्ये सर्वात प्राचीन व प्रसिद्ध असलेली ‘मनुस्मृती’ रचली गेली असावी असे दिसते. त्यानंतर पराशर, याज्ञवल्क्य, नारद यांसारख्या स्मृती रचल्या गेल्या असाव्यात असे दिसते. यांच्याखेरीज बाकीच्या बहुतेक स्मृतींच्या रचना इ.स. ४०० ते इ.स. १००० या कालखंडात झालेल्या आहेत. मानवजातीचा मूळ पुरुष म्हणून वेदोल्लेखित मनु हा मनुस्मृतीरचिता मनु निश्चित नव्हे, कारण त्याला त्यासाठी दोन हजारांहून अधिक वर्षांचे आयुष्य मानावे लागेल. तशाच कारणाने याज्ञवल्क्य स्मृती रचणारा कृषी हा बृहदारण्यकोपनिषदात आलेला याज्ञवल्क्य नक्की नव्हे. तसेच नारदस्मृती रचणारा नारद हा स्मृतीकाळांतील कुणी तरी मानवी ऋषीच होता; तो विष्णूचा अतिमानवी संदेशवाहक, नारायणाचा नामजप करणारा नारद नाहीच नाही.
मनुस्मृतीच्या सुबोध, ओघवती व पाणिनीय व्याकरणाशी जुळणाऱ्या भाषेतील २७०० श्लोकांमागील भूमिका अशी आहे की, ‘ब्रह्मदेवाने उत्पन्न केलेले धर्मशास्त्र मनुला प्राप्त होते आणि निरनिराळ्या वर्णाचे धर्म (!) समजून घेण्याकरिता त्याच्याकडे आलेल्या ऋषींना तो ते शिकवितो. संक्षिप्तपणे मनुस्मृतींतील विषय खालीलप्रमाणे आहेत- कालगणना, निरनिराळ्या युगांतील धर्म, धर्माची व्याख्या, निरनिराळे संस्कार, तसेच ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास या चार आश्रमांतील कर्तव्ये, राजधर्म, जकाती, अपराध व शासन, न्यायदान, सात प्रकारचे दास, पती-पत्नींची कर्तव्ये, बारा प्रकारचे पुत्र, संपत्ती वाटप, वारसा, पातके, प्रायश्चित्ते, चारही वर्णाचे अधिकार व कर्तव्ये, पूर्वजन्मांतील पातकांची दृश्य फळे, पापनाशक मंत्र (!), कर्माविषयी विवेचन इत्यादी. मनुस्मृतीवरून असे दिसते की, १) त्या काळात समाजाची फक्त जन्मावरून चातुर्वण्र्यात स्पष्ट विभागणी दृढ झालेली असून ती अधिक दृढ व दुष्ट केली जात आहे. २) विवाहसंस्था नीट निर्माण झालेली असून ती व्यवस्थित आकार घेत आहे. ३) आत्मा, पुनर्जन्म इत्यादी उपनिषदिक कल्पना, जनमनात रुजल्या आहेत. ४) भारतरत्न म. म. काणे यांच्या मते मांसभक्षण, नियोग वगैरे काही बाबतींतील ‘परस्परविरोधी मतेसुद्धा’ मनुस्मृतीत आलेली आहेत. ती बहुधा जनसामान्यांच्या बदललेल्या मतांशी जुळवून घेण्यासाठी (पण इ.स.नंतरचे तिसरे शतक संपण्यापूर्वी) बदलली असण्याचा संभव आहे, असे ते म्हणतात.
याज्ञवल्क्य स्मृतीची रचना इ.स.च्या तिसऱ्या शतकात झालेली असावी. तीत मनुस्मृतींतील सर्व विषयांचे अधिक व्यवस्थित व आटोपशीर विवेचन असून ती फक्त सुमारे १००० श्लोकांत आटोपलेली आहे. या स्मृतीचे कौटिलीय अर्थशास्त्राशी पुष्कळ साम्य दिसून येते व कौटिलीयाचा रचनाकाळ लक्षात घेता याज्ञवल्क्याने कौटिलीयांतून काही मते घेतली असावीत. या प्रमुख स्मृतींच्या पुढील पाच-सहा शतकांत आणखी वीस स्मृतिकारांनी आपापल्या स्मृतिरचना केलेल्या आहेत. प्राचीन पुराणांच्या रचनासुद्धा याच काळात झालेल्या आहेत.
कालौघात असे घडले की, स्मृतिपुराणांना व विशेषत: प्राचीन स्मृतींना, त्यांची भाषा जवळची आणि विषय व उदाहरणे कालोचित असल्यामुळे, हिंदू धर्मात मोठे प्रामाण्य प्राप्त झाले. प्रत्यक्षात वेदोपनिषदे बाजूला राहून, स्मृतींचा धर्मग्रंथ म्हणून उपयोग होऊ लागला आणि इथेच हिंदू धर्माची गाडी रुळावरून घसरली असे मला वाटते. पूर्वी न्याय, नीती, बंधुप्रेम, संस्कृतिसंगम इत्यादी आदर्श तत्त्वे मानणारा हिंदू धर्म आता जन्मावर आधारित वर्णभेद, जातीभेद मानणारा आणि बहुसंख्य जनतेवर उघडपणे आणि आयुष्यभर भयंकर अन्याय लादणारा धर्म बनला. गुण, कर्म, कौशल्य हे निकष रद्द होऊन, जन्म हा एकच निकष उरला. वेगवेगळ्या वर्णाना एकाच अपराधाबद्दल वेगवेगळा न्याय असे ठरविण्यात आले. हिंदू धर्म हा ब्राह्मण धर्म बनला. सर्व कायदे व नियम ब्राह्मणांच्याच फायद्यासाठी बनवून ब्राह्मणेतरांना नीचत्व देऊन त्यांचे अहित होईल असे नियम बनविण्यात आले आणि तोच त्यांच्या पूर्वजन्मांतील पापांमुळे त्यांना या जन्मी मिळालेला ‘दैवी न्याय’ आहे असे खोटेच सांगण्यात आले. शूद्रांसाठी तर अस्पृश्यता आणि भयानक रानटी शिक्षा सांगितल्या. उगाच नाही डॉ. आंबेडकरांनी जाहीरपणे मनुस्मृती जाळून टाकली ते (इ.स. १९२७).
आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे जरूर आहे. १) अग्न्यास्त्र, पर्जन्यास्त्र, पाशुपतास्त्र, ब्रह्मास्त्र अशा कित्येक ‘काल्पनिक अस्त्रांचे’ उल्लेख व २) तपश्चर्येने अतिनैसर्गिक शक्तिसामर्थ्यांचे काही ‘वर’ प्राप्त करून घेणे किंवा कुणा ऋषीने कुणाला ‘शाप’ देऊन त्याचे काही वाईट घडवून आणणे (चांगला उपाय आहे, शत्रूला फक्त शाप द्यायचा, प्रत्यक्ष हल्ला करायलाच नको!) आणि ३) पृथ्वीवरच्या राजांनी, इंद्राला साह्य़ करण्यासाठी स्वर्गात जाणे, अशासारखी ‘काल्पनिक वर्णने’ जी वेदांमध्ये मुळीच आलेली नाहीत ती रामायण, महाभारतात व आमच्या पुराण उपपुराणात भरपूर आहेत. बहुतेक पुराणवर्णने असंभाव्य अशा चमत्कारांनी व काल्पनिक दैवी शक्ती प्राप्त केलेल्या मनुष्यांच्या गोष्टींनी भरलेली आहेत. पुराणातील समुद्रमंथन, विष्णूचे अवतार व पराक्रम, पशु-पक्ष्यांच्या तत्त्व चर्चा, पतिव्रतांची महान कृत्ये, ऋषिमुनींचे मंत्रसामथ्र्य, यज्ञ व त्यांची फळे, विविध पूजा, व्रतवैकल्ये, उपासना व त्यायोगे होणारी सुखसंपत्ती, पुत्रपौत्र, राज्य, साम्राज्य, दीर्घायुष्य, स्वर्ग, मोक्षादिकांची प्राप्ती, अशी असंख्य वर्णने केवळ कविकल्पना आहेत व त्यांनी हजारो वर्षे हिंदूंचे मन वास्तविकतेपासून फार दूर असलेल्या एका ‘रमणीय परंतु असत्य विश्वात’ पार गुंगवून ठेवलेले आहे.
हिंदूंच्या या पुराणग्रंथांनी अशी खोटी व भ्रामक भारुडे रचून व ती हिंदूंच्या कानांवर वारंवार आदळून, हजारो वर्षे हिंदूंचा बुद्धिभ्रंश केलेला आहे. त्यांना अंधश्रद्धारूपी अंधकारात आणि परमेश्वर कृपेच्या खोटय़ा आशेत बुडवून ठेवले आहे. पुनर्जन्म, देवकृपा, ईश्वरी शक्ती, माया, चमत्कार, साक्षात्कार, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान इत्यादी भ्रांत कल्पनांमुळे आणि जबरदस्त संस्कारांमुळे हिंदूंचे जीवन ‘अवास्तव’ दृष्टिबाधित’ बनलेले आहे. दैववादाने ते अंध झालेले आहेत आणि प्रत्यक्ष जीवनाला विवेकाने व धैर्याने सामोरे जाण्याची कुवत किंवा भान त्यांना उरले नाही. त्यामुळे पुढील काळातील मुसलमानी आक्रमणांना ते बळी पडले. त्यामुळे आजही ते सतत आध्यात्मिक गुरूंच्या शोधात राहतात व त्यांचे दास होण्यात सुख मानतात. अशा प्रकारे पुराणांच्या तर्कदुष्ट संस्कारांमुळे हिंदूंचे कायम व अपरिमित नुकसान झालेले आहे.
स्मृतिपुराणे हे पुरोहित रचित ग्रंथ आहेत. देवाच्या नावाने आणि मृत्यूनंतरच्या कल्पित भयानक ‘परलोक जीवनाच्या’ म्हणजे ‘नरकवासाच्या’ नावाने, लोकांना भयभीत करून, अशा दृढ झालेल्या भीतीवर आपली उपजीविका करणाऱ्यांचे हे ग्रंथ आहेत. त्यात केवळ थापा, भाकडकथा असून, त्यात काहीही सत्य नाही. अशा ग्रंथांना हिंदू धर्माचे धर्मग्रंथ मानणे हे हिंदू धर्माला शोभादायक नाही, असे माझे मत आहे. आजही अनेक हिंदूंना, स्वर्गातील इंद्रदरबार, नारदाचा त्रिलोक संचार, इत्यादी गोष्टी खऱ्या वाटतात, यावरून स्मृतिपुराणांच्या भाकडकथांचा परिणाम, किती काळ जनमानसावर टिकून राहिलेला आहे, ते दिसून येते.
शरद बेडेकर
सौजन्य लोकसत्ता