हलत्या चित्रांचा ग्लोकल मीडिया

 

(‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०१७)

          

     नीलेश बने

 

१८९६ मध्ये जेव्हा गोऱ्या सायबाने भारतात शिनेमा आणला तेव्हा ‘भुताटकी- भुताटकी’ म्हणून बोंबाबोंब झाली होती. दादासाहेब तोरणे आणि दादासाहेब फाळके या दोन दादांनी अक्षरशः आपला संसार पणाला लावून, ही हलत्या चित्रांची गंमत भारतीय मातीत रुजवली. भारतात १९१२-१३ मध्ये सुरू झालेल्या हलत्या चित्रांच्या पडद्यावर लोकं खिशातील नोटा-नाणी उडवित असत. आज शंभर वर्षानंतर ही हलती चित्रे, त्याच नोटा-नाणी ठेवायच्या खिशातील मोबाइलमध्ये आलीत. आज दर मिनिटाला सुमारे ३०० तास लांबीचे विडिओ एकट्या युट्युबवर अपलोड होताहेत आणि हे सगळे क्षणक्षणाला बदलतेय. हलत्या चित्रांचा ग्लोकल ट्रेण्ड शब्दात पकडण्याचा हा ‘लाइव्ह’ प्रयत्न…

 

…………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………….

मस्तानअम्मा… वय फक्त १०६ वर्ष. मुक्काम पोस्ट गुडिवाडा, जिल्हा गुंटूर, आंध्र प्रदेश. डोक्यावर केसांच्या पांढऱ्याशुभ्र सुतरफेण्या, चेहऱ्यावर पडलेल्या खोलखोल सुरकुत्या आणि आजही हाताला असलेली गावरान चव. ही आज्जी आज सर्वात वयोवृद्ध युट्युबर असल्याचा दावा करतेय. तिच्या चॅनलला आजघडीला सहा लाख सत्तर हजार सबस्क्राइबर असून हा आकडा दिवसेंदिवस वाढतोच आहे.भाताच्या शेतात उघड्यावर चूल मांडून ही आज्जी एकसोएक भन्नाट पदार्थ बनविते. कलिंगडामध्ये शिजवलेले चिकन, बाबूंच्या नळकांड्यात बनविलेली बिर्यानी इथपासून ते थेट गावरान पद्धतीच्या बर्गर पर्यंतचे नमुनेदार पदार्थ ही आज्जी लिलया बनविते. तिच्या सुना-नाती तिला मदत करतात. तिचे नातू या रेसिपींचे व्हिडिओ बनवितात आणि युट्युबवर कंट्री फूड या चॅनलवर अपलोड करतात. आज जगभरात ही आज्जी सेलिब्रिटी शेफ झाली आहे. हफिंग्टन पोस्ट, टेलिग्राफसारख्या जागतिक वृत्तपत्रांनी तिची दखल घेतली आहे. एवढेच नव्हे तर तिच्या वाढदिवसाला जगाच्या कानाकोपऱ्यातून हजारो संदेश आणि भेटवस्तू आल्या. पाकिस्तानातील तिच्या एका चाहत्याने तर तिला चक्क साडी पाठविली.हे सारे काय चालले आहे? हा प्रश्न जेवढा विचार करावा तेवढा जास्त गुंतागुंतीचा होत जातो. कोण कुठली मस्तानअम्मा? ती जे काही करते ते जगाला का आवडावे? तिच्या नातवांची ही आयडिया, फक्त आज्जीलाच नाही, तर त्यांनाही नाव, पैसे खूप काही देऊन जाते. सोबत आज्जीची हातच्या गावरान भारतीय चवीचे डॉक्युमेंटेंशन झाले ते वेगळेच. एका छोट्या गावात चालणारा हा ‘लोकल’ प्रयोग आज ‘ग्लोबल’ पातळीवर पोहचतो. ग्लोबल अधिक लोकल जगाची बेरीज होऊन होणारे ‘ग्लोकलायझेन’ म्हणतात ते याहून अजून काय वेगळे असणार?

२२ मार्च १८९५ मध्ये पॅरिसमध्ये ल्युमिएर बंधुनी पहिल्यांदा जगाला सिनेमा दाखवला. त्यानंतर वर्षभरातच म्हणजे ७ जुलै १८९६ रोजी मुंबई विद्यापीठाच्या शेजारी असलेल्या वॉटसन् हॉटेलमध्ये ल्युमिएर बंधुचे हे छोटे सिनेमे दाखविले गेले. भारताच्या मातीने पाहिलेली ही पहिली हलती चित्रे. फॅक्टरीतून बाहेर पडणारी माणसे, झाडाला पाणी घालणारा माळी, धावत येणारी ट्रेन अशी अगदी एका मिनिटापेक्षा कमी कालावधीचे हे विडिओ होते. हलत्या चित्रांची ही भुताटकी दोन मराठी माणसांच्या मानगुटीवर बसली. त्यांनी आपल्या संसारापेक्षा कॅमेराचा ध्यास घेतला. दादासाहेब तोरणेंनी भक्त पुंडलिक हे नाटक कॅमेऱ्यामधून चित्रित केले आणि १९१२ मध्ये ते जगाला दाखविले. दादासाहेब फाळकेंनी १९१३ मध्ये वेगवेगळ्या लोकेशनवर जाऊन राजा हरिश्चंद्र या पहिल्या वहिल्या सिनेमाची निर्मिती केली.  नाटकाचे चित्रीकरण असो किंवा सिनेमाची निर्मिती… ही हलती चित्रे भारतीयांनी डोक्यावर घेतली. तिथपासून सुरू झालेला हा प्रवास आज हजारो कोटी रुपयांच्या भारतीय सिनेउद्योगात परावर्तित झाला आहे. मोठ्या पडद्याच्या सोबतीला ६० च्या दशकामध्ये टीव्ही आला आणि ९० च्या दशकात कॉम्प्युटर. त्यानंतर मोबाइल स्मार्ट झाला आणि इंटरनेटच्या वायरलेस जगाने हलणारी ही चित्रे अक्षरशः कुठेही पाहता येऊ लागली. या साऱ्या बदलांनी फक्त चित्रांची दुनिया बदलली नाही, तर माध्यमांची गणिते बदलली. एवढेच नाही तर, माणसाचा जगाकडे आणि जगण्याकडे बदलण्याचा दृष्टिकोन बदलला.  जर तुम्ही फेसबुक वापरत असाल, तर तुमच्या स्क्रोलमध्ये वाढलेले गेल्या वर्ष-दोन वर्षांमध्ये विडिओंचे प्रमाण तुमच्या लक्षात आलेच असेल. या स्क्रोलमध्ये विडिओ दिसतो म्हणजे थेट सुरूच होतो. मग त्यातील पहिल्या काही क्षणांमध्ये त्याने तुमचे लक्ष वेधून घेतले की, पुढील काही मिनिटे तुम्ही तो विडिओ पाहत बसता. या साऱ्यातून जे काही विराट विश्व आपल्यापुढे उलगडते त्याचा कोणतीच सीमा नसते. ना विषयाचे बंधन असते ना लांबीचे. पाककृतींपासून सर्वेक्षणापर्यंत आणि बातम्यांपासून बकवास जोकपर्यंत तिथे काहीही तुमच्या समोर सुरू होते. सुरुवातीला अगदी नकोसा वाटणारा हा अनुभव सर्वांच्या अंगवळणी पडलाय.

या कसल्या सवयी लागताहेत, आपल्याला याचे भान फार कमी जणांना उरलंय. ‘हूटसूट’ने केलेल्या जागतिक सर्वक्षणात भारतात १९ कोटी लोक नियमितपण सोशल मीडिया वापरतात, असे सांगण्यात आले आहे. हा आकडा एकूण लोकसंख्येच्या तुलनेत कमी वाटत असला, तर गंमत पुढे आहे. सोशल मीडिया वापरणाऱ्यांची ही संख्या फक्त गेल्या एका वर्षात ४० टक्क्यांनी वाढलीय. व्हॉट्सअप पासून फेसबुकपर्यंत आणि ट्विटरपासून इन्स्टाग्रामपर्यंतच्या या सोशल मीडियावर दररोज प्रत्येक भारतीय साधारणतः अडीच तास (२.३६ तास) घालवतोय. हे आकडे असे आणखीही सांगता येतील, पण यातील एक शेवटची गंमत सांगतो. अमेरिकेतला माणूस दररोज २.०६ तास आणि चायनीज माणूस १.५० तास एवढा वेळ घालवतोय. म्हणजे अमेरिका आणि चीनमधल्या माणसांपेक्षाही आपण जास्तवेळ सोशल मीडियावर घालवतो आहोत. आता सोशल मीडियावर आपण असतो म्हणजे काय पाहतो, त्याचेही आकडे उपलब्ध आहेत. हे सर्वेक्षण सांगते की, आपण सर्वाधिक वेळ सोशल मीडियावर काय करतो तर युट्युबवर विडिओ पाहतो किंवा फेसबुकवर विडिओ पाहतो. व्हॉट्सअप, ट्विटर, गुगल प्लस, पिन्ट्रेस्ट वगैरे सगळे याच्या नंतर येत. एवढेच नव्हे तर आपल्या हातात असलेल्या मोबाइलचा उपयोग सर्वाधिक लोक कशासाठी करतात, तर विडिओसाठी करतात. विडिओचे हे प्रस्थ एवढे वाढत चाललंय, हे आता आकडेवारीमधूनही स्पष्ट होतंय. ही सारी आकडेवारी सांगण्यामागे याच्या चांगल्या वाईट परिणामांची समीक्षा करण्याचा हेतू नाही. सोशल मीडियाच्या बाजारात आपण एक लोकसंख्या म्हणून आपला आकडा बराच मोठा आहे, हे कळणे महत्वाचे आहे. त्यामुळे या सोशल मीडियावर जे काही उमटते त्यातून एक लोकमत तयार होते. या सोशल मीडियावर सध्या विडिओंचे राज्य आहे. त्यामुळे हे विडिओ आपल्या एकंदरित भावजीवनावर आणि समाजजीवनावर महत्वाचा परिणाम करत आहेत, हे सांगणे हाच या आकडेवारीचा उद्देश आहे. माध्यमांचा वापर कसा करायचा हे आपण शिकलो नाही, तर माध्यमे आपला वापर करून घेतात, हे आजवरच्या इतिहासाने सिद्ध केले आहे. त्यामुळेच आपण कशी माध्यमे हाताळायची हे आता आपले आपल्याला ठरवता यायला हवे, हेच या आकडेवारीतून सांगायचे आहे.

मुंबई-पुण्यासह देशभर जेव्हा मॉलचे साम्राज्य वाढले तेव्हा अधिकाधिक लोकांना आकर्षित करण्यासाठी मॉलनी जेव्हा फुकटात वायफाय द्यायला सुरूवात केली. या फुकटच्या वायफायसाठी कॉलेजची मुले लेक्चर बंक करून मॉलमध्ये पडिक होऊ लागली. ही मुले काय करायची तर फुकटच्या वायफायवरून भरमसाठ विडिओ डाऊनडोल करायची. मॉलच्या व्यवस्थापनांना हे जेव्हा लक्षात आले, तेव्हा त्यांनी वेळेचे बंधन घातले. त्यामुळे अर्ध्या किंवा एका तासापेक्षा जास्त वेळ वायफाय मिळणे बंद झाले. त्यामुळे विडिओ डाउनलोडिंग थोडे कमी झाले, पण शेअरिंगच्या माध्यमातून त्यांनी पळवाट शोधलीच. पायरेटेड सीडी, टोरंट हे प्रकारही नवे नाहीत. त्यामुळे विडिओ पाहण्यासाठी वाट्टेल ते करण्याची मनोवृत्ती कायमच राहिली हेच खरे.     विडिओ या प्रकारामध्ये एवढे नक्की काय आहे की, लोक त्यासाठी एवढा आटापिटा करतात. या माध्यमाचे वेगळेपण कशात आहे, हे समजून घेतले तर कदाचित विडिओ या माध्यमाबद्दलचे आकर्षण का या प्रश्नाच्या मुळापर्यंत जाता येईल. शब्द, चित्र आणि आवाज या तिन्ही माध्यमांना कवेत घेणारा विडिओ हे माध्यम पाहणाऱ्यासमोर पर्यायी जग उभे करते. इंग्रजीत ज्याला वर्च्युअल रिअॅलिटी म्हणतो ते आभासी वास्तव उभे करण्याचे सामर्थ्य विडिओ या माध्यमात आहे. इथे पाहणारा त्या वास्तवाचा भाग बनतो. म्हणूनच सिनेमाच्या हिरोच्या किंवा हिरोइनच्या जागी आपण आपल्याला पाहू लागतो. त्याच्या भावभावनांशी एकरूप होऊ शकतो. म्हणूनच विडिओची मनापर्यंत पोहचण्याशी क्षमता अन्य कोणत्याही माध्यमापेक्षा वेगळी ठरते.    शब्द, चित्र आणि आवाज या तिन्ही माध्यमांनी कित्येक वर्ष माध्यमांचे जग व्यापून टाकले होते. या तिन्ही माध्यमांना कवेत घेणारे विडिओ हे माध्यम कितीतरी वर्ष मोठ्या पडद्यापुरते मर्यादित होते. मोठा पडदा लहान झाला आणि टीव्ही घरात आला. पण तरीही टीव्हीच्या पडद्यावर मर्यादीत वाहिन्यांचा मर्यादीत खेळ सुरू होता. सॅटेलाइट टेलिव्हिजनचे जग आले आणि चित्र बदलले. वाहिन्यांची संख्या, गुणवत्ता आणि सिग्नल यंत्रणा बदलली. रेकॉर्डेड कार्यक्रमांची जागा लाइव्हने घेतली आणि बघताबघता सारे जग घरात आले.

१९९० मध्ये झालेले खाडी युद्ध टीव्हीवर सीएनएनने लाइव्ह दाखवले. विडिओ या माध्यमाची ताकद तिथून जाणवायला लागली. जगाच्या बाजारपेठेवर आणि लोकभावनेवर नियंत्रण ठेवायचे असेल तर हे माध्यम हातात ठेवायला हवे, याची अमेरिकन जाणीव तिथून स्पष्टपणे दिसू लागते. सद्दाम हुसेनचा पाडाव असो की ११ सप्टेंबरचा हल्ला, अमेरिकेने हे माध्यम कायमच प्रभावीपणे हाताळल्याचे आपल्याला कायमच जाणवत राहते. याच अमेरिकेत हॉलिवूडचा डोलारा उभा राहातो, गुगल-युट्युब जन्माला येते, फेसबुक उगवते हे काही योगायोग नाहीत. माध्यम म्हणून आपण काय हातात ठेवायला हवे म्हणजे जगाची बाजारपेठ आपल्या ताब्यात राहील हे अमेरिकेला कोणी शिकवायला नको. विडिओचे हे जग अक्षरशः क्षणाक्षणाला विस्तारतेय. सिनेमा आणि टीव्हीपेक्षाही अधिक वेगवान असे इंटरनेट हे वाहन या विडिओंनी आता स्वीकारलंय. त्यामुळे प्रत्येकाच्या खिशातल्या मोबाइलमध्ये बरीच जीबी जागा सध्या विडिओंनी व्यापलेली आहे. हे सारे विडिओ कसले आहेत, किती जण ते पाहातात, त्यातील किती ते पुढे फॉरवर्ड, शेअर करतात ही गणिते आणखीच किचकट होत जातात. या साऱ्याचा अभ्यास करणारे शास्त्र जगभरात विकसित झाले आहे. जगभरातील विद्यापीठात या विषयांवर पीएचड्या घेतल्या जात आहेत. यातून मिळणारे ज्ञान वापरून जगभरातील कंपन्या आपला व्यवसाय कैकपटींना विस्तारत आहेत.यातील एक सोपे उदाहरण सांगतो. इंटरनेटच्या जगात आपल्या मजकुराची किंवा जाहिरातीची लोकप्रियता समजून घेण्याचा एक निकष असतो, तो म्हणजे सीटीआर. सीटीआर म्हणजे क्लिक थ्रू रेट. एखादी जाहिरात आपण सगळेच पाहतो. समजा १०० लोकांनी एखादी जाहिरात पाहिली तर त्यातील किती लोकांनी तिच्यावर क्लिक केले तो आकडा म्हणजे सीटीआर. एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, ज्या कंपन्या आपली जाहिरात विडिओ माध्यमातून सादर करताहेत, त्यांना मिळणारा सीटीआर हा अन्य जाहिरातींपेक्षा २७ टक्क्यांनी अधिक आहे.

एक काळ होता की तंबुच्या थिएटरात विडिओ पाहण्यासाठी गर्दी व्हायची. मग सिनेमा बघण्यासाठी इमारती बांधल्या गेल्या आणि थिएटर जन्माला आली. थिएटरमध्येही अनेक प्रयोग झाले. साउंडइफेक्टपासून डोम थिएटरपर्यंत आणि थ्रिडीपासून सेव्हनडीपर्यंत विडिओ पाहणे बदलत गेले. आज इंटरनेटमुळे विडिओ फक्त मोबाइलमध्ये नव्हे तर जगापासून वेगळे होऊन पाहण्यासाठी व्हीआर बॉक्सही आलाय. नुसता विडिओच नाही, तर ते पाहण्याचा संस्कारही बदलत गेल्याचे सातत्याने जाणवत राहते. या सगळ्याचा अर्थ एवढाच की विडिओंचे हे जग हळूहळू आपले जग व्यापून टाकतेय. त्यातील हलत्या चित्रांची भाषा ही जगातील कोणत्याही भाषेपेक्षा अधिक प्रभावी ठरतेय. अनेकदा एखाद्या विडिओची भाषा आपल्याला कळत नाही, पण त्यातील पात्रांच्या हालचालीवरून विषय कळतो. त्यामुळे या माध्यमाला अनेकदा भाषेचे बंधनही आडवे येत नाही. भाषेच्या या प्रश्नावर मात करण्यासाठी सबटायटलचा आणि ऑनलाइन डबिंगचा पर्यायही उपलब्ध आहे. त्यामुळे केनिया, झांबियातील विडिओ ऑस्ट्रेलियातील माणसालाही आवडू शकेल, याची शक्यता वाढली आहे.विडिओच्या या सर्वव्यापकतेमुळे विडिओ निर्मिती या क्षेत्राला प्रचंड सुगीचे दिवस आले आहेत. एकेकाळी ज्या विडिओ कॅमेऱ्यासाठी दादासाहेब फाळकेंनी आपल्या घरातील सामान गहण ठेवले, तो कॅमेरा आता प्रत्येकाच्या खिशात आलाय. त्यामुळे विडिओ चित्रित करणे हे अगदी डाव्या हाताचा खेळ झालाय. अर्थात त्याची गुणवत्ता आणि त्यातील कला हा स्वतंत्र कौशल्याचा विषय आहेच. पण तरीही हौशी किंवा इंग्रजीत ज्याला अमॅच्युअर म्हणतात ती विडिओग्राफी आता कुणीही करू शकतो. यामुळे विडिओ कटेंटची निर्मिती करणे हा जगभरातील मोठा उद्योग बनला आहे.

हा विडिओ कंटेट निर्माण करण्यासाठी, त्याचे संकलन म्हणजेच एडिटिंग करण्यासाठी विविध प्रकारची सॉफ्टवेअर वापरली जात आहेत. ही सॉफ्टवेअर तयार करणारीही इंडस्ट्री सध्या मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. विडिओ करणे म्हणजे फक्त चित्रीकरण करणे असेही आता उरले नसून, समोर काहीही चित्रीत न करता फक्त अॅनिमेशनच्या साहाय्याने विडिओनिर्मिती होत आहेत. या साऱ्याचा अर्थ एवढाच की विडिओ या एका माध्यमाने जगभरात प्रचंड मोठ्या प्रमाणावर नव्या संधी निर्माण केल्या आहेत. विडिओ कंटेटचा हा व्यापार दिवसेंदिंवस वाढत असताना, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपण तो समजून आत्मसात करणे अत्यंत आवश्यक बनले आहे.या विडिओंच्या माध्यमातून काय काय घडविले जाते आहे, हे पाहिले तरी साधारणतः त्याची व्याप्ती लक्षा येऊ शकते. आजघडीला सोशल मीडियाच्या माध्यमातून देवधर्मापासून टाइमपासपर्यंत आणि शिक्षणापासून पॉर्न इंडस्ट्रीपर्यंत सतराशेसाठ प्रकारचे विडिओ पाहिले जात असतात. खरे तर आपण सगळेच असे हे विडिओ नियमित पाहत असतो. त्यामुळे यात नवीन काय? असे वाटू शकते. पण यातील मुद्दा असा आहे की आपल्या या पाहण्याने नक्की काय होते, याची जाणीव अद्यापही आपल्याला पूर्णपणे झालीय असे म्हणणे धाडसाचे ठरते आहे. या क्षेत्रात आपण कितीही जाणकार असल्याचा दावा केला तरीही विडिओ या माध्यमाचे परिणाम अद्यापही अभ्यासकांना आपल्या शब्दात पकडता आलेले नाहीत. त्याबद्दल अंदाज व्यक्त केले जात आहेत. पण निश्चितपणे यामुळेच हे असे घडलेय, असे म्हणणे अवघड झालीय. एकंदरित सोशल मीडियामधली व्यामिश्रता आपले जगणे व्यापून दशांगुळे उरली आहे. त्यात विडिओ या माध्यमाचा फार मोठा वाटा आहे. आपण गेले काही वर्ष चर्चेत असेलेले उदाहरण घेऊ. सध्या सत्तेत असलेल्या भाजपने सोशल मीडियाचा उपयोग करून लोकमत तयार केले असा दावा केला जातो. नरेंद्र मोदींच्या भावनिक भाषणांचे असो किंवा ‘जनता माफ नही करेंगी’ म्हणणाऱ्या काकूंच्या विडिओंने जनमानसावर फार मोठा प्रभाव टाकला. त्याच सोबत राहूल गांधी, अरविंद केजरीवाल यांची खिल्ली उडविणारे विडिओ असोत किंवा आकडेवारीचा खेळ मांडणारे अॅनिमेशनपट… या सगळ्यांनी लोकभावना घडविण्यात फार मोठा वाटा उचलला. खरं तर असंही म्हणता येईल की, सोशल मीडियाला सामोरे गेलेले हे पहिलेच सरकार आहे.

भाजपला मिळालेले यश ही या मीडियाची एक बाजू आहे. या माध्यमाची इंटरअॅक्टिव्हिटी ही दुसरी बाजू तेवढीच टोकदार आहे. प्रवाहात असताना कदाचित त्याची टोके फारशी जाणवत नाहीत. पण प्रवाहाच्या विरोधात मात्र ही टोके टोचल्याशिवाय राहत नाहीत. छापील शब्द, रेडिओवरील ध्वनी किंवा टीव्हीसारख्या आजपर्यंतच्या माध्यमांमध्ये प्रवास एकतर्फी होता. पण हे सारे सोशल मीडियाच्या जगात आल्यावर हा प्रवास दुतर्फी झाला आहे. तुम्ही लोकांपुढे तुमचे मत ठेवले तर त्यावर प्रतिक्रिया उमटणारच आहेत. त्या प्रतिक्रियांचे गणित बांधणे हे मत ठेवण्यापेक्षा अवघड काम आहे. म्हणूनच ही प्रतिक्रियांमधून घडणाऱ्या दृष्टिकोनांची लढाई आहे. तिचा वेग प्रचंड आहे. त्यामुळे भल्याभल्यांना तो गाठणे आज जिकिरीचे झाले आहे. ज्या भाजपने सोशल मीडियाचा आधार घेत सत्तेत प्रवेश केला, त्या भाजपच्या अमित शहांना आज सोशल मीडियावरील प्रचाराला बळी पडू नका असे सांगावे लागणे, हे याच परिस्थितीचे प्रतीक आहे. यात कोणी चूक किंवा बरोबर असल्याचा प्रश्न नाही. आपण सगळेच या परिस्थितीला नवीन आहोत. त्यामुळे या परिस्थितीने पुढे काय वाढून ठेवले आहे, याबद्दल कोणीच ठामपणे सांगू शकत नाही. पण, हे सारे जरी खरे असले तरी सोशल मीडियापासून कोणी पळूनही जाऊ शकत नाही. पुन्हा भारतीय राजकारणाचेच उदाहरण द्यायचे तर, ठरवून सोशल मीडियापासून लांब राहिलेल्या राज ठाकरेंना अधिकृतरित्या या माध्यमात उतरावे लागणे, हे याच अपरिहार्यतेची साक्ष पटविते. सोशल मीडियाच्या या तुफान स्पर्धेत विडिओने आघाडी मिळवल्याचे आज तरी स्पष्टपणे दिसतेय. विडिओ या आधी नव्हता का? तर, होता. ल्युमिएर बंधूपासून फाळकेंपर्यंत, वॉल्ट डिझ्नेपासून शांतारामबापूंपर्यंत, नुक्कड पासून जय मल्हारपर्यंत, डीडीन्यूज पासून गल्लीन्यूजपर्यंत आणि इंटरनेटच्या तमाम वेबसाइटपर्यतच्या सिनेमा-टीव्ही-इंटरनेट या स्वरूपामध्ये होताच. पण या विडिओला सोशल मीडियाची बुलेट ट्रेन मिळाल्यावर त्याचा वेग, वेध आणि परिणाम याच्यात कैक पटीने बदल झाला. या वेगाने काळ-कामाची गणिते बदललीच पण मानवी भावभावनाच्या विश्वातही बदल घडवण्यास सुरूवात केलीय. त्यामुळे या माध्यमाबद्दल फक्त कुतुहलच नव्हे तर सावधानताही बाळगणे आवश्यक ठरले आहे.

सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकाराने या वेगाचा आडाखा बांधता येतो. उदाहरणार्थ आज याच विडिओमुळे निशा मधुलिका नावाची गृहिणी दिल्लीतील किचनमधून २७ लाख लोकांपर्यंत पोहचते. रोमन सैनी नावाचा तरुण स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अनअॅकेडमी सुरू करतो आणि त्याला तब्बल १० लाखापेक्षा लोक सबस्क्राइब करतात. देवधर्म, शिक्षण, आरोग्य, शेती, स्वयंपाक, पर्यटन, जाहिरात अशा नाव घ्याल त्या क्षेत्रातील उदंड माहिती, मनोरंजन आज विडिओच्या जगामुळे तुम्ही म्हणाल तिथे उपलब्ध झाली आहे.आजवर प्रस्थापित माध्यमे ही कोणाच्या तरी हातात होती आणि आहेतही. मग ते संपादकीय मंडळ असो की जाहिरातीची गणिते. त्यामुळे त्यातील कंटेट हा शेवटी त्यांच्याच हितसंबंधांचे रक्षण करणारा असणार हे गृहितक आहे. सोशल मीडियाने हे बंधन खऱ्या अर्थाने मोडले. विडिओंची निर्मिती सुलभ झाल्याने तर प्रत्येकाच्या हातात स्वतःचा मीडिया आला. युझर कंटेट हा परवलीचा शब्द झाला. त्यामुळे जगभर नवनव्या प्रयोगांना खुले व्यासपीठ मिळाले. मग व्याख्यानमालेच्या प्रारुपात अडकलेली संकल्पना टेड टॉक म्हणून तुफान लोकप्रिय झाली. तर दुसरीकडे पालघरमधल्या आदिवासींची वारली कला जगभर इंडिजिनियस आर्टचे प्रतीक बनली.पण याच विडिओचा उपयोग करून वेगवेगळ्या मानवी समुहांमध्ये कमालीचा द्वेषही पेरला जातोय. हिंसा दाखविली जातेय. अश्लिलता पसरवली जातेय. आज कितीही नाही म्हटले तरी हे सत्य नाकारता येत नाही, की आज सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या विडिओंमध्ये पॉर्न मोठ्या प्रमाणात आहे. आता पॉर्न ही इंडस्ट्री आहे, वगैरेचा दावा आज तरी भारतीय कायद्यानुसार बेकायदा आहे. त्यामुळे अशा अनेक कायदा हातात घेणाऱ्या घटना विडिओच्या माध्यमातून समाजात पसरत आहेत. या संदर्भातील पुढील दोन उदाहरणे झोप उडविणारी आहेत. जून २०१७ रोजी उल्हासनगर येथे एका २६ वर्षाच्या मुलाने प्रेमप्रकरणातून लाइव्ह विडिओ करत आत्महत्या केली. तर दुसरीकडे तेवढीच विचित्र वाटावी अशी घटना १४ मे २०१७ च्या मिड-डेने जगापुढे आणली आहे. एका जोडप्याने त्यांची प्रणयक्रीडा लाइव्ह कॅमेऱ्याच्या माध्यमातून सोशल मीडियावर आणली. हे सारे काय चालले आहे? असा प्रश्न कोणत्याही संवेदनशील माणसाला पडावा असाच आहे. पण हे वास्तव आहे हे कोणीच नाकारू शकत नाही.अखेर, माध्यमक्षेत्राचा भाष्यकार मार्शल मॅक्लुहानने सांगितलेले ‘दी मिडियम इज दी मेसेज’ हे ब्रह्मवाक्य विडिओ या माध्यमलाही लागू पडतेच! विडिओ हे एकच माध्यम कशा पद्धतीने वापरले जात आहे, याची अशी अनेक उदाहरणे येथे देता येतील. या उदाहरणांना स्थल-कालाची मर्यादा नाही. आज-आता-ताबडतोब अशी ही ‘लाइव्ह’ रचना असल्याने जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून, कोणत्याही क्षणांना एकमेकांसमोर आणण्याचे सामर्थ्य हे माध्यम आज आपल्या सोबत घेऊन फिरत आहे. म्हटले तर हे सामर्थ्य आहे आणि म्हटले तर हा कमकुवतपणाही आहे. असे म्हणतात की, २०१८ पर्यंत एकूण इंटरनेट ट्राफिकपैकी ७९ टक्के ट्राफिक विडिओ कंटेटवर अवलंबून असेल. त्यामुळे या हलत्या चित्रांपासून आपली सुटका नाही, हेच खरे!

 

(लेखक मुंबईच्या ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेनमध्ये रिसर्च फेलो आहेत)

9892745685

Previous articleहिंसेला भेटलेली सत्यभामा
Next articleगाडगेबाबांची मंतरलेली पत्रे
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here