हिंदू व वैदिक धर्म वेगळे कसे?

सौजन्य -(‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक )

संजय सोनवणी

हिंदू व वैदिक धर्म एकच आहे ही आपल्याकडे सर्वसाधारण समजूत आहे. किंबहुना तो समज रुढ व्हावा यासाठी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न  केले जातात . मात्र हे दोन्ही धर्म हे पूर्णतः  भिन्न आहेत. हिंदू हा देशातील पुरातन सिंधू संस्कृतीच्या उगमापासून अस्तित्वात असलेला धर्म आहे. शिव , शक्ती ,   गणेश या आपल्या सर्व प्रमुख देवता या हिंदूंच्या देवता आहे . जे स्वतःला वैदिक म्हणवितात ते यज्ञ संस्कृती मानणारे असून शरणार्थी म्हणून ते भारतात आलेत आणि त्यांनी हिंदूंवर कुरघोडी करण्याचा कसा प्रयत्न केला . मात्र एवढ्या वर्षाच्या प्रयत्नानंतरही यश मिळत नाही हे पाहून हिंदूंच्या देवता , त्यांची प्रतीक बळकविण्याचा वैदिक कसा प्रयत्न करत आहेत हे सांगणारा अभ्यासपूर्ण लेख
 …… ……. …….. ……. ……. …….. ……. ……. …….. ……. ……. ……. …… ….
भारतात सध्या ‘हिंदू’ या लेबलखाली नांदणारे दोन स्वतंत्र धर्म आहेत. एक आहे पुरातन सिंधू काळापासून आजतागायत पाळला जाणारा ‘हिंदू धर्म’ तर दुसरा आहे वेदांवर आधारित असलेला, वैदिक कर्मकांड, वेदोक्त संस्कार पाळत स्मृतींनुसार चालणारा ‘वैदिक धर्म.’ वेद हेच हिंदू धर्माचे मुलस्त्रोत आहेत असा सोयीस्कर गैरसमज जो पसरवला गेला त्यामुळे हिंदू धर्माची मोठी हानी तर झालीच पण ज्या वेदांशी कसलाही संबंध नव्हता व त्यात काय आहे हेही माहीत नव्हते त्या वेदांची मानसिक गुलामगिरी मात्र मध्ययुगापासून ते आजतागायत जोपासली गेली. हिंदू देवता या “पौराणिक” आहेत हा दुसरा गैरसमज. पुराण या शब्दाचा अर्थ आम्ही “पुरातन” असा न घेता गुप्त काळात जी पुराणे वैदिकांनी ताब्यात घेत वैदिक माहात्म्य घुसवत शिव, शक्ती, गणेशादि पुरातन दैवतांचे व सूत संस्कृतीने पुरातन काळापासून जपलेल्या येथील इतिहासाचे वैदिकीकरण केले. हे वैदिकीकरण येथेच थांबले नाही तर वैदिक धर्म जेव्हा स्थापनही झालेला नव्हता त्या काळातील राम, कृष्णच नव्हे तर व्यास व वाल्मिकीचेही भाकडकथा निर्माण करत वैदिकीकरण केले. गुप्त सम्राटांनी वैदिक धर्मियांना दिलेल्या राजाश्रयामुळे ही धार्मिक उलथापालथ करत जनसामान्यांचा धर्म मात्र हिंदू, पण त्याच्यावर वैदिक कलमे करीत हिंदूचेच सामाजिक महत्व घटवले. तंत्र-आगमे हे हिंदू धर्माचे मूलस्त्रोत पण तंत्रांना एवढे बदनाम केले गेले की तंत्र म्हणजे केवळ वामाचार असे सतत प्रचारित केले गेले. खरे म्हणजे हिंदू आपला धर्म व्यवहार आजही तंत्राधारितच करतात.  पण तंत्रांना वाईट समजतात हे हिंदूंचे दुर्दैव आहे. तंत्रे ही समतेची पाईक असून वेद नाकारणारी व वर्णाश्रम धिक्कारणारी आहेत हे मात्र सामान्यांना माहीत नसते. आजही हिंदू नव्हे तर वैदिक वर्चस्व टिकवण्यासाठी संघपरिवार व त्यांचे शासन  आटोकाट प्रयत्न करत आहे . उदाहणार्थ घग्गर नदी म्हणजे वैदिक सरस्वती तर म्हटले जातेच पण सिंधू संस्कृतीचे निर्माते हे “वैदिक आर्य” होते असे ठसवले जाते. सध्या पुरातत्व खातेही याच  वैदिक तत्वधारेसाठी काम करीत आहे. वैदिक विज्ञान, ज्ञान याचा बोलबाला वेदांत तसे काहीही नसताना  केला जातो. दुर्दैवाचा भाग असा कि सांस्कृतिक अभ्यासात कच्चे असणारे हिंदू वैदिकांच्या सातत्याने केल्या जाणा-या प्रचाराला बळी पडतात. याचे कारण म्हणजे ते वरकरणी नांव “हिंदुत्ववादी” वापरतात व प्रत्यक्षात जेही काही पुरातन व महान ते ते सारे वैदिकच असेही ठसवत राहतात.

आर्य हा कधीही वंश नव्हता
        आर्य आक्रमण सिद्धांताने जवळपास गेली दीडशे वर्ष वैचारिक, सैद्धांतिक, राजकीय आणि सामाजिक गोंधळ माजवून दिला आहे हे आपणास माहितच आहे. आर्य  येथीलच की बाहेरचे हाही वाद नव्याने सुरु झाला आहे. द्रविडस्थानची मागणी नव्याने रेटली जाऊ लागली आहे हेही आपण पाहतो आहोत. आर्य हा वंश नव्हता हे मानववंश शास्त्रज्ञांनी कितीही कंठरव करून सांगितले तरी वर्चस्वतावादी भावना जपणा-यांना आजही आर्य सिद्धांताचे आकर्षण आपल्या मोहपाशात घेऊन बसले आहे. माणुस हा अन्य प्राणीविश्वापेक्षा एक “विशेष” प्राणी आहे. त्याला बुद्धी आहे. कृत्रिमरित्या उपलब्ध नैसर्गिक साधनांना स्वसुखासाठी वापरायची, नवनवे शोधायची उपजत कला त्याच्यात आहे. त्याच्यात मिथके बनवायचीही तेवढीच कला प्रबळ असल्याने अनेकदा ती कला त्याच्या बुद्धीवादावर मात करते. स्वसमूह , जाती , धर्म , राष्ट्र  हेच त्याच्या जगण्याचे केंद्रबिंदू बनत गेल्याने आपापले समुह व तिची संस्कृती पुरातन व श्रेष्ठ कशी हे ठरवण्याची व ते सिद्ध करण्याची त्याची कला पुराणकाळातच नव्हे तर आजही जीवित आहे. आपापला समूह  श्रेष्ठ ठरवायचा म्हणजे अन्य समुहांना दुय्यम स्थान आपसूक दिले जाते. हा प्रकार आजचा नाही. सर्व पुरातन साहित्यातील मिथके आपण पाहिली तर याचा प्रत्यय येईल. आधुनिक काळात तरी ही प्रवृत्ती कमी होईल असा होरा होता, परंतु दुर्दैवाने तसे झालेले दिसत नाही. भारतीय तर वास्तवात कमी आणि मिथकांतच अधिक रममाण असतात हे आपण आजही अनुभवतो.

आपली पाळेमुळे जाणून घेण्यासाठी  प्रत्येक समूह  उत्सुक असतो. आपण कोण, कोठून , कशासाठी आलो आणि जगण्याचे प्रयोजन काय हे प्रश्न तत्वज्ञानात चर्चिले जातात. पण माणूस तिथेच थांबत नाही. भौतिकदृष्ट्याही आपले मूळ  स्थान काय आणि आपण कसे पसरलो यावरही तो विचार करतो हे मात्र विशेष आहे. खरे तर याची सुरुवात युरोपियनांनी अठराव्या शतकात केली. एकोणिसाव्या शतकात या शोधाला सिद्धांताचे स्वरुप येऊ लागले आणि त्याची भीषण परिणती हिटलरच्या उदयात झाली. हे तत्वज्ञान व सिद्धांत म्हणजे आर्य वंश सिद्धांत होय. निळ्या डोळ्यांचे, सोनेरी केसांचे, उंच-धिप्पाड नि गोरेपान असे आर्य कोठल्यातरी मुलस्थानातून  रथांवर आरुढ होत सर्वत्र घोंघावत पसरले, अनेक प्रदेश पादाक्रांत केले, स्थानिक लोकांना जिंकले व त्यांच्यावर आपली भाषा व संस्कृती लादली असा हा सिद्धांत. यालाच आधी आर्य आक्रमण सिद्धांत म्हणयचे. भारतातही याच आर्य टोळ्यांनी आक्रमण करुन दास-दस्युंना गुलाम बनवले व त्यांच्यावर जातीव्यवस्था लादली असा हा सिद्धांत. टिळकांनी या सिद्धांताला नुसते स्विकारले नाही तर पुष्ट्यर्थ ’आर्क्टिक होम इन वेदाज” हा ग्रंथही सिद्ध केला. विष्णू शास्त्री चिपळुणकर तर ब्रिटिशांना जाहीरपणे “आमचे पुरातन आर्य रक्ताचे बांधव” म्हणू लागले. दक्षिणेतील प्रतिक्रिया स्वाभाविक तीव्र होती. विजेते आर्य विरुद्ध पराजित द्रविड अशी देशाचीच उभी वांशिक फाळणी झाली. भारतीय राजकारण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या आर्य सिद्धांताभोवतीच फिरु लागले. त्यातूनच मूलनिवासी विरुद्ध परकीय आर्यभट हाही संघर्ष उभा राहिला. भारतीय इतिहास, संशोधने, साहित्य या सर्वांवर या आर्य सिद्धांताची गडद छाया आजही पडलेली दिसते. बहुजनांमध्ये  मानसिक हिनगंड  निर्माण करायची सोय या भारतातील आर्य सिद्धांतकारांनी लावली तर सध्या मुस्लिम-ज्यू  असलेल्या सेमिटिक भाषागटाच्या लोकांना भाषिक,वांशिक, बौद्धिक क्षेत्रात न्यूनाने पहायला लावायची सोय युरोपियन (नंतर अमेरिकाही) विद्वानांनी लावली  त्याचेही जागतिक पडसाद आपल्याला युरोपियन विरुद्ध मुस्लिम संघर्षात पडलेले दिसतील.

हिटलरने केलेल्या वंशसंहारानंतर युरोपिय जगाने भाषा बदलली. त्यांनी आर्य हा शब्द वंश या अर्थाने वापरायचे बंद केले तर “पुरा-इंडो-युरोपियन” भाषा बोलणा-यांचा समूह व त्याची आक्रमणे/निगर्मणे या स्वरुपात तोच सिद्धांत कायम ठेवला. भारतीय वैदिकवाद्यांनाही आपण आता बाहेरचे आहोत हे सांगणे राजकीय दृष्ट्या गैरसोयीचे वाटू लागल्याने वैदिक आर्य भारतातलेच व ते येथूनच  आशिया-युरोपात पसरले हे सांगायला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर सिंधु संस्कृतीचे संस्थापक वैदिक आर्यच, असे नुसते दावे करुन ते थांबले नाही तर तो दावा पक्का करण्यासाठी घग्गर-हक्रा नदीला ऋग्वेदातील सरस्वती नदी ठरवायचा घाट घातला. आज इंटरनेटवर तुम्ही शोध घ्याल तर सर्वत्र घग्गरच्या ऐवजी सरस्वतीचे नाव दिलेले आढळेल. भारतीय पुरातत्व विभागानेही, भाजपा सरकार आल्यानंतर, डिसेंबर १४ मधील पुरातत्वीय अहवालात   घग्गरऐवजी सरस्वती असे  नाव वापरल्याचे दिसेल. थोडक्यात संस्कृती वर्चस्वाचा अट्टाहास वैदिकांनी सोडला नाही व युरोपियनांनीही नाही ,  हे उघड आहे.

पण हे वास्तव आहे काय? संशोधकांनी सत्याला  व भौतिक, लिखित पुराव्यांना स्विकारायला हवे हा विद्वतमान्य संकेत आहे. हा शोध घेण्याची सुरुवात मी प्रथम १९८५ मध्ये ली. त्यावेळीस माझा “Ancient Aryans Thought on Religion” हा प्रबंधही प्रसिद्ध झाला. तेंव्हाही मी आर्य हा शब्द वंशवाचक नसून ती एक उपाधी आहे, संबोधन आहे हे मांडत वैदिक धर्म आणि हिंदू धर्मातील विभेद स्पष्ट केला होता. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. उपग्रहीय छायाचित्रांमुळे घग्गर नदीचे पात्र कधीकाळी खूप मोठे होते हे दिसल्याने तिच  पुरातन “हरवलेली सरस्वती” आहे असा समज पसरवण्याची मोठी अहमअहिका लागली. २००७ सालापासून मी पुन्हा या विषयाकडे वळालो. भारतीय आर्य की बाहेरचे आर्य हे सिद्धांत मांडणाऱ्या  दोन्ही गटांनी वापरलेले पुरावेही तपासले आणि २०१४ पर्यंत झालेल्या आशिया खंडातील उत्खननांचे अहवालही अभ्यासले. त्यातुनच “Origins of the Vedic Religion and Indus-Ghaggar Civilisation” हा ग्रंथ सिद्ध झाला. यात लक्षात आले की दोन्ही बाजूंचे  विद्वान आपापले पूर्वग्रह कायम ठेवत आपल्या पूर्वनिर्धारित सिद्धांतांना सिद्ध करण्यासाठी आहे तेच पुरावे मोडतोड करीत, काहींकडे चक्क दुर्लक्ष करीत किंवा वेगळेच अन्वयार्थ बळजबरीने काढत आहेत. यात युरोपियन विद्वान जसे आघाडीवर आहेत तसेच भारतीय विद्वानही. आजकाल तर जनुकीय शास्त्रालाही या वर्चस्वतावादासाठी वेठीला धरले जात आहे.

वैदिक धर्माचा जन्म दक्षिण  अफगाणिस्तानात
खरे तर वास्तव सरळसाधे आहे. वैदिक धर्माचा जन्म दक्षिण  अफगाणिस्तानात झाला हे  ऋग्वेदाच्याच भूगोलावरून सिद्ध होते. ऋग्वेदात उल्लेखलेल्या  टोळ्या, नद्यांची नावे , पारशी धर्मातील देवता, कर्मकांड आणि झरथुस्ट्रापासून अनेक व्यक्तींची ऋग्वेदात असलेली उपस्थिती हेच सिद्ध करते की दोन्ही धर्म समकालीन व सामायिक भूगोलामध्ये जन्माला आले. विदेथ माथव आपल्या गौतम राहुगण या पुरोहितासह अनेक वैदिक धर्मीयांना सोबत घेत भारतात आला आणि पुढे याच आद्य स्थलांतरितांनी वैदिक धर्माचा भारतात क्रमश: प्रसार केला. स्थलांतरवादी विद्वान मानतात त्याप्रमाणे हे बहुसंख्येचे स्थलांतर नव्हते. आक्रमण तर नव्हतेच नव्हते. उत्तर भारतातील भाषा या मूळच्या जशा होत्या तशाच राहिल्या. उलट वैदिक भाषेवर संस्कार होत पुढे त्याचे रुपांतर धार्मिक प्रचारकार्यासाठी संस्कृतात कसे झाले हे मी “भाषेचं मूळ” या चपराक प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात विस्ताराने दाखवून दिले आहे. संस्कृतचा जन्म कसल्याही स्थितीत इसवीसनपूर्व  पहिल्या शतकापार जात नाही. त्यामुळे संस्कृत ही आद्य भाषा हा युरोपियन व भारतीय वैदिकवाद्यांचा सिद्धांतच मुळात टिकत नाही. पण तिच  आद्य भाषा व त्यातून प्राकृत जन्मल्या या अवास्तव पूर्वग्रहपिडित सिद्धांतामुळे सांस्कृतिक अन्वयार्थही चुकणार हे उघड होते.

यालाच जोडून येणारा दुसरा सिद्धांत म्हणजे वेद हे हिंदू धर्माचे आद्य स्त्रोत आहेत हा. खरे तर हा सिद्धांत भोंगळ आहे हे डॉ. रा. ना. दांडेकर ते दा. न. शिखरे यांनीही दाखवून दिले होते. वेदांच्याही पुर्वी हिंदू धर्म होताच, हे शिखरेंचे विधान आणि शिव-शक्तीप्रधान धर्म हा वेदांच्याही पूर्वीपासून होता हे दांडेकरांचे विधान वेगळे काही सुचवत नाही. असे असले तरी मुख्य प्रवाहाने या विद्वानांची मतेही विचारात न घेता सिंधू संस्कृतीही वैदिक आर्यांची निर्मिती असे ठासून सांगत राहिले. खरे म्हणजे सिंधू संस्कृतीत मिळालेल्या विपूल तांत्रिक प्रतिमा असलेल्या मुद्रा व मातृदेवतांच्या प्रतिमा यांचा उल्लेखच वेदांत नाही तर सिंधू संस्कृती वैदिक आर्यांची निर्मिती कशी? ते जाऊद्या.  सिंधू संस्कृतीतील स्नानगृहे, तटबंदीयुक्त शहरे, भाजक्या वीटा, धान्याची कोठारे याचे तरी उल्लेख वेदात कोठे आहेत? असे असले तरी वर्चस्वतावादाचा अंमल असणा-या विद्वानांनी भारतात सांस्कृतिक वर्चस्वतावादाचा कलह निर्माण करण्यास हातभार लावला हे आपले दुर्दैव आहे.
                                                                                                                         वेद हे  हिंदू धर्माचे मूलस्त्रोत नाहीत.
वेद हे भारतीय संस्कृतीचे व हिंदू धर्माचे मूलस्त्रोत नाहीत. शिव-शक्तीप्रधान तंत्रे ही हिंदू धर्माचे मुलस्त्रोत असून सुफलनताविधी हा त्यांचा पाया आहे. हिंदू धर्म हा व्यक्तिगत पूजा व उपासनेला प्राधान्य देतो तर वैदिक धर्मातील यज्ञ संस्था ही सामूहिक होती. तंत्रे ही इहवाद व परलोकवाद यात संतुलन साधत मोक्षासाठी साधना हा त्याचा मूळ गाभा आहे. धर्म, कर्मकांड, विधि-विधाने, कायदा, औषधी, यातू, शेतीशास्त्र, धातू, शरीरविज्ञानशास्त्र इत्यादि धार्मिक व व्यावहारिक बाबींचा समावेश तंत्रांत होतो. डॉ. सुधाकर देशमूख आपल्या “मध्ययुगीन धर्मसंकल्पनांचा विकास” या ग्रंथात म्हणतात की शिव-शक्तीशी तादात्म्य साधने हा मुख्य उद्देश्य, व्यावहारिक गोष्टींना अधिक महत्व असलेला, तंत्र हा जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टीकोन आहे. ते पुढे म्हणतात की, “किंबहुना आज आपण ज्याला हिंदू धर्म म्हणतो तो वैदिक कमी आणि तांत्रिक अधिक आहे. तंत्रांचा दृष्टीकोन हा श्रौत-स्मार्त धर्माच्या विरोधात आहे.” थोडक्यात श्रौत-स्मार्त हे पंथ वैदिक असल्याने वैदिक धर्म व हिंदू धर्म यांच्यात काहीएक संबंध नाही हे उघड आहे.

सिंधू संस्कृतीचा काळ हा इसवी सन पूर्व सात हजारमध्ये सुरु होतो. सनपूर्व ३१०० ते २६०० या काळात ही संस्कृती अत्यंत भरभराटीला गेली होती. सनपूर्व  १७०० मध्ये या संस्कृतीला पर्जन्यमान बदलल्याने आहोटी लागली. मेसोपोटेमियात याच काळात युद्धे होऊ लागल्याने विदेश व्यापारही थंडावला. त्यामुळे आर्थिक अवनतीचीही वेळ आली व नागर संस्कृती पुन्हा ग्रामीण संस्कृतीत बदलली. सिंधू संस्कृती नष्ट झाली नाही तर तिची धारा आजही अव्याहत वाहते आहे. उदाहणार्थ सिंधू काळात असलेल्या सपाट तळाच्या नौका, बैलगाड्यांची व विहिरी बांधण्याची शैली ते नांगरटीची पद्धत आजही सिंध प्रांतात पहायला मिळते. आर्यांनी भारतावर आक्रमण करून सिंधू संस्कृती नष्ट केली व एतद्देशियांना जिंकून  त्यांच्यावर जातिसंस्था लादली व शूद्र वर्णात ढकलले हा सिद्धांत कालबाह्य झाला असला, त्याला कसलेही पुरावे नसले तरी मूलनिवासीवाद्यांना हे मत आजही लाडके वाटते. सोयीस्कर सिद्धांतांना गळामिठी घालून बसणे हे भारतियांचे मुख्य लक्षण आहे की काय हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होणे स्वाभाविक आहे. आणि नेमके यामुळेच वैदिकांना आपले वर्चस्व आजही गाजवायला संधी मिळते हे आपल्या लक्षात येत नाही.

समजा आर्य सिद्धांत खरा मानला, तर मग ते आक्रमण करून येवोत कि स्थलांतराने, आर्य नेमके होते किती हे आजवर कोणाही विद्वानाने कसे सांगितलेले नाही? एतद्देशिय संख्येने किती होते याचा जरा तरी अंदाज सिंधू खो-यापर्यंतचा तरी येतो. सिंधू खो-यातच किमान ५० लाख एवढे लोक असतील तर त्यांना शूद्र बनवून त्यांच्यावर वर्ण व्यवस्था लादायला किती आक्रमक आर्य पाहिजेत? ते आक्रमक नव्हते, स्थलांतरित होते तर मग काही लादणे अशक्यप्रायच आहे. बरे देश-विदेशात व्यापारी संबंध ठेवणारी सिंधू संस्कृतीसारखी बलाढ्य संस्कृती जे घडवू शकतात, ज्यांना वैदिकांनाही माहित नसलेली लिपी माहीत होती तर त्यांचे धार्मिक साहित्य, तत्वज्ञान नसेल हे कोणत्या तर्काने ठरवले? आज उपलब्ध नाही याचा ते मुळात नव्हतेच याचा कसा पुरावा होऊ शकतो?
बरे त्यांना बहुसंख्येने स्थलांतरित झाले असे म्हणावे तर स्थलांतरित हे नेहमी स्थानिकांच्या दयेवर अवलंबून असतात. झालेही तसेच. हा धर्म भारतात कसा आला याची पुराणकथा शतपथ ब्राह्मणाने जतन करुन ठेवलेली आहे ती अशी-

“सरस्वतीकाठी राहणा-या विदेघ माथवाने गौतम राहुगण हा आपला पुरोहित व अग्नीसोबत पूर्वेकडे वाटचाल सुरु केली. उत्तरगिरीला (हिंदूकुश) पार करत नद्या कोरड्या करत व अरण्ये जाळत ते सदानीरा नामक नदीपर्यंत आले. विदेघ माथवाने अग्नीला विचारले कि आम्ही कोठे निवास करू तेंव्हा अग्नीने सांगितले कि या नदीच्या पूर्वेला निवास कर. तिथे नापीक, दलदल असलेल्या जमिनी होत्या. तेथे विदेघ माथवाने अग्नी स्थापन केला.” (श.ब्रा. १.४.१, १४-१७).

                                                                                                                      वैदिक हे शरणार्थी , आक्रमक नव्हे!
वैदिक शैलीत लिहिल्या गेलेल्या या पुराण कथेवरून विदेघ माथव नावाचा कोणी एक राजा अथवा राजन्य आपल्या पुरोहित व अल्प-स्वल्प अनुयायांसह भारतात आला. त्याला त्याचा प्रदेश का सोडावा लागला याचे उल्लेख नसले तरी तशी राजकीय व धार्मिक परिस्थिती बनल्याने विदेघाला आपला प्रदेश सोडावा लागला हे उघड आहे. पारशी धर्माचे अनुयायीही मुस्लिमांचे अत्याचार वाढल्यानंतर भारतातच आश्रयार्थ आले होते. त्यापूर्वी ही वेळ पारशी लोकांमुळे वैदिकांवर आली होती असे दिसते. म्हणजे येथे आलेले वैदिक हे शरणार्थी असू शकतात, आक्रमक नव्हे हे कोण लक्षात घेणार?

सदानीरा नदी म्हणजे नेपाळमधून वाहत येत गंगेला मिळनारी गंडकी नदी होय असे काही विद्वान मानतात. पण महाभारतातील कथांनुसार सदानीरा नदी  गंडकी नसून गंडकी व शरयूमधुन वाहणारी कोणतीतरी अज्ञात नदी असावी असे दिसते. अमरकोशानुसार तर सदानीरा नदी हे बंगालमधील वाहणा-या कर्तोया नदीचेच एक नांव आहे असे दिसते. खरे तर या नावाची  एकही नदी नाही. सदानीरा म्हणजे “पाण्याने सदैव भरलेली नदी” व हे नांव कोणत्याही बारमाही नदीला लागू पडू शकते. वरील पुराकथेनुसार हा भाग दलदलीचा व नापीक होता असेही दिसते. सिंधू नदीच्या एखाद्या उपनदीच्या निर्मनुष्य खो-यातील एखाद्या नदीला तात्पुरते सदानीरा हे नाव दिले गेले हे उघड आहे. नवेनवेच आलेल्या लोकांना स्थानिक नाव माहीत  असण्याची शक्यता नाही.

पण आर्य आक्रमणवाद्यांनी कुरु प्रांतातून  पूर्वेकडे वैदिक धर्म पसरवायला निघालेल्या आक्रमकांशी या कथेचा संबंध जोडला. पण कुरु-पांचाल-मत्स्यादि प्रांत वेदांत येत नाही तर उत्तरकालीन ब्राह्मण ग्रंथांत येतात.  शिवाय हे आर्यांचे “विजयी आक्रमण” असते तर त्यांना ओसाड, दलदलीच्या भागात वस्ती करावी लागली नसती. प्रत्यक्षात गंगेचे खोरेही हजारो वर्षांपासून मानवी वस्त्यांनी  गजबजलेले असल्याचे असंख्य पुरातत्वीय पुरावे उपलब्ध आहेत. ते जेते असते तर निर्मनुष्य आणि तेही दलदलीच्या पानथळ ठिकाणी वस्ती करायचे काही कारण नव्हते. शिवाय सरस्वती नदी भारतातीलच असे चुकीचे गृहितक घेतले गेले. भारतात सरस्वती होती तर ती कोणती याचे समाधानकारक उत्तर आजही विद्वान देवू शकलेले नाहीत. अफगाणिस्तानात मात्र ही नदी “हरहवती” या नावाने होती व आजही आहे. (पर्शियन भाषेत स चा उच्चार ह असा होतो. उदा. सिंधू =हिंदू)

थोडक्यात काही वैदिक धर्मीय तत्कालीक परिस्थितीमुळे अफगाणिस्तानातील सरस्वती नदीचे खोरे सोडून, हिंदूकुश ओलांडत पश्चिमोत्तर भागात आले व स्थानिकांशी संघर्ष टाळण्यासाठी त्यांनी स्वत:ला गैरसोयीची पण इतरांना त्रासही होणार नाही अशी जागा निवडली. तेथे वाहणा-या नदीचे स्थानिक ना माहीत नसल्याने तिला “सदानीरा” असे नाव दिले. त्यामुळे अशा नांवाची नदी सापडण्याची शक्यता नाही. तेथे वस्ती करून त्यांनी जेवढे स्मरणात आहे तेवढे वेदवाड्मय शिस्तबद्ध रितीने मांडत त्यात भरही घातली. दहावे मंदल, विशेषत: पुरुषसूक्त ही येथे आल्यानंतरची रचना आहे हे विद्वानांना मान्य आहे. उदाहरणार्थ मॅक्समुलर  म्हणतो, “या सुक्तात प्रथमच ग्रीष्म, वसंत, व अन्य ऋतू अवतरतात जे इराणमध्ये  नाहीत व ऋग्वेदातही उल्लेखले गेलेले नाहीत. या सुक्ताची भाषाही अर्वाचीन आहे.” (‘A History of Ancient Sanskrit Literature’, by F. Max Muller, Pub.: Williams and Norgate, , 1859, p. 557) थोडक्यात ऋग्वेदाचे संपादन व दहाव्या मंडलाचे बरेचसे लेखन हे भारतात आल्यावर झाले आहे.

पण नेमके कोठे व याच सुक्तात सर्वप्रथम शूद्र हा शब्द एक समाजघटक म्हणून का येतो या प्रश्नाचे उत्तर आपल्या समोरच आहे. शूद्र नावाची एक टोळी पश्चिमोत्तर भारतात, उत्तर सिंध प्रांतात रहात होती याबाबतचे अनेक पुरावे सुदैवाने उपलब्ध आहेत. अलेक्झांडरचा इतिहासकार डायोडोरस हा अलेक्झांडरच्या भारतावरील स्वारीच्या काळात त्याच्या सोबत होता. त्याने सिंध प्रांतातील सोद्राइंशी झालेल्या युद्धाचे व अलेक्झांडरने त्या प्रांतात एका नदीच्या काठी वसवलेल्या अलेक्झांड्रिया नगरीचे वर्णन करून ठेवले आहे. . (The Invasion of India by Alexander the Great-As described by Arrian, Q Curtius, Diodoros, Plutarch and Justin, edited by J. W. Mcrindle, page 354) सोद्राई हे नांव शूद्र शब्दाचा ग्रीक अपभ्रंश आहे हे सर्व विद्वान मानतात. अलेक्झांडरचे आक्रमण इसपू चवथ्या शतकात झाले हे सर्वविदित आहे त्यामुळे तोपर्यंत तरी ही जमात त्या भुभागात अस्तित्वात होती. इतिहासकार राम सरण शर्माही या विधानाला दुजोरा देतात व म्हणतात, “शुद्र एक टोळी (जमात) म्हणून इसपू चवथ्या शतकात होती याबाबत शंका नाही.”  (Sudras in Ancient India: A Social History of the Lower Order Down to Circa A.D. 600 by RS Sharma).

“शूद्र हे आधी एखाद्या टोळीचे नाव  असावे. नंतर हे नाव जो कोणी अनार्य आहे, अवैदिक आहे व तीन वर्णांच्या बाहेर आहे अशा सर्वांनाच, परकीयांनाही उद्देशून वापरले गेले. सूत्रांच्या दृष्टीने जेही कोणी तीन वर्णांचे नाहीत ते शूद्र.” असे देवदत्त भांडारकर स्पष्टपणे म्हणतात. (Some Aspects of Ancient Indian Culture, By D. R. Bhandarkar, 1989, page 12.) वि. का राजवाडेही राधामाधवविलासचंपूच्या प्रस्तावनेत  “तीन वर्णांच्या बाहेर जो समाज होता त्याला शूद्र हे नांव वापरले गेले.”  असे म्हणतात.

महाभारतात शूद्र टोळीचे नांव अभिरांसोबत तर वारंवार घेतले आहे. युधिष्ठिराच्या राज्यारोहण समारंभापूर्वी  उत्तरेकडे दिग्विजयासाठी गेलेल्या नकुलाला शूद्र टोळी प्रमुखाने नजराणे दिले. भारत युद्धात शूद्र जमात अभिरांसह दुर्योधनाच्या बाजुने  लढली. इतिहासकार ग्यानचंद चौहान म्हणतात की , अभिरांसोबतच शूद्र टोळीचे इतके उल्लेख मिळतात की , महाभारत काळापर्यंत सिंध प्रांतात ही टोळी अत्यंत भरभराटीला आलेली होती असे स्पष्ट दिसते. ( (Some Aspects of Early Indian Society, by Gian Chand Chauhan, page 54)

यावरून एक गोष्ट स्पष्ट होते व ती म्हणजे शुद्र हे सिंध प्रांतातील एका जमातीचे नाव  होते. त्या प्रांतातच अनेक अन्यत्र अनेक स्वतंत्र नाव  असलेल्या अभिर, शिबी, कुरु, पांचाल, मत्स्य, यासारख्या अनेक जमाती होत्या. प्रत्येक जमात अथवा गण स्वतंत्र नावाने आपापल्या भूभागात भारतभर सुखनैव जगत होता. तीन वर्ण हे मात्र वैदिक धर्मात मोडत असल्याने तेच वैदिक होते, वेदोक्त व वेदांचे अधिकारी होते हे उघड आहे. त्याबद्दल खेद का केला गेला याचे नवल वाटल्याखेरीज रहात नाही.  यातही मोठा विनोद असा की ज्या क्षत्रियवर्णाचे हिंदूंना  अकारण मोठे आकर्षण आहे तो क्षत्रिय  हा वर्णच नसून मूळ पुरुषसुक्तानुसार “राजन्य” हा दुसरा वर्ण आहे. क्षत्रियव राजन्य एकच नव्हेत. म्हणजे क्षत्रिय वर्णाला मुळातच वेदमान्यताच नाही तरीही त्याचे आकर्षण असावे आणि शूद्र या एका टोळीच्या लोकांचे नाव त्यांनी इतरांना वापरले असले तरी शूद्र म्हणजे “क्षुद्र” असा समज करत अकारण न्यूनगंड मात्र जपावा हे मात्र अनाकलनीय आहे.

सिंध प्रांत हा अफगाणिस्तानाला सर्वात जवळ असल्याने भारतात आश्रयार्थ निघालेल्या वैदिक लोकांची भेट त्या भागात राहणा-या शूद्र नामक टोळीशी झाली असणे अत्यंत स्वाभाविक आहे. त्याच भागातील एका सदानीरा असे नांव दिलेल्या निर्मनुष्य जमिनीवर त्यांनी रहायला सुरुवात केली. आधी माहीत असलेले दास-दस्यू वगैरे पन्नासएक समाज मागे सुटलेले होते. शुद्रांनी (शूद्र जमातीच्या लोकांनी) वैदिकांनी आपल्या भागात रहायला हरकत घेतलेली दिसत नाही याचे एकच कारण संभवते व ते म्हणजे वैदिक संख्येने कमी होते व ते भांडखोर जमातींपासून दूरच राहू इच्छित होते, त्यामुळेच त्यांचा प्रवास अरण्यातून  होत दलदलीच्या प्रदेशात स्थायिक  होण्यात झाला. शूद्र जमात आधी त्यांच्या माहितीच नसल्याने त्यांचे नाव अफगाणिस्तानात रचलेल्या ऋग्वेदात येण्याचा प्रश्नच नव्हता. ऋग्वेदात अन्यत्र कोठेही शूद्र हा शब्द येतच नाही याचे कारण म्हणजे या लोकांशी आधी त्यांचा कसलाही संबंध आला नव्हता. आणि ज्या जमाती माहीत  होत्या त्या मागे सुटल्याने शूद्र जमातीच्या मेहरबानीशिवाय शांततामय जगण्यासाठी पर्यायही नव्हता.शिवाय त्यांना पूर्व  व दक्षिणेकडील भूगोलही माहीत नसल्याने अथवा त्यांच्याशी संबंधही न आल्याने हा सर्व भाग शूद्रांचाच आहे असे त्यांना वाटणे स्वाभाविक आहे. किंबहुना दक्षिण  भारत तर त्यांना मनुस्मृती व ब्राह्मण काळातही माहीत नव्हता. त्यामुळेच नंतरही तिकडे शूद्र राजे राज्य करतात असे म्हणून ठेवले आहे. याचाच अर्थ भारतात आलेले आद्य वैदिक हे शुद्र टोळीच्या मेहरबानीवर जगले. उलट झाले नाही तरीही न्यूनगंड का? पुढे ते जे वैदिक नाहीत त्यांना सर्रास शूद्र म्हणू लागले. प्रत्यक्षात भारतात शूद्र टोळीप्रमाणेच अभीर, शिबी, कुरु, मागध, व्रात्य, शाक्य, मत्स्य, औंड्र, पुंड्र आदि जमाती राहतच होत्या. या सर्वांना त्यांनी त्यांच्या अज्ञानामुळे शूद्र म्हटले. असे इतिहासात अनेक देशांबद्दल झाले आहे. सिंधू नदीपार हिंदू लोक राहतात असा समज सर्व पाश्चिमात्यांचा झाला व या देशाला इंडिया/हिंदुस्तान हे नांव पडले. तसेच आधी शूद्र टोळीशी संपर्क झाल्याने या देशात सर्वत्र शूद्रच राहतात असा त्यांचा समज झाला व परके ते शूद्र अशी त्यांची संकल्पना बनली. अर्थात ती मध्ययुगापर्यंत हिंदूंनी व अन्य धर्मीयांनी कधीच मान्य केली नव्हती.

एवढेच नव्हे तर मनुस्मृती शक, हूण, कुशाण अशा विदेशी राजांनाही शूद्र म्हणते. अंगविज्जा या दुस-या शतकातील महाराष्ट्री प्राकृतात रचल्या गेलेल्या ग्रंथातही कुशाण व शकांनाही शूद्र म्हणण्यात आले आहे. काय कारण आहे याचे? जेही वैदिक धर्मीय नाहीत ते सर्वच वैदिकांच्या दृष्टीने शूद्र होते. म्हणजेच वैदिकांचा धर्म वेगळा व शुद्रांचा धर्म वेगळा हे वैदिकांना माहित होते तसेच अन्यांनाही. वैदिक जरी अन्य सर्वांना शूद्र समजत असले तरी अन्य स्वत:ला शूद्र कशाला म्हणवून घेतील? घेतही नव्हते. आपल्याला जे शिलालेख, दानलेख मिळतात त्यात दान देणा-या सर्वांनीच आपापल्या व्यावसायिक जातींचा उल्लेख अभिमानाने केला आहे. उदा. हलिक, तेली, सेल-वढकी (वडार), वढकी (सुतार), गंधिक ई. या जाती आज शूद्र वर्णात येतात असे गैरसमजाने मानले जात असले तरीही तत्कालीन कोणीही स्वत:ला शूद्र म्हणवलेले नाही. ते शूद्र वंशाचे नव्हतेच तर कसे स्वत:ला शूद्र म्हणवतील? मनुस्मृतीतील शुद्रांवरची बंधने ही त्या काळात त्यांच्या सेवेत असलेल्या अवैदिकांबद्दल आहेत, बाकी अन्य धर्मीयांबाबत बाबत नाहीत हे उघड आहे. नंद, मौर्य, सातवाहन ते यादव ही बलाढ्य राजघराणीही त्यांच्या लेखी शूद्रच होती कारण ते वैदिक धर्मीय नव्हते. पुढे तर राजाश्रय तुटल्याने वैदिकांनी क्षत्रिय  व वैश्य वर्णही भाकडकथा निर्माण करत गाळून टाकले.

पण अत्यंत आरंभीच्या काळात, शूद्र टोळीच्या साहचर्यात आल्याने व त्यांच्या दयेवर अवलंबून असल्याने त्यांनी पुरुषसुक्तात शूद्र जमातीचा उल्लेख केला. त्यांची निर्मिती स्वतंत्र आहे हे मान्य केले. अगदी शुद्रांच्या कल्याणासाठी नुसत्या प्रार्थना केल्या नाहीत तर यज्ञही केले. (पहा मनुस्मृती व यजुर्वेद) हे खरे आहे की शुद्रांसाठी यज्ञ करणा-या ब्राह्मणांना त्यांनी कमी दर्जाचे मानले. पण हे शूद्र “शूद्र” राज्यातले लोक होते. वैदिकांना मुळात तोवर कुरु-पांचाल व मत्स्य सोडला तर भारतातील अन्य कोणताही भाग माहीतच नव्हता. भारतातील जमातीही माहित नव्हत्या. मग त्यांना त्यांचा कोणताच धर्म व तत्वज्ञान नव्हते काय? त्या रानटी जमाती होत्या की काय? खरे तर याचे उत्तर मनुस्मृतीनेच देऊन ठेवले आहे. “मंदिरांत पूजा करणा-या लोकांना श्राद्ध कार्यक्रमात प्रवेश नाही.” असा निर्बंध मनुने घातला कारण मूर्तीपूजा हे वैदिक धर्माचे अंगच नव्हते. पण मंदिरे होती, त्यांचे पुजारी होते आणि ज्यांना वैदिक शूद्र म्हणत होते ते हिंदू हा मूर्ती -प्रतिमापूजेचा  धर्म पाळत होते.

उत्खनित पुरावे हिंदू धर्माचे सिंधुपूर्व काळापासुनची धर्मधारा स्पष्टपणे दाखवतात. जेथून कलेची अभिव्यक्ती सुरु झाली तेथून मानवीसंस्कृतीचा  प्रकट उद्धार  सुरु झाला असे मानले जाते. सरासरी ३५ हजार ते दहा हजार वर्षांपुर्वीच्या काळात सातत्याने काढली गेलेली  भीमबेटका येथे मिळणा-या गुंफाचित्रे या भारतीय अभिव्यक्तीची उदाहरणे आहेत. अशाच प्रकारची गुंफाचित्रे विदर्भात जशी मिळतात तशीदक्षिणेत  अनेक ठिकाणी मिळून येतात. तत्कालिन  मानवाच्या जगण्याची पद्धत, नृत्य-कला, शिकारी इत्यादि बाबी त्या चित्रांतून स्पष्ट होतात. या सा-या चित्रांतुन स्पष्ट होणारी ठळक बाब म्हणजे सांस्कृतिक साम्यता. कुमाऊंमधील गुंफाचित्रे असोत कि आंध्रातील, त्यात मानवी जीवनशैलीचे साम्य दिसते. तलवारी ढाली, धनुष्य-बाण आदिंचे शोध लागले गेलेले आपल्याला दिसतात. विविध प्रकारची वाद्ये व वस्त्रप्रावरणे याचा अंदाज येतो. सैन्यदले अस्तित्वात आलेलीही आपल्याला दिसतात. सैन्यदले होती म्हणजे कोणत्या ना कोणत्या प्रकारची राज्यव्यवस्थाही या माणसांनी विकसित केली असणारच.  त्यांची प्राथमिक का होईना भाषाही होती, गीतेही होती हे सहज आपण ओळखू शकतो. थोडक्यात लिखित इतिहास अस्तित्वात नसला तरी तत्कालीन माणसाची अभिव्यक्तीची निकड आणि त्यातून त्याने घडवलेले जीवनदर्शन याचा आपल्याला अंदाज लावता येतो .

येथे एक लक्षात घेतले पाहिजे व ते म्हणजे गुंफाचित्रे आपल्याला तेथेच आढळतात जेथे नैसर्गिक गुंफा व तसे कातळ आहेत. अन्यत्र माणसाने तेथील नैसर्गिक साधने वापरून अभिव्यक्ती केलीच. आपल्याला गोवा व कोकणातही जमिनीवर आडव्या पसरलेल्या कातळांवर कोरुन काढलेली चित्रे दिसतात. जेथे रंगकाम करणे अशक्यच आहे तेथे तेथे वेगळ्या पद्धतीची अभिव्यक्ती आपल्याला दिसते. अनेक अभिव्यक्त्या मानवी दुर्लक्षाने किंवा कालौघात नष्ट झाल्या असतील. असे असले तरी येथे संस्कृती पुरातन काळापासून होती व तिचा इसपू ४०,००० वर्ष ते इसपू १०,००० या प्रदीर्घ काळातील आलेख आपल्याला मोजक्या अवशेषांतून का होईना पहायला मिळतो हे महत्वाचे. भारतीय लोक आर्य येण्यापूर्वी रानटी होते हा जो एक आरोप आर्यवादी वैदिक करतात तो खोटा आहे एवढेच येथे लक्षात घेणे आवश्यक आहे.

सिंधू संस्कृतीचे पाहिले तर शिव, मातृदेवता, नाग, बैल, पिंपळ इं. आजही पूजल्या जाणा-या अथवा सांस्कृतिक महत्व असलेल्या बाबी तेव्हाही पूज्य होत्या. महाराष्ट्रात ते दक्षिणेतही  इसवीसन पूर्व  २००० सालापूर्वीची  स्फटिकाची शिवलिंगे व मातृदेवता आढळलेल्या आहेत. बी. बी. लाल यांनी गंगेच्या खो-यात जाखेरा येथे केलेल्या उत्खनांतून तेथील सामाजिक जीवनाची माहिती मिळते. गंगेच्या खो-यातील लोक  इसवी सनपूर्व  २००० च्या काळात शेती, पशुपालन व हस्तोद्योगांच्या आधारे जगत असत. ते मासेमारीही करत. येथे सापडलेल्या भांड्यांत पितळ्या, लोटा, माठ व वाट्याही आहेत ज्या आपल्याकडे अगदी आताआतापर्यंत जशा वापरल्या जात तशाच वापरल्या जात होत्या. येथे काच व पितळाच्या बांगड्या तर सापडल्याच पण भाजक्या भांड्यांवरील कोरीव आकृत्यांवरून त्यांना त्रिकोण, वर्तुळ याचे शास्त्रशुद्ध ज्ञान होते असे सिद्ध होते हे बी. बी. लालांने दाखवून दिले आहे. करकटकासारखी भौमितीक अवजारे, ओळंबे इत्यादि अवजारेही सापडली आहेत. लोहाचा शोध भारतीय हिंदूंनी इसवी  सनपूर्व २५०० मध्येच लावला हे आता गंगेच्या खो-यात झालेल्या उत्खननातून सिद्ध झाले आहे. हे भौतिक जीवन व ज्या देवता पूजल्या जात होत्या ते पाहता वैदिक लोक भारतात आले तेंव्हा भारतीय संस्कृती आधीच वैभवाच्या शिखरावर पोहोचलेली होती.  वैदिक भारतात इसवी सनपूर्व १५०० ते  १२०० या काळात भारतात आश्रयाला आले हे येथे लक्षात घेतले पाहिजे.

शिव-शक्ती वेदांत नाहीत
सुफलन विधी हा तंत्रांचा पाया मानला जातो. योग हे तंत्राचेच एक विकसित रुप आहे. योग हा भारतियांना वैदिक मूठभर लोक भारतात येण्याआधी किमान २००० वर्ष आधीच माहीत होता. ऋग्वेदात योगाचे नांव येत नाही. भारतभर आजही पूज्य  असलेले शिव-शक्ती वेदांत डोकावतही नाहीत. शिस्नदेव म्हणून उलट त्याचा तिरस्कारच केला गेलेला दिसतो. तंत्रे भारतात विकसित होण्याचे कारण येथे कृषिवलसंस्कृती होती. शेतीत धनधान्य समृद्धीसाठी सुफलन विधी महत्वाचा असतो. किंबहुना मानवाचा तोच आद्य धर्म आहे. योनी व लिंगपूजा सृजनाचे तत्व म्हणून स्विकारले गेले. तेही प्रतीकरुपात. प्रतीके ही तंत्रांतील सांकेतिकता जपत असतात. या शिव-शक्ती या लिंग-प्रतिकांनी पुढे तत्वज्ञानाचा पाया बनत प्रकृती व पुरुष हा सांख्य तत्वज्ञानाचा पाया बनले. सांख्य तत्वज्ञान हे वेदपूर्व तर आहेच पण असूर संस्कृतीतून आलेले आहे हे आपण विसरता कामा नये. शंकराचार्यही सांख्य तत्वज्ञानाला “कपिलस्य तंत्र:” असे म्हणतात. तत्कालीन गंगेच्या खो-यातील यक्ष संस्कृतीतून आद्य औपनिषदिक विचार जन्माला आले. यक्ष व ब्रह्म हे शब्द समानार्थी असून त्याचा वैदिक ब्रह्माशी संबंध नाही. वैदिक ब्रह्म या शब्दाचा अर्थ मंत्र असा होतो तर ब्राह्मण साहित्य म्हणून जे ओळखले जाते ते ऋग्वेदातील मंत्रांचा अर्थ स्पष्ट करणारे म्हणून ब्राह्मण साहित्य आहे. उपनिषदांत ब्रह्म या शब्दाचा अर्थ अचिंत्य विश्वनिर्मितीचे अद्भूत (यक्ष) कारण म्हणजे ब्रह्म असा आहे. एकाच भाषेत अनेक शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरले जातात. अर्हत हा शब्द जैन आणि बौद्धांत वापरला जातो पण त्याच्या अर्थछटा वेगळ्या आहेत, तसेच हे आहे.
                                                                                                                   

                                                                                                       वैदिक  येण्यापूर्वीच रामायण -महाभारत घडले
वैदिक भारतात येण्यापूर्वीच रामायण-महाभारताच्या मूळ कथा घडल्या अथवा लिहिल्या गेल्या होत्या. रामायण व महाभारतातील मूळगाभ्यातील कथेत आलेल्या समाजस्थितीचा अभ्यास केला तर हे सहज लक्षात येते की ती समाजस्थिती वैदिक नक्कीच नव्हती. कोणतीही वैदिक स्मृती सहज चाळली तरी हे सहज लक्षात येते. वैदिक समाजस्थितीत व्यास ते सत्यवती, द्रौपदी, कुंती घडूच शकत नाहीत. स्त्रीस्वातंत्र्य हे महाभारतीय समाजसंस्कृतीचे अंग आहे. स्मृत्यांने किंबहुना हे विषयच टाळले आहेत कारण ते त्यांच्या पुरुषप्रधान समाजव्यवस्थेचे भागच नव्हते. अन्यथा निषेधासाठी का होईना त्यांचा उल्लेख केला असता. याचाच अर्थ असा की राम, कृष्ण वैदिक नव्हते. वैदिक नसल्याने ते क्षत्रियही  असू शकत नाहीत आणि वैदिक विष्णूचे  अवतारही असू शकत नाहीत. राजन्य हा खरा वैदिक वर्ण, क्षत्रिय नव्हे, पण तोही ब्राह्मण कालातच सर्वात आधी गायब करुन टाकला.

सांगगण्याचा अर्थ असा की वैदिक लोक भारतात येण्याआधीच येथे समृद्ध संस्कृती होती आणि आपण आज ज्या धर्माला “हिंदू” म्हणतो तो तेंव्हापासुनच चालत आला आहे. वेदांपासुन पुढे हिंदू धर्म विकसित झाला हे मत पुराव्यांवर टिकत नाही. पौराणिक धर्म म्हणजे हिंदू धर्म याचा  अर्थ पुराणांत वर्णिलेला  धर्म म्हणजे हिंदू असा अर्थ नसून पुरातण धर्म तो हिंदू धर्म असा घेतला पाहिजे. व हा धर्म स्वतंत्र होता याचा पुरावा असा की आजही वैदिकांसाठी वेदोक्त संस्कार असतात तर हिंदूंसाठी पुराणोक्त संस्कार असतात. हे संस्कार तंत्रांतून आलेले आहेत हे येथे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

वैदिक धर्म भारतात आला खरा. पण तो येथे कसा पसरला? भारतात वैदिक धर्म पसरला तो धर्मप्रचारकांच्या माध्यमातून. ग्रिफिथच्या मते वैदिकांना पहिला राजाश्रय कुरु राजांनी दिला. विष्णुपुराणातील कथेनुसार वेद व्यासांनी (अथवा प्रजापतीने) विस्मृतीत गेलेला लक्ष ऋचांचा वेद मिळेल तेवढा गोळा केला आणि त्याला चार भागांत विभाजित करून ऋग्वेद पैलाला, यजुर्वेद वैशंपायनाला, सामवेद जैमिनीला तर अथर्ववेद सुमंताला शिकवला. पतंजलीचे महाभाष्य सांगते की केवळ ऋग्वेदी वैदिकांचे २७ गट तयार झाले. या गटांनी पुढे धर्मांतराची आघाडी उघडली. विष्णुपुराणातील कथा ही अतिशयोक्त असली तरी या कथेला धूसर इतिहासाची पार्श्वभूमी   आहे. वेदांच्या ज्या अनेक संहिता निर्माण झाल्या त्या धर्मप्रसाराच्या सोयीसाठी. या आद्य मिशन-यांनी जवळपासच्या प्रदेशांत आधी धर्म प्रसार करायला सुरुवात केली. सुरुवातीला काही लोक, अगदी राजेही या नव्या धर्मात प्रवेशले. कोणाला त्यांनी ब्राह्मण वर्णात तर कोणाला क्षत्रिय व वैश्य वर्णात घेतले. हे सारे अपसूक वैदिकधर्मीय  झाले. उपनयन विधी हा धर्मांतराचा विधी बनला. जोवर उपनयन होत नाही तोवर कोणीही वैदिक बनू शकत नाही हा नियम त्यातूनच  निर्माण झाला. ज्यांनी धर्म बदलला नाही ते दुस-या धर्माचे म्हणून स्वाभाविकपणेच वैदिकांसाठी शूद्र राहिले.

                                                                                                         उपनिषदे लिहिली ती हिंदूंनी , वैदिकांनी नव्हे!
या आद्य धर्मांतरांच्या काळात वैदिकांना विरोध करण्यासाठी उपनिषदे लिहिली ती हिंदूंनी , वैदिकांनी नव्हे. जे जे संस्कृतात ते ते वैदिकांचे हा भ्रम आहे. मुळात संस्कृत भाषा इसवी सनाच्या दुस-या शतकापर्यंत विकसित झालेलीच नव्हती. तोवर वेद ते अन्य सर्व साहित्य पुराप्राकृतात होते. इसपू तिसरे शतक ते दुसरे शतक या काळात प्राकृतातून आधी अर्धसंस्कृत (वैदिक साहित्य अर्धसंस्कृतात आहे.) नंतर तिस-या शतकात पाणिनीचे संस्कृत आले. त्याआधी वैदिक धर्म हा केवळ मगध व आसपासच्या प्रदेशात रुजला होता. म्हणजे बरेच लोक वैदिक बनले होते.हिंदूतून  जे लोक वैदिक बनले ते कोणत्याही धर्मात धर्मांतरित वागतात तसे जास्त कडवे होते. मनुस्मृतीमध्ये हा टप्पाही स्पष्टपणे दिसून येतो. अवैदिक राहिलेल्या हिंदूंबद्दल  त्यांच्या मनात घृणा असणे स्वाभाविक होते. पण या अवैदिकांच्याही स्मृत्या होत्या हेही लक्षात घ्या. मनुस्मृतीने हा उल्लेख केला आहेच! म्हणजे तेंव्हाही हे दोन धर्म वेगळे होते. वैदिक धर्माला विरोध करायला महावीर-बुद्धांचा उदय मगधातुनच व्हावा हा योगायोग नाही. अन्यत्र हा धर्मच पसरला नसल्याने विरोधाचा प्रश्नच उद्भवत नव्हता. बुद्धकाळाने वैदिकांना नामोहरम केले. तेथून ते गुप्तकाळापर्यंत वैदिक धर्म महाराष्ट्रापर्यंतच कसाबसा पोहोचू शकला असला तरी त्याचा फारसा प्रसार झाला नाही. ‘गाथा सप्तशती’त ब्राह्मणांचा अथवा कोणत्याही वर्णाचा उल्लेख येत नाही याबद्दल स. आ. जोगळेकर आश्चर्य व्यक्त करून म्हणतात की, सातवाहन काळात ब्राह्मण अल्पसंख्य  असले पाहिजेत! हेच जोगळेकर, मिराशी वगैरे मंडळी सातवाहनांना ब्राह्मण ठरवू पाहतात हे नवलच नाही काय? असो.

दक्षिणेत  वैदिक धर्म दुस-या शतकानंतर पसरू लागला. म्हणजे तो प्रचारानेच धर्मांतरांनीच पसरला हे उघड आहे. तोवर किमान हजार वर्ष हा धर्म बिहार व आसपासच्य प्रदेशातच तग धरुन राहिला. पण नंतर याच काळात गुप्तयुग  अवतरले. गुप्तकाळाला वैदिक लोक नेहमीच सुवर्णकाळ म्हणतात. याचे कारण गुप्तांनी वैदिक धर्माला राजाश्रय दिला. भारताच्या इतिहासात प्रथमच आपल्याला वैदिक देवता नाण्यांवर अवतरायला लागलेल्या दिसतात. तत्पुर्वीच्या हिंदू नाण्यांवर सर्वत्र तांत्रिक प्रतिमा व शिवशक्तीच्या प्रतिमांची रेलचेल आहे. अगदी शाक्य जानपदाच्या नाण्यांवरही! गुप्तकाळात बौद्धांना विरोध करण्यासाठी ऋग्वेदातील दुय्यम देवता विष्णूला  पुढे केले गेले व अवतार संकल्पना राबवत हिंदू महापुरुषांनाही वैदिक ठरवण्याची स्पर्धा सुरु झाली. या स्पर्धेने विकृती गाठली ती चक्क बुद्धालाच विष्णुचा अवतार ठरवून.  म्हणजे अवैदिकांचे जेही काही श्रेष्ठ होते त्याला वैदिक ठरवण्याची वा वैदिकीकरण करण्याची सुरुवात झाली. प्राकृत भाषांतील मुळच्या सूत संस्कृतीने जपलेल्या पुराणांत धर्मप्रचारासाठी वैदिक महत्ता घुसवली गेली. तत्वज्ञानावरही वैदिक संस्कार केले गेले. इतकेच काय तंत्रशास्त्रांनाही पुराणांत घुसवले तर खरे पण त्यापेक्षा वेदच कसे श्रेष्ठ आहेत हे सांगायला सुरुवात केली. उदा. गरुडपुराण हे मुळात तंत्राधारित पण त्यातही विकृती निर्माण केली गेली. सुदैवाने आपण वैदिक पुटे काढून मुळात काय असेल हे सहज शोधू शकतो. पण हे काम हिंदूंनी  करण्याचे कष्ट कधीच घेतले नाहीत.

मंदिर-स्थापत्य, पूजा, योग, तप, मुर्तीकला, प्रतीकात्मकता ही सारी तंत्रांतून आलेली आहे. भारतातील द्वैत-अद्वैत वाद हा तंत्रांतूनच  निर्माण झाला. तंत्रांनी मन, शरीर, भावना या सर्वांचा एकत्रित  विचार केला. शिव हाच त्रिमुख होता. कुशाणकालीन नाण्यांवर  व घारापुरीला याचे पुरावे आहेत. पण ब्रह्मा-विष्णू-महेश असे त्याचे नंतर रूपांतर  करत घालघुसड केली. वैदिक परंपरेतील वर्णाश्रम धर्म वैदिकांना राजाश्रय मिळूनही तंत्रांनी कधीही मान्य केला नाही. “सर्व तंत्र स्वतंत्र” हा मार्ग सर्वांना खुला आहे एवढेच नव्हे तर शिव-शक्ती या द्वैतातून अद्वैत शोधणा-या तंत्रांनी स्त्री-पुरुष समतेचा नेहमी आदर केला. महाभारत व रामायणातील समाजस्थिती ही तंत्र-तत्वज्ञानाशी मिळती जुळती असून वैदिकांचा त्यावर कसलाही प्रभाव नाही. पण नंतर महाभारत प्रचंड भर घातली गेली तरी मूळ  स्वरुप त्यांना सर्वस्वी बदलता आले नाही. मात्र त्यात तंत्र, पांचरात्र याचा सन्मान करतही वैदिक पाचरी मारायचे काम त्यांनी करायचे ते केलेच! बरे, हे काम करणारे सर्व धर्मांतरीत वैदिक होते हे लक्षात घ्यायला हवे.

म्हणजे ते मुळचे हिंदूच . कोण होते हे धर्मांतर करणारे? राजाश्रय मिळाल्याने व वैदिक ब्राह्मणांना प्रतिष्ठा व धन मिळू लागल्याने अर्थातच ब्राह्मण वर्णात जाणा-यांची संख्या आधी सर्वात जास्त होती. घुर्येंनी दाखवून दिलेय की काही तर ब्राह्मण नसूनही बोगस गोत्रे तयार करुन ब्राह्मण झाले. या धर्मांतरीत ब्राह्मणांत हिंदू गुरव पुजा-यांची संख्या जास्त असणार हे उघड आहे. गुप्तकाळातच आश्रयदात्या राजाला प्रतिस्पर्धी नकोत म्हणून क्षत्रिय  वर्ण आता अस्तित्वात नाही किंवा शूद्र असलेल्या नंद राजाने सर्व क्षत्रिय ठार मारल्याने वैदिक क्षत्रीय कोणी नाही अशा कथा पसरवायला सुरुवात केली. तरीही क्षत्रिय वर्ण म्हणजे काहीतरी अलौकिक आहे असा भ्रम मात्र जो निर्माण केला गेला त्याचा पगडा अजूनही  भारतीयांवरुन गेलेला नाही.

                                                                                                          आदि शंकराचार्य हे वैदिक नव्हते तर तंत्रमार्गी
या सर्व काळात तंत्रांना बदनाम करुनही दहाव्या शतकापर्यंत तंत्रधर्म अभिमानाने जीवंत राहिला. हजारो-लाखोंच्या संख्येने तांत्रिक ग्रंथ लिहिले गेले. तंत्रांचे तत्वज्ञानानुसार पंथही पडले. शैव मंदिरे व खजुराओसारखी तंत्राधारित मिथूनशिल्पे बनतच राहिली. सामाजिक समतेचा आविष्कार घडवणारे मदनोत्सव/वसंतोत्सव सुरुच राहिले. तंत्रांचा बोलबाला एवढा होता की वैदिकांनी हिंदूंकडून कडून तंत्रांची उसणवारी करत वैष्णव तंत्रे विकसित  केली तर बौद्धांनी वज्रयानी तंत्रे विकसि त केली. अर्थात तांत्रिक बनलेल्या ब्राह्मणांना वैदिकांनी कधीही बरोबरीचे मानले नाही हाही इतिहास आहे. नाथ संप्रदाय हाही तंत्रांतूनच आलेला. श्रीशैलम हे तंत्रांचे मुख्य पीठ बनले. आदि शंकराचार्य हे वैदिक नव्हते तर तंत्रमार्गी होते हे येथे लक्षात घेतले पाहिजे. ते वैदिक नव्हते.  त्यांची स्तोत्रे भगवती अंबेला उद्देशून आहेत व त्यांत तांत्रिक प्रतिमांचा विपुल  वापर आहे. ते स्वत: शिवभक्त होते व अद्वैती होते. किंबहुना तंत्रशास्त्रांचे अधिकारी अशीच त्यांची ओळख आहे. पण दुर्दैवाने नंतर त्यांचेही वैदिकीकरण करत त्यांना  हिंदूंपासून पासून दूर ढकलण्यात आले व शंकराचार्यांचे मठ हे वैदिक अधिसतीचे आखाडे बनले. शंकराचार्यांनी ज्यावर भाष्ये केली ती ब्रह्मसूत्रे ही मुळची तांत्रिक तत्वज्ञानातूनच बनलेली. गीता सांख्ययोगावर व उपनिषदांवर आधारित. वेदांवर नाही. किंबहुना वैदिक तत्वज्ञान समाजात कधीच रुजले नाही. पण वैदिकांनी तंत्रांतील  काही वामाचारी पंथांना लक्ष्य करत संपूर्ण  तंत्रांनाच बदनाम करण्याची मोहीम आखली. शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे तंत्रनिष्ठ धर्म पाळणारे . शिवाजी महाराजांना बदनाम करणे जमले नाही पण शंभुराजांना बदनाम केले गेले. मद्य, मांस, मैथुनादी  म्हणजेच तंत्र, जादुटोणा-करणी-भानामती म्हणजेच तंत्र असा अपप्रचार करत करत तंत्रांचे (म्हणजेच आगमे) अवमूल्यन . मूळची आगमाधारित तत्वज्ञानाचे आविष्कार असलेले व वेदविरोधी उपनिषदे ते सांख्यादि तीन दर्शने वैदिकांनी आपलीच म्हणून कधी रुजवायला सुरुवात केली हे हिंदूंना समजलेच नाही. आजही ते जी पूजा करतात ती तांत्रिकच पद्धत आहे हे त्यांना माहीत  नाही. किंबहुना पूजा हीच अवैदिक आहे. मंदिरांचे गर्भगृह ते शिखर यात तंत्राचा तात्विक पाया आहे हेही त्यांना माहीत  नाही. पौराणिक मंत्र म्हणून जे अवैदिकांसाठी (म्हणजे हिंदूंसाठी  व त्यांच्या लेखी शुद्रांसाठी ) म्हटले जातात ते तंत्रांतूनच नक्कल केलेले  आहेत व त्यांचे मूळ  वेदपूर्व आहे हेही त्यांना माहीत  नाही. किंबहुना त्यांचे वैदिक दास्य हे त्यांच्या गहन अज्ञानाची अपरिहार्य परिणती आहे.

हिंदू अथवा ज्यांना वैदिक शूद्र-अतिशूद्र म्हणतात त्यांचा धर्म वेदपूर्व व पुरातन आहे. आजही ते तोच धर्म पाळतात. महत्वाची तत्वज्ञाने ही हिंदूंची  निर्मिती आहे, वैदिकांची नाही. तुम्हाला वेदाधिकार नव्हता याचे सरळ कारण म्हणजे तुम्ही कधी त्या धर्माचेच नव्हता तर त्यांच्या धर्मग्रंथावर कसा अधिकार मिळेल? त्यांच्या स्मृती तुम्ही कधीही इतिहासात पाळलेल्या नाहीत. तुमच्यातीलच धर्मांतरीत झलेल्या वैदिक धर्मियांनी तुमचा स्वार्थासाठी वापर केला हे नीट समजावून घ्यायला पाहिजे. तंत्रांवर मात्र सर्वांचा अधिकार होता व आहे. वैदिक धर्म येथील नाही. तो येथे आला तो मुठभर शरणार्थ्यांच्या मार्फत. ते आक्रमण नव्हते की बहुसंख्येचे स्थलांतर नव्हते. असते तर आज हिंदूंचा  ना शिव उरला असता ना तंत्रे. मंदिरेही नसती. वैदिक धर्माला मूर्तीपूजा मान्य नाही. पण धर्मांतरीत हिंदूंनी  आपल्या मुळच्या चाली सोडणे गुप्तकाळात नाकारायला सुरुवात करत विष्णुमंदिरांची पूजा स्विकारली. यामुळे वैदिकांतही दोन तट पडले. एक श्रौत तर दुसरा स्मार्त. श्रौत पंथ कर्मठ वैदिक असून ते मूर्ती र्तीपूजा करीत नाहीत. स्मार्त मात्र करतात. मंदिरांत पुजा करणा-या पुजारी ब्राह्मणांना आजही वैदिकांत प्रतिष्ठा नसते हे हिंदूंना  कोठे माहित आहे? पुन्हा या वैदिकांत पंचगौड व पंचद्रवीड हे दोन प्रादेशिक भेदही आहेत आणि वैदिक धर्मप्रचाराची दिशा दाखवणारा हा भेद आहे.

आज वैदिक कोण आणि हिंदू कोण हे वेगळे कसे दाखवणार असा प्रश्न वारंवार मला विचारला जातो. याला कारण वैदिक साहित्याने वा त्यांनी विकृत केलेल्या साहित्यामुळे निर्माण झाला आहे असे वाटणे स्वाभाविक आहे. पण हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. खरे तर ब्राह्मण, क्षत्रिय  व वैश्य हे तीन वर्ण ज्यांचे आहेत व वर्णीय धार्मिक उतरंड जे मानतात, ज्यांना जन्मसिद्ध वेदाधिकार आहे, ज्यांना वेदोक्त संस्कारांचा अधिकार आहे ते वैदिक धर्मीय लोक आहेत. काही हिंदू समाजघटक स्वत:ला या तीन वर्णांपैकी एक असल्याचे अज्ञानापोटी समजतात पण त्यांना त्या त्या वर्णाचे वैदिक अधिकार नाहीत तर ते वैदिक कसे? त्यांना आपण छद्म-वैदिक किंवा वैदिकाळलेले म्हणू शकतो. उदा. अनेक जाती स्वत:ला क्षत्रिय  समजतात पण त्यांना वेदोक्ताचा अधिकार नव्हता व नाही. हा “मान ना मान…मैं तेरा मेहमान” म्हणण्यासारखे आहे. काही पांचाळ जाती स्वत:ला ब्राह्मण समजतात, पण त्यांचे धार्मिक विधी मात्र त्यांचेच पुरोहित करतात. त्यांना एकही वैदिक धर्माचा जन्मसिद्ध अधिकार नाही. वैदिक धर्मियांनी वर्णांना एक साहित्यिक महत्ताच एवढी दिली आहे की त्या गारुडातून बाहेर पडता येत नाही.  ते हिंदू असूनही स्वत:ला वैदिक समजतात ही त्यांची मानसिक समस्या आहे व ते या वैदिक गारुडातून बाहेर पडत नाहीत तोवर अशा स्वत:ला नसतांनाही ब्राह्मण, क्षत्रिय  अथवा वैश्य मानणा-या हिंदूंचे  सामाजिक व मानसिक कल्याण होणार नाही.

रा. स्व. संघ हा हिंदुत्ववादी नसून पक्का वैदिकवादी आहे हे मी ‘मीडिया वॉच ‘  गेल्या दिवाळी अंकात दाखवून दिले होते. वैदिक धर्माचा इतिहास व तो भारतात कसा आला हे दाखवून देणारा माझा संशोधनपर ग्रंथ “Origins of the Vedic Religion and Indus-Ghaggar Civilization” प्रसिद्ध झाला असून या वर्षाअखेर माझे याविषयात पुस्तक येत आहे.

(लेखक हे ख्यातनाम विचारवंत व अभ्यासक आहेत)
९८६०९९१२०५
 

Previous articleलिंगा-लिंगातला भाव …..अभाव ?
Next articleपॉलीअ‍ॅमरी: बहुविध नात्यांची बहुपदरी व्यवस्था
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

2 COMMENTS

  1. अतिशय उत्तम माहिती मिळाली, खरोखर अज्ञानापोटी ९०% लोक कर्मकांडाला बळी पडतात

    अशा प्रकारच्या जनजगृतीची नितांत आवश्यकता आहे

  2. सोनवणी सर भोवळ आली. आपल लिखाण परखड संशोधनात्मक आहेच पण ते मांडताना आपण जे छेद उपछेद मांडले आहेत ते प्रस्थापित सध्या जे काही आहे आणि आपण भारतीय म्हणुन जे काही मान्य करतो त्याला क्रांतीकारक वाटत. खरोखरच हे असं असेल तर मग आजचा काळ त्याची मान्यता आणि आमची सगळ्यांची धर्माबद्दल जी भावना आहे त्याचं काय. बरं वर आपण भारतीय आसेतू हिमाचल जो एक राष्ट्र आणि तथाकथित एक धर्म हिंद( वैदिकांच काय) त्याचं काय ! अशा प्रकारच्या मर्यादा येऊं शकतात. जयतू हिंदू राष्ट्रम या संकल्पनेच काय!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here