साभार – ‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०१७
अरविंद जगताप
खरंतर हिंसेचा तिटकारा असल्याचं आपण भासवत असलो तरी हिंसेविषयी आपल्याला सुप्त आकर्षण असतंच. आपल्याला ते आकर्षण सतत वाटत राहण्यासाठी भवताली काही लोक, काही संस्था, काही गट सातत्यानं काम करत असतात. हिंसा आपल्याला संस्कारातच शिकवली जाते.
………………………………………………………………………………………………………
‘अमुक जातीच्या किंवा धर्माच्या लोकांना चांगला धडा शिकवला पाहिजे.’ असं सामान्य माणसं कित्येकदा बोलत असतात. त्यांनी उभ्या आयुष्यात साध्या झुरळालापण धडा शिकवलेला नसतो. त्यामुळे एक सुप्त इच्छा आत फसफसत असते. फक्त हे काम कुणीतरी करावं आणि आपल्याला ते पहायला मिळावं असं वाटत असतं बऱ्याच लोकांना. सोशल मिडीयावर असे कचकड्याचे शूरवीर खूप दिसतात. धर्माची भांडणं झाली की हे लोक युद्धाची भाषा बोलू लागतात. थेट चीनला धडा शिकवायची भाषा! कुणाच्या जीवावर? टीव्हीवर युद्धाच्या बातम्या बघून सोशल मिडीयावर लिहिणाऱ्या लोकांनी आक्रमक होण्याचं प्रमाण खूप वाढलंय हे मात्र मान्य करावं लागेल. हा एक नवीन आजार आहे. रोज कुणालातरी धडा शिकवायची भाषा लोक बोलताहेत. नशिबाने आज त्यांची संख्या कमी आहे. पण ही संख्या वाढायला वेळ लागणार नाही. कारण सोशल मीडियावर आपली आक्रमकता दाखवायला पैसे लागत नाहीत.
आमच्या गावात जत्रा असली की कुस्त्यांची स्पर्धा असायची. मुख्य पैलवानांची कुस्ती खूप उशिरा असायची. तोपर्यंत जमलेल्या गर्दीसमोर छोटे-छोटे पैलवान लढायचे. त्यांना कुठलं बक्षीस नसायचं. फक्त रेवड्या मिळायच्या. जिंकला तरी आणि हरला तरी. आज सोशल मिडीयावर लाईक मिळतात. या लाईकसाठी काडीपैलवान लोक आक्रमक भाषेत शाब्दिक लढाया करत असतात. ज्याला अजून बारावी पास झाल्याचं सर्टिफिकेट भेटलं नाही तोसुद्धा ‘देशभक्त’ आणि ‘देशद्रोही’ असल्याचं सर्टिफिकेट लोकांना वाटत असतो. या सोशल मिडीयावरच्या युद्धानं आता विकृतीची सीमा ओलांडलीय. लोक तर पूर्वीही एकमेकांशी आपल्या विचारसरणीवरून वाद घालायचे. आता आपलीच विचारसरणी आणि आपलाच पक्ष कसा बरोबर आहे यासाठी खोट्या गोष्टी पसरवायला सुरुवात झालीय. ‘चीन कसा भारताला घाबरला’ असं तद्दन खोटं पसरवलं जातं. यात आपण स्वतःला फसवतोय हेसुद्धा लोक विसरून जातात. एक महिला नेता आपल्या पक्षाच्या नेत्याच्या मुलाचा बचाव करताना खोटे फोटो वापरते. एका मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवते. एवढी अशी वेळ का आलीय? आपण किती आक्रमक आहोत हे दाखवायच्या नादात आपण किती मूर्ख आहोत हे सिद्ध करण्याची चढाओढ सुरू आहे.
खरंतर हिंसेचा तिटकारा आहे हे आपण भासवत असलो तरी हिंसेविषयी आपल्याला सुप्त आकर्षण असतंच. आपल्याला ते आकर्षण सतत वाटत राहण्यासाठी भवताली काही लोक, काही संस्था, काही गट सातत्यानं काम करत असतात. हिटलर आपल्याला आवडायचं काही कारण नसतं. पण त्याची गोष्ट एवढ्या फिल्मी पद्धतीने आपल्यासमोर आणली जाते की आपण एखाद्या बेसावध क्षणी नकळत त्याच्या प्रेमात पडतो. खरंतर हिटलरचं व्यक्तिमत्व, त्याची ती मिशी यात कुठं काय दरारा आहे? आणि त्याच्या आयुष्याचा शेवट तर केवढा दयनीय! तरी त्याचं ते रूप जाणीवपूर्वक लपवून आपल्याला केवळ वंशश्रेष्ठत्व मिरवणारा हिटलर त्याच्या त्या रूपाचं उदात्तीकरण करून सांगितला जातो. जातीच्या, घराण्याच्या अभिमानाचं ‘बाळकडू’ आपल्याला घरीच, अगदी नाकळत्या वयपासून मिळालेलं असतं. त्यात भर पडते ती हिटलरसारख्या विघातक आदर्शांची. आणि आपलं घरातून फुकट भेटलेलं बाळकडू आणखीच कडू होऊ लागतं. हिंसा आपल्याला संस्कारातच शिकवली जाते. कितीतरी बाप अभिमानाने सांगत असतात, की ‘मी मुलाला सांगतो मार खाऊन यायचं नाही. कुणी एक मारली तर तू दोन मारून ये. मी बघतो बाकीचं.’ आता यात कुणी आपल्या मुलाला ‘मार खाऊन ये’ असं सांगावं असं आपलं म्हणणं नसतं. पण ‘चर्चा करून प्रश्न सोडव’ असं कुणी सांगतं का? मुळात असं सांगणं आपल्यालाही हास्यास्पदच वाटतं ना? कारण या गोष्टीवर आपला विश्वास राहिलेला नाही. चर्चा, वाद-संवाद यांची प्रतिष्ठा वेगानं घटत चाललीय. आपल्याला अमिताभ बच्चन आणि अमरीश पुरी चर्चा करून प्रश्न सोडवताहेत किंवा सलमान खान गुंडांशी संवाद साधत त्यांचं हृद्यपरिवर्तन करतोय हे अजिबातच पटणार नसतं. आपल्याला हाणामारी बघायची असते. त्यामुळे सिनेमावाले वेगवेगळ्या पद्धतीने मारामारी दाखवतात. आपण ती चवीने पाहतो. आपल्याला आवडणारे संवाद बघा. ‘कितने आदमी थे? आदमी तीन और गोली दो?’ किंवा काय. ‘मैं जहां खडा हूं लाईन वही से शुरू होती है.’ बहुतेक संवाद नीट ऐकले तर ते आक्रमकच असतात. त्यात साहित्यिक-कलात्मक मूल्य वगैरे नावालाही नसतं. पण त्यातली आक्रमकता आपल्याला भावते. म्हणून सिनेमा एवढा लोकप्रिय आहे. सिनेमातल्या गाण्यांची भाषा बघा. ‘मार डाला, दिल चीर के देख, तेरी आंखो ने मारा रे, दिल के टुकडे, कम्बख्त इश्क, अखियों से गोली मारे…’ अशी हजारो उदाहरणं देता येतील. ही ‘प्रेमाची भाषा’ आहे आपली! एवढी हिंसक. मराठीत पण ‘नजरेचे बाण’ असतातच. तलवारीसारख्या भुवया आणि नजरेने घायाळ वगैरे. हे ‘हिंसक संस्कार’ आपल्यावर पद्धतशीरपणे केले जातात. ज्या सिनेमात नट-नटी जीव देतात किंवा त्यांचा जीव घेतला जातो, किंवा दोन घराण्यात एकमेकांचा बदला घेण्याची स्पर्धा लागते ते जास्त आवडतात लोकांना. हळूहळू आपण हिंसा पहायला सरावतो. हिंसेचं व्यसनच लागतं आपल्याला!
हिंसा या शब्दाचा आपण खूप एकांगी, मर्यादित विचार करतो. कुणीतरी एखाद्यावर केलेला हल्ला आपल्याला हिंसा वाटते. कुणीतरी कुणाचातरी केलेला छळ हीपण आपल्याला हिंसा वाटते. पण माणसं स्वतःच स्वतःलासुद्धा छळत असतातच की! त्यांचा विचार कुणी करायचा? माझी आजी जे अतिरेकी उपवास करायची त्याचं मला कधीच कौतुक वाटलं नाही. तो तिनं चालवलेला छळच होता स्वतःचा. पण तिच्या मनावर असलेला भावनेचा पगडा एवढा मजबूत होता की तिला कुठलाच नातेवाईक समजावू शकला नाही. तिनं तिला माहित असलेल्या सगळ्या देवांचे उपवास केले. अशी खूप उदाहरण आपल्याभोवती असतात. आमचा एक मित्र फिरायला-जेवायला नेहमी सगळ्या ग्रुपसोबत येतो. आम्ही सगळे मांसाहारी. तो एकटा शाकाहारी. त्याच्या नजरेत आमच्या ताटातल्या कोंबडीविषयी असलेलं मूक आकर्षण आम्ही ओळखू शकतो. पण तरीही तो हट्टानं मांसाहार करत नाही. त्याला काहीतरी देवाचं कारण. पण मुळात त्याला आम्ही खातो ते आवडत असतं. तो ‘मला ग्रेव्हीचा वास आवडतो’ वगैरे कारणं सांगून आमच्यात बसतो. पण त्याचं असं स्वतःला बंधनात ठेवणं आम्हालाच खूप वाईट वाटतं. माणसाचं स्वतःवर नियंत्रण असावं हे मान्य. पण अशा निरुपद्रवी गोष्टींसंदर्भात? पाणीच प्यायचं नाही. चप्पलच घालायची नाही. केसच कापायचे नाहीत असे काही अतार्किक नियम लोक बनवून घेतात तेव्हा अस्वस्थ व्हायला होतं. कुठेतरी श्रद्धासुद्धा नकळत हिंसेकडे झुकू लागते. जगभरातले लोक धार्मिक कारणानं किती हिंसक होत असतात हे आपण बघतोच. आजवर कुठल्या रोगानं किंवा भूकंप, सुनामीनं गेले नसतील एवढे जीव धर्माच्या नावाने गेलेत. हे सगळं ‘या धर्माच्या लोकांनी त्या धर्माच्या लोकांना मारलं’ एवढं सरळ आहे. पण आपल्याच धर्माच्या परंपरा पाळता-पाळता लोक स्वतःचा किती छळ करतात हेसुद्धा नीट बघायला पाहिजे. एकमेकांचा धर्म बुडवायला निघालेले, देश उध्वस्त करू पाहणारे लोक जगात सगळीकडे सगळ्याच धर्मांमध्ये आहेत. त्यांना हिंसा हवी आहे. पण स्वतः नामानिराळे राहून. सैन्य लढायला पाहिजे. विजय यांच्या नावावर. कार्यकर्ते एकमेकांना जखमी करू देत. निवडणूक हे जिंकणार. हे खूप भीषण आहे. पण या लोकांच्या हिंसेपेक्षा मला वेगळ्या प्रकारच्या हिंसेचं जास्त दुखः होतं. या लोकांच्या हिंसेमागे एक विशिष्ट विचारसरणी आहे. एक नियोजनबद्ध प्रचारतंत्र आहे. एक कारस्थान आहे. त्याला बळी पडलेले कार्यकर्ते आहेत.
पण काही लोक जे अशा कुठल्याच कटाचा भाग नसतात ते अशा हिंसेचे बळी होताहेत याचं जास्त दु:ख आहे. उदाहरणच द्यायचं तर लहान मुलांच्या आत्महत्येच्या प्रमाणात झालेली वाढ. हे असं का होतंय? मुलं एवढ्या सहजपणे आपल्या आई-वडलांचं स्वप्न असं चिरडून कसं टाकतात? एखादी छोटीशी गोष्टपण त्यांना का सहन होत नाही? कुणी अभ्यास करायला सांगितला म्हणून जीव देतोय. कुणी खेळायला दिलं नाही म्हणून जीव देतोय. त्या छोट्याशा जिवांच्या डोक्यात आयुष्य संपवण्याचे असे हिंसक मार्ग कसे शिरले? सगळ्यात जास्त हेलावून टाकणारी हिंसा ही आहे. एका निर्वासित मुलाचा मृतदेह किनाऱ्यावर पडलेला पाहून आपण सगळेच किती अस्वस्थ झालो होतो. मला आजवरचं सगळ्यात क्रूर आणि करूण दृश्य वाटलं ते. तो हिंसाचार जास्त चिंता वाढवणारा आहे. धर्मासाठी, साम्राज्यासाठी लढाया होतात. जीव जातात. पण हेलावून टाकणारी घटना असते ती शाळेत शिकणाऱ्या मुलांवर होणारा गोळीबाराची. तो पाकिस्तानात किंवा अमेरिकेत होत असला तरी प्रश्न पडतो, की माणसं एवढी विकृत कशी झाली. मुलगी झाली म्हणून किंवा गर्भात मुलगी आहे म्हणून ती मारून टाकणे ही गोष्ट आधुनिक म्हणवणाऱ्या नागरी समाजात अजूनही सुरूच असणं हे जास्त हिंसक आहे. इथं कुठं ‘धर्म नावाची अफूची गोळी’ आहे? इथं कुठं साम्राज्यवादाची नशा आहे? मग एवढी क्रूर हत्या सामान्य माणसं कशी करू शकतात? ज्या-ज्या हत्येत एरवी ‘सामान्य’ असलेली माणसं सहभागी असतात ती हत्या जास्त थरकाप उडवणारी असते. ज्या हिंसेत सामान्य माणूस साक्षीदार असतो ती जास्त घातक असते. लोक समूहाने एकत्र येऊन ज्या हत्या करताहेत, मारहाण करताहेत ते जास्त धोकादायक आहे. लोकांना अचानक कायदा हातात घ्यावा वाटणं हे एकतर कायद्याचं राज्य नसल्याचं लक्षण असतं किंवा समूहाचा सरकारवर असलेला विश्वास उडत चालल्याचं प्रतिक असतं. या गोष्टीचा सरकारला विचार करावा लागणार आहे. पण यासोबतच आपल्याला विचार करायचाय तो शेतकरी आत्महत्येसारख्या गोष्टीचा.
गेल्या काही वर्षात शेतकरी आत्महत्या वाढताहेत हे सगळ्यांना माहित आहे. मात्र अलीकडे घडणाऱ्या आत्महत्यांची पद्धत हेलावून टाकणारी आहे. मुळापासून हादरवून टाकणारी आहे. काही शेतकऱ्यांनी थेट विजेच्या तारेला पकडून जीव दिलाय. काही शेतकऱ्यांनी चक्क स्वतःची चिता स्वतः रचून पेटवून घेतलय. या गोष्टीने आपण, जर विचलित होणार नसू तर हे जास्त हिंसक आहे. आत्महत्या एवढ्या स्वतःला त्रास करून केल्या जाताहेत यामागं काय कारण असेल? कुणावर राग असेल? स्वतःवर? जगावर? स्वतःच्या जीवाचा एवढ्या हिंसक पद्धतीने शेवट का करत असतील माणसं? त्यांचं दु:ख किती टोकाचं असेल… आपण अजूनही त्यांचं दु:ख ओळखू शकलो नाही. आपल्याला या हिंसेमागचं कारण आधी शोधलं पाहिजे. कारण प्रत्येकवेळी शेतकरी स्वतःचे हाल करून घेईल असं नाही. आपल्याला विचार करावाच लागेल. या हिंसेचं काय करायचं? कारण इथं तर आपल्याच माणसांचे जीव जाताहेत. ही माणसं काही तिऱ्हाईत नाहीत. ती तर मला-तुम्हाला जगवणारी माणसं आहेत.
सामान्य माणसं हिंसेपासून चार हात दूर असतात असा आपला समज असतो. म्हणजे मटन आणायला गेल्यावर ‘एक किलो का दोन किलो’ सांगून रांगेत उभं राहणं, शक्यतो बोकडाच्या मानेवर सुरी चालवली जात असताना नजर फिरवणं हे तो करत असतो. पण त्यानंतर ‘चाप देना’ किंवा ‘लेग पीस देना’ अशी मागणी करत मटणाचे बारीक तुकडे करताना बघायला मात्र त्याला काही वाटत नाही. त्याबाबतीत आता समाजाची भीड चेपली आहे असं म्हणायला हरकत नाही. पण ‘कुणाचा जीव जाताना बघायचं नाही’ असं ठरवलं म्हणजे ‘आपण हिंसाचारी नाही’ असं असतं का? किंवा ‘आपण मांसाहारी नाही म्हणजे आपण हिंसाचारी नाही’ असं असतं का? तरी बरं, आपल्याच देशातल्या शास्त्रज्ञाने शोध लावलाय, की वनस्पतींना पण जीव असतो. हे ऐकून बर्नार्ड शॉच्या डोळ्यात पाणी आलं होतं म्हणे. ‘आपण शाकाहारी आहोत पण किती हिंसक आहोत’ असं काहीसं वाटून. माणसाने मग एवढं टोकाचं शाकाहारी असलं पाहिजे. पण आपण एवढे हळवे होऊ शकत नाही. हळवं असण्याचा थोर अभिनय करण्यात आपण सगळेच पटाईत असतो. पण घटना कितीही हिंसक असली तरी त्यावर आपली प्रतिक्रिया क्षणिक असते. प्रिन्स नावाचा मुलगा विहिरीत पडला होता तेव्हा लाखो लोक टीव्हीपुढे डोळे लावून बसले होते. काही बायकांनी तर अक्षरशः देव पाण्यात घातले होते. पण हे सगळेजण जेवायच्या वेळेवर नेमानं जेवत होते. कुणाची भूकच हरवलीय असं झालं नाही. अर्थात असं काही होण्याची गरज होती असं नाही. पण व्यक्त होताना आपण त्या घटनेएवढेच हिंसक असतो. रस्त्यात कुणी कुणाला चाकूने भोसकलेलं पाहून जेवढी दहशत बसत नाही तेवढी दहशत नियोजनबद्ध पद्ध्तीनं केलेल्या अनेक सामुहिक गोष्टींनी निर्माण होते. औरंगाबादमध्ये एमआयएम पक्षाचा मुस्लीम आमदार निवडून आला तेव्हा अशी मिरवणूक काढली गेली जणू काही या देशात इस्लामी राजवटच आली. या गोष्टींनी हिंदू जास्त संतापले. हिंदू जनजागृती समिती, बजरंग दल अशा कडव्या हिंदू संघटनांची मिरवणूक निघते त्यानं मुस्लीमही असुरक्षित होतात. कुठल्याही दंगलीपेक्षा या गोष्टी जास्त हिंसक असतात. कारण दंगलीत इतर धर्मियांनी एकमेकांना मदत केल्याच्या खूप घटना घडतात. पण जेव्हा हिंसेचं सावट असं अदृश्य असतं तेव्हा कुणीच कुणाची मदत करू शकत नाही. हे सावट किती गडद आहे याचा कुणालाच अंदाज येत नाही.
नथुराम गोडसेनं गांधीजींवर गोळी चालवण्याआधी हात जोडले होते. मग बंदुक काढून गोळीबार केला होता. आज एकाच वेळी गांधीजीना हात जोडले जातात आणि हत्याही केली जाते. हे जास्त भयंकर आहे. हत्या करणारे आणि अभिवादन करणारे हात एकच असले की कायदा आणि सुव्यवस्थासुद्धा हतबल होते. सगळं काही बेमालूमपणे करता येतं. विरोधात असले की ‘बनाएंगे मंदिर’ म्हणणारे आणि सत्तेत आले की मंदिराबद्दल काहीच न बोलणारे सोशल मिडीयावर मात्र अखंड वल्गना करत असतात. सामान्य लोकांना यातला खेळ बहुतेकदा लक्षातही येत नाही. आता ‘वंदे मातरम’बाबतच्या वादाचा एमआयएम आणि बीजेपीला फायदा आहे. सामान्य माणसाला काय मिळेल त्यातून? तरीही लोक सोशल मिडीयावर या विषयावर दिवसरात्र हिरीरीने वाद घालत बसतात. सोशल मिडीयावर अशा बिनकामाच्या विषयावर वाद घालणाऱ्यांची संख्या बघून नेमकं काय वाटतं? या देशातले लोक जागृत होताहेत असं वाटतं? का देशातल्या बेरोजगारांच्या संख्येत प्रचंड वाढ झालीय असं वाटतं? कष्ट करणारे हात दुबळे वाटू लागतात तेव्हा फुकट आणि अपघाताने मिळालेली जात महत्वाची वाटू लागते. तिच्या कुबड्या महत्वाच्या वाटू लागतात. आणि एकदा विनाकारण अशा कुबड्या हाती घेतल्या की तुम्ही कुणाला हात देऊ शकत नाही. साथ देऊ शकत नाही. तुम्ही फक्त वार करू शकता. त्यामुळे स्वबळावर मोठी झालेली माणसं जातीची नाही तर मातीची ऋणी असतात. पूर्वी जात ओठात होती ती आता पोटात आहे. त्याचं विष झालंय. ते विष समाजमाध्यमांमध्येही झिरपत जाताना दिसतंय. कधी नव्हे एवढे जातीपातीचे ग्रुप तुम्हाला समाजमाध्यमांत दिसतील. पुन्हा प्रत्येक धर्मातले लोक ‘तुम्ही अमुक धर्मावर का बोलत नाही?’ हा पांचट प्रश्न विचारणार. अरे, माणूस जे भोवताली घडतं त्यावर बोलेल ना! भारतातला माणूस मोदींवर बोलणार का ट्रम्पवर? गायीसारख्या सगळ्यात दयाळू, निरुपद्रवी प्राण्यावरून ज्या प्रकारे हिंसा होतेय तो या देशाला शाप आहे. हे तथाकथित गोरक्षक लोक गाईबद्दल मनामनात असणारा नैसर्गिक आदर कमी करायला कारणीभूत ठरणार आहेत. एकेकाळी या देशातल्या वाघांची चर्चा असायची जगभर. आता गाईचे किस्से सांगितले जातात. ‘गोमाते’साठी लोकांचा जीव घ्यायला धावून जाणारे ‘भारतमाते’वर होणाऱ्या हल्ल्याच्या वेळी कुठे असतात? या लोकांना एक कळत नाही, की भीती दाखवून आदर वाढत नसतो. आदर मनात असावा लागतो. गांधीजीबद्दल आजही जगाला आदर का आहे याचा शोध घेतला तरी खूप प्रश्नांची उत्तरं मिळतील. लोकांना हिंसेबद्दल सुप्त आकर्षण आहेच पण अहिंसेबद्दलचे प्रेम आणि आदरही नक्कीच शिल्लक आहे.
सोशल मिडिया माणसाचा मेंदू किती बधीर करू शकतो ते नोटबंदीच्या काळात पुरेपूर दिसलं. लोक चवताळून हा निर्णय कसा देश बदलून टाकणारा आहे हे सांगत होते. ‘आता देशात क्रांती झालीय’ असं वातावरण निर्माण केलं गेलं. नोटबंदीच्या विरोधात बोलणारा थेटच देशद्रोही ठरू लागला. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पहिल्यांदा केविलवाणे भासले देशाला. भंपक अर्थतज्ज्ञ गल्लीबोळात चमकोगिरी करू लागले. देशाच्या भवितव्यासाठी एवढा महत्वाचा म्हणवलेला निर्णय अत्यंत बालिश पातळीवर चर्चेत आला. लोकांचे एटीएमच्या रांगात अक्षरशः बळी गेले. तीच गत शेतकरी कर्जमाफीची. ‘शहर विरुद्ध गाव’ असं चित्र सोशल मिडीयावर निर्माण केलं गेलं. शेतकऱ्याविषयी पहिल्यांदा एवढ्या फालतू पद्धतीने लिखाण केलं गेलं. एखाद्याच्या प्रतिक्रियेवरून सहज त्याच्या जातीचा अंदाज यायला लागला. सोशल मिडीयावर आडनावावरून विचारांचा वास यायला लागला. जातीचा कधी नव्हे एवढा अभिमान या काही वर्षात वाढला. त्यात सोशल मिडीयाचा वाटा खूप मोठा आहे. लोक उघडपणे एकमेकांच्या जातीवर अत्यंत घाणेरड्या भाषेत लिहू लागले. एकमेकांच्या महापुरुषांची हीन पातळीवर जात टिंगल करू लागले. प्रत्येक जात ‘आमच्यावर अन्याय होतोय’ ही भाषा बोलू लागली. बलात्कार झालेल्या मुलीची जात महत्वाची ठरू लागली. प्रत्येक घटना जातीय तेढ निर्माण करण्यासाठी कशी वापरता येईल याचा विचार सुरू झाला. एका जातीचा मोर्चा निघाला की असुरक्षित असल्याचं चित्र स्वजातीत निर्माण करून नवीन मोर्चे काढले जाऊ लागले. ही मोर्चेबांधणी आपल्याला नक्की कुठे नेऊन ठेवणार आहे? एका गुन्ह्यात अमुक जातीचा माणूस सापडला म्हणजे त्या अख्ख्या जातीला गुन्हेगार ठरवायचं का? पण जातीच्या चष्म्यातून बघायला सुरुवात झाली की हे घडणारच. आणि आज कधी नव्हे ती जातीच्या नेत्यांची, प्रादेशिक अस्मिता असलेल्या नेत्यांची किंमत वाढलेली आहे. प्रत्येक जातीच्या नेत्याला गाजर दाखवून त्याला आपल्या दावणीला बांधायचं राजकारण यशस्वी होताना दिसतंय. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना जाती संपणं परवडणार नाही. जातीचं राजकारण त्या-त्या जातीच्या उन्नतीसाठी मुळीच फायदेशीर नसतं. पण ठराविक पक्षांना मात्र ते खूपच लाभदायी ठरतं. बहुमताचा जादुई आकडा ते जाती-जातीत फूट पाडल्याशिवाय गाठूच शकत नाहीत. पस्तीस टक्के घेऊन वर्गात पहिला नंबर आणायचा असेल तर बाकी सगळे नापास झाले पाहिजेत याकडं लक्ष द्यावं लागतं. आणि दुर्दैवाने सगळ्या जाती या राजकारणाला बळी पडून सपशेल नापास होताहेत. अतिशय क्षुल्लक लोकांना जातीचं नेतृत्व देऊन या देशातला विरोधी आवाज आणि नेतृत्व नष्ट करण्याचं पाप जातीय राजकारणाच्या आणि सध्याच्या सोशल मिडीयाच्या माथी आहे. ‘बाकी सगळेच नेते कसे भ्रष्ट आहेत आणि आपल्यापुढे कसा एकच पर्याय उरलाय’ असं चित्र सोशल मिडियावर पद्धतशीरपणे रोज तेवढ्याच ताकदीने रंगवलं जातं. सोशल मिडीयावर रोज नेत्यांची ठरवून केली जाणारी बदनामी, चारित्र्यहनन, खोटारडे आरोप ही एक हिंसाच आहे. या आधुनिक हिंसेनं विरोधकांना खच्ची करण्याचे डावपेच दुर्दैवाने आपल्या देशात खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी होतात. कारण आपल्याकडे ‘बातमी’ आणि ‘अफवा’ यांच्यातला फरकसुद्धा न समजून घेता अगदी आंधळेपणाने व्हॉट्सपवर येईल ती गोष्ट फॉरवर्ड केली जाते. आपल्याला बटाट्यात, वांग्यातसुद्धा देव दिसतो. ते बटाटे, वांगे आपण जपून ठेवतो. पण माणसासारखा माणूस जपत नाही….
सोशल मिडियाचा वापर जरी आपण सगळ्यात जास्त करत असलो तरी ऑर्कुट, फेसबुकसारख्या गोष्टी पाश्चात्य तरुणांनी शोधल्या. विकसित केल्या. आपलं माणूस शोधणं, आपली माणसं जोडणं हा या शोधांचा मूळ उद्देश होता. या गोष्टींचा वापर करून जगभरात खूप महत्वाच्या गोष्टी घडल्या. खूप व्यवसाय उभे राहिले, बघता-बघता काही देशात क्रांती झाली. आपल्याकडं काय झालं? सोशल मिडीयाचा वापर करून आपल्या देशात महात्मा गांधी यांना बदनाम करण्याची स्पर्धा लागली. देशभक्त आणि देशद्रोही अशी गटबाजी सुरु झाली. तिकडं सीमेवर पाकिस्तान, चीन सतत खोड्या काढताहेत. पण देशभक्त देशातल्याच लोकांना देशद्रोही ठरवण्यात मग्न आहेत. आपल्याच देशातल्या लोकांना नावं ठेवताना ते एवढे हिंसक होतात की या विखारी लोकांना पाकिस्तानला पाठवलं तर एका क्षणात पाकिस्तान नेस्तनाबूत करून टाकतील असं वाटतं. पण पाकिस्तानला पाठवायच्या बाबतीत मात्र ते आपल्या विरोधकांना पुढं करतात! समोरच्याचा तर्क खोडता आला नाही, की बिथरून ‘तुम्ही पाकिस्तानात जा’ म्हणतात. हे एरव्ही आक्रमक असणारे लोक शेतकरी कर्जमाफी, हमीभाव, बेरोजगारी, काश्मीर प्रश्न, भ्रष्टाचार या विषयावर मूग गिळून गप्प असतात. विरोधाचा आवाज दाबणं एवढं एकच काम ही मंडळी भक्तीभावानं करत असतात. यापूर्वीच्या कुठल्याही सरकारांसाठी अशी भाडोत्री आणि रिकामटेकडी मंडळी कधी काम करताना दिसली नाही. जगभरात सोशल मिडिया एखाद्या गोष्टीवर आवाज उठवण्यासाठी वापरला जातोय. आपल्याकडे आवाज दाबण्यासाठीच त्याचा वापर जास्त होतोय. अशा परिस्थितीतही काही लोक सातत्याने आवाज उठवताहेत ही आशादायी गोष्ट आहे. पण त्यांची संख्या एवढी कमी का आहे? गाईचं राजकीय महत्व वाढलंय म्हणून लोकांनी नंदीबैलासारखी मान डोलवायला सुरुवात केलीय की काय, अशीही शंका येते.
- अरविंद जगताप
(लेखक ख्यातनाम पटकथाकार आणि दिग्दर्शक आहेत)