स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधातला बुलंद आवाज असलेल्या डॉ . सीमाताई साखरे यांनी वयाची नव्वदी पूर्ण केली . वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला फोन केला तर नाव सांगताच सीमाताई एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला भेटल्या तेव्हा ज्या उत्साहानं बोलत अगदी तशाच बोलल्या . नव्वदीतही सीमाताईंचा आवाज आणि स्मरणशक्ती ठणठणीत असल्याचं जाणवलं . खरं तर खूप वर्षांनी आम्ही बोलत होतो पण , नाव सांगताच त्यांचं खळाळणं लगेच सुरु झालं .
पूर्वीही सांगितलं आहे , लिहिलं आहे पुन्हा सांगतो . नागपूरच्या ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकात मी रुजू झालो ते वार्ताहर म्हणून . मला खरं तर उपसंपादक व्हायचं होतं पण , कंपनीचे कार्यकारी संचालक म्हणाले नरेश गद्रे म्हणाले , ‘तू सिटी रिपोर्टिंगमधे जॉइन हो’ आणि पर्याय नसल्यानं मी वार्ताहर झालो . नोकरीच्या पहिल्याच दिवशी पहिली असाईनमेंट केली ती रुपाताई कुलकर्णी यांची . तेव्हा धंतोलीतल्या आनंदाश्रम या लॉजवर उतरलो होतो . दुसऱ्या दिवशी सकाळी येताना पत्रकार भवनातली सीमाताई साखरे यांची पत्रकार परिषद करुन या असं आमचे मुख्य वार्ताहर दिनकर देशपांडे यांनी सांगितलं .
रुपाताई आणि सीमाताई या दोघी तेव्हा अख्ख्या महाराष्ट्रात गाजत होत्या . दोघीही स्त्रियांच्या हक्कासाठी आणि अत्याचारच्या विरोधात लढत होत्या . दोघीही उच्च विद्याविभूषित होत्या . मात्र दोघींच्याही कामाचा बाज पूर्णपणे वेगळा होता . रुपाताई म्हणजे महिलांच्या हक्कांसाठी लढणारी तेजस्वी ज्योत तर सीमाताई साखरे म्हणजे धगधगती मशाल : गेली सहा दशकं ही मशाल पेटलेली आहे !
नंतरच्या काळात सीमाताई साखरे आणि रुपाताई कुलकर्णी यांच्याशी निकट संपर्क आला . त्यांची अनेक आंदोलनं , पत्रकार परिषदा , सभा कव्हर केल्या . दोघींच्याही जवळच्या गोटात माझा समावेश झाला . मंगला आणि मी आम्हा दोघांनाही या दोघींचं अपार ममत्व लाभलं .
कुणा महिलेवर अत्याचार झाल्याची केस आली की सीमाताई न्याय मिळवून देण्यासाठी आक्रमक होत . त्यांच्यात जणू बिजली संचारत असे . समोरचा माणूस कुणी बडा धनवान आहे की बडा अधिकारी की राजकारणातलं बडं धेंड , यांचा सीमाताईंवर कोणताही परिणाम होतं नसे ; कोणी कितीही दबाव आणला तरी पीडितेच्या बाजूनं सीमाताई हिंमत बांधून ठामपणे उभ्या राहात आणि पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी जीवाचं रान करत . त्यांच्यातल्या उर्जेसाठी अफाट हा एकच शब्द आहे . हातात आलेल्या केसचा केलेला सखोल अभ्यास , खणखणीत आवाज आणि आक्रमकता हे सीमाताईंचं भांडवल असायचं त्यामुळे समोरचे लोक त्यांना वचकून असत . पोलिस , कायदा आणि आंदोलन अशा तिन्ही पातळ्यांवर सीमाताई एकाच वेळी लढत असत . अशी त्रिस्तरीय लढाई आणि त्यासाठी पायाला चाकं लाऊन कायम दौऱ्यावर असतानाच वृत्तपत्रांतून सातत्यानं लेखन करत जनमन जागृतीचाही सीमाताई साखरे यांचा प्रयत्न सुरु असे . जात-पात आणि धर्माच्या सीमा मोडीत काढत स्त्री हक्काच्या संघर्षासाठी आवश्यक असणारं धवल चारित्र्य आणि अफाट लोकसंग्रह सीमाताईंच्या गाठीशी कायमच राहिला . खरं तर , एखाद्या वृत्तपत्रात स्तंभ लेखन करणाऱ्याचं लेखन ( क्वचित बातमीही ) अन्य वृत्तपत्रात प्रकाशित न होण्याचा साधारण संकेत त्या काळात होता ( सीमाताई तेव्हा ‘लोकमत’ या दैनिकात स्त्रियांच्या अत्याचाराविरोधात स्तंभ लेखन करत ) पण , सीमाताई त्या संकेताला एकमेव सन्माननीय अपवाद होत्या . नंतरच्या काळात या सर्व अनुभवांवर आधारित एक पुस्तकही त्यांनी लिहिलं . त्या काळात संध्याकाळी प्रेस-नोट देण्यासाठी वृत्तपत्रांच्या कार्यालयात सीमाताई येत आणि संपादकीय विभागात काही काळ ठिय्या ठोकत . संपादकीय विभागातील प्रत्येकाशी दोन शब्द तरी बोलण्याचा त्यांचा रिवाज असायचा कारण प्रत्येकाशी त्यांची ओळख होतीच .
इतक्या बिझी असल्यावर सीमाताईंना संसार , नोकरी आहे का , असल्यास प्रपंच , नोकरी त्या केव्हा करतात आणि ते करायला त्यांना वेळ केव्हा मिळतो याचं आम्हाला आश्चर्य वाटत असे . त्या सुरुवातीच्या काळात सीमाताईंच्या प्रेम विवाहची कथा एकदा ज्येष्ठ पत्रकार वामनराव तेलंग आणि आमचे मुख्य वार्ताहर दिनकर देशपांडे यांनी आम्हाला रंगवून सांगितली . लक्ष्मी भवन चौकातल्या एका चाळीतील त्यांच्या वास्तव्याच्या काळातल्या श्री अनी सौ. साखरेंच्या संसाराच्या कथा सांगितल्या . पुढे सीमाताईंच्या घरी जाणं-येणं वाढलं आणि वामनराव तेलंग तसंच दिनकर देशपांडे यांनी जे कांही सांगितलं होता त्यावर विश्वास बसला .
■
सीमाताईंशी माझं बॉंडिंग जरा वेगळं निर्माण झालं . तो प्रसंग मला अजूनही लख्ख आठवतो . त्या माझ्या आधीपासून मंगलाला ओळखत . आमच्या दोघांत काही तरी ‘गुफ्तगू’ सुरु असल्याची चाहूल त्यांना लागलेली होती . वृत्तपत्राच्या कार्यालयाच्या बाहेरही त्यांनी आम्हा दोघांना पाहिलेलं होतं पण , विवाहाची नोटीस दिल्यानंतरच काय व्हायचा तो बोभाटा होऊ द्यायचा हे आम्ही दोघांनी ठरवलेलं होतं . १९८४च्या जानेवारी महिन्यात नागपूरच्या विवाह नोंदणी कार्यालयात पूर्वसुचनेची नोटीस देऊन मंगला, मी आणि आमचा दोस्तयार प्रकाश निंबेकर बाहेर आलो तर , जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आणि तेही अगदी आमच्या समोरच सीमाताई उभ्या . त्यांच्या सोबत काही महिला होत्या आणि सीमाताई नक्कीच त्यांचं कांही गाऱ्हाणं घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे आलेल्या होत्या . त्या लगाबगीनं लगेच आमच्याकडे आल्या आणि त्यांनी विचारलं , ‘काय करताय रे तुम्ही दोघं इथं ?’
क्षणभर गप्प राहून ‘आम्ही दोघं विवाहाची नोटीस द्यायला आलो होतो’, हे मी सांगून टाकलं .
आमचं अभिनंदन करुन , ‘घरुन कांही प्रॉब्लेम नाही नं ? पण , काळजी करु नका मी आहे तमच्या पाठीशी ठाम’ असं त्या म्हणाल्या .
‘काही प्रॉब्लेम नाही , एकच राहिलं आहे आणि ते म्हणजे मंगलानं अजून हुंडा दिलेला नाही’, असं मी गमतीनं म्हणालो .
मंगलाला जवळ घेत सीमाताई म्हणाल्या . ‘माझी लेक मोठी गुणांची आहे . हुंडा तू नुसता मागितला तरी तुला धडा शिकवेन’ .
मी म्हटलं , ‘ती नाही तर तुम्ही द्या मला हुंडा . फार नको मला एक सूट हवा आहे’ .
‘हुंडा म्हणून नाही तर भेट म्हणून तुला सूट देईन’, असं मग सीमाताईंशीनी सांगितलं . तेव्हापासून त्यांना मी कायमच सासूबाई म्हणू लागलो . काल , त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी , संवादाची सुरुवातही मी ‘काय म्हणता सासूबाई’ अशीच केली . आमच्या बऱ्याच गप्पा झाल्या . अनेक आठवणी जाग्या झाल्या . त्यांच्या लाडक्या लेकीचा अकाली झालेला मृत्यू , मंगलाचं नसणं असे कांही हळवे पक्षी बोलण्याच्या ओघात स्वाभाविकपणे पिंगा घालून गेले आणि आम्हा दोघांच्याही आवाजात दर्द आला.
तो मूड घालवण्यासाठी इकडचं तिकडचं बोलून त्यांच्याकडून न मिळालेल्या सूटची आठवण करुन दिली . सीमाताई म्हणाल्या , ‘तू ये एकदा नागपूरला , घेऊन देते मी सूट’ . मीही आता वयाच्या सत्तरीच्या उंबरठ्यावर आलोय , कधी भेट होईल , का होणारच नाही हे सांगता येत नाही…पण ते असो .
सुमारे साडेचार दशकापूर्वी जगण्यात आलेल्या सीमाताई साखरे नावाच्या माझ्या सासूबाई आता वयाच्या नव्वदीत पोहोचल्या आहेत . त्यांना उत्तम आरोग्य लाभो .
छायाचित्र ओळी – तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते स्त्री शक्ती पुरस्कार स्वीकारताना डॉ . सीमाताई साखरे )
(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)
९८२२० ५५७९९
प्रवीण बर्दापूरकर यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.infoया वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –प्रवीण बर्दापूरकर– type करा आणि Search वर क्लिक करा.