साभार: साप्ताहिक साधना
-सुरेश द्वादशीवार
कवितेनेच त्याला जगवले, आनंद दिला, बेहोश केले आणि हवेहवेसे वाटणारे दुःखही तिनेच त्याला दिले. मात्र ज्यांचे जगण्याचे आधार वेगळे आणि बेहोशीची साधने निराळी, त्यांनी जेव्हा सुरेशला प्रतिभेच्या प्रांतातले सांगण्याचा दांभिकपणा केला, तेव्हा त्याच्यातला लढाऊ माणूस लेखणी आणि वाणीचा आसूड उगारून उभा राहिला. तो झटका त्याला नेहमी यायचा आणि तो येत रहावा असे पाहणाऱ्याला वाटावे इतका तो देखणा होता. दंभ, दुटप्पीपणा आणि दिखावेगिरी या विरुद्धचे कोणतेही भांडण हे समाजाच्या आरोग्याच्या रक्षणासाठी चालविले जाते. समाजाविषयीच्या गाढ ममत्वांतून ते उभे होते. सुरेश भट या बाजूने सगळ्या मुखवट्यांशी भांडायला उभा असलेला भांडखोर आणि चांगला माणूस होता.
…………………………………………………….
जो स्वतःशी स्पर्धा करतो, त्याला कुणी हरवू शकत नाही आणि ती स्पर्धाही कधी थांबत नाही अशा अर्थाचे एक इंग्रजी सुभाषित आहे. ज्याचे भांडणच स्वतःशी आहे त्यालाही कुणी हरवू शकत नसावे आणि ते भांडणही त्याच्याएवढेच आयुष्यमान होत असावे. स्वतःशी भांडण करणारी खूप माणसे मी पाहिली आहेत. अशा माणसांपैकी कुणा एकाला प्रतिभेचे वरदान लाभले असेल तर त्याचे ते भांडण अतिशय देखणे होत असल्याचेही मी पाहिले आहे.
त्यातही एखादा जबर आवाक्याचा प्रतिभावंत आपल्या ठायीच सारे जग पाहत असेल तर तशा तंटाव्याला जगाविरुद्धच्या त्याच्या एकाकी झुंजीचे विराट परिमाण लाभते. चक्रव्यूहात शिरून रक्तबंबाळ होणाऱ्या महाकाव्यातल्या एकाकी योद्ध्याची आपल्याला नम्र करणारी ती झुंज होते. त्या झुंजीतल्या विजयाएवढाच त्याचा पराजयही भव्यदिव्य होतो. कधी तो मी म्हणून जिंकतो, कधी जग म्हणून जिंकतो. दोन्ही विजय त्याचे, दोन्ही पराजयही त्याचेच. अशा वेळी स्वतःला जखमा करून घेत चाललेले त्याचे जगणेही दीप्तिमान आणि क्वचित कधी त्याला येणारी भोवळही साऱ्यांना प्रकाशाचा अनुभव देणारी…
अशा विराट पातळीवरचा आत्मसंघर्ष स्थानिक स्तरावर जगणारा माझा जिव्हाळ्याचा माणूस होता सुरेश भट. त्याला दिव्यत्वाचे आकर्षणच नव्हे, तर त्याचे नित्य नवे आमंत्रणच होते आणि त्याच वेळी कुठल्याशा गल्लीच्या अंधाऱ्या कोपऱ्याशी अडकून राहिलेल्या त्याच्या आतड्याने त्याला तेथे बांधूनही ठेवले होते. क्षणात तो वैश्विक व्हायचा आणि दुसऱ्याच क्षणी लोकल बनायचा. कविश्रेष्ठ सुरेश भट याच्या या क्षणात बदलण्याच्या रूपाचे मला कायमचे कुतूहल होते. कवी म्हणून, माणूस म्हणून आणि त्याहून अधिक सदैव तंडत राहणारा पण प्रेमात अंतराय येऊ न देणारा मित्र म्हणून.
तो भरभरून प्रेम करायचा. झडझडून राग करायचा. लोभात आला की कवितेतून बोलायचा आणि संतापला की त्याची भाषा ठिणग्यांची व्हायची. शिवाय त्याचा मूड कधी बदलेल याचा नेम नसायचा. त्याच्या साठाव्या वाढदिवशी मी त्याच्यावर एक अग्रलेख लिहिला. त्याच्या-माझ्या संबंधांची माहिती अन् उत्सुकता असल्याने तो आपण साऱ्यांच्या आधी वाचायचा असे ठरवून हृदयनाथ मंगेशकरांनी मला आणि मनोहर म्हैसाळकरांना रात्री अडीच वाजताच प्रेसमध्ये नेले. छापून निघणाऱ्या दैनिकाच्या नव्या चळतीतील गरमागरम प्रत काढून हृदयनाथांनी ती उभ्याउभ्या छपाईयंत्राजवळच वाचली अन् माझ्याकडे वळून ते म्हणाले, ‘वा’.
पण त्या लेखातल्या एका विशेषणाने सुरेश तडकला. दिसत असला तरी मुळात तो तसा कसा नाही हे त्याने भडकून जाऊन साऱ्यांना ऐकवले. मग काही दिवस त्याने माझ्याशी बोलणे टाकले. मी केलेले वर्णन त्याच्या गौरवात भर घालणारे आहे हे मंगेशकरांनी सांगूनही तो त्याच्या वैतागावर ठाम होता.
खूप आधीची एक गोष्ट. मुंबईतल्या माझ्या एका डॉक्टर स्नेह्याकडे कविवर्य बा.भ. बोरकर मुक्कामाला होते आणि मुंबईचेच एक मान्यवर कवी त्यांना आपल्या गझला ऐकवीत होते. बाकीच्या श्रोत्यांत ते डॉक्टर दांपत्य, माझी पत्नी आणि मी होतो. बऱ्याच रचना ऐकवून झाल्यावर त्या कवींनी बोरकरांकडे अभिप्रायाच्या आशेने पाहिले. बोरकरांनी आपला अभिप्राय टाळून अन् माझ्याकडे वळून म्हटले, ‘कशी वाटली ही गझल तुम्हांला?’
गझलेच्या प्रांतातले किंवा एकूणच कवितेच्या क्षेत्रातले फारसे काही न कळणारा मी क्षणभर भांबावलो. मनात सुरेशची गझल होती. त्याच्या आग्रहाने काही उर्दू गझलकारांच्या रचनाही वाचल्या होत्या. मी भीतभीत म्हणालो, ‘आतापर्यंत आपण ऐकली ती अतिशय देखणी कविता होती. मात्र मी तिला गझल म्हणणार नाही.’
त्यावर ते गझलवाले कवी अस्वस्थ होऊन म्हणाले, ‘तुम्ही भटांची गझल ऐकली असणार.’
मी होकारार्थी मान हलविली तेव्हा ते म्हणाले ‘तो माणूस चांगला नाही.’
मी म्हणालो, ‘नसेल. पण त्याची गझल मोठी आहे आणि त्याला आपला इलाज नाही.’
जरा वेळाने ते गृहस्थ गेले तेव्हाही त्यांचा चेहरा ताणलेलाच होता. पण बोरकर मात्र प्रसन्न हसत म्हणाले, ‘तुमचा अभिप्राय अचूक होता. त्यांनी कविताच गझलच्या रूपात लिहिली आहे.’
मग सुरेशच्या गझलांविषयी बोलताना बोरकर म्हणाले, ‘गझल या काव्य प्रकाराचा आवाकाच मोठा आहे. अध्यात्मापासून प्रेमापर्यंत आणि युद्धापासून शांततेपर्यंत कोणत्याही विषयाचे तिला वावडे नाही. हे विषय लीलया हाताळण्याचे कसब कवीच्या उंचीतून येते. या समाजाशी असलेल्या त्याच्या बांधिलकीतून ही उंची त्याला प्राप्त होते. भटांचा आवाका असा मोठा आहे. मलमली तारुण्यापासून आयुष्याच्या मशाली करण्याच्या आवाहनापर्यंतची झेप त्यांच्या प्रतिभेला सहजपणे घेता येते.’
एका साहित्यिकाने दुसऱ्या साहित्यिकाची भलावण उपहासाने करण्याच्या आपल्या वाङ्मयीन संस्कृतीत बोरकरांसारख्या ज्येष्ठ कविवर्यांच्या तोंडून आपल्या कविमित्राची अशी तोंड भरून स्तुती ऐकताना मी आणि माझी पत्नी भारावून गेलो.
असा एक अनुभव रत्नागिरीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातला आहे. मुळात या काळात मी मनातून सुरेशवर त्याने संंमेलनांविषयी लिहिलेल्या एका लेखामुळे आणि तो लेख रत्नागिरीच्या दैनिकात नेमक्या वेळी छापून येईल याची काळजी घेतल्यामुळे जरा रुष्टच होतो. या सुरेशभैय्याला हे असे ऐन समारंभ प्रसंगी वाकड्यात शिरायला का सुचते, असे मनात आले होते आणि तोच विचार करीत माझ्या इतर स्नेह्यांसोबत मी तिथल्या विशाल ग्रंथदिंडीत सामील झालो होतो.
आजवर मी खूप ग्रंथदिंड्या पाहिल्या. पण रत्नागिरीसारखी सुरेख व शिस्तबद्ध दिंडी तोवर पाहिली नव्हती. शाळेतल्या मुलामुलींपासून थोरामोठ्यांपर्यंत अक्षरशः सहस्रावधी माणसे तीत सामील झालेली. या दिंडीत वारकऱ्यांचा उत्साह अन्् भक्तिभाव होता. एका भव्य रथावर महात्मा फुले, लोकमान्य टिळक, राजर्षी शाहू, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मराठी पंचायतनाची भव्य तैलचित्रे मांडली होती आणि सगळा गाव डोळ्यांत कौतुक घेऊन रस्त्याच्या दुतर्फा उभा झाला होता. तशात अकस्मात दिंडी शांत झाली. जरा वेळाने हलगी वाजू लागली. मुलामुलींनी लेझीम टिपऱ्यांचा ताल धरला आणि एकाएकी सारी दिंडी गाऊ लागली,
गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे
आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे
माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. माझ्यासोबत असलेल्या स्नेह्यांच्या डोळ्यांतही अश्रू उभे राहिले. त्यांतला एक म्हणाला, ‘कुठे आपला सुरेश तिकडे तंडत बसला आणि इथे ही मुले त्याची कविता बघ केवढ्या अभिमानानं म्हणताहेत’ क्षणभर मलाही तसेच वाटले. आपली कविता सहस्रावधी बालमुखांतून उमटताना कवीने पाहावी आणि तशा अवस्थेतल्या कवीला आपण पाहावे असे मनात आले. स्वतःशी मांडलेल्या भांडणात हा कवी आपल्या आनंदाचे सोडा पण आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांच्या आनंदाचेही केवढे मातेरे करतो, असे मनात आले.
घरी परतलो तेव्हा सुरेशभय्याच्या मुलीच्या, गौरीच्या लग्नाची पत्रिका आलेली. तीवर कविश्रेष्ठांनी स्वतःच्या हस्ताक्षरात एक धमकी कोरलेली… ‘ लग्नाला ये, नाही तर…’ या रिकाम्या जागेवर कोणताही आनंदी मजकूर सहज भरता यावा.
वडिलांकडून सुरेशकडे मिळालेला वारसा एका श्रद्धाशील परंपरेचा होता. मधुराभक्तीच्या संप्रदायातील वऱ्हाडचे महान संत श्री गुलाबराव महाराज यांचे पट्टशिष्य श्री बाबाजी महाराज पंडित हे त्याच्या वडिलांचे, डॉ. श्रीधरपंत भट यांचे गुरू होते व त्या नात्याने ते सुरेशचेही आजेगुरू होते.
‘माझिया गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे’ ही आळवणी तो आपली म्हणून सांगत असला तरी तिच्यावरचा खरा अधिकार या संतपरंपरेचा होता. गोकुळात रंग खेळणाऱ्या हरीविषयीचे त्याचे प्रेम आणि घरी जपून जायचा त्याने राधेला दिलेला अलवार सल्ला हा या मधुराभक्तीच्या गूढाशी असलेले त्याचे नाते सांगणारा होता. प्रेम गडद झाले की त्याची भक्ती होते. सुरेशच्या कवितेतले प्रेम असे गडद आहे. त्याच्या शृंगारगीतांतली भक्तिशरणता देहभोगावर मात करणारी आहे. म्हणून त्याच्या कवितेतला प्रीतीच्या साक्षात्काराचा क्षण भोगाच्या पूर्तीचा आनंदक्षण होत नाही. ‘अमृतमय मी, अमृतमय तू, तनमन अमृत बनले ग’ असा अनुभव देणारा तो आत्मपूर्तीचा क्षण होतो. त्याची बहुतेक प्रेमगीते मर्त्य आणि देहधारी स्त्रीपुरुषांची असण्यापेक्षा अमृताचे आयुष्य वाट्याला आलेल्या राधाकृष्णाची आणि गोपगौळणींची गीते आहेत. त्यांतला अनुभव पूर्णत्वाचा म्हणून तत्त्वज्ञानाच्या पातळीवर जाणारा आहे. तो तसा घेता यायला देहावर मन उभे व्हावे लागते आणि त्यावर आत्मतेजाचा प्रकाश पसरावा लागतो.
सुरेशच्या आई शांताबाई भट या अण्णासाहेब कर्व्यांच्या संस्थेची गृहीतागमा ही पदवी मिळवणाऱ्या. मार्क्सवादी विचारांवर श्रद्धा असणाऱ्या. दीनदलितांच्या उद्धाराचे ते तत्त्वज्ञान आहे असे मानणाऱ्या. सुरेशची कविता शोषित, पीडितांच्या बाजूने लढाईला उभी होताना त्याच्या आईने पाहिली असेल तेव्हा आपला श्रद्धाविचार असा हत्याररूप झालेला पाहून तिने धन्यताच अनुभवली असणार.
माझे हे मत सुरेशला मात्र फारसे मान्य होणारे नव्हते. ‘माझे खरे-खोटेपण मलाच ठाऊक, व्यर्थ निघतात माझे निष्कर्ष घाऊक’ असे म्हणून त्याने हे नाकारलेही होतेच. ‘माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी’ असा उद्दाम आत्मविश्वास मिरवणारा तो कलावंत होता आणि मी त्या क्षेत्रातल्या सूर्यांच्या उन्हापासून जीव बचावत सावली शोधणारा साधा माणूस होतो. माझ्या या मताचा पुरावा ठरणारी हकीकत अशी :
एल्गार या त्याच्या काव्यगायनाच्या एका कार्यक्रमाचे संचालन राम शेवाळकरांनी केले. शेवाळकर गमतीने म्हणाले, ‘सुरेश आणि मी कॉलेज जीवनापासूनचे दोस्त. आमच्यातला करार हा की आमच्या गुप्त गोष्टी आम्ही बाहेर सांगायच्या नाहीत. सुरेशने हा करार अनेकदा मोडला. आता मीही तो मोडतो. आजवर माझ्या कविता मी सुरेश भट या टोपणनावाने प्रकाशित करीत आलो ही अशीच एक गुप्त गोष्ट आहे.’ सुरेशने रामभाऊंच्या पाठीवर दाण्दिशी गुद्दा लगावून उद्गार काढला, ‘सा ….’
आपल्या कवितेवर दुसऱ्या कोणाचा हक्क विनोदातही मान्य न करणारा हा कवी त्या कवितेचे श्रेय एखाद्या परंपरेला वा तत्त्वविचाराला द्यायला राजी होणे अर्थातच शक्य नव्हते आणि तरीही त्याच्यातला ‘सूर्य’ जेव्हा ‘माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा’ असे म्हणायचा तेव्हा त्यातली सामाजिक बांधिलकी एकाच वेळी संतांची आणि क्रांतिकारकांची होऊन जायची. त्याला त्याचाही इलाज नसायचा.
जगात कुठे काहीही घडले तरी त्यावर आपण आपले मत देण्याची गरज असतेच असा काही थोरांचा समज असतो. त्याशिवाय जगाची बौद्धिक वाढ खुंटून जाईल अशी त्यांची श्रद्धा असते. मग त्यांचे हे मतदान अखंडपणे सुरू राहते. सुरेशचा प्रकार याहून वेगळा होता. मनात एक प्रसन्न खुन्नस बाळगून जगणारा तो माणूस होता. कुठे हल्ला करायचा याचा तो सतत शोध घ्यायचा आणि वर ‘मंग, त्याहीनं काही केलंच तर माहं का व्हाआचं आहे’ असं म्हणणारा होता. त्याच्या सुदैवाने त्याची निशाणचिन्हे व्हावी अशा गोष्टी अन् माणसेही त्याला साप्ताहिक गतीने सापडणारी होती.
दुर्दैवाने, सुरेशच्या वाट्याला आलेले जग फार क्रूर होते. आपल्या कुंपणांनाच आकाश मानणाऱ्या या जगाने त्याच्या प्रतिभेच्या भरारीची दखल घेणे दीर्घकाळ टाळले. ती भरारी त्यांच्या स्वप्नांच्या पलीकडची होती. इथपर्यंत राग-संतापाचे कारण नव्हते. कारण या कुंपणांबाहेरच्या विश्वाला सुरेशची भरारी भावल्याचे स्पष्ट दिसतच होते. त्याच्या लेखी या कुंपणवाल्यांच्या करामती या कीव आणि करमणुकीचा भाग होत्या. पण त्यांचा दुष्टावा असा की त्यांनी सुरेशच्या अपंगत्वाला दंश करून त्याचा तेजोभंग करण्याचा क्षुद्रपणा केला. त्याच्या तोंडून या कथा ऐकताना मीच विदीर्ण होऊन गेलो.
सुरेशला जाऊन आता आठ वर्षे झाली. त्याच्या स्मरणार्थ एक मोठे ऑडिटोरियम आता बांधले जायचे आहे. त्याने सारा जन्म भाड्याच्या अन् तुटक्या घरात काढला. त्याच्या कवितेने साऱ्यांना भरभरून दिले. तो मात्र आयुष्यभर उणीवांच्या सहवासात राहिला. ‘इतुकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते’ ही त्याची रचना त्याच्या या अनुभवातून आली होती. त्याने मान मिळवले आणि अवहेलनाही सहन केली. त्याची कविता गाऊन आपल्या लोकप्रियतेत भर घालणाऱ्या एका गायिकेने एका छोट्याशा मदतीसाठी त्याला सारा दिवस आपल्या पंचतारांकित हॉटेलच्या खोलीबाहेर ठेवलेल्या बाकड्यावर ताटकळत बसवलेले अनेकांनी पाहिले. (तो तिचा दोष नसावाही. आपल्याला मदत करणाऱ्यांची दखल त्यांच्याविषयी शक्य तेवढे तिरके आणि विपरीत बोलून घेण्याची, नीत्शे या जर्मन तत्त्वज्ञानी माणसाची सवय या कविश्रेष्ठाने बऱ्यापैकी आत्मसात केली होती.) त्या प्रसंगाने त्याला आणलेल्या खचलेपणाचा मीही साक्षीदार आहे…
सुरेशच्या जीवनातला आनंद आणि आधार त्याची कविता हाच होता. या कवितेने त्याला जीवनरस पुरवला. ती एवढी समर्थ की तिने त्याच्याएवढाच त्याच्या रसिक श्रोत्यांच्या आणि वाचकांच्या जीवनात आनंद उभा केला. आयुष्यभर या कवितेच्या उपासनेखेरीज या माणसाने व्यवसाय म्हणून काही केले नाही आणि केले ते फारसे जमलेही नाही.
एका रात्री मी चंद्रपूरला असताना शेवाळकरांचा फोन आला. ते घाईघाईने सांगत होते, ‘तात्काळ सुरेशला फोन कर. त्याच्या मुलाचा अमरावती मार्गावर अपघातात मृत्यू झाला आहे. त्याचे शव अजून घरी पोहोचायचे आहे. तो कोणाशी न बोलता मूक आणि शांत आहे.’
दुसऱ्याच क्षणी मी त्याला फोन केला. म्हणालो, ‘अरे, काय ऐकलं मी आता? नानासाहेब सांगत होते…’ माझं बोलणं अर्ध्यावर थांबवत तो म्हणाला, ‘झालं ते जाऊ दे. तो आता कधी परत यायचा नाही. पण तुला सांगतो, मी आजच एक अप्रतिम गझल लिहिली. ती आधी ऐक.’ अन् त्याही अवस्थेत तो फोनवर आपली नवी गझल मला गाऊन ऐकवू लागला. मी स्वतःला सांभाळत ती कशीबशी ऐकली. ती संपताच तो म्हणाला, ‘क्यों, कैसी रही?’ मी म्हणालो, ‘बेस्ट. अरे पण ..’ मग मलाच बोलवेना. त्यावर कविश्रेष्ठ म्हणाले, ‘पत्रकार असून तू असा कसा रे हळवा?’ अशा वेळी कोणी कोणाची अन् कशी समजूत घालायची होती ?
सुरेश त्याची प्रत्येक कविता अन् गझल जगायचा. त्याच्या श्वासाश्वासांत अन् रोमरोमांत त्याची गीते होती. माझ्याकडे एकदा काही दिवसांसाठी तो मुक्कामाला असतानाची गोष्ट. एका रात्री अडीच-तीनच्या सुमाराला माझी पत्नी मला उठवून म्हणाली, ‘अहो, सुरेशभय्या त्यांच्या खोलीत कविता गाताहेत.’ आम्ही धडपडत त्याच्या खोलीत गेलो. तो शांत झोपला होता. त्याची मुद्रा प्रसन्न होती. मधूनच तो घोरत होता. अन् तशातच तो त्याची कविता हळू आवाजात पण चालीत गुणगुणतही होता.
सुरेश काही काळ पत्रकार होता. काही काळ एकदोन नियतकालिकांचा संपादकही राहिला. पण त्याच्या कवितेवर प्रेम करणाऱ्या वाचक-श्रोत्यांना त्याचा हा गद्य अवतार फारसा आवडला नाही. त्याच्या स्वभावातल्या त्या प्रसन्न खुन्नशीला तो मानवणारा होता एवढेच. पण खुन्नस ही या माणसाच्या स्वभावाची एक किरकोळशी तिरीपच तेवढी होती. तो त्याचा स्थायीभाव नव्हता. त्याच्या स्थायीभावाचा संबंध त्याच्या कवितेशी होता. कविता करण्याची वा होण्याची प्रक्रिया मला अर्थातच अज्ञात आहे. पण स्वतःलाही आश्चर्य वाटायला लावणारी कल्पना शब्दबद्ध होऊन मनात उमटली की ती कवीलाही विस्मयाएवढाच आनंद देत असणार. सुरेशचा त्याहून मोठा आनंद, आपली कविता रसिकांना ऐकविण्यात आणि त्यांनाही आपल्या अनुभवविश्वाचे भागीदार बनविण्यात होता.
पुण्याच्या साहित्य परिषदेत मी मुक्कामाला असताना तो तेथे आला. आदल्या रात्री टिळक स्मारक भवनात त्याचा एल्गार झडला होता. तीन मजले चढून माझा शोध घेत तो खोलीत आला तेव्हा मित्र-मैत्रिणींचा एक मोठा कळपच तिथे बसला होता. त्यांतल्या अनेकांनी आदल्या रात्रीचा एल्गार ऐकला होता. सगळ्यांच्या मनात सुरेश भट या विभूतिमात्राविषयी गझलेमधल्या शेरात अर्थ भरला असावा तसा ठासून भरलेला भक्तिभाव होता. मग कुणीतरी भीतभीतच त्याला म्हटले, एखादी कविता ऐकवा. अन् त्याने सोबतच्या माणसाला पिटाळून आपली नवी वहीच मागवली आणि आदल्या रात्रीचा एल्गार रंगला नसेल, एवढी तीन तासांची मैफल रंगवली. सगळा कळप तृप्त अन्् त्याहून तृप्त सुरेश भट.
या कवितेनेच त्याला जगवले, आनंद दिला, बेहोश केले आणि हवेहवेसे वाटणारे दुःखही तिनेच त्याला दिले. मात्र ज्यांचे जगण्याचे आधार वेगळे आणि बेहोशीची साधने निराळी, त्यांनी जेव्हा सुरेशला प्रतिभेच्या प्रांतातले सांगण्याचा दांभिकपणा केला, तेव्हा त्याच्यातला लढाऊ माणूस लेखणी आणि वाणीचा आसूड उगारून उभा राहिला. तो झटका त्याला नेहमी यायचा आणि तो येत रहावा असे पाहणाऱ्याला वाटावे इतका तो देखणा होता. दंभ, दुटप्पीपणा आणि दिखावेगिरी या विरुद्धचे कोणतेही भांडण हे समाजाच्या आरोग्याच्या रक्षणासाठी चालविले जाते. समाजाविषयीच्या गाढ ममत्वांतून ते उभे होते. सुरेश भट या बाजूने सगळ्या मुखवट्यांशी भांडायला उभा असलेला भांडखोर आणि चांगला माणूस होता.
पुसतात एकमेकांना मसणात जात हे मुडदे
कोणीच विचारत नाही, माणूस कोणता मेला
हा सवाल अशाच माणसाला सुचतो आणि चौकात उभे राहून जाहीरपणे तो विचारण्याचे धाडसही त्यालाच होत असते.
मात्र सुरेशला हे वर्णन आवडणारे नव्हते. भांडखोर वगैरे म्हटले की, त्याच्यातला भांडखोरपणा आणखी चवताळून उठायचा. व्यक्तिशः मला ‘अजातशत्रू’ हे विशेषण आवडत नाही. तसे म्हणवून घेणारी माणसे आदरणीय असली तरी आकर्षक नसतात. जे कशाशीही भांडत नाहीत, कशाच्याही विरोधात उभे राहत नाहीत, त्या चांगल्या-वाईटाकडे समसमान भूमिकेने पाहणाऱ्या माणसांविषयीचा माझा आदर खूपदा अनुकंपेच्या जवळ जाणारा असतो. आंब्याच्या साली आणि कागद सारख्याच आनंदाने चघळणारा पु.ल. देशपांड्यांचा स्थितप्रज्ञ खरे तर कुणाला आवडूही नये.
सुदैवाने ज्याविरुद्ध चवताळून उठावे अशा खूप गोष्टी आपल्या अवतीभवती आहेत. त्यांत नित्य नव्या गोष्टींची भर पडत आहे. इथे दारिद्य्र-दैन्याच्या जोडीला बऱ्यापैकी विषमता आहे. जातीयतेच्या बरोबरीने पोटजातीयतेची तिची पिलावळ आता वयात आली आहे. जळणाऱ्या लेकी-सुनांची संख्या मोठी आहे. भ्रष्टाचार ईश्वरासारखा सारे काही व्यापून शिल्लक राहणारा आहे. शिवाय शहाणपणाच्या नावाने होणाऱ्या लाचार तडजोडी आहेत. बेफिकिरीच्या नावाने चालणारे आंधळे निबरपण आहे. मख्ख आणि निष्क्रिय संदेश-उपदेशाचे ढोंगी उपचार आहेत आणि मुत्सद्देगिरीच्या नावाने चालणारे कातडी बचावूपणही आहे. एवढे सगळे चांगले क्षेत्र असताना जे लढा-भांडायचे सोडून घराची सुरक्षित वाट धरतात, त्यांच्याविषयी कसले आकर्षण आणि कसला आदऱ?
सुरेश भट नावाचा माणूस भांडायचा. त्याच्यातला कवी भांडायचा. या रणक्षेत्रात कवितेचे हत्यार घेऊन एकट्याने साऱ्यांना आव्हान देत उभा व्हायचा. चांगले दोन हात करायचा. जखमी बिखमी होऊन मग त्या जखमा कलंदरासारख्या अंगावर मिरवायचा आणि तरीही त्याला भांडखोर म्हटलेले आवडायचे नाही. एका सत्कार समारंभात मी त्याचा, तो अजातशत्रू नसल्याबद्दलचा केलेला गौरव त्याला अजिबात आवडला नाही. उत्तरादाखल केलेल्या भाषणात, आपण भांडखोर कसे नाही हे त्याने चवताळून जाऊन सिद्ध केले.
त्याची एक गमतीशीर आठवण मी रामभाऊंकडून ऐकली. सभोवती माणसांचे कोंडाळे करून राहण्याची त्याची सवय कॉलेजजीवनातही होतीच. कोणाही सज्जनाची खोडी काढण्याचा त्याचा स्वभाव तेव्हा ऐन भरात होता. कॉलेजच्या निवडणुकीत आपल्या प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्यासाठी आणि विशेषतः त्याला कॉलेज कन्यकांच्या नजरेतून उतरून देण्यासाठी सुरेशने काय करावे? गावातला तृतीयपंथीयांचा एक जत्था गोळा करून तो त्याने कॉलेजातल्या मुलींच्या कॉमनरूममध्ये पाठवला आणि त्या समूहाला त्या प्रतिस्पर्ध्यासाठी मत मागायला लावले. कन्या गारद आणि प्रतिस्पर्धी त्याहून गारद.
आणि हाच सुरेश भट कॉलेजातल्या स्वयंस्फूर्त भाषणस्पर्धेत त्याच्या वाट्याला आलेल्या ‘मला पुनर्जन्म मिळाला तर’ या विषयावर बोलताना साऱ्यांची मने जिंकीत म्हणाला, ‘मला पुनर्जन्म मिळाला तर तुम्हांला एक पूर्ण आणि अव्यंग सुरेश भट पाहायला मिळेल’ त्या वेळी श्रोत्यांत बसलेले शेवाळकर मला म्हणाले, ‘त्या क्षणी सगळे महाविद्यालय सुरेशचे आपले होऊन गेले.’
सगळे हिशेब वेळच्यावेळी चुकते करणे हाही सुरेशचा खास विशेष होता. कुणाचा शब्द फार काळ त्याने उधार ठेवला नाही. अमरावतीच्या व्याख्यानात नरहर कुरुंदकरांनी नाव न घेता त्याचा उल्लेख ‘कम्युनिस्ट कवी’ असा केला. त्यावर नामांतर प्रकरणात कुरुंदकरांनी घेतलेल्या भूमिकेचा समाचार घेताना सुरेशने ओळी लिहिल्या,
गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री
मेल्याविना मढ्याला आता उपाय नाही
मग माणसे वचकून रहायची. कारण कुरुंदकर होते म्हणून हिशेब शायरीत चुकता झाला. सुरेश भट साऱ्यांसाठीच शायरी वापरील असे नव्हते. रिपब्लिकन पक्षाच्या बऱ्यापैकी मोडीत निघालेल्या एका नेत्याच्या पचनशक्तीचा गौरव करताना त्याने लिहिले, ‘अहो, तुम्ही अख्खा आंबेडकर जिथे पचवलात….’
लेखनकामाठी करणारी माणसे आणि बाया ही तशी मुळातच भित्री जमात आहे. त्यांना अशा सुरेशची भीती वाटावी हे ओघानेच यायचे. एका दिवाळीत मराठीच्या बहुतेक सर्व दिवाळी अंकांत सुरेशच्या कविता अग्रमान देऊन छापल्या गेल्या. त्याचा आनंद रामभाऊ शेवाळकरांना भररस्त्यात ओरडून सांगताना कविश्रेष्ठ म्हणाले, ‘अरे राम, यंदाचे दिवाळी अंक पाहिले की नाही? सगळ्या थोर म्हणविणाऱ्या कवींची त्यात…इ…इ…’ रामभाऊ बिचारे आपल्याला रस्त्यात कुणी पाहात तर नाही ना म्हणून बावरलेले आणि सुरेश रस्त्यापलीकडून पुन्हा ओरडून विचारत होता, सांग ना, खरं की नाही?
पण वरवर अद्वातद्वा दिसणारा आणि तसेच बोलणारा हा माणूस माणसे जोडणारा होता. त्याचा मित्रपरिवार नुसता मराठीच्या मुलुखातच नव्हे तर उर्दूच्या क्षेत्रातही होता. मुंबईत, पुण्यात, कोल्हापुरात सुरेशला भेटायचे तर गर्दीतच भेटावे लागे. माणसे त्याला नुसती जपत नसत, त्याचे लाड करीत असत आणि झोपडपट्टीत आयुष्य काढणाऱ्या तरुणांचाही त्यात भरणा असे.
सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलेली सुरेशची आठवण त्याच्या चाहत्यांचे वर्तुळ दाखविणारी आहे. यशवंतराव चव्हाण, शरद पवार आणि शिंदे कराडहून पुण्याला मोटारने येत होते. पुढल्या जागेवर बसलेल्या शिंद्यांनी सुरेशची एक कविता गुणगुणायला सुरुवात केली. यशवंतराव म्हणाले, जरा मोठ्याने म्हण. मग शिंद्यांनी ती सगळी कविता यशवंतरावांना ऐकविली. यशवंतराव म्हणाले, मला भटांची याहून चांगली कविता माहिती आहे आणि त्यांनी सुरेशची दुसरी एक कविता पाठ म्हणून दाखविली. पुढच्या सगळ्या प्रवासात शिंदे आणि यशवंतराव एकमेकांना सुरेशच्या कविता ऐकवीत राहिले.
शंकरराव चव्हाणांच्या करड्या दिसणाऱ्या व्यक्तिमत्त्वात कवितेला जागा असावी असा आरोप प्रथमदर्शनी तरी कुणाला करता येणार नव्हता. पण त्यांनाही सुरेश भट मुखोद्गत होता हे वृत्त आजही एका राज्यव्यापी अचंब्याचा विषय व्हावे.
सुरेशचा अनेकांवर राग होता आणि अनेकांचा त्याच्यावरही राग होता. तो तसा रहावा, असा त्याचा प्रयत्नही असायचा. मात्र लोकांच्या या रागाचा त्याच्या कवितेवरच्या प्रेमाशी संबंध नसायचा. मुळात त्याच्यासारख्या ढगळ प्रकृतीच्या आणि तेवढ्याच ढगळ पोशाखात वावरणाऱ्या (या पोशाखाचे रंगही एकमेकांशी मारामारी करायला निघालेले!) या माणसाला एवढी मुलायम कविता स्फुरते कशी हा अनेकांच्या मनातला तिढा. त्यातून त्याचे भन्नाट बोलणे सुरू झाले की कविता लिहिणारे सुरेश भट बहुधा दुसरेच कुणी असावेत असेच कुणाही सभ्य माणसाला वाटावे. ते बोलणे नुसते भन्नाटही नसायचे. आज्ञार्थक असायचे. ते तुम्ही ऐकलेच पाहिजे अशी त्यात सक्ती असायची. त्यात पुन्हा तुमचे बोलणे त्याने ऐकले पाहिजे असा आग्रह तुम्हाला धरता यायचा नाही. कारण सुरेश कवी होता. त्याची लहर बोलण्याची असली तर तो बोलणार. क्वचित कधी ऐकण्याची असली तर थोडं ऐेकणार. नाही तर एरव्ही तो तुम्हांला बोलूच द्यायचा नाही. पण बोलताना एखादे वाक्य त्याच्या तोंडून असे यायचे की, ऐकणाऱ्याला मोत्याचा सर लाभल्याचे समाधान मिळावे.
एकदा त्याचे एक अनाकलनीय पत्र आले. ‘या आठवड्यात येऊन भेट’ असा त्यात आदेश होता. ‘भेट झाली नाही, तर त्याचा पश्चात्ताप आपल्या दोघांनाही पुढे आयुष्यभर होत राहील’ असे एक गूढरम्य वाक्य त्यात होते. मी गेलो. नेहमीप्रमाणे गप्पा झाल्या. मी विचारले, ते वाक्य कशासाठी? कविश्रेष्ठ म्हणाले, काही नाही रे, तुझ्याशी बोललो नव्हतो खूप दिवसांत, म्हणून.
एकदा एका पत्रात लिहिले होते, ‘रावण झालास तरी चालेल. पण हनुमान होऊ नकोस.’
आयुष्याची अखेरची काही वर्षे आपल्या असंख्य अनुयायांना सोबत घेऊन मराठीचा सगळा प्रांत गझलेच्या झेंड्याखाली आणायची मोहीम त्याने हाती घेतली होती. त्यासाठी गझलेच्या बाजूने मुळाक्षर ते बाराखडीपर्यंतचे सारे जय्यत तयार केले होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून अक्षरशः शेकड्यांनी तरुण मुले आणि मुली आपल्या रचना त्याच्याकडे पाठवायची. सुरेश त्या सगळ्यांना उत्तरे द्यायचा. त्यांच्या रचनांत सुधारणा सुचवायचा आणि प्रोत्साहन द्यायचा. या उपक्रमाने अनेक नवे व चांगले गझलकार महाराष्ट्राला मिळवून दिले. सगळ्या कविसंमेलनांतून सुरेशच्या या गझल-दिग्विजयाची चिन्हे दिसू लागली आणि अनेक नेमस्त समीक्षकांना ‘आता हे जरा आवरा’ असे सांगण्याची गरज वाटू लागली. पण त्याच्या उत्साहाला सीमा नव्हती आणि गझलेच्या पिकाला मोसमही अनुकूल होता.
गझल हा काव्यप्रकार मूळचा अरबी. त्या भाषेतून तो फारसीत आला. तिथून उर्दूत. हा सगळा प्रवास चारशे वर्षांपूर्वीचा. आज गझल तुर्की, पंजाबी, सिंधी, पुश्तु आणि हिंदीत लिहिली जाते. व्रज आणि भोजपुरीतही तिने अवतार घेतला आहे. पन्नासेक वर्षांपूर्वी ती गुजरातीत स्थिरावली. या तुलनेने मराठीतच तिचा स्वागत-स्वीकार जरा उशिरा झाला. आरंभीचे गझलकार गझलेच्या साच्यात आपल्या कविताच बसवीत. अजूनही हा प्रकार चालू आहे. पण मराठीत गझल या काव्यप्रकाराला स्वायत्त आणि स्वयंपूर्ण दर्जा मिळवून देणारा गझलकार सुरेश भट हा आहे, याविषयी मात्र कोणाच्याही मनात शंका राहू नये.
फिराख गोरखपुरींनी म्हटले की, रानकुत्र्यांच्या भीतीने पळालेली हरिणी जाळीत अडकावी आणि नेमके तेव्हाच तिच्यासमोर शिकाऱ्यांनी येऊन ठाकावे, अशा वेळी तिच्या कंठातून जो आर्त चीत्कार उमटेल तो म्हणजे गझल. गझल ही बोलकी वेदना आहे. तो करुणेचा आवाज आहे. प्रेम आणि समर्पणाचे आवाहन आहे. सुरेशचे सामर्थ्य हे की त्याने गझल लढाऊ होऊ शकते हे सिद्ध केले. गझल ही केवळ बोलकी वेदना नाही, ते लढाऊ हत्यार आहे आणि हे हत्यार सहस्रावधी दीन-दुबळ्यांच्या वतीने अन्यायकारी व्यवस्थेविरुद्ध प्रभावीपणे चालविता येते, हे त्याने दाखविले. त्याच्या सामाजिक जाणिवा एवढ्या तीव्र की त्यामुळेच बहुधा कुरुंदकरांनी त्याला ‘कम्युनिस्ट’ म्हटले असावे.
अर्ध्याहून अधिक आयुष्य कवितेच्या आणि गझलेच्या उपासनेत घालविलेला हा कवी निरीश्वरवादी होता. त्याच्या पुढचा खरा प्रश्न, एकीकडे तथाकथित थोरामोठ्यांचे अभिजात हितसंबंध आणि दुसरीकडे मराठी तरुणांची पिढी, यांत महत्वाचे कोण आणि काय हा होता आणि सुरेशचा कौल तरुणाईच्या बाजूने जाणारा होता.
नवा सूर्य आणण्याचे त्याचे आवाहन या बांधिलकीतून येणारे होते. म्हणूनच रसरशीत जीवनवादाचा मूर्तीमंत सोहळा त्याच्या कवितेत उभा राहिला. मात्र जीवनवादाच्या ओझ्याखाली चेंगरून जाण्याएवढी त्याची रचना दुबळीही नव्हती. सगळा मूल्यवाद कवेत घेऊन उंच झेपावण्याची ताकद या कवीच्या पंखांत होती. जो जीवनवादी असेल, तो स्थितिवादी असणार नाही. जे स्थितिवादी असतील त्यांनी आपल्या घराच्या अंगणात राहूनच तारे वेचावे, अशी शिफारस त्याच्या कवितेतून यायची.
सुरेश भट रसरशीत लिहिणार, रसरशीत जगणार आणि रसरशीतच जेवणार. चांगली पुस्तके संग्रही ठेवण्याचा एक देखणा षौक त्याला होता. सर रिचर्ड बर्टनच्या अरेबियन नाईट्सच्या सोळा खंडांपासून अनेक दुर्मिळ आणि बहुमूल्य नवी-जुनी पुस्तके त्याच्या संग्रहात होती. एक नंतरच्या काळात वाढलेले वेड उत्तमोत्तम गझलांच्या ध्वनिफिती जमा करण्याचे होते. सिंधी, पंजाबी, पुश्तु अशा अनेक भाषांमधल्या गझलांच्या नामवंत गायकांनी गायलेल्या ध्वनिफितींचा मोठा साठा त्याच्याजवळ होता. तुम्हांला संगीताचे कान असतील, तर तुम्हांला पुढ्यात बसवून त्या ऐकविणे हा त्याचा आनंद होता. माझ्याएवढेच त्याचे प्रेम तुम्हांलाही लाभले असेल तर त्यांतल्या चांगल्या ध्वनिफिती स्वखर्चाने नव्या फितींवर फितवून घेऊन त्या तुम्हांला देण्यातही त्याला रस होता. पण त्यासाठी तुमच्या घरी असलेला टेपरेकॉर्डर त्याच्या घरी असलेल्या टेपरेकॉर्डर एवढा दर्जेदार असावा अशी त्याची अट होती.
मात्र या सगळ्या षौकांतला त्याचा राजस षौक तबियतीने जेवण्याचा होता. त्याचे जेवण हा त्याच्या मित्रांच्या चर्चेतला नित्याचा चवदार विषय होता. जेवण सामिष असो नाहीतर साधे, तो अत्यंत चवीने जेवणार. आवडले तर चांगल्या गझलेतल्या प्रत्येक शेराला द्यावी तशी प्रत्येक घासाला दाद देणार आणि स्वयंपाक करणाऱ्याला वा करणारीला तृप्त आशीर्वाद देणार.
एकदा एका मारवाडी मित्राच्या हॉटेलात आम्ही जेवत असताना सुरेशने त्या मित्राला खडसावले, ‘मारवाडी हॉटेल असून तुमच्या इथे कांजीवडा कसा नाही? ये बात बराबर नही.’ मित्र म्हणाला, ‘सायंकाळपर्यंत थांबा. कांजीवडा बनवतो’ पण कविश्रेष्ठांजवळ कांजीवडा बनविण्याच्या पाकक्रियेचे सगळे शास्त्रीय अध्ययन असल्यामुळे त्या मित्राला अडवत तो म्हणाला, ‘सातआठ तासांत कांजीवडा कसा बनेल?’ आणि त्याने माझ्या मित्राला कांजीवड्याच्या सिद्धतेची सगळी प्रक्रिया तपशिलासकट सांगितली. मित्र म्हणाला, ‘उद्या थांबा आणि कांजीवडा खाऊनच जा.’ कविश्रेष्ठ कांजीवड्यासाठी मुक्काम करून थांबले. दुसऱ्या दिवशीच्या कांजीवड्यावर तो खूष आणि मी त्याच्या आग्रहापायी बेजार.
एक दिवस रात्री एका बऱ्यापैकी हॉटेलात जेवून आम्ही घरी परतलो. बराच वेळ गप्पा झाल्या. रात्री दीडचा सुमार असावा. माझ्या पत्नीकडे वळून कविश्रेष्ठ म्हणाले, ‘जया, आता मी सांगतो तसे खमंग फोडणीचे वरण आणि गरम फुलके बनव.’
नागपुरातल्या एका बड्या हॉटेलात जेवताना ऑर्डर देऊन मागविलेली एक डिश त्याने तीनदा परत केली. सोबतचे लोक ओशाळून चुळबूळ करू लागले. त्यांच्यावर गरजताना तो म्हणाला, अरे, घरी फुकट जेवताना आपल्या मिजाशी चालतात. इथे या डिशला आपण चांगले पाऊणशे रुपये मोजतो आहोत, पैसा मोजून काहीही का खायचे?
असा हा आमचा कविमित्र कीर्तीच्या शिखरावर असताना गेला. साऱ्या महाराष्ट्रात त्याच्या चाहत्यांचा परिवार पसरला असताना, त्याच्यावर जीव टाकणाऱ्या तरुण-तरुणींचा मोठा वर्ग त्याच्यासोबत असताना आणि समाजातल्या उच्चपदस्थांपासून सगळ्या स्तरांपर्यंत त्याची पाठराखण करणारी माणसे असताना गेला. साहित्याच्या वर्तुळात त्याची बऱ्यापैकी दहशत होती. मात्र एवढे सारे असून सुरेश अखेरपर्यंत अस्वस्थ होता. स्वतःशी असलेले त्याचे सनातन भांडण संपले नव्हते. संपूर्ण समाधान, पूर्ण तृप्ती त्याला मिळू नये हेच त्याचे प्राक्तन असावे आणि त्याने असे अतृप्त व असमाधानी रहावे ही आपलीही सांस्कृतिक गरज असावी.
जेम्स मिल म्हणाला, ‘डुकराच्या समाधानाहून ॲरिस्टॉटलचे असमाधान श्रेष्ठ आहे.’ ॲरिस्टॉटलचे असमाधान तत्त्वज्ञान जन्माला घालत असते आणि मागाहून येणाऱ्या अनेक पिढ्या त्या तत्त्वज्ञानावर पोसल्या जात असतात. एखाद्या प्रतिभावंताचे अस्वस्थपण तारकांचे लावण्य घेऊन येणाऱ्या देखण्या कविता जन्माला घालत असेल तर ते तसेच कायम रहावे असेच आपणही नाही का म्हणणार?
0 0
सुरेश माझ्याहून बारा वर्षांनी वडीलधारा. पण माझे-त्याचे संबंध आरंभापासून अखेरपर्यंत एकेरीचे राहिले. एका समारंभात मी त्याचा मान राखत तुम्ही-आम्ही सुरू केले तेव्हा तो डाफरून म्हणाला, ‘गेलास का दूर?’
आता तो नाही… त्याची कविता आहे. तिच्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांचा वर्ग आहे. त्याचा ओढवून घेतलेला रोष आता साऱ्यांच्या विस्मरणात गेला असेल. त्याच्यावर अनेकांनी धरलेला रागही इतिहासजमा झाला असेल. पुढेमागे लोक त्याचे दिसणे-वागणेही कदाचित विसरतील. मात्र त्याची कविता साऱ्यांच्या स्मरणात कायमची राहणार आहे.
(लेखक नामवंत संपादक व विचारवंत आहेत)
9822471646
( साधना डिजिटल अर्काइव्ह : 2 एप्रिल 2011 च्या साधना साप्ताहिकात ‘तारांगण’ या सदरात हा लेख सर्वप्रथम प्रसिद्ध झाला. पुढे साधना प्रकाशनाकडून ‘तारांगण’ हे पुस्तक प्रकाशित झाले.)
पुस्तक ऑनलाइन खरेदी करण्यासाठी लिंक : https://www.amazon.in/Tarangan-Marathi-…/…/ref=sr_1_fkmr0_1…
अप्रतिम लेख