-मेहमूद खान
पाचवीत असताना एक मित्र कविता म्हणू लागला
“बांडा मुसलमान, कातड्याचे कान
वेळवाची… अन दगडाचे…”
प्रथमतः दचकलो. नंतर प्रचंड चिडलो.
नंतर त्या अश्लील कवितेची कानाला सवयच झाली.आयटीआयमध्ये शिकताना यापद्धतीने पुन्हा ट्रोल व्हायला लागलो. “तुम्ही बांडे खतना कशाला करता? ४ बायका अन १२ पोरं कशाला पैदा करता? , असे सोबत शिकणाऱ्या प्रशिक्षणार्थींचे प्रश्न. त्यानंतर सामूहिक रूपाने कुत्सित हसणं. चिडवणं. २ वर्षे सतत हे वाट्याला आलं.
नंतर B.Com करत असताना थोड्याफार फरकाने हाच अनुभव यायचा. यवतमाळला लॉ कॉलेजला प्रवेश घेतल्यानंतर राहण्यासाठी शहराच्या वेगवेगळ्या भागात येथे रूम भाड्याने मिळेल का? असा प्रश्न विचारल्यावर, नाव काय? असा प्रश्न विचारला जायचा. मेहमूद खान म्हटल्यावर आपसूकच कपाळावर आठ्या पडताना पाहून मन खिन्न व्हायचं. पुढे अजित चोपडे, गोपाल पुरोहित हे मित्र भेटले. यांच्याकडून मात्र मुस्लिम तिरस्काराची कधीच अनुभूती आली नाही. एवढेच नव्हे तर अजितसोबत नंतरच्या कालखंडात एकाच खोलीत आम्ही ब्राह्मण, मुस्लिम असे आम्ही सोबत राहत होतो.जेवत होतो. १० बाय १०च्या रूम मध्ये एकाचवेळी माझी नमाज अन अजितची पूजाअर्चा चालायची. गोपालच्या घरी रात्र रात्र भर नाटकांची तालीम चालायची.आजही हे जिगरबाज दोस्त आहेत.
पुढे ‘लोकमत’ मध्ये काम वार्ताहर म्हणून काम करतांना देखील अनेक जण कुतूहलाने मुस्लिम विश्वाबाबत काही कपोलकल्पित रहस्यमयी प्रश्न विचारायचे. शंका निरसन झाल्यावर समाधानी व्हायचे. मला मराठी साहित्याची आवड असल्याने मी कुसुमाग्रज, विंदा करंदीकर पासून पु. ल. देशपांडे, ग्रेस,पाडगावकर, मर्ढेकर असे भरपूर वाचन केले. या वाचनातून एक गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे मराठी साहित्यात मुस्लीम जग जवळपास नाहीच. मुस्लिमांबद्दल ऐकीव गोष्टीच अधिक आहेत . प्रत्यक्षात मुस्लिमांचं जगणं फारच कमी लोकांना माहीत आहे . मी या विषयात नेहमी विचार करायचो . मुस्लिमांचे धार्मिक ग्रंथ हे अरेबिक मध्ये असल्याने त्यात नेमकं काय आहे, हे अनेकांना माहितच नाही . एवढंचं काय रोज पाच वेळा नमाज पडणाऱ्या मुस्लीमांपैकी काही जणांना त्या प्रार्थनेचा अर्थही माहीत नाही . भाषा ही गैरसमज वाढविण्यात चांगलीच मदतगार ठरली आहे.
वेगवेगळ्या हिंदू मित्रांसोबत बोलताना भारतीय मुसलमानांची सामाजिक जीवनातील अलिप्ततेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाल्याचे लक्षात आले . त्या प्रश्नांचे समर्पक उत्तर मुसलमानांना देता येत नाही. कोणी प्रयत्न केला तर इतर समाजाला ते ऐकण्याची इच्छा नाही. यातून मुस्लिमांबाबत प्रचंड चीड व द्वेष आपसूकच तयार होत जातो. मुस्लिम समाज बहुतेक शहरात मुस्लीम वस्तीतच राहतो . त्यामुळे बाहेरच्या जगात काय चालते, याची त्यांच्यापैकी अनेकांना कल्पनाच नसते, हेही अनुभवातून लक्षात आले.
मी माझ्या गावात मस्जिदचे व्यवस्थापन काही वर्ष पाहिले. त्यादरम्यान एक बाब मला प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे मुस्लिम लोकांची संपूर्ण जीवनपद्धत ‘कुराण’ आणि महम्मद पैगंबरांनी सांगितलेल्या ‘हदीस’ या ग्रंथानुसार चालते. या धर्मग्रंथात कुठेही हिंसाचाराने वागणे,अन्य धर्मीयांचा द्वेष करण्यास सांगितले नाही.इतर धर्मीयांना त्रास देणारे ,अनुचित वागणारे हे गुन्हेगार आहेत असे त्यात स्पष्ट लिहिलेले आहे. गैरवर्तणूक, व्यवहार यांना “हराम” तर सदाचाराला “हलाल” संबोधले जाते. पण सर्वधर्मीयांत असणारे काही नालायक व उपद्रवी लोक याही समाजात आहेत. त्यामुळे सर्वच मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात बदनाम झाला आहे. काही मोजक्या धर्मांध व नालायक लोकांमुळे समस्त मुस्लीम समाज बदनाम होतो आहे. हे कमालीचे निराशाजनक आहे. काही जणांच्या अतिरेकी कृत्यामुळे बाकी समाज मुस्लिमांबाबत प्रचंड चीड बाळगून आहे.सोशल मीडियाचा फेरफटका मारला तर लोकांमध्ये मुस्लिमांबाबतचा संताप आणि त्यांच्याबाबत किती खोलवर विष भिनले आहे, हे दिसून येते.
मुस्लिम ८- ८दिवस आंघोळ करीत नाही, मुस्लिम हरामखोर,बेईमान,आतंकवादी,हिंसेखोर, बिनडोक,अडाणी असतात. त्यांच्या मोहल्यात गेल्यास ते मारतात. लव जिहादच्या माध्यमातून ते हिंदू मुलींचे आयुष्य बरबाद करतात. त्यासाठी त्यांना पैसे मिळता. ,मुस्लिम कडवे धर्मवेडे असतात,मुजोर असतात. अशा खूप काही समजुती आहे . त्यामुळे यांचे आता खूप लाड झालेत . यांना आता या देशातून हुसकावून लावले पाहिजे . हे माजले आहेत , यांना आता धडा शिकविलाच पाहिजे . इतिहासात यांनी आपल्यावर प्रचंड अत्याचार केले आहेत. आता आपली वेळ आहे यांना धडा शिकविण्याची.असे खूप काही बोलले जाते.
हे सर्व पाहून मन खिन्न होते.उदास होते.’बांडे,कटवे ‘असे दूषण ऐकून संताप येतो. हतबलता येते .मात्र त्याचवेळी हिंदू समाजातील अनेक सुजाण माणस आम्हाला समजून घेवून आमचे प्रश्न , आमची मानसिकता समजून घेतात, आमच्यापैकी सगळे अतिरेकी नाहीत. धर्मांध नाहीत हे पोटतिडकीने मांडताना दिसतात तेव्हा आशाही निर्माण होते . दोन्ही बाजूला काही मोजके विकृत,धर्मांध असले तरी अजूनही समाजातील मोठा वर्ग सहिष्णुतेच्या पायावर उभा आहे, हे पाहून बरेही वाटते. आमच्या समाजातील काही चुकीच्या नादान लोकांमुळे संपूर्ण समाजाचे अस्तित्व पणाला लागलो आहे . पुढे काय होईल काहीच माहीत नाही . एक प्रचंडअसुरक्षितता आहे.
(लेखक यवतमाळ जिल्यात विधिज्ञ आहेत)