सदर पुस्तकाच्या लेखनासाठी आपले ब्राह्मण बालमित्र भांडारकर यांनी आपल्याला सहकार्य केले अशी कृतज्ञतापुर्वक नोंद जोतीरावांनी प्रस्तावनेत आवर्जून केलेली आहे. ” ख्रिस्त महमद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधुपरी जोती म्हणे!” हेच तर त्यांचे ब्रीद होते. हे शिवचरित्र लिहिण्यासाठी जोतीरावांनी अनेक संदर्भ साधनांचा धांडोळा घेतला. मराठीतील विविध बखरी, फारशीमधील तवारिखा, इतिहास ग्रंथ, इंग्रजी भाषेतील नानाविध ऎतिहासिक पुस्तके यांचा सखोल व्यासंग करून मोठ्या तयारीनिशी जोतीरावांनी हा ग्रंथ सिद्ध केला. गेली १५१ वर्षे तो सर्वत्र उपलब्ध आहे. किती शिवप्रेमींनी तो वाचलाय? उलट बहुतेक सगळेच उच्चभ्रू शिवचरित्रकार आणि शिवशाहीर या पुस्तकाची ठरवून उपेक्षा करतात.