संजय गांधींचे कट्टर समर्थक असलेले आणि थेट दिल्लीतूनच उमेदवारी मिळवलेले सतीश चतुर्वेदी , तेव्हा पहिल्यांदाच पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आणि अंतुलेंच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्रीही होते .नंतरच्या निवडणुकीत संजय गांधींचे भक्त असलेल्या सतीश चतुर्वेदींची उमेदवारी कापण्यात आणि त्या विधानसभा मतदारसंघात अविनाश पांडेची वर्णी लावण्यात श्रीकांत जिचकारांनी यश मिळविले . सतीश चतुर्वेदींनी बंडखोरी करुनही अविनाश पांडे विजयी झाले . वैभवसंपन्न कौटुंबिक पार्श्वभूमी असणारा आणि अतिशय सुसंस्कृत , अशी अविनाशची प्रतिमा त्या काळात निर्माण झालेली होती . राजकारणातलं त्याचं भवितव्यही उज्ज्वल असल्याचे संकेत मिळत होते . पुढील फेरबदलात त्याला मंत्रीमंडळात संधी मिळणार असं जिचकार सांगू लागले आणि नेमकं याच काळात अविनाश एका नको त्या वादात सापडला .