आयुष्यातल्या काही आवडींसाठी मी अत्यंत unapologetic आहे. कारण मग मी त्यासाठी अत्यंत बायस्ड असते. जसं की शूजित सिरकार , जुही चतुर्वेदी या जोडगोळीचे चित्रपट. आपल्या अत्यंत साध्या सोप्या विषयांमध्ये हात घालून सोन्यासारखी स्क्रिप्ट लिहिणारी जुही चतुर्वेदी आणि त्या सोन्याचा कुठेही झगमगाट होऊ न देता ते अगदी रोजच्या वापरातलं आहे पण बेशकिमती आहे ही जाणीव करून देणारा सेन्सिबल दिग्दर्शक शूजित सिरकार. सिनेमा बनवावा तर तो यांनीच. कोरोनामुळे सध्या चित्रपटगृह बंद असल्याने “गुलाबो सिताबो” हा यांचा चित्रपट अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला आहे. अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यामधले लीड ऍक्टर असले तरी शूजित सिरकारच्या चित्रपटांच्या नायकांचं हे वैशिष्ट्य असतं की , त्याला अत्यंत सहज आणि नेकेड अशा ह्युमन इमोशन्स असतात आणि म्हणून या चित्रपटाचा हिरो म्हणाल तर याच अनटच्ड आणि अनएक्स्प्लोअर्ड इमोशन्स आहेत.
सगळ्यात आधी तर’ आज कित्येक महिन्यानंतर पिक्चर पाहायला मिळाल्यामुळे अपरिमित आनंद वगैरे झाला आहे. अर्थात थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघता आला नाहीये पण शुक्रवारच्या फर्स्ट डे फर्स्ट शोच मूव्हिगॅझम अनुभवता आलं आणि तेही शूजित सिरकारच्या पिक्चरमुळे. हे म्हणजे पुण्यातल्या कोणाकडे अचानक जाऊन, त्यांनी गोड स्मित करून तुम्हाला प्रेमाने घरात घेऊन,न विचारता चहा बरोबर चक्क पोहेसुद्धा द्यावे, असं आहे.चित्रपटाची गोष्ट काय आहे हे तसंही मी कधीच सांगत नाही. पण चित्रपट पहाताना काय वाटलं हे सांगतेय. त्यामुळे यात कोणतेही स्पॉयलर्स नाहीयेत.
मिर्झा म्हणजे अठ्ठ्याहत्तर वर्षीय अमिताभ आणि त्याची बेगम पंच्याण्णव वर्षांची बेगम हे लखनौ मधल्या एका अत्यंत जुन्या हवेलीमध्ये ‘फातिमा महल’ मध्ये रहात असतात. तिथे राहणारे त्यांचे भाडेकरू आणि त्यात पिठाची चक्की चालवणारा आपला आयुष्मान (बांके) . गुलाबो- सिताबो या आहेत कठपुतळ्या. ज्या सतत एकमेकींशी भांडत बसतात.जसं की बांके आणि मिर्झा. वडील गेल्यानंतर पाठच्या चार बहिणींना शिकता यावं म्हणून सहावीत असतांनाच शाळा सोडून बांकेला वडिलांची गिरणी चालवायला घ्यावी लागते आणि आयुष्य अक्षरशः चक्की पासिंगमध्ये निघून जात असतं.आयुष्मान भाडं बुडवत असतो आणि बुढाऊ मिर्झा मुळात अत्यंत लोभी असल्याने त्याला या भाडेकरूला हवेलीतून कायमस्वरूपी काढून टाकायचं असतं. हवेलीमध्ये मन अडकून पडलेला म्हातारा. जो अत्यंत लोभी आहे. बेगमला मिळालेली तिची वडिलोपार्जित हवेली ती गेली की आपली होईल, यासाठी तो जीवाचं रान करतो आहे. हा असा मिर्झा. अमिताभने ‘पिकू’ मधला जो बंगाली बुढ्ढा वठवला होता त्याचं अत्यंत कॉन्सन्ट्रेटेड खास लखनवी version म्हणजे हा मिर्झा. बेहद खतरनाक. या म्हाताऱ्याचं कॅरेक्टरयझेशन इतकं रिअल आहे की काही क्षणांमध्ये आपल्याला ते झेपत नाही. फारुख जफरची बेगम मस्तच. आयुष्मानने कॅरेक्टर मस्तं पकडलं असलं तरीही अमिताभ, ब्रिजेंद्र काला, विजय राझ हे मला स्वतःला अधिक ठळक वाटले आणि जास्त भावले सुद्धा. आयुष्यातली खिन्नता अत्यंत प्रसन्नपणे दिग्दर्शकाने यात दाखवली आहे. ही सगळी गोष्ट फिरते एका हवेलीभोवती. चित्रपटाची संथ लय, बॅकग्राऊंडला अत्यंत समर्पक अशी गाणी, उत्तम साऊंड स्कोअर आणि काहीही प्रूव्ह करून दाखवण्याचा अट्टहास नसल्याने सहजरित्या उलगडत जाणारी माणसांची काहीशी तुटक, काहीशी विद्रुप, काहीशी अप्पलपोटी आणि आणि काहीशी प्रेमळ रूपं. माणसांच्या माणूस असण्याची आणि नसण्याची ही गोष्टं. बस.. इतकंच? …तर नाही.. कॉन्स्टिपेशन असो, कोमामध्ये गेलेलं प्राजक्ताचं फुलं असो वा लखनौमधली जुनी हवेली… या दिग्दर्शकाची कमाल हीच की तो हे सगळं अशा इमोशन्सची जोडतो की चित्रपट पाहून संपला की आपल्यातलं काहीतरी उघडं पडलंय असं वाटत राहतं.
चित्रपट काही सांगू पाहतो का, या भानगडीत हा दिगदर्शक कधी पडतच नाही. तो आपली गोष्ट सांगून मोकळा होतो.. या पिक्चरमध्ये भन्नाट असे डायलॉग्ज आहेत. चित्रपटातली खास उर्दू मिश्रित भाषा ही सुद्धा अत्यंत लाघवी. एकदा मिर्झा आयुष्मानचं पांघरूण घेऊन आला असतो. तो चिडून जेव्हा तो घेऊन जातो, तेव्हा मिर्झा त्याला म्हणतो,की, ‘ले जाओ.. वैसे दिन भर पादे हे हम आज…’ जाम खदखदून हसू येतं. या अशा खऱ्या ह्यूमनाइज्ड इमोशन्स पाहायला मिळणं रेअरिटी आहे आणि अशा कित्येक जागा या चित्रपटात आहेत. एका सिनमध्ये स्वतः अप्पलपोटा असणारा आयुष्मान मिर्झाला म्हणतो, ‘मिर्झा, लालच जहर की तरह होता है, आदमी को अंदर से मार देता है’ यावर मिर्झा म्हणतो, ‘आजतक मैंने कभी सुना नहीं है के लालच से कोई मर गया हो… यह हवेली हमारी लालच नहीं.. उल्फत है , मोहोब्बत है हमारी… ‘ उफ्फ्फ हे असे डार्क डायलॉग्ज आहेत. आपण आपल्या लोभाला प्रेमाचं नाव देऊन स्वतःची सुटका करू पाहतोय का? असा विचार करायला लावणारे बरेच प्रसंग या चित्रपटात येतात.
हवेलीसाठी स्वतःपेक्षा वयाने पंधरा वर्ष मोठ्या असलेल्या बेगमशी लग्न करणारा मिर्झा, अब्दुल रेहमानवर प्रेम असूनही हवेली सोडून जायचं नसतं म्हणून मिर्झासोबत लग्न करणारी बेगम, बहिणींना शिकता यावं म्हणून चक्की पिसणारा आयुष्मान, शिकून स्मार्ट झालेली आणि स्वतःच रस्ता शोधू पाहणारी गुड्डू, सरकारच्या नावावर जमीन हडपणारा ऑफिसर, वकिली करून बिल्डरची पोटं भरणारा वकील, आयुष्मानला सोडून वेल सेटल्ड माणसाशी लग्न करून त्याला जागा दाखवू बघणारी त्याची एक्स गर्लफ्रेंड. यात जास्तं लोभी कोण? घराच्या मागे आज ही शेकडो लोकं धावत असतात. घर नक्की बनतं कशाने? त्यातल्या माणसांनी? त्या घरामधल्या मोठं मोठ्या सामानाने? तिथे व्यतित केलेल्या क्षणांनी की, शेवटी त्या चार भिंतीच असतात? आज आपल्या बरोबर जी माणसं आहेत ती का आहेत आपल्या सोबत? नीट ऐकलं आणि पाहिलं तर असा अत्यंत दचकवायला लावणारा असा प्रश्न हा चित्रपट विचारतो आणि त्यावर नको असलं तरी विचार करायला लावतो.
म्हणजे असं काय आहे आता तुमच्याकडे, ज्यामुळे तुम्हाला आपली अशी वाटणारी माणसं तुमच्या अवती भोवती आहेत? आणि मग ते जे काही असेल ते गेलं निघून समजा तर राहतील का ती? आणि राहाल का तुम्ही सुद्धा आपल्या अशा माणसांबरोबर? काही गोष्टी उलगडून बघू नयेत कारण बघायला बसलं तर त्यातलं वास्तव मग आयुष्यभर आपले वडे तळत बसतं आणि हेच वास्तव हा चित्रपट आपल्याला अत्यंत सुमधुर पण बोचणाऱ्या पद्धतीने दाखवून देतो. आता गंमत अशी की बोच ही अत्यंत मजेशीर गोष्ट असते. काहींना अगदी लोखंडी सळई तापवून लाल केली आणि घुसवली कातडीमध्ये तरीही ती बोचत नाही आणि काहींना पापणीचा साधा इटुकला केस डोळ्यात गेला तरी पाण्याच्या धारा वाहतात. सो आपापल्या कातडीनुसार हे बोचत असणार आणि हेच फार प्रभावीपणे हा दिग्दर्शक दाखवून देतो.. कळत- नकळत.
लोभ… पैशाचा, जागेचा, सत्तेचा, प्रसिद्धीचा, प्रशंसेचा, दुसऱ्याला कमी लेखण्याचा, निर्जीव वस्तूंचा, सजीव वस्तूंचा, मटेरिअलिस्टिक गोष्टींचा. लोभ ही भावना असते का प्युअर? तर असते. कित्येक लोक अगणित प्रकारचे लोभ बाळगून जगतात.. स्वतःच्याही नकळत कधी कधी.. त्या जोरावर हव्या त्या गोष्टी मिळवत राहतात. त्यांना वाटतं प्रेम सुद्धा मिळेल. मिळत असेल सुद्धा कदाचित.. कधी कधी प्रेमाचा लोभ होऊन जातो. लोभाचं प्रेम होऊन जातं.आपण दुनियेला गंडवत जातो, दुनिया आपल्याला गंडवत जाते. लोभाने कोणाचा जीव जात नाही पण त्यामुळे जगणं विसरून जातो माणूस. क्षण हातातून निसटून जातात. प्रेम सुद्धा उडून जातं. लोभ विकत घेता येतील अशा सगळ्या गोष्टी कदाचित देऊ शकतो. इतकी स्ट्रॉंग इमोशन आहे ही. पण एक गोष्ट जी मिळू शकत नाही आणि ती म्हणजे सुकून. आता तो हवाय कोणाला? तर असं आहे की हवाय ज्यांना ते बघत बसतील जुन्या पुराण्या खुर्चीत बसून बाहेर कोसळणाऱ्या पावसाला आणि ज्यांना नकोच आहे सुकून, ते तीच खुर्ची विकून मिळेल ते पैसे घेऊन, उभं राहून खात बसतील गरम गरम कांदा भजी. चॉईस आपल्याकडेच आहे आणि राहील कायम. हा चित्रपट म्हणजे अत्यंत सुरेख असं पान आहे. शांत पणे चघळत खावं, काहीसं गोड, मधूनच दातात येणारी सुपारी. हळूच घशाखाली उतरावं आणि मग त्याची चव रेंगाळू द्यावी जिभेवर.. जमेल तितकं जास्त वेळ आणि मग आठवत राहावी ती चव… नंतरही बराच वेळ. प्राजक्ताच्या फुलाचा वास जसा आजही आठवतो तसंच काहीसं…This Gem is definitely not to be missed.. Cheers to ‘गुलाबो सिताबो’!
(लेखिका संशोधिका असून पाणी प्रदूषण या विषयात काम करतात . त्यांची स्वतःची या विषयात काम करणारी ‘इकोसोल’ नावाची कंपनी आहे . वेगवेगळ्या भाषेतील पुस्तकं वाचणे, चित्रपट बघणे व त्याविषयात लिहिणे ही त्यांची आवड आहे )