प्रस्तुत अहवाल अलीकडेच माझ्या वाचनात आला. त्याचे वाचन म्हणजे शहारे आणणारा अनुभव होता. या अहवालाविषयी बोलण्याआधी हिमालयाविषयी काही महत्त्वपूर्ण तथ्ये लक्षात घेऊ. कितीही नयनरम्य असल्या तरी या पर्वतरांगा पर्यावरणीय दृष्ट्या नाजूक आणि विशेषकरून भूकंप आणि पूरप्रवण आहेत. आणि तरीही लागोपाठच्या सरकारांनी हिमालयाच्या या वैशिष्ट्यांकडे दुर्लक्ष करत हिमालय व हिमालयीन नागरिकांवर चारही बाजूंनी अविरत हल्लेच केलेले आहेत. व्यावसायिक वनीकरणाचा प्रचार, विवृत्त (open cast) खनन, भव्य जल प्रकल्प, अनियोजित पर्यटन याचा एकत्रित परिणाम म्हणून येथे विषारी कचऱ्याच्या साठ्यांना ऊत आलेला आहे, वायूप्रदूषण वाढत आहे. सोबतच जंगले व जैवविविधता यांचेही नुकसान झाले आहे. यामुळे पाण्याचे स्रोत घटत आहेत आणि भूस्खलन व पूर वाढले आहेत. या सगळ्यात भर म्हणून मोठाले रस्ते बांधून हिमालयावर पाचवा हल्ला केला जातो आहे. यामुळे मुळातच उद्ध्वस्त झालेल्या पर्वतरांगांची अधिकच नासधूस होणार आहे.
हे तज्ज्ञ चार धाम योजनेमुळे झालेल्या विनाशाविषयी लिहितात, ‘उतारानंतर उतार ढासळू लागले आहेत. रस्ते हस्तांतरणात मिळवलेल्या २४ मीटरपेक्षाही अधिक खोलात असलेल्या डोंगरांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे पाण्याचे स्रोत बुजवले गेले, जमिनीवरची मूल्यवान माती- जी तयार व्हायला शतकानुशतके लागतात व ज्या मातीत झाडे वाढतात ती- कचऱ्यासारखी उपसून टाकण्यात आली, तितकीच मौल्यवान जुनी-नवी झाडे पाडण्यात आली, पुन्हा नवे भूस्खलन होऊन अनेक नवी झाडे कोसळली, या सगळ्यातून तयार झालेला कचरा दरीच्या पायथ्याशी उताराला इतक्या निष्काळजीपणे टाकून देण्यात आला की, नद्या आणि पाण्याचे इतर स्रोत तुंबून राहिले. धूळ आणि कर्कश्य आवाजाने दरीतील शांतता लोप पावली, मोठमोठे दगड त्यांच्या जागेवरून हलवून पायथ्याशी फोडण्यात आले, या चालू कामामुळे आणि दरडी कोसळण्याने होणारी वाहतुकीची कोंडी हा नवा दिनक्रम झाला, यामध्ये अनेक प्रवासी आणि कामगारांचे दुखापत होऊन मृत्यू झाले आणि हे सगळं होत असताना संपूर्ण देशाला त्रयस्थासारखे बाजूला उभे राहून मौज पाहण्यास भाग पाडण्यात आले.’