वेदांतसुद्धा पिकवाढीचे मंत्र आहेत. अथर्ववेदात तर त्याचा फार मोठा भरणाच आहे. निवळ श्रद्धा आणि अंधभक्ती यांखेरीज या गोष्टींना महत्त्व नाही. भरल्या पिकात स्त्रीपुरुषांनी समागम केला वा त्यात रजस्वला स्त्रियांनी निजवल्या तरी तेथील पीक वाढते अशा समजुती काही भागांत आहेत. त्यांनाही केवळ परंपरागत श्रद्धा व भक्ती यांखेरीज दुसरा आधार नाही.
इथे नीतीविषयीही एक गोष्ट नमूद केली पाहिजे. नीती ही सदासर्वकाळ व सर्व स्थळी सारखी नसते. एका समाजाचे नैतिक व्यवहार दुसऱ्यात अनीतीचे ठरण्याची शक्यता असते. आदिवासींच्या अनेक जमातींत मुलींना लग्नाआधी लैंगिक स्वांतत्र्य दिले जाते. ते मुलांनाही असते. त्यांना मैथुनाचे धडे द्यायला गोटूल ही संस्थाही काही जमातींत असते. हिंदूंमध्ये सगोत्री विवाह निषिद्ध तर मुसलमानांमध्ये तेच सर्वाधिक पवित्र असतात. महाराष्ट्रात मामेबहिणीशी लग्न चालते. कर्नाटकात व आंध्रात मामाचे व भाचीचेही लग्न धार्मिक ठरते. आजच्या जगाने जातिबाह्य व धर्मबाह्यच नव्हे… तर आंतरराष्ट्रीय लग्नेही मान्य केली आहेत. त्याहीपुढे जाऊन अनेक देशांनी समलैंगिक विवाहांना मान्यता दिली आहे. आयनरँड ही तत्त्वचिंतक विदुषी त्याचमुळे म्हणते, नीती ही समाजाची लहर आहे. ती बदलत असते आणि तिचे निश्चित व सार्वकालिक नियमही नसतात. प्रत्येक समाज व वर्ग आपल्या सुरक्षेच्या व स्वास्थाच्या संदर्भात असे नियम तयार करतो. त्यांत कालानुरूप बदल करतो. मग जुने नियम कालबाह्य होतात व त्यांची जागा नव्या नियमांनी घेतलेली दिसते.
याखेरीज आणखीही एक बाब हरिप्रसाद शास्त्रींचे म्हणणे निराधार ठरवणारी आहे. जगाच्या पाठीवर अतिप्राचीन काळात असाव्या तशा मूळ स्वरूपात जगणाऱ्या जमाती आहेत. अंदमानात व काही दूरस्थ बेटांवर अजून विवस्त्र वावरणाऱ्या रानटी जमाती आहेत आणि त्याही काही विधींचा वापर उत्पन्न व जमात यांच्या वाढीसाठी करताना आढळल्या आहेत. हे विधी त्यांच्या समजुतीनुसार फल प्रदान करणारे असले तरी प्रगत समाजाला ते केवळ अज्ञानमूलकच नव्हे तर असभ्य वाटावेत असे आहेत.
तिकडे गॅलिलिओने पृथ्वी गोल असल्याचा व ती सूर्याभोवती फिरत असल्याचा बायबलविरोधी सिद्धान्त मांडला. पुढे बायबलच्या व चर्चच्या धाकाने त्याने तो मागे घेतला… तरी त्याचे अनुयायी व विद्यार्थी त्याचे अध्ययन पुढेच नेत राहिले. अखेर चर्च नरमले व गॅलिलिओ श्रेष्ठ ठरला. बायबल आणि कुराण यांतील माणसांची आयुष्ये व ईश्वराने निर्माण केलेले जग यांचा एकत्र इतिहास पाहिला तर जगाचे वय दहा हजार वर्षांमागे जात नाही. आजचे जग हे अमान्य करते. ती मान्यता नाकारणे मध्ययुगातच सुरू झाले होते. त्यात सगळे देश व त्यातले वैज्ञानिक पुढे होते. स्वतःला तांत्रिक वा चार्वाक मताचे न मानणारे संशोधकही यात पुढे होते.